अन् ती हसली ..... भाग - ९

When Mother Stays With Her Mairred Daughter


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  : -  मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली ..... भाग - ९


सासू-सासऱ्यांविषयी तिचे असलेले मत, बेजबाबदारपणा आईला अजिबातच आवडलेला नव्हता.  त्यामुळे आईचा रोष तिने ओढवून घेतला होता.  आई नाराज होऊन, तिच्या घरून गेलेली तिला चालणार नव्हते.  दादा वहिनीला कळले तर ते काय म्हणतील?  याचे तिला टेन्शन आले होते. 

एरव्ही दादा तिला फोनवर बोलताना हसत हसत टोमणे मारतच असतो.  स्वतःच्या सासू सासऱ्याला जवळ ठेवत नाहीस, पण  दादा वहिनीला मात्र आईबाबांची काळजी न चुकता घ्यायला सांगतेस अन् आता, बाबा तर राहीले नाहीत.  एकटी आईच तिच्याजवळ असून, ती मुलगी असूनही तिला आंनदी ठेवू शकली नाही, तिची हवी तशी काळजी घेतली नाही.  असे तिच्या माथ्यावर खापर फोडायला तो कमी करणार नाही.  याची तिला भिती वाटत होती.

कुश ही उठून आजीकडे गेला होता.  आई, त्या दोघांची सकाळची अंघोळ वैगरे तरी उरकेल, असे तिला वाटले होते.  पण आज तिच्या सर्वच विचारांना सुरुंग लागत होता.  वैभवीच्या डोक्यात सतत उलटसुलट विचार चालू होते.

तिने सर्वांच्या नास्त्यासाठी पोहे केले.  दुपारच्या जेवणासाठी कणीक मळून ठेवली.  भाजीची तयारी केली.  नाष्टा केल्यानंतर लवकुशला अंघोळ घालत असतानाच दरवाज्याची बेल वाजली.

वैभवी साबणाचे हात धुवून, नाईलाजाने दरवाजा उघडायला गेली.  सकाळी लवकर गेलेला समीर परत आला होता.  त्याचा नाश्ता तिकडेच झाला होता.  म्हणून आल्या आल्या त्याने मस्त ताणून दिली होती. 

वैभवीला कोणत्याही कामासाठी समीरकडून अपेक्षा करणं बरोबर वाटत नव्हतं.  आईचा तर प्रश्नचं येत नव्हता.  डोक्यात विचारांचं काहूर माजले होते तरी एका पाठोपाठ समोर येईल ते, ती काम उरकत होती.  मध्येच मुलांना हवे नको ते सुद्धा पहात होती.

सकाळच्या नाश्त्याचे सोपस्कार आवरून, ती दुपारच्या स्वयंपाकाची सुरवात करू लागली. मुलांसाठी तिने बटाट्याची भाजी करायचे ठरवले होते.  त्याला फोडणी देण्यासाठी तिला कढई हवी होती.  पण त्यात मुलांसाठी कमी तिखट घालून केलेली रात्रीची उरलेली बुरजी तशीच होती.  डाळीच्या पातेल्याची सुद्धा तिचं गत होती. 

रात्री तिनेच किचन आवरले होते.  उरलेली अंड्याची बुरजी, डाळ दुसऱ्या भांड्यात काढून न ठेवता तसेच त्याचं कढईत अन् पातेल्यात ठेवून दिले होते.  तिचे डोळे पुन्हा पाण्याने डबडबले.  उरलेलं वाया तर गेलेचं होते.  परंतु तिला दोन्ही भांडी घासून घेतल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. 

तिच्याही नकळत तिला तिच्या आई आणि सासू आठवल्या, \"आई आणि सासूबाई सगळं आवरून घेताना कोणतीच गोष्ट कशा विसरत नाहीत?  दोघीही न चुकता उरलेलं, दुसऱ्या भांड्यात काढून फ्रिज मध्ये ठेवत असतात आणि सकाळी पुन्हा लागणाऱ्या कढई, पातेलं घासण्यासाठी ठेवतात.  दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला, दुपारच्या भाजीला काय करायचे हे रात्रीचं ठरवून तशी तयारीही करतात.  न विसरता दह्याच विरजण लावतात.  सासूबाईंनी यावरून मला तीन चार वेळा समजावले होते तर, मला त्यांचा खूप राग आला होता. 

अरे देवा! दह्याच विरजण सुद्धा लावायला मी विसरले.  खरोखरच माझे घरात लक्ष नाही हेच खरं.  माझेच चुकतेय.  आई नेहमी सांगत असते, बाईच्या जातीचं घरात सर्व ठिकाणी लक्ष असू द्यावे.  पण मीच तिच्यावर चिडते.  बाई आता घराबाहेर पडली तरी बाईनेच का घरात लक्ष द्यावे?  पुरुषाने का देऊ नये?

याबाबतीत समीरलाही तिचे म्हणणे पटते.  स्त्री पुरुष यांना कोणत्या एका कामाचा टॅग लावू नये. त्याचे एवढेच म्हणणे असते.  जशी बाहेरच्या कामाची, दोघांच्या बँकेची, पॉलिसी, मेंटेनन्स, लाईट बिल, इतर बिल वैगरेची तो जबाबदारी घेतो.  इतरही बाहेरची वेळकाढू कामे सोसायटी मीटिंग, मुलांसाठी, घरासाठी काही आवश्यक असणाऱ्या गोष्टींची खरेदी, मुलांना गार्डन मध्ये फिरवून आणणे, मिळेल तसा त्यांच्या सोबत वेळ घालविणे.  एवढंच नाही तर जेव्हा त्याचे आई बाबा इथे राहत नसतात तेव्हा, आठवड्यातून कमीत कमी दोनदा त्यांच्या घरी जाऊन त्यांना काही हवे नको, ते तो पहातो.  वेळोवळी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो.  गरज पडली तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो.  त्यांच्या रूटीन चेकअपचा रेकॉर्ड स्वतः मेन्टेन करतो.  या सर्व गोष्टी तो न चुकता करतो.  तशी मी घरातल्या कामाची जबाबदारी घ्यावी. भले मी ती पार पाडताना चार पैसे खर्च करून, आऊट सोर्स केले तरी चालेल.  पण ती जबाबदारी मी व्यवस्थित पूर्णपणे पार पाडावी.  म्हणूनच मुलांची जबाबदारी एकट्या आईकडे द्यायला त्याची आडकाठी होती.  दोन लहान मुलांच्या मागे मागे करून ती थकून जाईल याची त्याला जाणीव होती.

सासूबाई तर नेहमीचं सांगत असतात.  घर हे  दोघांचे असते.  कोणती गोष्ट कोणी करावी हे दोघांनी मिळून ठरवायचे.  स्त्रीने अमुक एक गोष्ट करावी आणि पुरुषांनी ती करू नये असे काही नाही.  समीर ठरवल्याप्रमाणे त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो.  मलाचं माझी  जबाबदारी नीट पूर्ण का करता येत नाही?

मुलांना संभाळण्यासाठी सुद्धा बाई न ठेवता, एकट्या आईवर मी ती जबाबदारी सोपवली.  ही मी खूप मोठी चूक केली.  समीरला माझ्या आईचा त्रास जाणवतो.  मुलांसाठी बाई बघ, असे मला तीन चार वेळा त्याने सांगितले होते. मी मात्र प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. 

आर्थिक काही अडचण नसताना, केवळ चार पैसै वाचवण्याचा नादात तिला किती त्रास होईल, याचा विचार माझ्या मनाला शिवला नाही.  मुलांचा आनंद ती तसाही घेऊ शकली असती.  एका वेळेला दोन लहान मुले, दिवसभर सांभाळायला मलाही त्रास होतो हे माहीत असूनसुद्धा, मी तिचं गोष्ट आईच्या बाबतीत कानाडोळा केली.\"

वैभवीला आज एका एका गोष्टीची प्रचिती होत होती.  तसतसे तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता.  विचार करून करून तिचे डोके भणभणत होते.

\" दोन बायका घरात कामाला आहेत तरी किती कामे मागे असतात.  भांडी घासून बाई जाते.  पण घासलेली भांडी पुनः जागेवर लावावी लागतात.  कपडे मशीनमध्ये धुतले जरी जात असले तरी, मशीन मध्ये आधी ते टाकावे लागतात. वाळत घालावे लागतात.  वाळलेले कपडे घड्या घालून, जागच्या जागी ठेवावे लागतात आणि हे काम क्षुल्लक जरी असले तरी त्यात वेळ आणि थोडीफार मेहनतही लागतेच.

मुलांना संभाळणारी बाई होती तेव्हा,  मुलं प्ले ग्रुप मध्ये सोडून आल्यावर, ती ही कामे करत होती.  पण ती गेल्यापासून ही कामे सुद्धा आईवरचं पडली होती.\" वैभवीला आठवूनचं गहिवरून आले.

तिने जवळ जवळ दुपारपर्यंतची सर्व कामे हातावेगळी केली होती.  आज मुलांना सुद्धा सुट्टी होती.  त्यामुळे अधूनमधून त्यांचे काही न काही टुमणे मागे असायचे.  एकदा वैतागून तिने त्यांच्यावर आवाजही चढवला होता.  तसे दोघे आजीकडे रडत रडत जाऊ लागले.  तिने महत्प्रयासाने त्यांची समजूत काढून त्यांना थांबवले होते.

सकाळपासूनच्या नॉन स्टॉप कामाने आणि विचाराने ती थकून गेली होती.  दुपारचे चार वाजत आले होते.  मुलं मस्ती करून झोपली होती.  समीरचा तर आज पूर्ण आरामाचा दिवस होता.  तीन तासाच्या आत त्याने एकवीस किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले होते. गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट घेऊन तो आला होता.

ती थकून बेडवर आडवी झाली.  तिच्या लक्षात आले, आज आई तिच्याशी उठल्यापासून एक अवाक्षरही बोलली नव्हती.  पुन्हा तिचे डोळे भरून आले होते.  एका कुशीवर होऊन तिने आसवांना मोकळी वाट करून दिली.

\" माझे वागणे, माझ्या आईलाच एवढे त्रासदायक होते, तर सासूबाईंना किती होत असेल?  बरेच वेळा सासूबाई त्यांच्या अनुभवाने, मला काहीतरी शिकवायला जातात आणि मी फुकटचा शाहणपणा शिकवतात, असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करते.  उलट बोलून अपमान करते. आईला याच गोष्टीचा खूप राग आला आहे.\" वैभवी शांत पडून होती.  पण तिच्या डोक्यात मात्र विचारांची सारखी उलथापालथ चालली होती.  त्याला दारावरच्या बेलच्या आवाजाने पुन्हा एकदा खिळ बसली. 

\" यावेळी, आता दुपारचे कोण आले असेल? सुट्टीच्या दिवशीही, दुपारी शांत पडायला मिळत नाही.\" विचार तिच्या मनात आला.  तिला उठण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.  तिने उठून दरवाजा उघडला.


क्रमशः

🎭 Series Post

View all