Login

अन् ती हसली ..... भाग - ८

When Mother Stays With Married Daughter


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  : -  मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली ..... भाग - ८


त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितले,‌ सकाळचे सात वाजत आले होते.  उठून त्या आंघोळीला गेल्या.  आज देवपूजेत काही केल्या त्यांचे मन लागत नव्हते.  एक प्रकारचा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता.  मन अगदी उदास झाले होते.  रूममध्ये जाऊन, पोथी घेऊन त्या वाचायला बसल्या.  त्यातही त्यांचे मन रमेना.  हात जोडून त्यांनी पोथी बंद केली. नाईलाजाने त्या खिडकी जवळच्या खुर्चीत बसून उद्विग्न मनाने बाहेर बघत राहिल्या.

त्यांच्या डोळ्यासमोर त्या, वैभवीकडे आल्यानंतरचे सुरवातीचे दिवस सरसर येऊन उभे राहिले. \" वैभवीच्या वडिलांना जाऊन सव्वा महिनाच झाला होता.  वैभवी आणि समीर हट्टाने, त्यांना त्यांच्याकडे घेऊन आले होते.

घरी आल्यानंतर वैभवीच्या सासूनेच त्यांचे स्वागत केले होते.  विहीणबाईंनी कंबरेच्या सततच्या दुखण्यामुळे कॉलेजच्या शिक्षिकेच्या नोकरीचा राजीनामा देऊन, घरी राहणे पत्करले होते.  त्यांच्या आधुनिक राहणीमानामुळे, वागण्या बोलण्याच्या अदबीमुळे, सुरवातीला वत्सलाबाईंना जावयाच्या घरात वावरताना खूप दडपण आले होते. 

" वत्सलाबाई, तुमच्या लेकीचेच हे घर आहे. कोणा परक्याचे नाही. मोकळेपणाने रहा.  हवंतर मला तुमची मैत्रिण समजा. ", असे म्हणतं विहीणबाईंनी त्यांच्यातला अवघडलेपणा दूर केला होता.  त्यांना काही दिवस तरी मुलीकडे निवांत रहाता यावे म्हणून, त्या स्वतः आणि व्याही पंधरा दिवसांनी त्यांच्या घरी निघून गेले होते. 

निघतानाही, वैभवीचा बेफिकीर स्वभाव आणि त्यांच्यातला बुजरा स्वभाव लक्षात ठेऊन, विहीणबाईंनी आपलेपणाने त्यांना स्वतःची काळजी घ्यायला सांगितली होती. "आपली नातवंडं अगदी गोड आणि गुणी मुलं आहेत.  त्यांच्यात तुमचा जीव रमेल.  तुम्हाला हवे तितके दिवस रहा. पण मुलीच्या प्रेमापोटी जीवाची, स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करून घेऊ नका.", म्हणून आवर्जून सांगितले होते. 

रखमा जाऊन बराच वेळ झाला तरी ज्योती आली नाही हे लक्षात येताच, ती आज येणार नसल्याचे वैभवीला आठवले. \" पुन्हा झोपावे की नाही \" याचा विचार डोक्यात चालू असतानाच तिने आईला उठलेले पाहिले.  \" आता पुन्हा झोपण्यात काही अर्थ नाही.\" असा विचार करून ती फ्रेश झाली.  स्वतःला आणि आईला चहा करून घेतला.

आज तिला, आई पहिल्यादांच थकलेली जाणवली.  कालची उदासी अजून तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.  तिला तसे बघून वैभवीला एकदम उंचबळून आले. 

" आई कशाला एवढ्या लवकर उठलीस?  झोपायच होतं नं.  चहा घे अन् आज काही करू नकोस.  खरचं मला तू खूप थकल्यासारखी वाटतेस. आराम कर." ती न राहवून बोलली.

वैभवीच्या बोलण्याने वत्सलाबाई मनातून खूप सुखावल्या.  \" मला अशी स्वस्थ बसलेली बघायची तुला सवय नसल्यामुळे, कदाचित मी थकलेली जाणवत असेल.\" असे त्यांच्या ओठावर आले होते पण त्या काहीच बोलल्या नाहीत.

त्यांनी चहा घेतला.  त्यांना थोडे बरे वाटले.  पुन्हा त्या भूतकाळात रमल्या.  विहीणबाई त्यांना म्हणाल्या होत्या, " वत्सलाबाई, वैभवीची मुलं अजून लहान आहेत, ऑफिस आणि घर याचा ताळमेळ संभाळायला वैभवी अजून तेवढी परिपक्व झाली नाही.  मुलं झाल्यावर दोन अडीच वर्षे ती घरीच होती.  तोपर्यंत सर्व ठीक होते.  आता तिचा जॉबही नवीन आहे त्यामुळे घराकडे तिचं थोडफार दुर्लक्षही होते.  माझा मुलगाही सतत टूरवर असतो.  त्यामुळे कधी कधी तिच्या एकटीवरच सगळी जबाबदारी पडते.

घरात तीन तीन बायका कामाला आहेत.  तरी  घर आहे म्हंटल्यावर, अधूनमधून कामात आपल्याला हातभार लावावा लागतो.  वैभवी सुद्धा, आई म्हणून हक्काने तुम्हाला कामं सांगेल.  तेव्हा स्वतःची तब्येत संभाळून काय करायचे ते करत जा.  वाढत्या वयात शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी असतात.  त्याकडे दुर्लक्ष करू नका.  मुलांना आपल्याकडे पहायला वेळ नसतो म्हणून तुम्हाला आठवण करून देते.  काही होत असेल तर लगेच मुलीला नाहीतर जावयाच्या कानावर घालत जा.  चालढकल करू नका.  हे माझे अनुभवाचे बोल आहेत असे समजा हवेतर ", विहीणबाई अगदी मनापासून काळजीने बोलत होत्या.

\" किती समंजस सासू मिळाली माझ्या मुलीला!  सासरे तर शांत स्वभावाचे, अगदी देवमाणूसचं!  तरी वैभवी त्यांच्याशी अशी का वागते कळत नाही.  वैभवी अगदीच वाईट नाही.  आळशी आहे थोडी.  कामाचा कंटाळा करते.  नीट समजावून सांगितले तर समजेल तिला.  माया आहे तिला सुद्धा.  तरीपण तिला पडलेल्या कामाच्या त्रासामुळे तिला इतरांच्या त्रासाची जास्त जाणीव होईल हे नक्की.  कितीही सांगून, समजावून तिला तो जाणवेल याची शाश्वती नाही.\",  वत्सलाबाई विचारात अगदी गुंग असताना लव झोपेतून उठून, त्यांच्याकडे आला.  उभ्या उभ्याच त्यांच्या मांडीवर झोपला. 

त्यांच्या मांडीला घातलेल्या नाजूक मिठीने त्या भानावर आल्या, तसे त्यांनी त्याला जवळ घेऊन छातीशी कवटाळले.  त्याच्या गालाचे पापे घेतले.  त्यांचा मूड अगदी कमालीचा बदलला.  कुश सुद्धा त्यांच्याजवळ येतोय का म्हणून दरवाजाकडे पाहू लागल्या.

वैभवी तिचा चहाचा कप घेऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसली.  आईशी काळजीने बोलूनही तिने काहीच प्रत्युत्तर दिले नाही, हे तिच्या मनाला खूप लागले.  प्रयत्न करूनही तिला तिचे अश्रू थांबावता आले नाही.  तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात, आई तिच्यावर इतकी नाराज झालेली तिने कधी पाहिली नव्हती.  आईचा कालचा राग अजूनही तसाच होता.  \" इतकी का मी आईशी वाईट वागले? आईच्या मनाला त्रास होतोय, हे मला का नाही जाणवले?  का आई म्हणते तसे, जाणवूनही मी तिच्याकडे दुर्लक्ष केले?  आईविषयी सुद्धा माझ्या भावना बोथट झाल्या आहेत का? खरचं मी खूप वाईट मुलगी आहे का?\"  दरवाजाची बेल वाजली आणि तिची विचार शृंखला तुटली.

\" आता कोण आले? दरवाजा उघडायला एक माणूसच ठेवला पाहिजे.\"  डोळे पुसून, थंड झालेला चहा, एका घोटात संपवून तिने दरवाजा उघडला.

कचरा घेणारा सफाई कामगार आला होता.   त्याला कचरा देऊन, ती नाश्त्याच्या तयारीला लागली.  आज स्वयंपाक करणारी ज्योती येणार नव्हती.  त्यामुळे वैभवीला नाश्ता आणि स्वयंपाक सुद्धा करावा लागणार होता.  आई रागवली नसती तर, आईला बाहेरचं अन्न खायला आवडत नसूनही, \" कधीतरी चालते गं\" असे म्हणतं तिने सर्व झोमॅटोवरून ऑर्डर करून मागवले असते किंवा आईलाच काहीतरी चमचमीत बनवायला सांगितले असते.

आज तिला \"देव सुद्धा तिची परीक्षा घेतोय.\" असे अचानक वाटायला लागले होते.  तीन दिवसांपूर्वी तिचे आणि समीरचे भांडण झाले होते.  समीरने दिलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत तिला, एकतर तिच्या सासू सासऱ्यांना रहायला बोलवायचे होते किंवा आईला परत तिच्या घरी जायला सांगायचे होते. 

मुलांना पाळणाघरात ठेऊन आईला परत तिच्या घरी पाठवण्याचे तिने मनात पक्के केले होते अन् तेच आईला सांगायला ती गेली होती.  परंतु झाले उलटेच होते, आईला तिचा बेत आधीच कळला होता. 

सासू-सासऱ्यांविषयी तिचे असलेले मत, बेजबाबदारपणा आईला अजिबातच आवडलेला नव्हता. त्यामुळे आईचा रोष तिने ओढवून घेतला होता.  आई नाराज होऊन, तिच्या घरून गेलेली तिला चालणार नव्हते.  दादा वहिनीला कळले तर ते काय म्हणतील? याचे तिला टेन्शन आले होते.