त्याची गोष्ट भाग 2

अनयचे स्वप्न पूर्ण होईल का?
त्याची गोष्ट भाग 2

मागील भागात आपण पाहिले की स्पर्धेत विजयी झालेल्या अनयची मुलाखत पत्रकार सारिका घेत असते. लहानपणी आपण आई आणि माई बरोबर स्वयंपाकघरात रमत असू. ही अनयची आठवण त्याने सांगितली. पण त्याचे वडील त्याला रागवत असत. आता पाहूया पुढे.


अनयला आठवणीतून बाहेर काढत सारिका म्हणाली,"अनय लहान असताना सगळेच आई बरोबर जोडलेले असतात. पुढे वय वाढते तशी स्वप्न बदलतात. असे काही झाले का?"

अनयला पुढे आठवू लागले. जरा मोठा झाल्यावर मी शाळेत जाऊ लागलो. खर तर आईला असेच वाटलेले की आता मोठा झाल्यावर माझे वेड कमी होईल.

पण मला ते फोडणीचे मसाले,ती उपकरणे,पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया सगळे आवडायचे.

मोठी ताई एकदा म्हणाली,"अन्या,बाहेर पळ. इथे काय मुलींसारखा बसलास?"

दुसऱ्या दिवशी आमचे मोरे गुरुजी शाळेत शिकवत असताना म्हणाले,"मुलांनो कुठलेही काम हलके नसते. ते करायला लाजू नये."

मी चुळबुळ करताना पाहून त्यांनी विचारले,"अन्या,काही विचारायचं आहे का?"

मी घाबरत विचारले,"गुरुजी,जेवण बनवण हलके काम आहे का?"

गुरुजी हसले,"वेड्या,ते तर जगातील सर्वाधिक अवघड तरीही सुंदर काम आहे. त्यात पदार्थ मोजताना गणित आहे. चवींचा समतोल साधताना विज्ञान आहे."


गुरुजी खूप बोलले. मला इतकेच समजले की स्वयंपाक बनवणे सुंदर आहे. त्यात काहीही वाईट नाही.


एकीकडे अभ्यास आणि खेळात चमकत असल्याने मी शाळेत लोकप्रिय होतो. त्यात मोठा भाऊ इंजिनियिंगला गेला.


आप्पा म्हणाले,"एक इंजिनियर झाला आता दुसऱ्याला डॉक्टर करू."


माई मात्र म्हणाली,"आप्पा,मुलांच्या मनाचा विचार करत जा हो!"

आप्पा हसले,"माई,लहान असतात ती. त्यांना काय कळते?"

मी मात्र आता आईला दाणे कुटून दे. कुठे भाज्या निवडून दे. अशी मदत गुपचूप करायचा. तरी मोठ्या बहिणी मला हाकलत.

आमची ताई फार छान गात असे. एकदा मी सहज म्हणालो,"तायडे,तुझा आवाज किती छान आहे. तू गाणे का नाही शिकत?"

माझं बोलणं बाहेरून येत असलेल्या आप्पांनी ऐकल आणि मला एक मुस्कटात लगावली.

आप्पा रागाने थरथरत म्हणाले,"गाणी शिकून काय तमाशात जाणार का ती?"

ताई मात्र खाली मान घालून रडत होती. मी आता आप्पा असले की जास्त बोलत नसे.


घरातून जसा विरोध होता तसेच स्वयंपाक आवडणारा मुलगा ही संकल्पना नातेवाईकांना सुद्धा पचनी पडत नसे. अनेकजण आडून आडून आईला ऐकवत असत.


त्या वर्षी मी दहावीला होतो. मोठ्या ताईचे लग्न झालेले. लहान ताई मात्र बंडखोर होती. ती शिक्षिका बनायचे म्हणून पुढे शिकत होती.


पावसाळ्याचे दिवस होते आणि आई आजारी पडली. ताप,थंडी आणि पित्त झालेले.

त्याचवेळी माई नेमकी छोट्या ताईबरोबर रहात होती. डॉक्टरांनी आईला तपासले आणि सांगितले,"राधाबाई,हलका आहार घ्या. पेज किंवा मुगडाळ खिचडी."


आईने फक्त मान डोलावली. आई घरी आली. आता आई स्वयंपाकाला लागणार एवढ्यात आईला चक्कर आली. मी तिला बाहेर नेऊन झोपवले.

आई पेज करते ते लक्षात होते. गरम पेज तयार केली आणि आईला भरवली. आईच्या डोळ्यात पाणी आले.

तिने गालावर हात ठेवला आणि म्हणाली,"अनय,सुरेख चव आहे तुझ्या हाताला."


त्यानंतर आई मला गुपचूप अनेक पदार्थ शिकवू लागली. आता ती पहिल्यासारखी मला मनाई करत नसे.

डोळ्यातले अश्रू पुसणाऱ्या अनयला पाहून सारिका म्हणाली,"त्यानंतर मग आपण हेच काम करायचे हे तुम्ही ठरवले का? पुढचा मार्ग कसा शोधला?"

अनय पुढे बोलू लागला,"दहावीला गुणवत्ता यादीत आल्यावर मला डॉक्टर करायचे हा आप्पांचा निर्धार आणखी दृढ झाला. त्यांनी जिल्ह्यातील नामवंत कॉलेजात मला अकरावीला प्रवेश घेऊन दिला.


आप्पांच्या धाकाने मी अभ्यास करत होतो. तरीही मला डॉक्टर व्हायचे नव्हते. त्याच वेळी संजीव कपूरची मुलाखत एका मासिकात छापून आली होती. ती वाचताना मला माझा मार्ग दिसत होता.

पण दुसरीकडे आप्पांची भितीही वाटत होती. पुन्हा बारावीत गुणवत्ता यादीत झळकलो आणि मला शासकीय वैद्यकीय महािद्यालयात प्रवेश मिळाला.

आप्पांच्या धाकासमोर कोणीच काही बोलू शकले नाही. कॉलेज सुरू झाले. माझी तिथे घुसमट होत होती. मनाविरुद्ध अभ्यास अजिबात होत नव्हता. तरीही मी नेटाने प्रयत्न करत होतो. अशातच पहिली सत्र परीक्षा झाली. सुट्टीला मी घरी आलो.

आई म्हणाली,"अनय,तुला करमते ना? अभ्यास जमतोय ना?"

मी आईकडे न पाहताच,"हो,अगदी छान."

असे उत्तर दिले. मनात मात्र निकालाची भिती होतीच. सुट्टी संपली आणि मी परत आलो. दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता. मला रात्रभर झोप आली नाही.


काय असेल निकाल? अनय पुढे काय करेल?

पाहूया पुढील भागात.
©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all