त्याची गोष्ट भाग 1

गोष्ट त्याच्या संघर्षाची
त्याची गोष्ट भाग एक

तिची गोष्ट अनेकदा वाचली असेल एकदा त्याची गोष्टही वाचून पहा

चॅनलची एबी व्हॅन येऊन थांबली. प्रसिद्ध पत्रकार सारिका खाली उतरली.

केस नीटनेटके करून तिने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि सुरवात केली,"नमस्ते,मी तुमची लाडकी सारिका. कॅमेरामन मनोज सोबत. आज आपण पॅरिसच्या ह्या सुंदर हॉटेलबाहेर आहोत. थोड्याच वेळात आपल्याला समजेल की ह्या स्पर्धेत भारत जिंकणार का?"



सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिलेली ही स्पर्धा काय होती?
कोण आहे भारताचा प्रतिनिधी?
सगळी उत्तरे आता आपल्याला नायकाच्या प्रवासासोबत मिळतील.


पॅरिसच्या आलिशान सप्तरंगी हॉटेलमध्ये आज आंतरराष्ट्रीय मास्टर शेफ स्पर्धेचा विजेता जाहीर होणार होता.


अंतिम पाच जणात भारतातील प्रसिद्ध शेफ अनय पाटील यांचे नाव होते. संपूर्ण मीडिया निकालाची वाट पहात होता.पत्रकार बाहेर वार्तांकन करत होते.

परीक्षकांनी निकाल आयोजकांना दिला. आता सर्वांची ह्रदये जणू थांबली होती. निवेदक निकाल जाहीर करू लागले.

तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन स्पर्धक होता.
दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सची महिला होती.
आता प्रथम क्रमांक जाहीर होणार होता.


निवेदकाने पॉज घेतला आणि घोषणा केली,"ह्या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेते आहेत..... अनय पाटील."

नाव उच्चारताच अनय स्तब्ध झाला. भोवतीचा काळ जणू थांबला होता. अनयच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. बक्षीस स्वीकारले आणि अनय खोलीवर आला.

गेले तीन महिने चाललेली स्पर्धा आज संपली होती आणि संपला होता अनयचा संघर्षही.


सारिकाचा फोन वाजला. चॅनल हेडचा फोन तिने घेतला,"सारिका तू काहीही कर. सर्वात आधी अनयची मुलाखत आपल्याच चॅनेलवर आली पाहिजे. यू गॉट इट?"


फोन कट झाला आणि सारिका तणतण करत म्हणाली,"काय तर म्हणे यू गॉट इट? याला काय जाते ए.सी.मध्ये बसून बोलायला."


मनोज तिरकस हसला,"तुला मुलाखत घ्यावीच लागेल."

तेवढ्यात सारिकाचे डोळे चमकले. ते पाहून मनोज ओरडला,"नाही हा सारिका आता परत नाही."


सारिका फक्त हसली. अनय थांबलेल्या हॉटेलच्या लॉबीत सरिकाने एका वेटरला गाठले. त्याला घसघशीत टीप दिली आणि सरिकाचा मार्ग मोकळा झाला.


अनय बराच वेळ शांत पडून होता. अचानक बेल वाजली. अनयने दरवाजा उघडला.

सारिकाला पाहून अनय हसत म्हणाला,"फ्रेंच हॉटेलात भारतीय वेट्रेस असू शकते पण किमान तिचा पेहराव फ्रेंच पाहिजे."

सारिका आता रिलॅक्स झाली,"अनय मी..."

अनय म्हणाला,"मी तुमची लाडकी सारिका. बरोबर ना?"


सारिका पुढे बोलणार तेवढ्यात अनय म्हणाला,"तुम्ही सतत प्रसिद्धी देत राहिलात. त्याचा मला फायदाच झाला आहे. तुम्हाला मुलाखत देईल मी. पण आता नाही."


सारिका हसून म्हणाली,"तुमचा प्रवास जाऊन घ्यायचा आहेच. घरी संपर्क करायचा प्रयत्न केला पण..."


अनय हसून म्हणाला,"आप्पांना डावलून कोणीच तुमच्याशी माझ्याबद्दल बोलणार नाही. अगदी माझी भावंडे आणि आई सुद्धा. दुसरी एक व्यक्ती आहे पण ती तुम्हाला माहित असणे शक्य नाही. तेव्हा आता माझा प्रवास मलाच उलगडावा लागेल. पण इथे नाही भारतात."


त्यानंतर सगळे समारंभ आटोपून अनय भारतात आला. त्याने शब्द पाळला आणि मुलाखत घेण्यासाठी सारिकाला बोलावले. सारिकाने ही बातमी चॅनल हेडला दिली.


अनयच्या बंगल्यावर सारिका पोहोचली. हॉलमध्ये सारिका अनयची वाट पहात होती.


अनय तयार होऊन आला आणि सारिकाने पहिला प्रश्न त्याला विचारला,"तुम्ही भारतात एक प्रसिद्ध शेफ होताच. मग ह्या स्पर्धेत सहभाग कशासाठी? पैसा की प्रसिद्धी?"


अनय हसला,"दोन्ही नाही. ह्या स्पर्धेत भाग घेतला तो फक्त माझ्या आई आणि आप्पांसाठी."

सारिकाने पुढचा प्रश्न विचारला,"आई आणि आप्पा तुमच्या सोबत नाहीत का?"

सारिकाने हा प्रश्न विचारला आणि अनयने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली.


घरची भरपूर शेतिभाती आणि गावच्या हायस्कूलवर शिक्षक असलेले आप्पा आणि गृहिणी आई. अनय त्यांचे उशिरा झालेले चौथे आणि शेवटचे अपत्य.

भावंडे वयाने मोठी असल्याने त्याला खेळायला घेत नसत. शेजारी पाजारी समवयस्क मुले नव्हती. त्यामुळे अनय आपला सतत आई आणि माई म्हणजेच आजीचे बुड धरून असायचा.


आई आणि माई स्वयंपाक करताना पहायला त्याला आवडायचे.

साधे पिठले बनवत असेल तरी अनयचा प्रश्न असे,"कोणत्या डाळीचे पीठ आहे? मग ज्वारीचे पिठले का नाही बनवत? फोडणीत हळद शेवटी का घातली?"


त्याच्या प्रश्नांनी वैतागून आई म्हणायची,"अरे,तू मुलगी आहेस का हे प्रश्न विचारायला? जा बरं बाहेर जाऊन खेळ."

अनय रुसला की माई प्रेमाने जवळ घेऊन म्हणत,"का रागावते माझ्या बल्लवाचार्य बाळाला."

अनय आजीला बिलगून म्हणायचा,"माई,मी होईन मोठा बल्लवाचार्य."


पण हे सगळे आप्पा नसताना. आप्पांना अनय स्वयंपाक घरात घुटमळत असलेला अजिबात आवडत नसे. अनयला मात्र तिथे आई आणि माईला काम करताना पाहायला आवडायचे.


काय होईल पुढे? लहानपणी पाहिलेले स्वप्न पुढे बदलेल का? आप्पा काय भूमिका घेतील?
पाहूया पुढील भागात
©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all