त्यांचेही थोडे ऐकूया.
भाग -तीन.
मग आमच्या रुहीला झालंय तरी काय?" राकेश काळजीने.
"काहीही नाही." डॉक्टर शांतपणे.
राकेशचे काळीज बाहेर यायचे तेवढे बाकी राहिले होते. मुलीच्या डोक्यातून एवढे रक्त येत होते आणि डॉक्टर तिला काहीही झाले नाही असे त्याला सांगत होते. समोर बसलेला व्यक्ती खरंच डॉक्टर आहे ना? ही शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेली.
"मग ते रक्त?" त्याने डॉक्टर सामंताकडे पाहत विचारले.
"ते रक्त नव्हतेच मुळी." डॉक्टर सामंत त्याच शांत स्वरात उत्तरले.
"डॉक्टर?" राकेशचा गोंधळ आणखी वाढला होता.
"रक्त हा एक चिकट द्रवपदार्थ आहे. त्याच्यात असलेल्या प्रोटीन्समुळे काही वेळातच त्याची गोठण्याची क्रिया सुरू होते. तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणे रुहीला किमान तासाभरापूर्वी रक्तस्त्राव व्हायला सुरुवात झाली. पण अजूनही तुम्हाला वाटणारे ते रक्त गोठले नाही. लक्षात येतेय का तुमच्या?" डॉक्टर सामंत समजावणीच्या सुरात म्हणाले.
"पण मग तिच्या डोक्यातून येतेय ते?" प्रश्नांकित चेहऱ्याने राकेश डॉक्टरकडे बघत होता.
"ते रक्त नसून लाल रंग आहे. कुंकू किंवा तत्सम प्रकाराचे काहीतरी किंवा पेंटिंग कलर वगैरे." डॉक्टरांच्या उत्तराने राकेश तोंडाचा नुसता आ करून बघत राहिला. हा असला काही प्रकार असावा असे त्याच्या गावीही नव्हते.
"हातावरचे रक्ताचे डाग पाण्याने धुतल्यावर लगेच निघून जातात. तुम्ही रुहीचे हात बघितलेत? आमच्या नर्सने तिचे हात धुवून दिले तरी हाताने रंग सोडला नाही. तुमच्या मते इतका ब्लड लॉस झालाय, पण ब्लड रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहेत. इव्हन प्लेटलेट्स काउंट देखील." डॉक्टर.
"पण मग हा काय प्रकार आहे? आणि ती तर डोके दुखतेय असेही सांगते आहे." राकेश रडायचा तेवढा बाकी होता.
"त्यासाठी मी काही गोळ्या लिहून देतो. तीन दिवसांनी तिला परत एकदा घेऊन या. नेमका काय प्रकार आहे हे कळेलच आणि हो, घाबरण्यासारखं काही नाहीये तेव्हा टेंशन घेऊ नका. या आता तुम्ही." डॉक्टरांनी त्याला गोळ्यांची चिठ्ठी लिहून दिली आणि पुढच्या पेशंटला आत बोलावले.
******
"काय बोललेत डॉक्टर?" घरी आल्यावर रक्षा राकेशला विचारत होती.
गोळी घेऊन रुही तिच्या खोलीत झोपली होती. हॉस्पिटलमध्ये रखमा असल्यामुळे राकेश तिथे फारसा काही बोलला नव्हता. आताही रक्षाला काय उत्तर द्यावे त्याला कळत नव्हते.
"एवढ्या तपासण्या केल्या, इतके पैसे गेले आणि डॉक्टरांनी काय, तर केवळ पन्नास रुपयांच्या गोळया लिहून दिल्या. काय बोलले डॉक्टर सांग तरी."
ती परत तेच विचारत होती. रुहीच्या इतक्या भीषण स्थितीत डॉक्टरांनी फक्त पन्नास रुपयांच्या गोळया दिल्या हेच तिच्या बुद्धीला पटत नव्हते.
"रुहीला काही झालेच नाही तर डॉक्टर कसल्या गोळया देतील?" तो वैतागून म्हणाला. रक्षा त्याच्याकडे डोळे फाडून बघत होती. डोक्याला हात लावून सोफ्यावर बसत त्याने डॉक्टर जे बोलले ते तिला सांगितले.
"असे कसे शक्य आहे? तिच्या डोक्यात कुंकू, रंग? कुठून येईल हे?" रक्षा घाबरत म्हणाली.
"मलाही काही कळत नाहीये. रुही तर काही सांगत देखील नाही आहे." राकेश.
"साहेब तुम्हाला कळलं नसेल तरी मला कळलंय." दोघांसाठी चहा घेऊन येत असलेली रखमा बोलली. त्यांचे बोलणे तिने ऐकले होते.
"पोरीवर कोणीतरी जादू केलीय बघा. नाहीतर असं कसं होईल? परवा नाकातून तोंडातून रक्त, आज डोक्यात कुंकू आणि मॅडम मघाशी बघितलंत ना? ॲम्ब्युलन्स रस्त्यात बंद पडली होती. साहेब, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण खरंच सांगते कोणीतरी करणी करतोय बेबीवर." रखमा विश्वासाने सांगत होती.
"काही काय बोलतेस रखमा? असं काही नसतं." रक्षा रखमाला टोकत म्हणाली खरी पण तिचा स्वर डगमगल्यासारखा झाला होता. कुठेतरी तिलाही हे पटत होते.
"तुमचा विश्वास बसत नाहीये ना? माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत, त्यांना मी सकाळी घेऊन येते. ते काय सांगतात ते तरी बघूया." त्यांच्यावर निर्णय सोडून रखमा कामाला लागली.
खरंच रखमा म्हणते तसा काही प्रकार असेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*******
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा