त्याला आवडलेली ती भाग 10

The communication between Rugved and Rucha continued

त्याला आवडलेली ती:- भाग 10

रात्री 2 वाजेपर्यंत त्या दोघांचे चॅट सुरु होते. शेवटी ऋग्वेद  ने ऋचा ला तो झोपतोय असे सांगितले त्या नंतर 15 मिनिटांनी चॅट थांबले. साहजिकच त्याला सकाळी उशिरा जाग आली.
जाग आल्यावर त्याने बघितले तर दादासाहेब समोर बसलेलं...तो जागा व्हायची वाट पाहात होते. 
"कधी आलात?" 
"तासभर झाला...तुम्ही झोपला व्हता म्हणून नाय उठवलं"
"बरं..बसा, मी फ्रेश होऊन येतो"

तो फ्रेश होऊन आला तर समोर आले घातलेला चहा आणि कुकीज होत्या...
दोघेही चहा घ्यायला लागले...

चहा घेऊन झाल्यावर दादासाहेबांनी ऋग्वेद ला विचारले, 
"तुमचे काय चालू आहे भैय्या?
"काय झाले आता?"
"रात्री 2 वाजेपर्यंत तुमच्या पडदयाच्या मागून लाईट येत होतां असं गणू म्हणाला..."
"त्या गणू ला काय कळते दादा साहेब....?"
"बरोबर आहे त्याला काही कळत नाही म्हणून त्याला मी पाठवून दिले घरी पण मला तर कळते ना..."
"म्हणजे...?"
"हा मोबाईल कोणाचा आहे..?"
ऋग्वेद चा उशीखाली जो फोन होता तो आत्ता दादा साहेबांकडे होता...
"......"
"कुणाचा आहे?"
"मित्राचा...."
"आणि त्यातले केलेले मेसेज....हे मित्राला का त्या मुलीला?"
"दादासाहेब तुम्ही त्यातले मेसेज वाचले????" ऋग्वेदने आश्चर्याने विचारले...
"वाचावेच लागले..." 
"का???" तो किंचाळत म्हणाला...
"दादासाहेबांवर किंचाळत नाही कोणी?"
"पण मी करेन ते..."
"भैय्या..."
"मी पण वैशंपायन आहे...माझ्या धमन्यात पण तेच रक्त आहे...आणि मी ही तेवढाच आवाज चढवू शकतो"
"तू कोणा मुलीसाठी माझ्या वर आवाज चढवणार?"
"हो..."
"विसरू नका मी बाप आहे तुमचा..."
"आज आई असायला हवी होती.....तिने मला समजून घेतले असते"
"अरे, आई हयात नसली म्हणून काय झाले मी तर सगळे तुझं मनासारखे केले ना..."

"मनासारखे...? पूर्ण आयुष्य मला बंधनात ठेवले, माझ्यावर हुकूमशाही दाखवली..मला सतत धाकात ठेवले  आणि इथे हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा तुमच्या माणसांना बोलवून मला नजर कैदेत ठेवले....
आणि आज तर तुम्ही हद्द केलीत...माझे मेसेज मी झोपलेलो असताना वाचलेत...हे सगळे मनासारखे आहे का?"

"या सगळ्यात मला तुमची किती काळजी आहे हे दिसत नाही का?"
"नाही दिसत आहे...तुरुंगवास वाटत आहे मला हा"
"भैय्या..."
"मेला तुमचा भैय्या....तुम्हाला वागताच येत नाही तुमच्या मुलाबरोबर नीट....खरंतर कसे वागायचे हे कळत नाही...."
"आम्हाला कळत नाही...?या दादासाहेबाला कळत नाही?"
"नाहीच कळत आणि तुम्ही ते मान्य पण करणार नाही कारण तुमचा इगो आड येतो....."
"काय येतो?"
"अहंकार..."
दादा प्रचंड रागाने ऋग्वेद कडे पाहत होते...

काही क्षण न बोलता पसार झाले...
"त्या मुलीकडे चाललो आहे आम्ही..."
"का?"
"तीला आम्ही पोलिसांच्या ताब्यात द्यायला"
"काय केले आहे तिने?"
"आमच्या मुलाचा अपघात..."
"हा हा हा...आणि तिचेच मेसेज तुम्ही वाचले ना..त्यात कुठे लिहिलेले सापडले का की तिने मुद्दामून केले"
"पण पाडले तर ना..."
"तुम्हाला काय करायचे आहे ते करायला तुम्ही मोकळे आहात....नंतर काय करायचे ते मी पाहून घेईन.

दादासाहेब निघून गेले तरी त्यांचे लोक रूम च्या बाहेरच थांबले होते...
डॉक्टर आणि नर्सेस येऊन तपासून गेल्या. 
"डॉक्टर लवकर डिस्चार्ज मिळेल का मला?"
"येस, यु विल.."डॉक्टर हसत म्हणाले...

थोड्या वेळाने नैना आणि ऋचा आल्या...पण त्यांनादादासाहेबांची लोक आत सोडेना...
"काय गोंधळ चालू आहे रे?"  ऋग्वेद ने विचारले.
"ऋग्वेद आम्ही आहोत...ही माणसे आत सोडत नाही आहेत"
एक अस्सल इरसाल शिवी हासडत ऋग्वेद त्यांच्यावर ओरडला...
त्या शिवी ने लगेच परिणाम केला...
त्या दोघींना आत यायला मिळाले.....

"तुला एवढ्या घाण शिव्या देता येतात ऋग्वेद, मला माहिती नव्हते "ऋचा आल्या आल्या म्हणाली...
"तुला माझ्या बद्दल खरंच सगळी माहिती आहे का ऋचा?"
"नाही ना, तीच घ्यायला आली आहे..."
"नैना ला घेऊन?" तो हसत म्हणाला..
"म्हणजे काय, शी इज माय बेस्ट फ्रेंड"
"काल पासून माझी पण झाली आहे...थँक्स नैना"
"अरे थँक्स काय, नसता दिला तर ह्या ऋचा ने मला कच्चे  खाऊन टाकले असते"
"काही पण हं नैना..." ऋचा लाजत म्हणाली...

"ऋचा, मला तुला एक सिरीयस गोष्ट सांगायची आहे..."
"काय?"तिच्या डोळ्यात एकदम चिंता साचली
"हे बघ माझे वडील म्हणजे दादासाहेब तुझ्या घरी जातील   तुझ्या वडिलांना भेटायला..."
"का?" ऋचा घाबरत म्हणाली...
"त्यांना माहिती आहे की तू मला पाडले आहे आणि त्यामुळे त्यांना तुझ्या बद्दल तक्रार करायची आहे"
"बापरे... ऋग्वेद आता मी काय करू?" ती रडकुंडीला येत म्हणाली...
"डोन्ट वरी, मी बघतो...मला इथून फक्त डिस्चार्ज मिळू दे..."
"मला सॉलिड भीती वाटत आहे..."
"नैना, तू समजावून सांग तिला आता..."
"मी काय सांगू ऋग्वेद, काल ते लोक ज्या पद्धतीने आमच्याशी बोलले, आम्ही खूप घाबरलो होतो...आज सुदधा त्यांनी कसे थांबवले बघितले ना..."

" ते दादासाहेबांचे चमचे आहेत...काळजी करू नका...एकच काम करा....माझा फोन दुरुस्त करून आणा...नाहीतर ते सिम कार्ड आणा, बाकी मी बघतो.."

"पण तो फोन कोणाकडे आहे? मला वाटते की मी अंबुलन्स मध्ये ठेवलेला ...नंतर तो माझ्याकडे नव्हता...मला नाही आठवत आहे आता..." ऋचा चा आवाज अगदीच काकुळतिला आला होता. 

"ऋचा काळजी नको, मी  घेतो काय ते...नैना एक अड्रेस देतो तिथे जा...तिथे मनिष  भेटेल त्याला सांग भैय्या ने लगेच हॉस्पिटलमध्ये बोलावले आहे...त्याला घेऊनच ये...रिक्षा ने जा आणि येताना त्याच्या बरोबर ये..."

"तो असेल ना तिथे...?"
"नसेल तर तिथून त्याचा नंबर घे आणि त्याला फोन करून सांग..."
"ओके बॉस..." असे म्हणून ती गेली..

"तू आजपण तिला कटवलेस का?" ऋचा ने निरागसपणे विचारले..
तिच्या या बोलण्याला ऋग्वेद हसायला लागला...
"नाही ग!आज खरंच पाठवलंय! माझ्याकडे कोणाचा नंबर नाही ना म्हणून..."
"हां, मग ठीक आहे..."
"किती वाजता उठलीस तू?"
"उठायला झोपले कोण होते...?"
"म्हणजे?"
"मी रात्रभर जागेच होते..."
"काय विचार करत होतीस?"
"काहीच नाही..."
"असे कसे होईल?"
"हो असेच आहे..."
"असे का! बरं ......मग, मॅडम लक्षात आहे ना काल रात्री काय बोलला आहे ते"
"काय?"
"प्रॉमिस जे केले होते ते?"
"नाही... कसले प्रॉमिस?" ऋचा ने भोळेपणाचा आव आणत विचारले...
"प्रॉमिस आठवत नाही ना...?"
"नाही..." ती मिश्किलपणे म्हणाली.."

"या दादासाहेब...हीच ती जीने मला गाडीवरून पाडले..." तो एकदम मोठ्याने दरवाज्याकडे पाहत म्हणाला...
त्याच्या या बोलण्याने ऋचा एकदम दचकली आणि दरवाज्या कडे न पाहताच त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली....
ती जवळ आलेली पाहातच त्याने अलगद तिला आपल्या जवळ ओढले...
आधीच घाबरलेली ती असे जवळ ओढलेले पाहून अजूनच गोंधळली....
"कोणी आले नाही आहे, या रूम मध्ये फक्त आपण दोघेच आहोत..." तो हळूच तिच्या कानात म्हणाला.
तिला त्याची खोडी कळली आणि तिने पण मिश्कीलपणे पटकन त्याला कळायच्या आत त्याच्या गालावर ओठ टेकले आज हसत पटकन बाजूला झाली.
काय घडले हे एक क्षण त्याला कळलेच नाही पण लक्षात आल्यावर त्याने हसून तिच्याकडे पाहिले...
तिने पण हसत त्याला साथ दिली आणि टॉप ला कॉलर नव्हती तरी ती वर खेचल्यासारखी करत 'मी पण काही कमी नाही' असे दाखवून दिले.....तिचा शब्द तिने पळाला होता ना!

त्याने हातानेच तिला जवळ बसायला सांगितले.
ती त्याच्या बाजूला बेडवरच बसली, त्याने तिच्या हातावर हात ठेवला तेवढ्यात बाजूचा पडदा हलला तसं त्याने रागाने तिकडे बघितल्याबरोबर कोणतीतरी जे उभे होते ते मागे झाल्याचे जाणवले.

तिने ही त्याचा हात हातात घेऊन पुन्हा एकदा त्याला"सॉरी" म्हणाली.
तसं त्याने डोळ्यानेच "ठीक आहे" असे खुणावले.
"मग काल कोणीतरी एकदम रंगात येऊन गप्पा मारत होत तो म्हणाला तशी ती लाजली.
"वाह म्हणजे तुला लाजता सुद्धा येते!" त्याने पुन्हा तिला चिडवले.
पण यावेळी न चिडता ती फक्त हसली आणि तिचे गाल आरक्त झाले.
ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघण्यात हरखून गेले होते इतक्यात मोठयाने खांकरण्याचा आवाज आला तशी ती दचकली आणि मागे वळून पाहिले तशी ताडकन उठून उभी राहिली कारण मागे दादासाहेब येऊन उभे होते...

ती एकदम घाबरून बाजूला उभी राहिली तसं त्याने तिला हातानेच 'रिलॅक्स' असे खुणावले.
त्याच्या हातात मगाशी घेतलेला फोन देत ते म्हणाले 
" तुमचे हे वागणं आम्ही विसरणार नाही! 
काय कमी केलं आजवर आम्ही तुम्हाला? तुमची काळजी करतो हेच चुकत ना आमचं? आणि ही आजची पोरगी तुम्हाला जवळची वाटते" म्हणत एक रागीट कटाक्ष त्यांनी तिच्याकडे टाकला तशी आधीच घाबरलेली ती एकदम रडायला लागली.

"राडायला काय झालं? खातो की काय आम्ही तुम्हाला? माझ्या पोराला पाडलं अन वर तुम्हीच रडता?" ते म्हणाले.
काय बोलावे तिला कळात नव्हते पण तिने फक्त हात जोडले.

"डॉक्टराला सांगितलंय आम्ही.....थोड्या वेळाने तुम्हाला ते सोडतील हॉस्पिटलमधून, सरळ घरीच जायचं आणि तुमची बुलेट आम्ही दिलीय दुरुस्तीला" म्हणत ते निघून पण गेले तसे तो पुन्हा हसायला लागला तशी ती वेड्यासारखी त्याच्याकडे बघतच राहिली.

"तुला काय वेड्या लोकांमध्ये आलो असे वाटतंय का?"तो म्हणाला.
"मी कुठली शहाणी आहे मी पण तुझ्यासारखीच ना.... म्हणून तर तू आवडला ना"
आणि तिने पटकन डोळा मारला तसं तो मोठे डोळे करून तिच्याकडे बघत राहिला. 

तितक्यात नैना आली पण सोबत कोणीच नव्हते ती गिल्टी अशा हावभावात असतानाच त्याने " its ok नैना! माझं काम झालंय! तो बाहेरगावी गेलाय मला आताच कळले."

नैना फक्त हसली, थोड्या वेळात फॉर्मलिटी पूर्ण झाल्या आणि डॉक्टर त्याला तपासून गेले. 
राकट असे 4 ते 5 लोक आत आले त्याच्या सामानाची आवरावर करू लागले तसं हातात घेतलेलं समान ऋचा ने खाली ठेवले.

 त्या दोघी बाहेर निघाल्या तसं ऋग्वेद ने त्यांना थांबवलं आणि तो त्या माणसांना म्हणाला " सगळं घेऊन घरी जा मी थोड्या वेळाने येईल" तसे ते घाबरले आणि एकदम हातापाय पडत त्याला म्हणाले " अस नका करू तुम्ही! दादासाहेब आमचा जीव घेतील! 
तुमचं ठीक हो तुम्ही त्यांचे लेक.... पण आम्ही विनाकारण मारले जाऊ!" म्हणत ते हात पाय जोडायला  लागले.

त्या दोघी अवाक होऊन बघत होत्या, तो म्हणाला " तुम्ही पण चला आमच्या सोबत!" 

त्यांची हिम्मत होईना, पण त्याला नाही पण म्हणता येईना. 
हॉस्पिटल च्या खाली आलिशान पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर उभी होती, त्याला पाहताच एकाने धावत जाऊन दार उघडले. दोघांच्या आधाराने चालणारा तो आणि त्याचा तो रुबाब हा त्या दोघींना थक्क करत होता शिवाय त्या गाडीमागे आणखी 2 स्कॉर्पिओ होत्या.

हे प्रकरण वेगळेच आहे मनाशी म्हणत नैना ने त्याच्याकडे पाहिलं तसं ऐकू गेल्याप्रमाणे तो म्हणाला " कळेलंच ग तुला सगळं प्रकरण!" तशी ती चपापली.

त्याच्या सोबतच त्या दोघी रेंज रोव्हर मधून निघाल्या थोड्याच वेळात एक भल्या मोठया लोखंडी दरवाजासमोर काही क्षण गाडी थांबली, जागेचे गेट उघडलं आणि गाडी आत गेली.

समोरच दृश्य बघून त्या फक्त डोळे विस्फारून बघत होत्या. ते घर आहे की राजवाडा हेच त्यांना कळत  नव्हते इतकी मोठी बिल्डिंग आणि समोर मोठी बाग त्यातून जाणार तो रस्ता आणि त्यात दुतर्फा झाडे!

त्यांच्या या अशा नजरेकडे अपेक्षित असल्याप्रमाणे तो मिश्कीलपणे फक्त बघत होता.

गाड्या थांबल्या तश्या दारे उघडायला 4 नोकर धावले...
त्यांचे स्वागत करायला 2 स्त्रिया हातात ओवाळायचे ताट घेऊन उभ्या होत्या! 
या सगळ्या थाटाचे ऋचा ला प्रचंड दडपण आले....
तिने नैना चा हात घट्ट पकडून ठेवला!
"सॉलिड मोठी लोक आहेत ही..." नैना तिच्याकडे पाहत म्हणाली.
ऋचा च्या मनात त्यावेळेस अगदी सेम विचार चालू होते! 
ओवाळून ऋग्वेदचे आत स्वागत झाले..
त्याच्या मागोमाग त्या दोघींनी घरात पाऊल टाकले आणि तो भव्य हॉल पाहून त्या दोघींचे डोळे दिपले! 

क्रमशः

©®
अमित मेढेकर

🎭 Series Post

View all