उलुपिनंदन ! पार्ट 15

.
दुर्योधनाच्या महालात दुशासन , अश्वत्थामा , शकुनी इत्यादी जमले होते. तेवढ्यात तिथे महाराज शल्य आले.

" प्रणाम मद्र नरेश. " दुर्योधन म्हणाला.

" युवराजांनी मला भेटायला बोलावले आहे असा निरोप आला. तातडीने उपस्थित झालो. " मद्रनरेश शल्य म्हणाले.

" क्षमा असावी मद्रनरेश की आपल्याला असे तातडीने बोलवावे लागले. पण कारणच तसे आहे. " दुर्योधन म्हणाला.

" काय झाले गांधारीनंदन ?" मद्रनरेश शल्य यांनी विचारले.

" पांडवांच्या शिबिरात मी काही गुप्तहेर पेरून ठेवले आहेत. त्यांनी मला संदेश दिला की काल रात्री आपण कुंतीनंदन युधिष्ठिरच्या शिबिरात गेले होते. मला आपल्या निष्ठेबद्दल संशय उत्पन्न होत आहे. " दुर्योधन चढत्या स्वरात म्हणाला.

" युवराज , मी कौरव पक्षात सामील झालो आहे. तेव्हा माझी निष्ठा तुमच्याच प्रति आहे. मी फक्त सम्राट युधिष्ठिरची क्षमा मागायला गेलो होतो. " मद्रनरेश शल्य म्हणाले.

" प्रिय दुर्योधन , मद्रराज यांच्या निष्ठेवर संदेह करण्याचे काहीच कारण नाही. उद्या आपल्या पक्षाचा विजय व्हावा म्हणून ते आपल्या प्रिय बहिणीच्या मुलांना यमसदनी पाठवायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. हो ना मद्रनरेश ?" शकुनी म्हणाला.

" हो. एक बोलू गांधारीनंदन. काल मीही आपल्याला माद्रीनंदन सहदेवच्या शिबिरात पाहिले. असो. येतो. "
मद्रनरेश शल्य म्हणाले.

महाराज शल्य निघून गेले. सर्वांच्या नजरा दुर्योधनाकडे खिळल्या.

" दादा , तू त्या सहदेवला भेटायला का गेला होतास ?" दुशासन म्हणाला.

" प्रिय अनुज दुशासन , मी युद्ध सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असेल हे जाणून घेण्यासाठी वेषांतर करून सहदेवला भेटायला गेलो. महाराज शल्य यांनी मला ओळखले. खरच त्यांची नजर तीक्ष्ण आहे. " दुर्योधन म्हणाला.

" पण दादा जर सहदेवाने चुकीचा मुहूर्त सांगितला तर ?" दुशासनाने विचारले.

" असे होऊ शकत नाही. सद्गुण विकृती काय असते ठाऊक आहे ना? या पांडवांची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा धर्म. द्युतसभेत एवढा अपमान होऊनही त्यांनी धर्म त्यागला नाही. त्यांच्या धर्माला त्यांच्याच विरोधात शस्त्र म्हणून वापरणार मी. " दुर्योधन म्हणाला.

" श्रीकृष्णही पांडवांसोबत आहेत हे विसरू नकोस गांधारीनंदन. " अश्वत्थामा म्हणाला.

" श्रीकृष्ण ? तो तर एक कपटी मायावी आहे. त्याचे खरे सामर्थ्य नारायणी सेनेत आहे. परंतु मी माझ्या चातुर्याने ती नारायणी सेना माझ्या पक्षात ओढली आहे. आता तो श्रीकृष्ण दात नसलेल्या सिंहाप्रमाणे फक्त डरकाळ्या मारत बसेल. " दुर्योधन हसत म्हणाला.

" श्रीकृष्णाचे खरे सामर्थ्य त्याच्या नारायणी सेनेत नसून त्याच्या तीक्ष्ण बुद्धीत आहे. मला सर्वात जास्त भय देवकीनंदन वासुदेवचेच वाटते. जेव्हा तो शांतिदुत म्हणून आला होता तेव्हा त्याने फक्त पाच गावे मागीतली होती. मीही तुला पाच गावे देऊन युद्ध टाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र तू त्या अंगराज कर्णाच्या नादाला लागून तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्या कर्णाला अर्जुनाला पराभूत करून फक्त स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे. " शकुनी म्हणाला.

" असू दे. एक म्यानात दोन तलवारी राहत नाहीत तसे आता या पृथ्वीवर पांडव आणि कौरव एकत्र जगू शकत नाहीत. आता शांती प्रस्थापित होईल ती त्या पाच पांडवांच्या वधानंतर. " दुर्योधन म्हणाला.

" आता हा विषय इथेच थांबवू. आपल्याला महामहिम भीष्म यांच्या महालात जायचे आहे. तिथे युद्धनीतीवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. अंगराज कर्णासह सर्वजण तिथे नक्कीच पोहोचले असतील. " अश्वत्थामा म्हणाला.

" उचित बोलत आहेस कृपीनंदन. आपल्याला प्रस्थान करायला हवं. " दुर्योधन म्हणाला.

मग सर्वजण महामहिम भीष्माच्या महालात गेले. तिथे महामहिम भीष्म , गुरू द्रोण , गुरू कृपाचार्य , महाराज शल्य , अंगराज कर्ण , सिंधूनरेश जयद्रथ आणि असंख्य नरेश तिथे आधीपासूनच उपस्थित होते. दुर्योधनाने सर्वांना नमस्कार केला. त्यांची प्रेमाने विचारपूस केली. कौरवपक्षाच्या वतीने लढणाऱ्या सर्व नरेशांची , त्यांच्या राजकुमारांची , सेनाप्रमुखांची , सामंतांची ही सर्वात विशेष बैठक होती. दुर्योधनाला कर्णाला सेनापती बनवायचे होते. पितामह भीष्म पक्षपातीपणा करतात असा त्याचा ठाम विश्वास होता. परंतु , भीष्मासारखा महान योद्धा उपस्थित असताना स्वतः सेनापतीपद स्वीकारणे कर्णाला पटले नाही. त्यामुळे त्याने नम्रपणे नकार दिला.

" आपण सर्वजण आमचे पितामह गंगानंदन भीष्म यांचे कर्तृत्व जाणतातच. देवांमध्ये महादेव , नवग्रहांमध्ये जसा सूर्य , देवतांमध्ये इंद्र , पर्वतांमध्ये जसा मेरू , धनुर्धारीमध्ये जसे श्रीराम , शस्त्रांमध्ये जसा वज्र तसेच कुरुवंशात गंगानंदनहून श्रेष्ठ कुणी नाही. शंतनूनंदनच्या छायेखालीच कुरुवंशाचा वटवृक्ष बहरला. ज्या कुरुसाम्राज्याचे ऋण पांडवांवर आहेत त्याच कुरुसाम्राज्याचा घास घेण्यासाठी पांडव शस्त्रसज्ज होऊन सीमेवर उभे आहेत. परंतु , ज्यांना साक्षात बृहस्पती आणि शुक्राचार्य यांनी प्रशिक्षित केले आहे , ज्यांनी साक्षात रेणुकानंदन परशुरामाचा पराभव केला त्या गंगानंदन भीष्माला प्रधान सेनापती नेमून मी पांडवांच्या पराभवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे. पितामह , अकरा अक्षौहनी सेनेचे सेनापतीपद स्विकारून आम्हाला धन्य करा. " दुर्योधन म्हणाला.

" गांधारीनंदन , मी हस्तिनापूरच्या सिंहासनाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. मी तर हस्तिनापूरचा एक सेवक आहे. परंतु , सेनापतीपद स्वीकारण्याच्या आधी माझ्या काही अटी आहेत. " महामहिम भीष्म म्हणाले.

" कसल्या अटी ?" दुर्योधनाने विचारले.

" मी पांडवांचा वध करणार नाही. " महामहिम भीष्म म्हणाले.

" काय ? मग आपण विजय कसा प्राप्त करणार ?"
दुर्योधनाने विचारले.

" मी पांडवांच्या सात अक्षौहनी सेनेचा विध्वंस करणार. जर त्यांची सेना नष्ट झाली तर आपोआप विजय आपलाच होईल. " महामहिम भीष्म म्हणाले.

" परंतु आपण वध का करू शकत नाही ?" दुर्योधनाने विचारले.

" मला जसे कौरव तसेच पांडव. मी कुरुवंशांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली आहे. पांडवांमध्ये कुरुवंशाचेच रक्त आहे. " महामहिम भीष्म म्हणाले.

" वत्स दुर्योधन , या भीष्माच्या सर्व अटी मान्य कर. सेनापतीपदासाठी या सभेत भीष्माहून अधिक योग्य कुणी नाही. " शकुनी दुर्योधनाच्या कानात हळू आवाजात म्हणाला.

" जशी आपली इच्छा पितामह. दुसऱ्या अटी सांगा. "
दुर्योधनाने विचारले.

" जर पांचालचा राजकुमार शिखंडी माझ्यासमोर आला तर मी शस्त्रांचा त्याग करेल. " महामहिम भीष्म म्हणाले.

" पण का ?" दुर्योधनाने विचारले.

" याचे कारण सांगणे मी उचित समजत नाही. फक्त इतके समज पूर्वजन्मातील काही वचने आहेत. " महामहिम भीष्म म्हणाले.

" सर्वांनी एक गोष्ट कानात तेल घालून ऐका. शिखंडीची गोष्ट या सभेच्या बाहेर गेली नाही पाहिजे. ही गोष्ट आपल्यातच राहिले पाहिजे. " दुशासन मोठ्या आवाजात म्हणाला.

क्रमश...



🎭 Series Post

View all