अन् ती हसली ..... भाग - ७

When Mother Stays With Married Daughter



राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  : -  मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली ..... भाग - ७


दुसऱ्या दिवशी रविवार,‌ सुट्टीचा दिवस असूनही, तिला सकाळी लवकर उठावे लागणार होते.  वत्सलाबाईंनी तिला आधीच सांगितले होते की, \" त्या उद्या सकाळी, कोणासाठीही उठून दार उघडणार नाहीत.\"  समीर सुद्धा सकाळी पाचलाच मॅरथॉनसाठी बाहेर पडणार होता.

वत्सलाबाईंना, मुलीची अवस्था बघून वाईट वाटत होते.  पण त्यांनी स्वतःच्याच मनाची समजूत काढली.  \" मुलीला इतरांची जाणीव होण्यासाठी मला थोडे कठोर झालेच पाहिजे.\"  आल्यापासून पहिल्यांदाच मुले त्यांच्या शेजारी झोपायला नव्हती.  त्याचे त्यांना खूप वाईट वाटले.  त्यांच्याही नकळत त्यांचे डोळे पाणावले होते.  बराच वेळ त्या बेडवर तळमळत होत्या.  एक वेळ त्यांच्या मनात \"मुलांना आणावे का परत माझ्याकडे झोपायला?\" असे सुद्धा येऊन गेले होते.  पण दुसऱ्याचं क्षणाला मन घट्ट करत, निद्रादेवीची आराधना करून त्यांनी डोळे मिटले.  पहाटे केव्हातरी त्यांना झोप लागली.

सकाळी दरवाजाची पहिली बेल बरोबर साडेपाच वाजता वाजली.  दोन वेळा बेल वाजली तशी वैभवी खडबडून जागी झाली.  डोळे चोळत चोळतच तिने दार उघडले.  दूधवाला भैया दूध घेऊन आला होता. 

" मॅडमजी जल्दी करो … पतेला ले आवो … कितने देर से खडा हुं …..  माॅंजी कही गॉंव चली गयी क्या? " दूधवाला भैया नाराजीतच बोलला.

"  सॉरी … सॉरी ..  भैया  अभी ले आती हुं .."  वैभवी जांभई देत म्हणाली.

तिने पातेल्यात दूध घेतले आणि तसेच ओट्यावर नेऊन ठेवले.  पुन्हा जाऊन बेडवर झोपली.

थोड्यावेळाने पुन्हा बेल वाजली.  वैभवी पुन्हा वैतागत उठली.  दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हते.  रागाने दरवाजा बंद करणार तेवढ्यात तिला खाली पडलेले वर्तमानपत्र दिसले.

तिने ते वैतागतच उचलले आणि आत घेतले. \" मूर्खच आहे.  पेपरसाठी बेल कशाला वाजवायला पाहिजे होती?  फुकटची झोपमोड \", स्वतःशीच बडबडत पुन्हा ती झोपायला गेली.

तिला बेडवर अंग टाकून, जेमतेम दहा बारा मिनटेचं झाली असतील तर पुन्हा बेल वाजली. यावेळी ती रागाने उठलीच नाही.  \"जाऊदे.  मी नाही उठली तर आई आपसूकचं उठेल.\"  असे मनातल्या मनात म्हणतं तिने अंगावरची चादर तोंडावर ओढून ती झोपून राहीली.  

दरवाजाची बेल पुन्हा पुन्हा वाजत राहिली.   परंतु वत्सलाबाई काही उठल्या नाहीत.  शेवटी नाईलाजाने ती चरफडत उठली.  जाता जाता तिने आईच्या रुममध्ये डोकावले.  आई शांत पडून होती.  तिने रागातच दरवाजा उघडला.

” ताई … किती वेळ वो दरवाजा उघडायला?  एवढ्यात माझी अर्धी भांडी घासून झाली असती.  आजी घरात नाहीत का?  एकदा बेल मारली की त्या कश्या लगेच चुटकीसरशी दरवाजा उघडतात."  रखमाने तोंडाचा पट्टा चालू ठेवत भांडी घासायला सुरवात केली.

वैभवी नुसतीच तिच्याकडे रागाने पहात राहिली.

" अन् हे काय? अजून दूध तापावला नाही.  मग चाय कधी होणार ?"  भांडी घासता घासता तिचं लक्ष दुधाच्या पातेल्याकडे गेले होते.

" तू काय गं घरून चहा पिऊन येत नाहीस का?"  वैभवीने चिडून विचारले

" काय म्हणता ताई, सकाळी उठल्यावर, मशिरीची दोन बोटं कशीबशी फिरवून, पहली धावत तुमच्याकडे येतयं. ‌ चाय करत बसले तर तुमच्या सैपाकवालीचा टाईम व्हतो अन् तुम्हालाचं ते खपत नाही आम्ही दोघी एकाचवेळी आलेलं." रखमा भांड्याला जोर आणि शब्दाला धार लावत बोलत होती.

" बरं बरं देते बाई ", वैभवी नाईलाजाने म्हणाली.

\" काय सकाळ सकाळ कटकट आहे.  ही माझ्यासाठी काम करायला येते की मी हिच्यासाठी काम करते, तेच समजत नाही?  आल्या आल्या या महाराणीला मी चहा करून हातात द्यायचा.\" वैभवी दुधाचे पातेले गॅसवर ठेवताना एकटीच बडबडत होती.

" काय म्हणालात का ताई? सकाळ सकाळ वाकड त्वांड करून तुमचा चाय नको मला.  आवो, तुम्हाला बी हाफीसात गेल्या गेल्या टेबलावर चाय मिळतो नं? का तुम्ही करून घेता चाय हाफीसात?

एवढं वय झालं तरी आजीनं कधी वाकड तॉंड करून चाय नाय दिला.  किती प्रेमानं करतात त्या. आजी गावाला गेल्या की काय निघून? " रखमाने खरमरीत वैभवीला उत्तर देताना वत्सलाबाईंचींही चौकशी केली.

" एवढी काय गं चिडतेस? झोप झाली नाही म्हणून निघाले माझ्या तोंडून.  आईला जरा बरं नाही म्हणून झोपली आहे ती."  रखमाशी हुज्जत घालणं शहाणपणाचे नाही, हे तिला माहीत होते.  ती जर रागाने काम सोडून गेली तर वेळेत येणारी आणि तिच्या इतके चांगले काम करणारी दुसरी बाई मिळाली नाही तर पंचायत होईल, याची तिला जाणीव होती.

वत्सलाबाईना आज खरोखरचं जाग आली नव्हती.  एकतर रात्री मुलांशिवाय झोपण्याची सवय नसल्यामुळे त्यांना लवकर झोप लागली नव्हती आणि दुसरे म्हणजे सकाळी लवकर उठायचे त्यांना टेन्शन नव्हते.

रखमाने तिसऱ्यांदा बेल मारल्यानंतर त्यांना जाग आली होती.  पण त्या दरवाजा उघडायला बाहेर आल्या नव्हत्या.  वैभवी उठून दरवाजा उघडायला गेल्याचं त्यांना जाणवले होते.  का माहीत नाही पण आज त्यांना बेडवरून उठूशी वाटत नव्हतं.‌  कदचित उठून काही काम करायचे नाही, म्हणूनही असेल.  पण त्या तशाच बेडवर पडून राहिल्या.

रखमा झाडू घेऊन, वत्सलाबाईंच्या रूमचा अर्धवट उघडा असलेला दरवाजा अगदी हळूच उघडून आत आली.  तशा वत्सलाबाई कुस बदलत उठून बसल्या. 

" माझ्यामुळे झोपमोड झाली का आजी?  झोपा तुम्ही … बरा वाटत नाही ना तुम्हाला …  आरामात उठा.  तशीही ताईंना आज सुट्टी आहे.  कामाचा काय त्या बघत्याल.  तुम्ही झोपून रावा."   रखमाला आजीची झोपमोड झाली म्हणून वाईट वाटले होते.

वत्सलाबाईंनी, उठल्या उठल्या आधी बसल्या जागी परमेश्वराला हात जोडले.  मनातल्या मनात \" दिवस चांगला जाऊदे \", म्हणून त्याला आळवणी केली.

" काल रात्री फार उशिरा झोप लागली गं.  म्हणून आज मला जागच आली नाही.  तसेही वैभवीला सांगितले होते मी, तू आलीस की दरवाजा उघडायला.  हल्ली जरा थकायला होते मला."  खरे कारण न सांगता वत्सलाबाई रखमाला सहज बोलल्या.

त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितले,‌ सकाळचे सात वाजत आले होते.  उठून त्या आंघोळीला गेल्या.  आज देवपूजेत काही केल्या त्यांचे मन लागत नव्हते.  एक प्रकारचा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता.  मन अगदी उदास झाले होते.  रूममध्ये जाऊन, पोथी घेऊन त्या वाचायला बसल्या.  त्यातही त्यांचे मन रमेना.  हात जोडून त्यांनी पोथी बंद केली. नाईलाजाने त्या खिडकी जवळच्या खुर्चीत बसून उद्विग्न मनाने बाहेर बघत राहिल्या.