उगाच काहीतरी

काही गमतीशीर अनुभव

हे गमतीशीर अनुभव लेखन केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने केले असून त्यात ज्योतिष्य शास्त्राचे समर्थन अथवा विरोध करण्याचा काहीही उद्देश नाही.

****

भविष्यात घडणाऱ्या घटनांची ज्याला उत्सुकता नाही अशी व्यक्ती विरळाच .. मी ही त्याला अपवाद नाहीच. गेल्या दहा बारा वर्षांत जरा कमी झालंय..पण पूर्वी मला ज्याला त्याला हात आणि पत्रिका दाखवण्याची भारी हौस..

ज्योतिष्य हे शास्त्र आहे किंवा नाही ह्या वादात आपण पडूया नको.. कारण आपण (म्हणजे निदान मी तरी) त्यातली तज्ज्ञ नाही.. पण ह्या निमित्तानं आलेले काही गमतीशीर अनुभव शेअर करावेसे वाटतात.

आमच्या वेळी (हुश्श ! आत्ता कसं बरं वाटलं.. थोर अनुभवी वगैरे असल्यासारखं) कोणत्याही कार्यात किंवा प्रसंगात जर एखाद्या व्यक्तीभोवती महिलामंडळाचं कोंडाळं दिसलं की समजून जायचं.. कुणीतरी हात बघणारा भेटलाय.. आम्ही मुली (बायका नको म्हणायला.. आपण निदान स्वतःला तरी) जेवढ्या साड्यांच्या दुकानात किंवा दागिन्यांच्या दुकानात किंवा मैत्रिणींच्या गप्पांत रमायचो ना.. तितकंच रमायचो.. हात बघणाऱ्याच्या समोर ..

अन् मुख्य म्हणजे अशी कुणीतरी हात बघणारी व्यक्ती लग्नमंडपात उपस्थित आहे अशी बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरे आणि लग्न लागल्या लागल्या वरवधू अन् त्यांच्या घरचे सोडून बाकी वऱ्हाड \"त्या\" हात बघणाऱ्या व्यक्तीभोवती गोळा होई.

हात बघणारी व्यक्ती.. शक्यतोवर पुरुष.. प्रौढ.. कुटुंबवत्सल अशी असायची.. जिला बिनदिक्कत \"काका\" म्हणता येईल अशी.. ह्या काकांना अंदाज असायचा .. कोण काय विचारणार ह्याचा.. अन् कुणाला काय सांगायचंय ह्याचाही..

समोर परकरपोलकं (हल्ली त्याला लाछा वगैरे म्हणतात..पण माझ्यासाठी परकरपोलकंच) घातलेली किशोरी असेल तर ती नक्की विचारणार.. "मी पास होईन का? दहावीला किंवा बारावीला किती मार्क मिळणार..? डॉक्टर होईन की इंजिनीयर वगैरे वगैरे..

पण तीच जर वीस बावीस वर्षांची तरुणी असेल तर लग्न कधी ठरेल ? नवरा कसा असेल? सासर कुठलं असेल वगैरे.. ! अशा युवतीसोबत तिची आई नक्की असायची जोडप्रश्न विचारायला.. आणि शेवटी.. "तुमच्या नजरेत आहे का कुणी हिला शोभेलसा ?" हा प्रश्न ठरलेला.. कारण त्या तेव्हढ्याशा दीड दिवसाच्या सहवासात \"तो हात बघणारा\"..ज्या बहिणीच्या घरी लग्न आहे तिच्या सख्ख्या नणंदेच्या सख्ख्या जावेचा मावस भाऊ.. अगदी घरोब्याचा होऊन जाई.

जर ह्या युवतीसोबत आई किंवा कुणी मोठी स्त्री नसेल तर ती \"लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज\" हा प्रश्नही चोरटेपणानं विचारून घेई.

नवविवाहित मुलींचे प्रश्न जरा वेगळे असत.. जर एखादी गरोदर मुलगी किंवा सून असेल तर \"हिला मुलगा की मुलगी\" हा प्रश्न निश्चित. हा प्रश्न त्या हात बघणाऱ्या काकांच्या दृष्टीनं सगळ्यात सोप्पा.. कारण त्यांचं भविष्य किमान ५०% खरं ठरण्याची खात्रीच.

त्याहून प्रौढ बायका असतील तर त्या \"काकां\"चे आता \"भाऊजी\" झालेले असत.. समस्त वहिनींची दुखरी नस ह्या भाऊजींना पक्की ठाऊक असे.. मग दोनतीन गोष्टी ते गोष्टींचा क्रम अन् कधी कधी वाक्यरचना बदलून बेमालूम सांगत.. ह्या गोष्टी प्रत्येक वहिनीला अगदी तंतोतंत लागू होत..

"वहिनी, तुमच्यामुळे आमच्या भावाच्या हातात लक्ष्मी आहे, हो.. नाहीतर.. (च्यक च्यक)

"वहिनी, तुमच्या हाताची रेषाच सांगतेय.. तुम्ही सगळ्यांचं कित्ती करताय ते.. ! पण तुमची कदर नाही कुणालाच!"  (वहिनीचा पदर डोळ्याला ..)

"वहिनी, जीवावरचं संकट येऊन गेलंय का कधी आमच्या भावावर ? तुमचं पतिव्रतेचं पुण्य.. म्हणून सहीसलामत निभावलंय हो सारं..!" (वहिनी लगेच नवऱ्याच्या शोधात.. भाऊजींशी गाठभेट घालून द्यायला.)

हात बघण्याचा कार्यक्रम हलका फुलका.. पण पत्रिका बघणं प्रकरण जरा गंभीर..

आमच्या शेजारी एक आजोबा राहत.. त्यांचा पत्रिकेचा उत्तम अभ्यास पण ते प्रश्नज्योतिष्य देखील बघत.. एकदा आम्ही बहिणी त्यांच्या घरी गेलेलो ..बारावी पास झाल्याचे पेढे द्यायला.. पेढे दिले.. नमस्कार केला अन् काहीही न ठरवता अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.. "पुढे आम्ही काय शिकावं ?"

आजोबांनी लगेच प्रश्न कुंडली मांडली.. हिशेब केला अन् सांगितलं.. "फारसं शिक्षणाच्या मागे लागू नका आत्ताच.. सध्या स्पर्धा परीक्षेतून नोकरीचे उत्तम योग आहेत.. शिक्षण नंतरही घेता येईल.. जेव्हा म्हणाल तेव्हा .. जितकं म्हणाल तितकं..!"

तेव्हा ज्योतिष्यशास्त्रावर फारच भरवसा.. अन् ते सांगणाऱ्या आजोबांवरही.. म्हणून कॉमर्स घेतलं.. स्पर्धा परीक्षांवर भर दिला.. अन् आजोबांचं भविष्य खरं ठरलं .. अवघ्या एकोणविसाव्या वर्षी दोघीही बहिणींना नोकरी लागली.. पुढे शिक्षणही पूर्ण झालं.. अजूनही शिक्षण सुरूच आहे.. जेव्हा इच्छा असेल तेव्हा एकेक पदवी पदरात पाडून घेतोय..

असं मात्र प्रत्येक वेळी घडतंच असं नाही.. म्हणजे ९९ टक्के वेळेला नाहीच नाही.

आत्ता लॉक डाऊनमध्ये मात्र एका ज्योतिषाला ऑनलाईन पत्रिका दाखवण्याचा योग आला.. माझी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण व्हॉटसअप केलं.. त्या ज्योतिषी महाराजांनीही पत्रिका उघडून घडाघडा सांगायला सुरूवात केली..

आणि काय आश्चर्य ! त्यांनी सांगितलेल्या ९० टक्के गोष्टी अगदी तंतोतंत खऱ्या निघाल्या.. भविष्याबद्दलही सांगितलं.. मला लागू होईल असं..

मी खुश.. अनेक दिवसांनी मला योग्य मार्गदर्शन मिळालेलं..त्यांनी बनवलेली (अर्थात डाऊनलोड केलेली) पत्रिका मला व्हॉटसअप केली.. अन् लक्षात आलं.. त्यात माझी जन्मतारीख चुकलीय .. जन्मतारीख एक महिन्यानं पुढे गेलीय.. म्हणजे जी पत्रिका बघून त्यांनी माझ्याबद्दल एवढं तंतोतंत सांगितलं..ती पत्रिका माझी नव्हतीच ! सगळंच मुसळ केरात..

मग त्यांनी खऱ्या जन्मतारखेवरूनही भविष्य सांगितलं.. पण ते मला लागू पडत नव्हतं.. मग आईचं डोकं खाल्लं.. माझी खरी जन्मतारीख सांग म्हणून.. तिनं चक्क माझ्या बारशाची निमंत्रणपत्रिका समोर ठेवली .. त्यातली तारीख महाराजांनी पाठवलेल्या पत्रिकेच्या आधीची.. आता जन्मापूर्वीच माझं बारसं करणार नाही एवढं नक्की.. पण मग ती चुकीची पत्रिका मला तंतोतंत लागू कशी ? हा प्रश्न अनुत्तरितच.

ज्योतिष्य हा विषय फारच गहन आहे.. अन् भविष्य बघण्याची उत्सुकता मला अंमळ जास्तच आहे.. पण तूर्तास तरी स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःचे भविष्य स्वतःच  घडवायचा विचार आहे.. तो टिकणार एवढं नक्की.. पुढला ज्योतिषी मिळेपर्यंत तरी !

© कल्याणी पाठक