त्याला आवडलेली ती भाग 8

Rucha and Rugved went ahead to met with an accident

त्याला आवडलेली ती:- भाग 8

"आज मी चालवते बुलेट तू मागे बस!"
"आयला! हा पण गुण आहे तुझ्यात?"
"मग तुला काय वाटले मी काय फक्त मागे बसण्यासाठी जन्माला आले आहे का?"
"चला बघू या कशी चालवतेस ते!"
तिने त्याच्या बुलेट ला स्टार्ट केले आणि एक्ससिलेटर रेज करत तिने त्याला बसवले. एकदम स्टाईल मध्ये बुलेट बाहेर काढली.
ते दोघे बाहेर पडताना निम्मं कॉलेज त्यांच्याकडे आ वासून बघत होते.
तिची गाडी चालवण्याची पद्धत पाहून तो जाम खुश झाला.
वाऱ्यावर उडणारे तिचे सुगंधीत केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते...त्या केसांचा मुलायम स्पर्श त्याला अजुन छान वाटत होता. 

"काय जमते आहे का नाही मला?" तिने विचारले..
"बेस्टच! उगाचच इतके दिवस मी एकटा गाडी चालवत होतो"
ती खळखळून हसली..
"मग, कुठे नेऊ तुला?"
"गाडी तुमच्या हातात आहे बाईसाहेब, मी तर केवळ बिचारा पांथस्थ! जिथे तुम्ही न्याल तिथं मी येणार"
त्याच्या या नाटकी बोलण्याला ऐकून ऋचा ने हसत गाडीला स्पीड दिला..

आणि तेवढ्यात अचानक रस्त्यावर एक कुत्र्याचे पिल्लू आले.
स्पीड मध्ये असलेली ऋचा त्याला पाहून एकदम गोंधळली आणि ब्रेक दाबून गाडी बाजूला वळवण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी एकदम जोरात घसरली...
गाडी घसरत घसरत अंदाजे 40 फूट रस्त्याला घासुन गेली आणि तिथे जवळ असणाऱ्या झाडाला जाऊन धडकली..

मागे बसलेला ऋग्वेदचा पाय पुर्णपणे जायबंदी झाला होता आणि तिचा पाय गाडीच्या खाली अडकला होता..
रस्त्यावरील लोक धावत पळत आले आणि त्यांनी त्या दोघांना उठवले...

ऋग्वेद ला अजिबातच उठता येत नव्हते...त्याची जीन्स पूर्ण फाटलेली आणि त्यातून त्याला भरपूर खरचटलेले दिसत होते. 
त्याचा हात सुद्धा बऱ्याच प्रमाणात दुखावला होता.
त्यामानाने ऋचा ला कमी लागलेले...ती उठू शकत होती. 
लोकांनी झाडाच्या बाजुला खुर्ची ठेऊन त्या दोघांना बसवले आणि पाणी दिले. 
ऋचा प्रचंड घाबरली होती. ती धावतपळत ऋग्वेद पाशी गेली आणि तिने त्याला बघितलं तो डोळे बंद करून मागे डोके टेकवून बसला होता. 

"ऋग्वेद, ऋग्वेद बघ ना इकडे...काय होतंय तुला?"
त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे बघून परत डोळे मिटले.
"ऋग्वेद उठ ना" ती रडत रडत म्हणाली..
त्याने डोळे उघडत तिच्याकडे बघत थोडेसे हसत म्हणाला, "मी ठीक आहे ग" 
"तू ठीक नाही आहेस ऋग्वेद, तुला खूप लागले आहे. मला दिसत आहे. तू माझ्यासाठी काही लागले नाही असे  म्हणत आहे"
तो काहीच बोलला नाही.
"कुणीतरी प्लिज अंबुलन्स ला बोलवा" तिने बाजूच्या लोकांना ओरडून सांगितले. 
कोणीतरी अंबुलन्स ला बोलावले आणि त्यात ह्या दोघांना बसवून दिले.
ऋग्वेद ला बाजूला ठेऊन ती बरीच रडत बसलेली..
तिने नैनाला फोन करून सांगितले की काय झाले आणि तिला हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट बोलावले.

ऋग्वेद ला आत स्ट्रेचर मधून घेऊन गेले, ऋचा बरोबर होतीच. 
ऋग्वेद ला डॉक्टरांनी चेक केले आणि पटापट टेस्ट करायचे ऑर्डर दिले...ऋचा ला बाहेर बसायला सांगितले. 
तेवढ्यात नैना दोन तीन मित्रांसोबत हॉस्पिटलमध्ये पोचली.
तिला पाहून ऋचा तिच्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागली.
नैना ने तिला सावरले...तिला शांत केलं.
नर्स ला दाखवून तिच्या जखमांना पण तिने मलमपट्टी करून घेतली.

थोड्या वेळाने डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले, बराच मार लागला आहे..4 दिवस ऍडमिट करून ठेवावे लागेल.
सिटी स्कॅन पण काढला आहे ...त्याचा रिपोर्ट आल्यावर बाकीची ट्रीटमेंट ठरवूयात. 

ऋचा काहीच बोलली नाही...डॉक्टर गेल्यावर ती आत त्याला भेटायला गेली. 
तो आत शांतपणे झोपला होता. 
सिस्टर ने तिला सांगितले की त्याला पेनकिलर इंजेक्शन दिले आहे, त्याला डिस्टर्ब करू नका. 
ती तिथेच बसली. नैना पण तिच्या शेजारी उभी होतीच.

"नैना, मी हे काय केले ग?"
"अगं, तू काय मुद्दामून केलेस का ऋचा, ईट वॉज जस्ट अकसिडेंट"
"पण त्याला काही झाले तर?"
"त्याला काही होणार नाही...सगळे ठीक होईल"
"तो कधी उठेल ग?"
"उठेल लवकरच..."
" त्याच्या घरी कळवावे लागेल ना?"
"डोन्ट वरी, सुहास ने कळवले आहे"
"ते काही मला म्हणतील का ग नैना?"
"अजिबात नाही...तुला पण लागले आहेच ना"
ती बरीच घाबरलेल्या अवस्थेत होती.

थोड्या वेळात तीन चार लोक हॉस्पिटलच्या रुम मध्ये शिरले...
पाहिल्यावर एकदम धडकी भरतील असे ते लोक होते.
डोळ्यावरचा गॉगल काढून एक माणूस म्हणाला, 
"दादा वैशंपायन म्हणतात मला"
"नमस्ते काका, मी नैना"
"कसे झाले हे?"
"गाडीवरून पडला ऋग्वेद..."
"गाडी वरून पडला, आजपर्यंत तर असे कधी झाले नाही...गाडी कोण चालवत होते?"
ऋचा काहीच बोलली नाही...तिने नैना कडे फक्त पाहीले..
"गाडी कोण चालवत होते?" त्यांनी परत विचारले..
"काका, त्याच्याच गाडीवरून पडलाय तो, गाडी कोण चालवत असणार!"
ते काहीच बोलले नाही...
ऋचा ने कपाळावरचा घाम पुसला...
"डॉक्टरांना बोलवा" दादा म्हणाले
कुणीतरी डॉक्टरांना बोलावून आणले.

"डॉक्टर, हा माझा मुलगा आहे..एकुलता एक. त्याला काही झालेले मला चालणार नाही आणि तुम्हाला सुद्धा"

"हे बघा, तुमच्या मुलाला काही झालेले नाही आहे...जो काही मार लागला आहे ते भरून यायला वेळ लागेल, ते झाले की त्याला आम्ही डिस्चार्ज देऊ"

"वैशंपायन घराचा कुलदीपक आहे हा, याला काही होता कामा नये" 

डॉक्टर निघून गेल्यावर त्या दादांनी नैना आणि ऋचा ला त्यांच्या बद्दल माहिती विचारली. 
जुजबी माहिती घेऊन ते निघून गेले.
ऋचा घाबरून नैना चा हात घट्ट पकडून राहिली. 
नैना तीचा हात थोपटत राहिली.

थोड्या वेळाने ऋग्वेद शुद्धीवर आला. 
आल्या आल्या त्याने ऋचा कडे पाहून स्माईल केली आणि पाणी मागीतले.
तिने पाणी देऊन विचारले ,"कसा आहेस तू आता?"
"एकदम ठणठणीत...आ...आ...जोरात कण्हत बसला. 
त्याचे बोलणे आणि कन्हणे दोन्ही एकत्र आल्यामुळे ऋचा त्या परिस्थितीत हसायला लागली.

"ऋचा, तू रडत होतीस ना आत्ता आणि आता हसत आहेस" नैना तिला म्हणाली. 

तिचे बोलणे ऐकून ती परत रडायला लागली.
त्या दोघींचे ते बोलणे आणि वागणे पाहून ऋग्वेद गालातल्या गालात हसला.

"काही खायला मिळेल का?" त्याने विचारले
"हो येस...मी आणते तुमच्या दोघांसाठी कॅन्टीन मधून काही खायला आणि कॉफी "
नैना निघून गेल्यावर ऋग्वेद ऋचा कडे निर्मळपणे हसत पाहत म्हणाला,
"आवडले का?"
"काय आवडले?"
"तुझ्या मैत्रिणीला परत कटवलेले"
"ऋग्वेद, तू ना....." ती डोळे मोठे करत म्हणाली
तो हसायला लागला पण त्याचे अंग दुखायला लागला आणि त्यामुळे तो परत कण्हला.
ती त्याच्या जवळ गेली आणि तिने अलगद त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटले.

"हे काही बरोबर नाही ऋचा"
"काय बरोबर नाही...काय चुकले माझे?"
" मला कुठे कुठे लागले आहे आणि तू फक्त माझा खांदा थोपटत आहे"
त्याच्या बोलण्यातील अर्थ लक्षात येऊन ती लाजली.

क्षणभर कोणीच काही बोलले नाही..
"ऋग्वेद, तू माझ्यावर रागावला नाहीस ना?"
"का रागवावे?"
"मी तुला पाडले"
"तू नाही पाडले, त्या भू भू च्या पिल्लुने पाडले"
"हो पण गाडी चालवत मी होते ना"
"आणि मी चालवत असताना पिल्लू आले असते तर..."
"तरी तु मला पाडले नसतेस"
"एवढा विश्वास..."
"आहेच मुळी"
"का असे?"
"नाही माहिती... पण आहे"

तिने अलगद पणे त्याचा हात हातात घेतला.
त्याने तिच्याकडे पाहिले ती पण त्याच्याकडे पाहत होती..
दोघेजण एकमेकांना पाहत राहिले. 

काहीवेळाने त्यांच्या दोघांच्या समोर कॉफीचा मग आला आणि त्यांची तंद्री भंग पावली.
नैना हातात कॉफ़ी घेऊन दोघांकडे मिश्कीलपणे पहात होती.
नैना आली हे कळताच ऋचा एकदम ओशाळली आणि उठून म्हणाली, अगं तुझीच वाट पाहत होतो खूप भूक लागली आहे दोघांना"

तिचा गोंधळ पाहून नैना हसायला लागली. " मला तुम्हा दोघांना डिस्टर्ब करायचे नव्हते पण कॉफ़ी गार झाली असती ना..."

ऋचा ने ऋग्वेद चा बेड हँडल ने वरती केला आणि त्याच्या हातात कॉफी दिली...
 बरोबर पफ आणि केकस पण होते. 
खाताना वातावरण एकदम शांत झाले होते ...नैना ने आपल्याला पकडले या भावनेने ऋचा बरीच लाजली होती. 
ऋग्वेद मात्र तिचे चेहऱ्यावरील भाव शांतपणे अनुभवत कॉफी घेत होता!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all