Login

त्यांचा निर्णय

Gost Eka Nirnayachi
उमाताई वृध्दाश्रमाच्या बाहेर उभ्या राहून सगळा परिसर न्याहाळत होत्या. वृध्दाश्रमाची एकाकी पण मोठी इमारत, आजूबाजूला दिसणारी गर्द झाडी, मधेच दृष्टीस पडणारे आनंदी वृध्द किंवा जोडपे आणि मागच्या बाजूस दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले होते.

"आई, परत एकदा विचार करा. आम्हाला तुमच्या इस्टेटी मधला जराही वाटा नको. आम्हाला केवळ तुमची सोबत हवी आहे, तुमचा सहवास हवा आहे." उल्का उमाताईंच्या मागे येत म्हणाली.

"अं..काय म्हणालीस?" उमाताईंचे आपल्या सुनेच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.

"आजी, आई म्हणते परत एकदा विचार कर. आम्हाला तू हवी आहेस. अशी सोडून जाऊ नकोस ना. रोज माझी स्वीट पापी घेऊन सकाळी झोपेतून कोण उठवणार मला? आणि रात्री झोपताना छान छान गोष्टी कोण सांगणार? शिवाय मला तुझ्याशिवाय जेवणही जात नाही, माहितीये ना तुला?" सोनू उमाताईंकडे पाहत निरागसपणे म्हणत होती.

"अगं, मी तुला सोडून कुठेच जात नाही. मी फक्त आपले घर बदलते आहे, इतकेच. इतकी वर्षे मी आपल्या घरात राहतच होते ना? आता मला इथे राहावेसे वाटते गं आणि तू मला भेटायला कधीही येऊ शकतेस." उमाताई सोनूला कडेवर घेत म्हणाल्या.

"मान्य आहे मला, तुम्ही सगळे असता माझ्यासोबत. माझी काळजी घेता, मला काय हवं, नको ते सगळं व्यवस्थित पाहता. माझी दुखणी- खुपणी काढता. पण हे गेल्यापासून अगदी एकटं पडल्यासारखं वाटतं. आता मन रमत नाही आपल्या घरी." उमाताई आपल्या सुनेकडे पाहून म्हणाल्या.

"आई, म्हणून हा असा निर्णय घ्यायचा! आम्ही तुमचे कोणीच लागत नाही का? उद्या लोक म्हणतील, सासू जड झाली म्हणून सुनेने तिला घराबाहेर काढले आणि इतकी सारी इस्टेट स्वतः घश्यात घातली." उल्का आपले डोळे पुसत म्हणाली.

"उल्का, माझा निर्णय पक्का आहे. लोकं बोलणारच. आपण लक्ष द्यायचं नाही आणि मी स्वत:च्या मर्जीने इथे आलेली आहे. हे तुम्हाला माहीत आहे अन् मलाही. मग कशाला इतरांचा विचार करायचा? माझा संसार केव्हाच झाला. आता तुम्ही तुमच्या मर्जीने संसार करायचा आणि ही सगळी इस्टेट माझ्या मुलाची आहे. त्याबाबतीतले सगळे निर्णय त्याने घ्यायचे."

इतक्यात निनाद त्या इमारतीतून बाहेर आला. "आई, इथे कसली झकास सोय आहे म्हणून सांगू? आपल्या घरापेक्षाही कडक! चल, तुझी रूम मागच्या बाजूला आहे. तिथून काय मस्त व्ह्यू दिसतो! मला तर वाटतं आम्हीही इथे राहायला यावं."
निनादने उमाताईंची बॅग उचलली आणि तो त्यांचा हात धरून इमारतीला वळसा घालून मागे आला.

"अहो, तुम्ही काय बोलताय हे? आणि इथलं वर्णन काय करता? इतकीच हौस असेल तर वर्षातून एकदा आम्हा सर्वांना फिरायला नेत चला.
मी आता शेवटचं सांगते, मला आई हव्या आहेत. त्यांच्याशिवाय आपल्या घराला घरपण नाही. उद्या सगळे नातेवाईक म्हणतील, सासू प्रेमळ असून देखील सुनेने तिला घराबाहेर काढलं आणि वृद्धाश्रमात ठेवलं." उल्का निनादच्या हातून बॅग काढून घेत म्हणाली.

"उल्का, मलाही माझी आई जवळ हवी आहे. पण त्याहूनही जास्त तिचा आनंद महत्वाचा वाटतो मला. या वयात तिला जे वाटतं ते तिने करायला हवं, असं माझं स्पष्ट मत आहे." निनाद थोडा विचार करून म्हणाला.

"आणि काय गं, पुन्हा तेच? तुला लोक काय म्हणतील याची काळजी आहे की आपल्या सासूच्या मनाची? मी अधून मधून घरी राहायला येत जाईन आणि तुम्हाला काही अडलं तर मी आहेच की. उद्या माझं काही बरं, वाईट झालं तर? तेव्हा देवाच्या पाठी सासू हवी म्हणून भूणभूण करशील का? नाही ना?

निनाद, तुम्ही तुमचा संसार सुखाने करा. आता मी माझ्या मर्जीनुसार जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही एक बदल होणार नाही."
निर्धाराने बोलणाऱ्या उमाताईंकडे पाहणाऱ्या उल्काला आता कळून चुकल होतं, आई त्यांचा निर्णय बदलणार नाहीत. तिने अगतिक होऊन निनादकडे पाहिले. तो डोळ्यांनीच तिला समजावत होता, धीर देत होता.

उमाताई आपल्या खोलीत आल्या. त्यांच्या सोबतीला आणखी एक आजी होत्या.
"या.. तुम्हाला सोडायला तुमचा मुलगा आला की मुलगी? नाही म्हणजे या पोरीच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून विचारते." आजी उल्काला न्याहाळत म्हणाल्या.

"मुलगी कुठची? ही माझी सून आहे. मी इथे राहायला आले ना म्हणून रडते आहे ती." उमाताई आपले सामान ठेवत म्हणल्या.

"हो का? आजकालची मुले आपल्या आई- बापाला घराबाहेर काढतात आणि इथे आणून ठेवतात. मीही त्यातलीच बरं. ते दुःख कोणालाच समजायचे नाही." त्या आजींनी उल्काला जवळ घेतलं.
"माझ्या सुनेने मला असा जीव लावला असता तर मी इथे आलेच नसते."
हे ऐकून उल्का कितीतरी वेळ त्या आजींच्या पाठीवरून हात फिरवत राहिली.

काही वेळाने निनाद, उल्का आणि सोनूने उमाताईंचे सगळे सामान नीट लावून ठेवले. निघताना मात्र सर्वांची मने जड झाली. उल्का उमाताईंच्या गळ्यात पडून कितीतरी वेळ स्फुंदत राहिली. मात्र उमाताईंच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही आला नाही.

निनाद, उल्का आणि सोनू निघून गेले. तसे उमाताईंनी निर्धाराने अडवून ठेवलेले अश्रू अखेर वाहू लागले.
"अशी प्रेमळ सून मिळणं खूप अवघड असतं." त्या स्वतःशीच म्हणाल्या.

"मग तुम्ही इथे येण्याचं कारणच काय?" आजी उमाताईंना म्हणाल्या.

"संसारात अडकून पडायचे दिवस सरले आता. आपलं वय झालं. आपणच आपल्या मुलांवर किती भार द्यायचा? त्यांना आपली अडचण होईल असे अजिबात वागायचे नाही. उलट एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्या आयुष्यात डोकावायचे. तेही दूर राहून आणि आपलं आयुष्य आपण एन्जॉय करत राहायचं. या वयात मनमोकळं जगायचं."
उमाताईंच्या या बोलण्याने त्या आजींनाही उत्साह वाटला.
"तुमच्यासारखी विचार करणारी व्यक्ती मी आजवर पाहिली नाही. असो, तुमच्या रूपाने मला एक छान मैत्रीण मिळेल आणि तुमच्या सोबतीमुळे माझं दुःख कमी होईल हे मात्र नक्की."

दोघी नकळत एकमेकींच्या मिठीत विसावल्या आणि निनादची दूर जाणारी गाडी उमाताई भरल्या डोळ्यांनी पण आनंदाने पाहत राहिल्या.

समाप्त
©️®️✍️सायली जोशी.
0