उबदार घरटें

मीनू घ्या घरी घट बसवत नसले तरी कुलकर्णी आजींकडे मिनू ला कुमारिका म्हणून जेवायला बोलावत.
उबदार घरटें
पितृपक्ष संपून नवरात्र सुरू झाले हिंदी भाषी प्रदेश असल्याने जागोजागी मातेचे पंडाल बांधणे सुरू होते.
काही ठिकाणी देवी विराजमान झालेली होती चारीकडे लाऊड स्पीकरवर देवी गीत वाजवून नवरात्राचा जल्लोष साजरा होत होता, एकूण भक्तिमय वातावरण असल्याने मिनूलाही खूप उत्साह होता.

मिनू च्या घरी जरी घट बसवत नसले तरी कुलकर्णी आजींकडे मिनू ला, ती दोन-तीन वर्षाची असल्यापासूनच नऊ दिवस कुमारिका म्हणून जेवायला बोलावत, तसेच आजूबाजूच्या लोकां कडे पंचमी पासून कन्या भोज ला बोलवत त्यात खीर, पुरी ,चणे, शिरा असे विविध व्यंजन खायला मिळायची .
आजूबाजूला मिनूच्या मैत्रिणी अंतरा,सोना साक्षी अशा सगळ्यां बरोबर मिनू ही छान छान ड्रेस अप होऊन कन्या भोज ला निघायच्या.

पायाला आलता, कपाळावर कुंकू लावून , मनसोक्त जेवण, घरी येताना काहीतरी गिफ्ट किंवा नोट मिळायची.

एकूण काय मुलींची खूप मजाअसायची.

काल संध्याकाळी बाहेर खेळत असताना शर्मा आंटी घरोघरी कन्या भोज करता निमंत्रण देताना दिसल्या. सप्तमीपासूनच शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी उठून शाळेत जायची घाई नाही .
आई मी पण आंघोळ करून येते मला कुलकर्णी काकूं कडे कुमारिका जायचे आहे ना?
आजी,आई दोघींनी एकमेकींकडे पाहिलं !
आईने मिनूला जवळ बोलावलं-- हे बघ मिनू बाळा आता तू मोठी झाली कुमारिका फक्त लहान मुलींनां च बोलावतात.
\"मी कुठे मोठी?\" म्हणत मिनू आपल्या खोलीत गेली, तिला आठवले चार-पाच दिवसांपूर्वीच तिच्या पोटात दुखत होते आणि ते सर्व झालं होतं.
आता ते आठवताच तिला जोरात रडू आलं!
" अगं बाई काय झालं माझ्या सोनसाखळीला?" आज्जी धावत खोलीत आली .
"काय झालं पोट दुखतंय?
नाही!
मग--?
मला इतक्यात मोठं व्हायचं नव्हत! मला लहानच राहायचंय का मी मोठी झाले?"

अच्छा म्हणून रडू येते?
आजीने तिला जवळ घेतल व पलंगावर बसत म्हणाली\" बघ ही तुझी बाहुली तू लहानपणापासून हिची आई बनते न खेळात? मग खरं खरं आई व्हाय करता शरीराने पण स्ट्रॉंग व्हायला हवं ना तेच होत आहे तुझ्या शरीरात."
आजीने जवळ घेतल्याने मिनू चे मन थोडे शांत झाले, तिचे भरलेले डोळे पुसत आजीने तिला खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या झाडाकडे बोट दाखवत म्हटले बघ रोज रोज एक एक काडी काडी जमवून ती चिमणी आपल्या पिल्लांसाठी एक उबदार घरटें तयार करते ,अश्या उब दार घरट्यातच तिची पिल्ले सुरक्षित राहतील.न? .
असं समज तुझ्या आत एक सुरक्षित घरटं तयार होत आहे!"
आजी बोलतच होत्या तेवढ्यात बाहेरून रश्मी ताईचा आवाज आला, तिला इशारा करत आजी बाहेर गेल्या!
अरे वाss म्हणजे मिनू आता तू आमच्या पार्टीत आली?"

रश्मी गेल्यावर मिनू विचार करू लागली मी मोठी झाले म्हणजे आता मी रश्मीताई सारखे मोकळे केस ठेवू शकेल स्टाईलचे कपडेही घालेन! विचार करताच मिनूला हसू आलं.
आरशासमोर उभ राहून ती स्वतःला निरखून पाहू लागली
" आज में उपर आसमां नीचे
आज मै आगे,जमाना है पीछे!

आरशासमोर तिचे चाललेले अंगविक्षेप पाहून बाहेर आजी,आई दोघीएकमेकींकडे पाहून हसल्या.

दोन दिवसांनी सकाळी स्वयंपाक घरात आजी,आई करंज्या करत होत्या!
" मिनू जा पटकन आंघोळ करून ये बरं , म्हणताच मिनू आंघोळ करून आली.
तिला जवळ घेत आजी म्हणाली" तुला आवडतात ना करंज्या ? तू मोठी झाली ना याच सेलिब्रेशन म्हणून या करंज्या !तुझ्या आवडीच्या ओल्या नारळाच्या."

मी करून पाहू? मिनू ने म्हटले," हो हे बघ ही करंजीची पारी यात सारण भरायचे, पण पारी खूप पातळ नाही लाटायची कारण आतलं नाजूक सारण तिला सांभाळायचं असतं आणि बंद करायची ती पण नीट नाहीतर तळताना सारण बाहेर येईल!
आजी मुरड का घालायची?
अगं सगळं मनासारखं नाही झालं तरी मनाला समजवायचं मुरड घालायची ! मिनूला कितपत कळलं माहित नाही पण ती करंजी बनवून पाहू लागली.

दुपारी--- मिनू चल ग जेवायला, आईने आवाज दिला !आज तर करंज्या मिनू धावत आली पहाते तर तिच्यासाठी पाट चौरंग, चांदीचे ताट त्या भोवती रांगोळी! मी बसु? माझ्या करता?,
हो तर माझीमिनू मोठी झाली ना मग कौतुक ही मोठच हवं!" म्हणत आईने करंजी भरवली. मिनू चे मन आनंदाने भरून उठलं..
संध्याकाळी दहा-बारा करंज्या एका डब्यात भरून आई म्हणाली" मिनू-- या करंज्या रश्मीच्या घरी पाठवायच्या आहेत!

मी, मी जाऊ पोचवायला? पण सायकलने जाईन!
"अग पण इतक्या दूर चार नंबर गेट एकटी नीट जाशील ?
" हो का नाही,? आता मी मोठे झाले ना! हो बाई असं म्हणत आजी व आई दोघी हसायला लागल्या.
_________________________
लेखन -- सौ.प्रतिभा परांजपे.