त्यांचेही थोडे ऐकूया. भाग - ५(अंतिम भाग.)

मुलांना रेसचा घोडा बनवण्याऐवजी थोडे त्यांचेही ऐकले तर?

त्यांचेही थोडे ऐकूया.

भाग - पाच. (अंतिम भाग.)


"मीच डोक्यात टाकला होता." निर्विकार चेहऱ्याने ती उत्तरली आणि इकडे चारशे व्होल्टचा शॉक लागल्याप्रमाणे रक्षा आणि राकेश एकमेकांकडे बघू लागले.


"का पण? तुला माहितीये तुझ्या या वागण्याचा तुझ्या पेरेंट्सना किती त्रास झालाय? सोबत त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला तो वेगळाच." डॉक्टर.


"त्यांच्या वागण्याचा मला त्रास होतोय हे त्यांना कधी जाणवले का? मग माझ्या वागण्याच्या त्रासाचे मी का काही वाटून घेऊ?" ती बेफिकीरीने म्हणाली.


"असं का बोलतेस? आणि हे डोक्यात रंग टाकण्याचे कुठून सुचले?" डॉक्टर.


"काका, अहो घरी माझे ऐकून घ्यायला कोणालाच वेळ नसतो. पप्पा सतत आपल्या ऑफिसच्या कामात गुंतलेले. घरी असले तरी त्यांचे तेच सुरू असते. मम्मा तिच्या किटी पार्टीज, मैत्रिणी, मोबाईल यात बुडालेली असते. माझ्याशी कोण बोलणार मग? माझं ऐकून तरी कोण घेणार?


मी घरी असले तर मम्माची सतत अभ्यासावरून भुणभुण. नाही तर मग हा क्लास, तो क्लास.. दिवसभर मी बाहेर. मला कुठल्या क्लासला जायचे आहे हे तेच ठरवणार. रेसचा घोडा झाल्यासारखे वाटते मला कधी. पण सांगणार कोणाला? लहान असताना सगळे किती लाड करायचे. आता तर मला मम्माने स्वतःहून प्रेमाने केव्हा जवळ घेतलेय ते सुद्धा आठवत नाहीये." ती अचानक हळवे होत बोलत होती.


"अगं पण त्यांना तुझी काळजी आहे म्हणूनच ते तुझ्या पाठी लागतात ना?"


"हो, त्यांना माझी काळजी आहे हे चार दिवसापूर्वी मला कळले. शाळेत अचानक नाकातून थोडं ब्लिडींग झाले. टीचरनी मम्माला शाळेत बोलावले तेव्हा पहिल्यांदा तिच्या डोळ्यात काळजी दिसली. बोलताना चुकून मी तोंडातूनही रक्त आले हे बोलून गेले तर ती मला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेली. माझ्या पेरेंट्सना माझ्या बद्दल काही वाटतं याचा मला आनंद झाला होता.


दुसऱ्या दिवशी रविवार होता. आराम करून कंटाळा आला म्हणून मी सकाळीच दुसऱ्या सोसायटीतील मैत्रिणीकडे गेले. ती चित्र काढत होती. ते बघत असताना माझा धक्का लागला आणि रेड कलर खाली पडला. त्यात माझ्या डोक्याला भिंत लागली आणि दुखत होते म्हणून मी डोक्याला हात लावला.


खाली सांडलेला रेड कलर बघून मला एक आयडिया सुचली आणि मी तो रंग डोक्यात टाकला. रक्तासारखा लाल रंग बघून मम्मा पप्पा घाबरणार आणि पुन्हा माझी काळजी घेणार एवढेच मला अपेक्षित होते. म्हणून मग सोसायटीच्या गेटजवळ पोहचल्यावर मी ड्रामा सुरू केला." ती प्रामाणिकपणे सांगत होती.


इकडे रक्षा आणि राकेश एकमेकांशी काही न बोलता केवळ ऐकत होते. आपल्या मुलीच्या मनात काय काय साचले आहे हे त्यांना आज कळत होते. रक्षाच्या डोळ्यातून तर पाणी वहायला लागले.


"पण मग तुझ्या मनाप्रमाणे होत असताना तू हे सिक्रेट माझ्याशी शेअर करावे असे का वाटले?"


"मम्माला रखमा काकूचे बोलणे पटू लागले होते. माझ्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक करताहेत असे तिला वाटू लागले होते. ही अंधश्रद्धा आहे ना डॉक्टर काका? मी त्याला खतपाणी कसे घालणार ना? म्हणून मी सांगायचे ठरवले." ती.


"ओके. गुड गर्ल! बरं तुझ्या पेरेंटशी मी बोलतो. तू थोडावेळ बाहेर थांबशील का?" डॉक्टरांनी बेल वाजवली तसे नर्स रक्षा आणि राकेशला आत घेऊन आली. आता रुही बाहेर थांबली होती.


"डोक्यातील येणाऱ्या रक्ताचे रहस्य कळलेय ना?" डॉक्टरांच्या प्रश्नावर रक्षाने एक हुंदका दिला.


"आम्हाला आमची चूक कळलीय डॉक्टर. जे या लहानशा जीवाला कळतेय ते आम्हाला कळत नव्हते. स्पर्धेच्या युगात आपली लेक नेहमीच समोर राहावी यासाठी झटताना तिला काय हवे याचा कधी विचारच केला नव्हता. खरंच चुकलो आम्ही." रक्षा आणि राकेश हतबलपणे बोलत होते.


"ही चूक यापुढे होणार नाही याची काळजी घ्या. ज्या वयात मुलांना आईवडिलांची खरी गरज असते, त्या वयात त्यांच्यापासून दूर जाऊ नका. त्यांना वेळ द्या. त्यांना समजून घ्या. त्यांचेही थोडे ऐकून घ्या." डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितले. ते त्या दोघांनाही पटले. 

******

"रुही." बाहेर येत राकेशने तिला हाक मारली. तिने धावत जाऊन दोघांनाही मिठी मारली.


"सॉरी मम्मा, सॉरी पप्पा. माझ्या डोक्यात मीच कलर टाकला होता." डोळ्यात पाणी घेऊन ती म्हणाली.


"आम्ही सुद्धा सॉरी बेटू." रक्षा तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाली. राकेशनेही त्या दोघींना आपल्या मिठीत घेतले.


काळ्या जादूने नव्हे पण रंगाच्या जादूने मात्र आज खऱ्या अर्थाने हे त्रिकोणी कुटुंब आनंदी होते.


*****समाप्त *****

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.

स्पर्धेच्या या युगात आपण आपल्या मुलांना रेसचा घोडा बनवायच्या मागे लागलोय. प्रत्येक ठिकाणी आपले मुलं समोर कसे राहील हेच आपल्याला हवे असते. त्यासाठी सुरू होतो मग वेगवेगळ्या क्लासेचचा मारा आणि उपदेशाचे डोज. पण आपल्या मुलांना काय हवेय हे आपण त्यांना कधी विचारतो का? त्यांनाही थोडं बोलू द्या. त्यांचेही थोडे ऐकूया.

तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.

धन्यवाद!




🎭 Series Post

View all