अन् ती हसली .....

When Mother Stays With Her Married Daughter



राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  :- मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली .....


वत्सलाबाई आज खूपच अस्वस्थ होत्या.   सकाळपासूनच्या कामाने थकून गेल्यानंतर, दुपारी पडल्या पडल्या नेहमी झोपी जाणाऱ्या त्या, नुसत्याच कुस बदलत लोळत पडल्या होत्या.  त्यात त्यांचे साठी गाठायला आलेले गुढघेही घाईवर आले होते.

कधी नव्हे ते आज त्यांना, भरल्या घरातही एकटं एकटं वाटत होते.  राहून राहून त्यांना, त्यांच्या स्वर्गवासी पतीची आठवण येत होती.  ते नेहमी त्यांना म्हणायचे,

" वत्सला, माणसांनी इतकेही साधे सरळ राहू नये.  समोरचा आपल्याला गृहीत धरायला लागला की आपलंच काहीतरी चुकतेय हे समजायला हवे.  वेळेतचं मनात आहे ते स्पष्ट बोलता आले पाहिजे.  नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते."

" जाऊ द्या हो … मला नाही जमतं असे तुमच्या सारखे वागायला, आपले कितीही बरोबर असले तरी, कोणाला तोडून बोलायला .." , असे म्हणून त्यांनी कधी त्यांचे बोलणे फारसे मनावर घेतले नव्हते.

आज त्यांच्या त्याचं वागण्याचा, त्यांना राग येत होता आणि वाईटही वाटत होते.  समाधानाची एकच बाब होती, आता स्वतःला बदलायची वेळ आल्याची त्यांना जाणीव झाली होती. 

घशात अडकलेला आवंढा आत ढकलतं,  \"आता अशी चूक पुन्हा होऊ द्यायची नाही.\", असा मनाशी ठाम निश्चय करून त्या उठून बसल्या. 

हाताचा आधार घेत बेडवरून त्या खाली उतरल्या.  कपाट उघडून साड्यांच्या घड्यांच्या मधोमध ठेवलेला नवऱ्याचा फोटो काढला.  त्यावरून अलगद मायेने हात फिरवला.  त्याच्याकडे डोळे भरून पहात बोलू लागल्या.

" आता पटतेय हो मला तुमचे बोलणे.  मनात असलेले योग्य वेळेत बोलले नाही की त्याचे परीणाम भोगावे लागतात. 

उशीर झालाय खरा, पण अगदीच वेळ गेली नाही.  फक्त आता एक करा माझ्यासाठी.  मला तुमचे बळ द्या. आज मला त्याची अत्यंत गरज आहे.  द्याल नं? "

फोटोत त्यांना हसलेले पाहून,  कुणी पहायच्या आत, फोटो होता त्या जागेवर त्यांनी ठेवला आणि निश्चिंत होऊन पुन्हा बेडवर जाऊन दुखरा गुढघा चोळत बसल्या.

" आई ..  चहा ..

तुझ्यासाठी खास, तुला आवडतो तसा केला आहे … आलं घालून स्पेशल कडक.", वैभवी चहाचा कप आईच्या पुढ्यात धरुन म्हणाली.

" खूप दमली असशील नं !  म्हणून म्हंटले, मीच चहा करते … पिऊन बघ.  मला नीट जमलाय का? तुझ्यासारखा नसेलच पण …. तरी ….", बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसता बसता वैभवी म्हणाली.

वत्सलाबाई हसल्या …  कप हातात घेता घेता मनात म्हणाल्या, आता अजून काय पुढ्यात मांडून ठेवणार आहे ही कोण जाणे?

चहाचा पहिला घोट घेत त्या म्हणाल्या,
" अगं न जमायला काय झालं?  छानचं झालायं.  बोल काय काम आहे? "

वैभवी कशीही असली तरी, अधून मधून तिला प्रेमाचा उमाळा येत असतो.  परंतु बरेच वेळा, त्या मागे तिचा काहीतरी सुप्त हेतू दडलेला असतो.  हे एव्हाना वत्सलाबाईंना बऱ्यापैकी कळून चुकले होते.

" असं काय गं म्हणतेस? म्हणजे माझं काही काम असेल तरचं, तुला मी चहा आणून देत असते का?

आणि काय गं असे काय काम असते तुला घरात? चांगल्या दोन दोन बायका आहेत की घरात काम करण्यासाठी.", लटक्या रागातचं वैभवीने विचारले.

" अगं रागावू नकोस ….  हे सफेद केस काही उन्हाने नाही झालेत माझे …. बोल … काय बोलायचे ते स्पष्ट बोल. 

उगाच ताकाला जाऊन भांड लपवू नकोस आणि खरचं गं, काय काम असतं मला ? ",  म्हणतं त्या पुन्हा स्वतःशीच कुत्सिकपणे हसल्या.

" जाऊदे तुला सांगूनही ते कळणार आहे का?  तू, तुला काय काम होतं माझ्याकडे, ते सांग " ,वत्सलाबाई स्पष्टचं बोलल्या.

" आई … खरचं मला आता काही नकोय गं … कसं सांगू तुला ? ..... मला कळत नाही … प्लिज तू गैरसमज नको करून घेऊस.", वैभवी हाताची चुळबूळ करत सांगण्याचा प्रयत्न करत होती.

" अगं ..  पुरे झाली आता तुझी प्रस्तावना.  काय असेल ते स्पष्टपणे सांग.  मला काही वाटणार नाही … काही वाटायचे, आताशी माझ्या मनाने केव्हाचं सोडून दिले." , वत्सलाबाई उजवा हात हवेत उडवत म्हणाल्या.

तू म्हणतेस तर सांगते मी, " आम्ही पुढच्या रविवारी सिंगापूरला चाललो आहे आठ दिवसांसाठी." , वैभवीने बोलून झाल्यावर, मनातल्या मनात हुश् केलं.

" मग ? 

मुलांनाच सांभाळायचं असेल नं?  संभाळीन की.  त्यात काय एवढं?  आता नाही का संभाळत?

हो, आता त्यांचा इंग्रजी अभ्यास घ्यायला  काय तो मला जमणार नाही.  आणि केजी का फेजी त्याचा काय एवढा मोठा अभ्यास तो असणार? ...

तरी तेवढं सोडून बाकी सगळं बघेन मी ….  तुम्ही निवांत जा …  घेईल काळजी ..", चहाचा रिकामा कप बशीवर ठेवत वत्सलाबाई म्हणाल्या.

वत्सलाबाईंची धाकटी मुलगी वैभवी आणि जावई समीर दोघे, मुंबई सारख्या शहरात, आय टी कंपनीत कामाला होते.  लव आणि कुश चार साडेचार वर्षाची गोंडस जुळी मुले त्यांच्या घराची शोभा वाढवत होती. 

वैभवीचे माहेर, कोकणातले एक आदर्श आणि सुखी कुटुंब होते.  कुटुंबात तिचे आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी आणि चौदा वर्षाचा वैभवीचा लाडका भाचा इतकीच काय ती मंडळी होती. 

सहा महिन्यापूर्वी, वैभवीच्या वडीलांचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला आणि त्यांचे मरणोत्तर सर्व विधी पार पाडल्यानंतर, वैभवी तिच्या आईला वत्सलाबाईंना, जागेत बदल मिळावा म्हणून तिच्या मुंबईच्या घरी घेऊन आली होती. 

काही दिवसांसाठी आलेली तिची आई, आजतगायत तिच्याकडेच राहिली होती.  नवरा गेल्याचं दुःख विसरून, तिच्या नातवांमध्ये, वैभवीच्या लहान मुलांमध्ये छानपैकी रमली होती.

खरंतर, \" जावयाच्या घरात किती दिवस राहायचं?\", म्हणून वत्सलाबाई चार दिवसातचं, त्यांच्या घरी निघाल्या होत्या, पण वैभवीनेचं तिच्या सोयीसाठी हट्टाने, आईला तिच्याकडे ठेवून घेतली होती.

नाहीतरी वत्सलाबाईंना तसा मुलांचा लळा लागलाचं होता आणि मुलांनाही त्यांच्या आजीचा.

नेमकी त्याच वेळी, काही कारणांमुळे मुलांना संभाळणारी बाई सुद्धा काम सोडून गेली होती.  दुसरी मिळेपर्यंत तिची होणारी गैरसोय आईमुळे टळणार होती.

आई घरात असली की, आपसूकचं तिला बऱ्याच कामात मदत होते, हेही वैभवीला चांगलेच माहीत होते.

तसे म्हणायला गेले तर, घरात अजून दोन बायका काम करायला होत्या.  एक स्वयंपाक करायला आणि एक वरचं काम धुणभांडी केरकचरा वैगरे साठी.  त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवायलाही आईची तिला मदत होत होती.

" अगं आई, आम्ही मुलांना घेऊन जातोय.  खूप दिवस त्यांनाही कुठे नेले नव्हते म्हणून या वेळेला .. ", वैभवी आईला मध्येच थांबवत बोलली.

" हो का?  हे बरं केलंस …

मग आता कसलं टेंशन आलंय तुला? ", त्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिला विचारले.

" आई तुला … ", वैभवी बोलण्याचा प्रयत्न करत होती.  पण पुढे बोलण्यासाठी तिची जीभ रेटत नव्हती.

क्रमशः

🎭 Series Post

View all