ऊन - सावली

जीवनात येणाऱ्या सुखदुःखांचा चढउतार आणि त्यातून मिळणारे समाधान म्हणजे *ऊन-सावली* होय.



निरव शांत भासणाऱ्या मनतळ्यात मी डुंबलो
कैक दुःखाच्या रक्तरंजित शूलावर निद्रिस्त झालो

आप्त नात्यात मीच मजला नित्य शोधत गेलो
वेदनेच्या आर्त तळाशी मीच मनाला घेऊन गेलो

गवाक्षातून प्रत्ययास येई अनभिज्ञ दुर्मिळ क्षण
जगलेल्या आयुष्याचा पाढा कसा वाचत गेलो

खंगल्या आसवांच्या एकेक दुर्भिक्ष मर्मगाथा
उलगडताच मी खोल आर्ततेत अडकून पडलो

मायेच्या आर्त हाकेला वाऱ्यात शोध शोधलो
मोरपिसासम हळुवार स्पर्शाला मी भुकेला झालो

ऊनसावली सुखदुःखाचे नाते मी विसरून गेलो
त्रस्त झालो, आक्रंदून कसा हताश होऊन गेलो

खेळ सप्तरंगी जिंदगीत नात्यांचा रंग उधळीत गेलो
आभासी या जगी मृगजळाच्या डोहात बुडून गेलो

मावळतीच्या वासरमणीला मी अंतिम स्मरत गेलो
तिमिराच्या अंतास स्वतःचीच निशाणी पुसत गेलो

छाया भासे मायेची ती सावली मजवरी मृगजळाची
तृष्णेच्या हव्यासापोटी मृगजळाच्या मागे सुसाट गेलो

समसमान भासे मज आयुष्य कित्येक युगे पार झाली
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर कसा अलवार झुलत गेलो


*सौ.पार्वती रा.नागमोती*
*सांगली*