Login

त्यांचेही थोडे ऐकूया. भाग -२

मुलांना रेसचा घोडा बनवण्याऐवजी थोडे त्यांचेही ऐकले तर?

त्यांचेही थोडे ऐकूया.

भाग -दोन.


"रुही, तू ठीक आहेस ना? काळजी करू नकोस. आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये जाऊ." डोळ्यात पाणी घेऊन रक्षा रुहीच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली.


"मम्मा, डोकं फार दुखत आहे." रुहीचे रडणे पुन्हा सुरू झाले.

******

दहा मिनिटातच सोसायटीच्या गेटसमोर ॲम्ब्युलन्स उभी राहिली. रुहीला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने रक्षाचा प्रवास सुरू झाला होता. एवढी मोठी सोसायटी, पण अशा वेळी कोणीच मदतीला आले नाही. कोण येणार? वर्किंग डे असल्यामुळे सर्वांचीच लगबग चालली होती. दुसऱ्यांच्या जीवनात डोकावायला त्या पांढरपेशा समाजाला वेळ तरी कुठे होता?


घाबरलेल्या रक्षाने सोबतीला म्हणून घरकामाला येणाऱ्या रखमाला कसेबसे तयार केले. या क्षणी तीच तिला एकमेव आधार वाटत होती.


"मॅडम, परवाच बेबीच्या नाकातोंडातून रक्त येत होतं म्हणे आणि आज असं. काय झाले असेल हो लेकराला?" रखमाने प्रश्न विचारायला आणि अचानक वेग कमी होऊन ॲम्ब्युलन्स बंद व्हायला एकच गाठ पडली.


दोन तीनदा सुरू करण्याचा प्रयत्न करूनही ती प्रतिसाद देत नव्हती.


"मॅडम, सॉरी. ॲम्ब्युलन्स मध्ये बिघाड निर्माण झालाय त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही." वाहनचालक खाली मान करून रक्षाला म्हणाला.


"अरे देवा, हे काय नवीन आनिक? लेकराच्या मागे कुठली दुष्ट शक्ती मागे लागलीय काहीच कळत नाही." रखमा कपाळावर हात मारून म्हणाली तसे रक्षाने तिच्याकडे रागाने पाहिले.


"काळजी करू नका. मी काहीतरी बंदोबस्त करतो." म्हणत त्याने आणखी दुसऱ्या ॲम्ब्युलन्स चालकाला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले.


इकडे रक्षानेही राकेशला परस्पर हॉस्पिटलमध्येच बोलावले. दहा मिनिटांनी दुसऱ्या ॲम्ब्युलन्समधून पुन्हा त्यांचा लवाजमा हॉस्पिटलच्या दिशेने निघाला.


*****


'डॉक्टर सावंत' क्रिटिकल केअर मधील प्रसिद्ध डॉक्टर. प्रख्यात मेंदू रोग तज्ञ. त्यांच्यासमोर राकेश, रक्षा आणि रुही बसले होते. रक्तस्त्राव आता थांबला होता. परंतु डोक्यातील ओलसरपणा आणि दुखणे अजूनही तसेच होते.


"मिस्टर राकेश, आपण एक सिटी स्कॅन करून बघूया. कारण इतक्या वर्षांच्या माझ्या प्रॅक्टिसच्या काळात कसली जखम नसताना आपोआप डोक्यातून रक्तस्त्राव होणारी ही पहिलीच केस आहे. असे वरवरून बघून मला अजुनपर्यंत काहीच निदान लागत नाहीये." डॉक्टर म्हणाले तसे रक्षाने तिच्या हातातील दोन दिवसांपूर्वीची फाईल टेबलवर ठेवली.


"हे काय?" डॉक्टर तिच्याकडे पाहत विचारत होते.


"सिटी स्कॅन रिपोर्ट. दोन दिवसांपूर्वीचा. दोन दिवसांपूर्वी शाळेमध्ये हिच्या नाकातून आणि तोंडातून ब्लीडींग सुरू झाले होते, तेव्हा आमच्या फॅमिली डॉक्टरांनी स्कॅन सुचवले होते." रक्षा सांगत होती.


डॉक्टरांनी बघितले, तो रिपोर्ट अगदी नॉर्मल होता.

"तेव्हा काही उलटी, चक्कर वगैरे आली होती का?" त्यांचा प्रश्न.


"नाही. तेव्हादेखील फक्त ब्लिड होत होते." रुही.


"आजच्या सारखेच?" त्यांनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजर टाकत विचारले तसे ती थोडीशी गोंधळली.


"मॅडम, आज काही उलटी किंवा चक्कर आली असे काही घडले होते का?" रुहीचा प्रश्न तसाच सोडून डॉक्टर सामंत रक्षाला दुसरा प्रश्न विचारत होते.


"नाही." तिने नकारार्थी मान हलवली.


"ओके. तुम्ही सांगताय त्यावरून काहीतरी गंभीर झाले आहे असे तरी मला वाटत नाही. पण तरीसुद्धा परत एक स्कॅन आणि काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतील." डॉक्टर सामंत त्यांना दिलासा देत म्हणाले.


रुही स्कॅनिंगच्या रूममधून बाहेर येईपर्यंत रक्षा आणि राकेशच्या जीवाला घोर लागला होता. डॉक्टर म्हणतात तसे काहीच सिरीयस नसावे, पोरगी सुखरूप बाहेर यावी हे एकच मागणे होते.


वेटिंग एरियात असलेल्या गणपतीच्या मूर्तीजवळ रखमा सुद्धा हात जोडून उभी होती. रुही बेबीला काही होऊ नये म्हणून ती गणेशाला साकडे घालत होती.


स्कॅनींग आणि रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट पंधरा मिनिटात डॉक्टर सामंताच्या केबिनमधील टेबलावर तयार होते. रिपोर्ट बाजूला ठेऊन त्यांनी पुन्हा तिघांना आत बोलावले. रुहीच्या केसांचे निरीक्षण करून झाल्यावर तिला रक्षासोबत बाहेर पाठवून डॉक्टर राकेशशी बोलायला लागले.


"मिस्टर राकेश, आपण केलेल्या रक्ताच्या चाचण्या आणि डोक्याचे स्कॅनिंग दोन्ही अगदी नॉर्मल आले आहेत."


"मग आमच्या रुहीला झालंय तरी काय?" राकेश काळजीने.


"काहीही नाही." डॉक्टर शांतपणे.


राकेशचे काळीज बाहेर यायचे तेवढे बाकी राहिले होते. मुलीच्या डोक्यातून एवढे रक्त येत होते आणि डॉक्टर तिला काहीही झाले नाही असे त्याला सांगत होते. समोर बसलेला व्यक्ती खरंच डॉक्टर आहे ना? ही शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेली.


डॉक्टर असे का म्हणाले असावेत? वाचा पुढील भागात.

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all