राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
संघ : - मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - १०
संघ : - मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - १०
\" यावेळी, आता दुपारचे कोण आले असेल? \" सुट्टीच्या दिवशी, दुपारीही शांत पडायला मिळत नाही.\" विचार तिच्या मनात आला. तिला उठण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिने उठून दरवाजा उघडला.
तिनेचं, ऑनलाईन शॉपिंग केलेले पार्सल घेऊन कुरिअरवाला आला होता. खरंतर ते पार्सल तीन दिवसांपूर्वीच येऊन परत गेले होते. आईने तिला ओ टी पी. नंबरसाठी, ती ऑफीसमध्ये असताना दोन वेळा फोन केला होता. पण तिनेच कामात बिझी असल्यामुळे आईचा फोन उचलला नव्हता. नाईलाजाने आईने कुरिअर वाल्याला सुट्टीच्या दिवशी यायला सांगितले होते.
तिने पार्सल घेतले नी स्वतःच्या रूममध्ये घेऊन जाताना, आईच्या रूममध्ये डोकावून पाहिले. आई स्वतः च्याच गुडघ्याला बाम चोळत बसली होती.
वैभवी पुन्हा स्वतःच्याच विचारत गुरफटत गेली. \"आठवड्यातून एक दोन तरी माझी नी मुलांची ऑन लाईन शॉपिंग केलेली पार्सल्स घरी येतात. कधी गॅस सिलेंडर वाला, तर कधी फोनवर ऑर्डर केलेले वाण सामान घेऊन कोणी. मला माझेच पार्सल असूनही, दरवाजा उघडून घ्यायला कंटाळा येतो. आई तर, पार्सल आल्यावर आधी मला फोन लावते. एकदा नाही लागला किंवा उचलला तर पुन्हा पुन्हा ती फोन करत राहते. माझ्याकडुन ओ टी पी नंबर मिळाल्यावर, कुरिअर वाल्याला देऊन नंतर पार्सल घेत असते. त्यात तिच्या दुपारच्या झोपेचं किती खोबरं होत असेल? कल्पनाही करवत नाही. तरी तिने माझ्याकडे चुकूनही कधी तक्रार केली नाही.\"
तिच्या मनात आले \" चोळून द्यावा का मी आईचा गुडघा? \" पण तिने तसे केले नाही. ती पुन्हा जाऊन बेडवर आडवी झाली.
आज वैभवी शरीराने आणि मनानेही खूपच थकली होती. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. मुले जागी झाली होती. आईने त्यांना दुपारी स्वतःकडेच झोपवले होते. समीरचाही आराम करून झाला होता.
वैभवी आता यंत्रवत उठली. दुपारच्या चहाची वेळ झाली होती. समीरने तिला मुलांची तयारी करायला सांगितली होती. नेहमीप्रमाणे तो त्यांना कॉलनीमध्ये सायकलवर फिरायला घेऊन जाणार होता.
समीर चहा पिण्यासाठी सहज म्हणून बाल्कनीत उभा राहिला. बाल्कनीतल्या कुंड्यातली झाडे आज त्याला नेहमीसारखी ताजीतवानी वाटली नाही. त्याने वैभवीला आवाज देत विचारले, " आज झाडांना पाणी घातले नाही का? "
" नाही घातले. आज ज्योती आली नाही त्यामुळे सकाळ पासून मला वेळच मिळाला नाही. आई रोज पाणी घालते, त्यामुळे माझ्या ते लक्षातही आले नाही." वैभवीने शांतपणे कबूल केले.
\" रखमा झाडांना पाणी घालायचे, महिन्याचे फक्त दोनशेच रुपये मागत होती. दोनशे रुपयांनी तुला काय एवढा फरक पडणार आहे? देऊन टाक. समीरही म्हणाला होता. पण तेव्हा सासू आणि आता आई घरीच असते. म्हणून मीच तिला नको म्हंटले होते. पैसे वाचवण्याच्या नादात, मी नकळत आईला आणि सासूबाईंना किती त्रास देत होते? \" वैभवीला आता प्रत्येक गोष्टीत तिची चूक प्रकर्षाने जाणवू लागली होती.
" ठीक आहे. मी घालतो झाडांना पाणी. तू मुलांची तयारी कर.", समीर तिला म्हणाला.
सर्वांचे चहापाणी झाल्यानंतर, वैभवीने रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. सकाळीच दोन वेळेची चिकन करी बनवलेली होती. त्यामुळे मुलांसाठी डाळभाताचा कुकर आणि त्या दोघांसाठी चपात्या आणि आईला ज्वारीची भाकरी बनवायची होती. मुख्य म्हणजे \"भाजी काय बनवायची\" याचे टेन्शन आता तिला नव्हते म्हणून मनातून, त्यातल्या त्यात तिला हायसे वाटले होते.
ती चपात्या लाटत असतानाच दरवाजाची बेल वाजली. \" समीर, मुलांना घेऊन इतक्या लवकर कसा काय आला? \" असा विचार करत तिने गॅस कमी करून दरवाजा उघडला.
बाहेर धोबी उभा होता. इस्त्रीसाठी कपडे न्यायला आला होता. तिने हात धुवून त्याला कपडे आणून दिले. डायरीमध्ये कपड्याची नोंद करून ठेवली. दार लावून पुनः ती ओट्या जवळ उभी राहिली.
आज घरात वैभवीची खूपच उठबस झाली होती. नेहमी इतके काम करण्याची सवय नसल्यामुळे तिचे अंग भरून आले होते. स्वयंपाक आवरून ती ओटा पुसून बसणारचं होती. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. घरात आई किंवा समीर असताना, दरवाजा उघडायला कधी न उठणारी वैभवी आज प्रत्येक वेळी नाईलाजाने दरवाजा उघडत होती. दरवाजा उघडायचे सुद्धा एक काम असते, याचा ती स्वतः आज अनुभव घेत होती.
समीर आणि मुले परत आली होती. वत्सलाबाई रुममधून बाहेर आल्या. त्यांनी देवाला दिवाबत्ती लावली आणि कोणाशीही काही न बोलता पुन्हा रूममध्ये जाऊन बसल्या. समीरने त्यांच्या रुममध्ये जाऊन, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. परंतु त्यांनी " विशेष काही नाही. थोडा आराम केला की बरे वाटेल.", असे सांगून वेळ मारून नेली.
आजच्या रात्रीच्या जेवणानंतर, वैभवीने आदल्या दिवशी विसरलेली सगळी कामे आठवणीने केली. आज दिवसभरात ती एकदाही निवांत बसली नव्हती. मोबाईलला चार्जिंगला लावायला सुद्धा, हात तिने लावला नव्हता की टिव्हीचा रिमोट उचलला नव्हता. आज कामाने, विचार करून आणि डोळ्यातील आसवे गाळून ती पुरती गळून गेली होती.
वैभवीची, आज सतत झालेली धावपळ बघून वत्सलाबाईंना शेवटी तिची दया आलीच.
लवकुशला त्यांनी स्वतः जवळ झोपायला ठेवून घेतले. वैभवीने सर्व काम आवरून दरवाज्याच्या कड्या लावल्या, हॉल किचनचे दिवे पंखे बंद करून ती बेडरूम मध्ये आली. बेडरूममध्ये, समीर आरामात बेडवर पाय लांब करून, पुस्तक वाचत बसला होता. ती फ्रेश होऊन बेडवर पडणार तोच पुन्हा दरवाजाची बेल वाजली.
लवकुशला त्यांनी स्वतः जवळ झोपायला ठेवून घेतले. वैभवीने सर्व काम आवरून दरवाज्याच्या कड्या लावल्या, हॉल किचनचे दिवे पंखे बंद करून ती बेडरूम मध्ये आली. बेडरूममध्ये, समीर आरामात बेडवर पाय लांब करून, पुस्तक वाचत बसला होता. ती फ्रेश होऊन बेडवर पडणार तोच पुन्हा दरवाजाची बेल वाजली.
आज तिला दरवाज्याची बेल जास्तचं वाजते असे वाटायला लागले होते. \"एवढ्या रात्रीचे कोण आले आता कलमडायला?\" रडकुंडीला येत तिने पुन्हा दिवे लावून, दाराच्या सर्व वरच्या, खालच्या लावलेल्या कड्या काढून दरवाजा उघडला. बाहेर तिला कोणीच दिसले नाही. तिला शंका वाटली, \"मला बेल वाजल्याचा भास तर नाही झाला नं? की खरेच कोणी मला त्रास देण्यासाठी बेल वाजवून गेले?\" म्हणून ती बाहेर येऊन जिन्याच्या दिशेने पाहू लागली. तिला कोणीच दिसले नाही. तिला जवळ जवळ रडू कोसळले होते.