त्याला आवडलेली ती भाग 11

Rucha and Naina are amazed to see the whole empire of Rugved

त्याला आवडलेली ती:- भाग 11

हॉल ची शोभा भव्यता त्यांच्या डोळ्यात मावत नव्हती..काचेची 2मोठी झुंबरे त्या हॉल ला अजून झळाळी देत होते. 
मध्यभागी असलेल्या मोठ्या सोफ्यावर त्या दोघी जाऊन बसल्या..ऋग्वेद त्याच्या रूम मध्ये गेला... त्यांच्या पुढे चांदीच्या भांड्यातून पाणी आले...
ते झाल्यावर मोठ्या बाऊलमध्ये फ्रुटस आले आणि त्यानंतर छानसे सरबत आले...आजूबाजूला भरपूर नोकर सतत वावरत होते..
त्याच्या श्रीमंतीचे त्या दोघींना दडपण यायला लागले. 
ऋग्वेद यायची त्या वाट पहात राहिल्या...

थोड्या वेळाने ऋग्वेद आला...त्याला चालताना थोडासा त्रास होत होता पण तरी तो बराच बरा होता.. 
"मला आता जबरदस्तीची विश्रांती घ्यावी लागेल..." तो आल्या आल्या दोघींना म्हणाला.
"आम्ही जाऊ का?" नैना ने विचारले..
"नाही ग, बसा निवांत... मी या करता सांगत आहे की मला 4-5 दिवस कॉलेज ला येता नाही येणार..."
ऋचा ने नुसते त्याच्याकडे बघितले काहीच बोलली नाही...

"ऋग्वेद, तू सांगितले नाहीस..." नैना त्याला म्हणाली
"काय?"
"तू इतका श्रीमंत आहेस..."
तो नुसता हसला.... आणि ऋचा कडे पाहून म्हणाला, "काय ग ऋचा, तुलाही काय म्हणायचे आहे का?"
"हो, तुझ्यापुढे आम्ही खूपच गरीब आहोत"
"बरं.... अजून"
"अजून काय, ह्या श्रीमंतीचे आम्हाला दडपण येत आहे"
"माझ्या वागण्यातून असे काही मी जाणवुन दिले का?"
"नाही ना...त्याचेच खूप आश्चर्य वाटते.."
"बस, झाले तर मग! चुकूनही असा विचार करू नकोस ऋचा...आपण सगळे एकच आहोत"
ती काहीच बोलली नाही..

नैना मात्र चुळबुळ करत होती...शेवटी न राहवून ती म्हणाली, "ऋचा जायचे का आपण?"
ऋचा ला अजिबात जायचे नव्हते पण नैना ला नाही म्हणू शकत नव्हती.
तिची ईच्छा ओळखून ऋग्वेदच म्हणाला, "थांबा ग! तुम्हाला मी घर दाखवतो"
त्याने 2 नोकरांना हाक मारली आणि सगळ्यांसाठी जेवण लावायला सांगितले....
"या, त्यांचे जेवण लावून होईस्तोवर आपण घर पाहून घेऊयात"
त्या दोघी त्याच्या मागे चालायला लागल्या!

भव्य भक्कम शिसवी दरवाजे, प्रत्येक खोली ही एक खोली नसून त्याच ते एक आगळं वेगळं रूप होते.... तेथील सजावट सामान सगळं युनिक होते!

काही नवीन तर  काही ट्रॅडिशनल असा मेळ! 
तिथली ती क्रिस्टल ची छोटी काही मोठी झुंबरे! 
भिंतीवर काही सिलेक्ट करून लावलेली पेंटींगस तर काही क्राफ्ट वर्क केलेले वॉल पीस! 
पाय दमायला लागले पण घराचा परिसर संपेना! 
घर आहे की एखादा राजवाडा हेच त्यांना कळेना आणि त्या थाटाच्या आणि श्रीमंतीच्या देखाव्यात त्या दोघींना प्रचंड दबल्यासारखे झाले.
त्यांची ती अवस्था त्याला जाणवत होती कारण त्या अगदी अबोल झाल्या होत्या. वरचा एक मजला पूर्ण दादासाहेबांच्या वास्तव्याचे आणि कामाचे ठिकाण म्हणल्यावर त्या जायला नकोच म्हणाल्या.

सगळ्यात शेवटी त्या आल्या ऋग्वेद च्या रूम कडे.
एक भला मोठा शिसवी पलंग, त्याच्या उजव्या बाजूला मोठं बुकशेल्फ! 
तिथे पण एक छान वेगळ्या आकाराचे टेबल त्यावर डीसायनर लॅम्प आणि एक साधी तर दुसरी रिकलायनिंग चेअर!
शेल्फ पूर्ण पुस्तकांनी भरलेलं, भिंतीवर एक त्याचा एकदम स्टाईल वाला फोटो आणि त्याच्या एकदम ऑपोसीट त्याच्या लहानपणीचा एक त्याच्या आईसोबतचा(अंदाजे) फोटो लावलेला होता. 
तो हुबेहूब आईसारखा दिसत होता. 
तिथे एक बाजूला सोफा, भिंतीवर काही बाईक चे पोस्टर अस साधंच पण खूप भावेल असं रूमचे डेकोरेशन होत. लागूनच गॅलरी तिथे छान गुलाबाची बहरलेली झाडे , बहरलेला निशिगंध आणि पायाला गुदगुल्या करेल असे लॉन! 
ते बघुन तर त्यांचे हावभावाच बदलले. एकदम प्रसन्न स्मितहास्य त्याच्याही चेहऱ्यावर दिसत होते. ऋचा तर बघतच राहिली!

"झालं असेल तर निघुयात का इथून?" खोडकर पणे तो म्हणाला तशा त्या भानावर आल्या.
"हो" म्हणत त्या दरवाज्याकडे निघाल्या तसं पटकन त्याने बेडवरच काहीतरी लपवले हे नैना च्या लक्षात आले तिने खुणेनेच त्याला काय ते विचारले पण त्याने काही नाही असे बोलला.
नैना पण खोडकरपणाने गपचूप तो पाठमोरा फिरल्यावर हळूच तिथे गेली आणि पटकन पाहिले तर तो एका मुलीच्या फोटो होता. चेहरा बघून ती पटकन हसलीच....

जेवणाचा टेबल म्हणजे तर किमान 25 लोक बसू शकतील इतका मोठा गोलाकार आणि त्यावर तितक्याच प्रकारचे मेनू!
 एक टॉय ट्रेन ज्यावर सगळी भांडी ठेवलेली अगदी सॅलड्स म्हणाल तर त्याचेच विविध प्रकार ते बघून त्या फक्त एकमेकिंकडे बघत होत्या आणि तो त्या दोघींकडे.

"काय जेवायचे नाही की काय तुम्हाला?" तो म्हणाला. दचकल्यासारख त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तसे हसत त्याने "सुरवात करा" असे सांगितलं. 
ताटातील अनेक प्रकार पाहून त्यांना जेवणच जाईना पण त्याच्या शब्दा खातीर त्या जेवायला बसक्या...

"ऋग्वेद तुमचा नक्की काय व्यवसाय आहे? नाही म्हणजे प्रस्थ बडे आहे हे नक्कीच!" ऋचा म्हणाली.
"अग एक छोटा उद्योग समूह आहे, आमचा...."
"काय नावाने...?"
"वैशंपायन ग्रुप!"
"व्हॉट! म्हणजे ते इंडिस्ट्रीलिस्ट वैशंपायन्स?" नैना हातातला चमचा खाली टाकतच बोलली.
"हो तेच ! आणि असं काय रिऍक्ट करतेस? जेव गपचूप!" तो बोलला, पूढे काही मिनिटे एकदम शांतता होती...
"तू वैशंपायन ग्रुप्स चा मालक आहेस?" नैना ने परत विचारले..
"मालक नाही...मालकांचा मुलगा"
"म्हणजे तेच ना..."
"तेच कसे..."

तेवढ्यात काहीतरी गडबड जाणवली त्या एकदम भांबावल्या पण तो काहीच घडत नाही असेच जेवत होता. 
धाड धाड चालण्याचा आवाज आला त्यांनी वळून पाहिले तर दादासाहेब आत येत होते, त्या दोघींना पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या!
त्या दोघीसुद्धा घाबरल्या,पण हातानेच त्याने रिलॅक्स जेवा असे खुणावले. 
जसे आले तसेच ते त्यांच्या वरच्या मजल्याकडे निघाले पण काहीतरी आठवले तसे पुन्हा बाहेरच्या रूम कडे गेले.
कसंबसं जेवण उरकले आणि नैना म्हणाली " तू इतका श्रीमंत मग तू कॉलेज ला का येतोस?"
"म्हणजे?"
"अरे तू काही केले नाहीस तरी तुझ्या पुढच्या 7 पिढ्या ऐशो आरामात जगतील. तुला शिकून काय करायचे?"

"म्हणजे काय? मला पण माझे आयुष्य जगायचे आहे. त्यात माझ्या मनासारखे केलं तर बिघडले कुठे?"

"अरे पण तू बुलेट ने येतोस! समान्य वागतोस! तुझ्या वागण्यात हा असला बडेजाव नाही!"

"का असायलाच हवा का?"
"नाही असेच काही नाही!"
"मग झाले तर! आपण फ्रेंड्स आहोत इतकच योग्य नाही का?"

"हो" म्हणत तिने मान डोलावली.
"अरे बराच वेळ झाला आम्ही निघू का?" ऋचा म्हणाली.
"ठीक आहे पण पुन्हा या" म्हणत तो त्यांना सोडायला बाहेर च्या रूम कडे आला तर दादासाहेब तिथे बसलेले.
त्या दोघींना बघताच ते म्हणाले " ऋचाच ना तू?"
"हो"
"चल, तुझ्याच सोबत येतो तुझ्या घरी" तशी ती घाबरली आणि त्याच्याकडे बघायला लागली. तो एकदम कूल!
"तुम्ही असं काही करणार नाही आहेत!" तो खमक्या स्वरात म्हणाला.
"तुम्ही आम्हाला अडवणार?"
"असेच समजा! किंवा सांगतोय की नका जाऊ असे समजा!"
"का?"
"मी म्हणतो म्हणून!"
"का ऐकावे आम्ही?"
"मी म्हणतो म्हणून!"
त्या दोघांच्या या संवादावर या दोघींच्या माना फक्त इकडून तिकडे फिरत होत्या.

"तुम्ही दोघी जा!मी नंतर फोन करतो. राजू यांना घरी सोड!" तो हुकमी आवाजात म्हणाला तसं तो राजू नावाचा व्यक्ती लगबगीने निघाला आणि दादासाहेब डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होते तर तो तितकाच ठामपणे आणि थंडपणे त्यांच्याकडे बघत होता.

त्या परिस्थितीत घाबरतच त्या दोघींनी दादासाहेबना  लांबून नमस्कार करत त्याला बाय केले आणि मेन दरवाज्याकडे निघाल्या.
राजू ने स्कॉर्पिओ काढली आणि त्या दोघींना बसवले...
गाडी गेट बाहेर जाईस्तोवर ऋग्वेद पाहत होता...
शेजारी उभे असलेले दादासाहेब कधी गेले हे त्यालाच कळले नव्हते! 

स्कॉर्पिओ ने  दोघींना ऋचा च्या घरी सोडले..ऋचा च्या आईने त्या दोघींना गाडीतून उतरताना पाहिले..
त्या आत शिरल्यावर आईची लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली...
"कुणाची गाडी होती? आणि तुम्ही गाडीत कसे बसल्या?"
"ऋग्वेद ची.." 
"कोण ऋग्वेद?" 
"आमच्या कॉलेज मध्ये आहे"
"मग तो घरी का नाही आला?"
"कारण त्याचा ड्रायव्हर सोडायला आला होता"

अजून काही विचारायच्या आतच नैना म्हणाली,
"काकू मी तुम्हाला सगळे सांगते"आणि तिने सगळी गोष्ट सांगितली...
तिचे ऐकून काकू डोक्याला हात लावून बसल्या..

"पण मी म्हणते की तुला गरज काय होती त्या गाडीला चालवायची"
आईच्या या प्रश्नावर ऋचा शांत बसली...
"बाबांना कळले तर काय होईल ते तूच बघ आता.." असे म्हणून तिची आई तिथून निघून गेली...

ऋचा ला पण बरेच टेन्शन आले होते...जर दादासाहेब घरी आले तर काय होईल? बाबा काय म्हणतील? एवढा मोठा माणूस आपले काही पण करू शकतो...तिने नैना कडे पाहिले...नैना पण काय करता येईल याच विचारात होती...तिने तिच्या मित्राला फोन केला...
"ऐक ना शंतनू, तू आत्ता काय करतो आहेस?"
"काहीच नाही?"
"मी ऋचा चा पत्ता तुला पाठवत आहे, पुढच्या 15 मिनिटात तू तिथे ये"
"ठीक आहे " म्हणून त्याने फोन ठेवला...

बरोबर 15व्या मिनिटाला तो ऋचा च्या घरापाशी होता...
ऋचा ने आईला कॉफी करायला सांगितली आणि ती, नैना आणि तो तिघे जण बाल्कनीत गेले...
नैना ने त्याला सगळे सांगून विचारले आता काय करायचे?
" आईला! बोंबाबोंब...त्या वैशंपायन ग्रूप कडूनच बाबा मटेरियल घेतात"
"आता तुझे बाबा कुठून आके इथून?"
"नाही म्हणजे त्यांना कळले की मी तुम्हाला मदत करतोय आणि त्यांनी आम्हाला मटेरियल देणे बंद केले तर?"
"ई...फारच भित्रा निघालास तू?"
"ए, भित्रा नाही म्हणायचे, काल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला मोबाईल मीच दिला होता...विसरू नकोस"
"हो, कारण तेव्हा तुला माहिती नव्हते ना की हा वैशंपायन  यांचा मुलगा आहेस"
"हो यार, ते पण खरंच आहे" 
"म्हणजे तुझा आम्हाला काही उपयोग नाही..."
"अगं असे कसे म्हणतेस? मी काहीतरी करतो... "
"काय करतोस..."
"विचार करू देत..."

त्यांचे एकंदर बोलणे पाहून ऋचा खूपच उदास झाली...
या सगळ्यातून तिला केवळ ऋग्वेद च वाचवू शकतो ही एकच शक्यता तिच्या मनात अजून घट्ट झाली...!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all