Jan 26, 2022
नारीवादी

उडान

Read Later
उडान

ही गोष्ट आहे दोन मुलींची. दोघींचीही पार्श्वभूमी अगदी वेगवेगळी. दोघींचेही संगोपन वेगवेगळे. परंतु दोघींच्याहीमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे या जगात आपली एक एक वेगळी ओळख निर्माण करणे. स्वतःचे एक अस्तित्व तयार करणे. समाजासाठी काहीतरी करणे.

        आजच्या या युगामध्ये स्त्रियांनी खूप प्रगती केलेली आहे. एक स्त्री अंतराळात सुद्धा जाऊन आलेली आहे. परंतु वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही चालीरीती या मुलींना मानावेच लागतात. समाजात राहायचे तर समाजासारखे वागावे लागते. त्याच्या विरोधात जाऊन जर काही करायचे असेल तर हा समाज त्यांना खूप विरोध करतो. परंतु, जर आपल्या प्रेमाची माणसं जवळ असली तर कोणतेही काम आपण करू शकतो.

       या कथेमध्ये एक स्नेहा आहे आणि एक स्वप्ना. स्नेहा ही श्रीमंत घरातली मुलगी. आणि स्वपना ही एका सामान्य घरातली मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी.

        स्नेहाच्या कुटुंबीयांकडे गडगंज संपत्ती असते. स्नेहाने जरीही काही केले नाही तरी तिचे आयुष्य उत्तम जाईल. आणि स्नेहाच्या कुटुंबीयांची ही तिची इच्छा असते की स्नेहाने लग्न करावे आणि आपला सुखी संसार थाटावा. परंतु, स्नेहाच्या मनात आपली एक ओळख बनवायची इच्छा असते. आई वडिलांच्या पैशांवर आणि लग्नानंतर नवऱ्याच्या पैशावर मजा मारण्यात काय अर्थ आहे? यामुळे आपण आपले अस्तित्व गमावून बसू असे तिला वाटत असते. त्यामुळे मला लग्न करायचे नाही असे तिने ठरवले असते.

       दुसरीकडे स्वपना आहे. वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल आहेत. आई गृहिणी आहे. स्वप्नाचे स्वप्न आहे की तिने एक मोठे अधिकारी व्हायचे. परंतु घरच्यांची इच्छा की तू मुलगी आहेस तू लवकर लग्न करावे आणि तुझं सुखी संसार थाटावा. आई वडील श्रीमंत असो वा गरीब, दोघांचेही स्वप्न असते की, आपल्या मुलीचा एक सुखी संसार असावा. म्हणून स्नेहा आणि स्वप्ना दोघांच्याही आई-वडिलांना तसेच वाटत होते.

      परंतु स्नेहाने ठरवले होते की,तिला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे. यावेळेस तिच्या पालकांनी तिला संमती दिली. स्नेहा परदेशात जाऊन शिक्षण घेऊ लागली.

       तिकडे स्वप्ना आहे. तिला स्पर्धा परीक्षा साठी तयारी करायची आहे. तिलाही तिच्या आई-वडिलांनी एक संधी दिली. तीही शहराच्या ठिकाणी जाऊन परीक्षेची तयारी करू लागली. स्वप्नासाठी आता काही स्थळ येऊ लागले. तिच्या आई-वडिलांनी तिच्या कानावर ही गोष्ट टाकली. तिने मला काही कालावधी द्या जर मी त्या वेळेत काही करू शकली नाही तर मी लग्न करेल अशी अट ठेवली. तिला आई-वडिलांनी काही वेळ दिला. परंतु ती अयशस्वी ठरली. आणि तिला ठरलेल्या अटी प्रमाणे लग्नाला सामोरे जावे लागले. लग्न करण्याच्या अगोदर तिने तिच्या जोडीदाराला तिच्या स्वप्नांबद्दल सांगितले. तिच्या होणाऱ्या पतीनेही तिला पाठिंबा दर्शवला.

        स्वपना आणि महेश यांचे लग्न झाले. लग्नानंतर मात्र बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अभ्यासाला तेवढा वेळ तिला द्यायला जमत नव्हते. महेश ने तिला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु, ती परत अयशस्वी झाली. आता लग्नाला एक वर्ष झाले. घरच्यांकडून गोड बातमीची मागणी होऊ लागली. या सर्व गोष्टींमध्ये तिचे स्वप्न मागे पडू लागले. तिलाही वाटले की माझ्या नवऱ्याच्या माझ्या घरच्यांच्या ही काही अपेक्षा असतील. त्या सर्वात पहिल्यांदा आपण पूर्ण कराव्या.

       स्वप्नाला काही दिवसात गोड बातमी समजली. महेश आणि घरच्यांनी तिची खूप काळजी घेतली. एक सुंदर कन्यारत्न त्यांना प्राप्त झाले. स्वपना आता आपल्या या मुलीच्या संगोपनात व्यस्त झाली. तिला मनोमन वाटत होते आपण आपले करियर मागे सोडून आले आहोत. तिने महेश जवळ ही आपली खंत व्यक्त केली. परंतु महेश ने आता तुझ्या आयुष्यात आपली मुलं ही प्रथम जबाबदारी आहे असे सांगितले. आता तू तुझ्या करिअर कडे लक्ष देण्यापेक्षा त्यांना घडवण्यात तुझा वेळ घालव असा सल्ला दिला. स्वप्ना द्विधा मनस्थितीत होती. एकीकडे तिची मुलगी आणि दुसरीकडे तिची करियर. त्यात तिने मुलीला निवडले.

         इकडे स्नेहा ने आपले परदेशातले शिक्षण संपवून भारतात येण्याचे ठरवले. ती भारतात आली. आता तिचे वय वाढू लागले होते. त्यामुळे घरच्यांची तिच्या लग्ना बाबतची चिंता वाढू लागली होती. परंतु तिने सांगितले होते मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाल्याशिवाय मी लग्न करू इच्छित नाही. आणि मला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. म्हणून मी आता तरी अजून लग्नास तयार नाही. तिने फायनान्स मध्ये उच्च डिग्री घेतली होती. म्हणून तिने एक ऑफिस उघडायचे ठरवले. तिने ते केले ही. परंतु कालांतराने तिला जाणवले की मला काहीतरी वेगळे करायचे आहे. मला या समाजासाठी काहीतरी करायचे आहे. वडिलांकडे तर खूप पैसा प्रॉपर्टी तर होतीच. तेव्हा तिला समजले की, वडिलांची एक आदिवासी भागांमध्ये खूप मोठी प्रॉपर्टी आहे. त्या जागेचा आपण एक उत्तम उपयोग करू शकतो.

      तिने त्या जागेमध्ये एक आदिवासी मुलांसाठी शाळा काढण्याचे ठरवले. ती त्या दुर्गम भागात गेली. तिथे बघितले. तेव्हा तिला समजले की इथल्या मुलांना चांगल्या शिक्षणाची खूप आवश्यकता आहे. आपण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. म्हणून ती एक इंग्लिश मीडियम ची शाळा उभारते.

     सगळ्या गावांमध्ये ती जाहिरात देते. तिकडे स्वप्ना ची मुलगी ही शाळेत जाण्या इतकी मोठी झालेली असते. आणि ती त्याच भागात राहत असते जिकडे स्नेहा शाळा उभारणार असते. स्वपना ती जाहिरात बघून स्नेहा ला भेटायला जाते. ती तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी एका चांगल्या शाळेच्या शोधात असते. स्नेहाची भेट झाल्यानंतर दोघांच्या चांगल्याच गप्पा रंगतात. बोलता-बोलता स्नेहा तिला सांगते की, मी शाळा उभारणार आहे परंतु मला काही उत्तम दर्जाच्या शिक्षकांची ही आवश्यकता आहे. तुमच्या ओळखीत कोणी जर चांगले शिक्षक असतील तर प्लीज मला कल्पना द्या. कारण या भागात मी नवीन आहे. स्नेहाच्या या वाक्यावर स्वप्नाने आपणही शिकवू शकतो अशी इच्छा व्यक्त केली. आणि तिने सांगितले की, मला स्पर्धा परीक्षा मध्ये योग्य यश मिळाले नाही. परंतु, मला ज्ञान घ्यायला आवडते व माझ्या ज्ञानाचा जर मुलांना उपयोग होईल तर मला आनंद होईल. आणि नोकरीमुळे मी माझ्या मुलीकडे ही लक्ष देऊ शकते. स्नेहाला हे ऐकून अतिशय आनंद झाला. तिने तुम्ही लवकरात लवकर आमच्या शाळेत जॉईन व्हा असे सांगितले.

         स्वप्नाने तिच्या घरी याबाबत कल्पना दिली. महेश ही म्हणाला की, ही संधी चांगली आहे. घरच्यांनी ही पाठिंबा दिला. परंतु, बरेच वर्ष घरी राहिल्यानंतर स्वप्नाचा आत्मविश्वास बऱ्यापैकी कमी झाला होता. तिला वाटत होते हे आपल्याला जमेल का? तेव्हा तिने तिच्या मनातील भीती स्नेहाला सांगितले. स्नेहाने तिला बळ दिले. तुम्ही घाबरू नका मी आहे. कोणतीही गोष्ट करताना कधीतरी सुरुवात करावीच लागते. तिने तिच्या प्रवासाबद्दल स्वप्नाला सांगितले. मी आज परदेशा पासून तर ही शाळा उघडण्या पर्यंत एकटीच होती. माझ्या घरच्यांचा तर पाठिंबा होताच परंतु, मी एक मुलगी आहे मी हे सर्व कसे करेल? या भीतीने मी डगमगले नाही. तुम्ही घाबरू नका. आपण दोघेही या मुलांना आयुष्यात चांगली वाट दाखवू.

      आणि दोघींनीही त्या भागातील गरीब मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे दोघींनीही आपल्या स्वप्नांना पंख देऊन झेप घेतली.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now