Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

त्याचा आभासच बनला तिच्या जगण्याचा आधार..

Read Later
त्याचा आभासच बनला तिच्या जगण्याचा आधार..


"काशी..."
केशवने आवाज दिला तशी काशी सैरभैर झाली. तीची नजर इकडे तिकडे केशवला शोधू लागली.आठ महिन्यांची गरोदर काशी भिंतीच्या आधाराने उठली.
पाठमोऱ्या केशवला जावून घट्ट बिलगली. तिचा आनंद आता गगनात मावत नव्हता. पोटातील बाळाला देखील जणू बाबांची चाहूल लागली. त्यानेही आतून हलकेच प्रतिसाद दिला मग.

तब्बल आठ महिने झाले केशव आणि काशीच्या शेवटच्या भेटीला. महिन्याभराची सुट्टी घेवून त्यावेळी देखील केशव खूप दिवसांनी घरी आला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच त्याला एवढी मोठी सुट्टी मिळाली होती. देशसेवेचे व्रत हाती घेतलेल्या केशवचा दीड वर्षांपूर्वी काशी सोबत विवाह झाला. लग्नानंतर आठच दिवसांत त्याला लगेचच ड्यूटीवर हजर व्हावे लागले.

नव्या प्रेमाची ती नवी नवलाई देखील दोघांना अनुभवता आली नाही. काशी एक एक दिवस केशवच्या आठवणीत मोठ्या मुश्किलीने काढत होती. त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. तो जरी जवळ नव्हता तरी तो सतत अवतीभवती घुटमळत असल्याचा भास काशीला रोजच व्हायचा. त्याचे आजूबाजूला असणे जरी भास असले तरी तो आभास देखील काशीला खूपच आनंद देवून जायचा.

एकांतात काशी मनसोक्त गप्पा मारायची केशवसोबत. दिवसरात्र मग केशव तिच्या सोबतच आहे असा भास तिला आता रोजच होत होता.
लग्नानंतर तब्बल सहा ते सात महिन्याने केशवला सुट्टी मिळाली आणि अखेर दोघांची मिलनाची अतूट इच्छा तृप्त झाली. तो एक महिना म्हणजे दोघांसाठीही अविस्मरणीय असा होता. एक एक करत प्रेमाच्या अनेक आठवणी दोघांनीही हृदयाच्या कप्प्यात अलगद साठवून ठेवल्या. ज्या की आयुष्यभर मग दोघांनाही कामी येणार होत्या. पुढे जावून त्याच आठवणी आभास बनून त्यांच्या जीवनात वेळोवेळी आनंदाचा वर्षाव करणार होत्या.

महिन्याभरानंतर सुट्टी संपवून केशव पुन्हा ड्यूटीवर हजर झाला. इकडे आता काशीचे कशातच लक्ष लागेना. तिकडे केशवची देखील अगदी हीच अवस्था होती. पण कामाच्या व्यापात तो घरालाही विसरत असे. कारण दुसरा पर्याय देखील नव्हता त्याच्याकडे. शेवटी ह्या अशा प्रसंगी कठोर व्हावेच लागते. काही गोष्टी जरी स्वप्नवत वाटत असल्या तरी सत्यात दोघेही त्याचा अनुभव घेत होते. दूर असूनही ते एकमेकांच्या हृदयाच्या अगदी जवळ होते. एकमेकांचा विरहात एक एक दिवस ते दोघेही काढत होते आणि भास आभास हेच त्यांच्या जगण्याचा जणू आता आधार बनले होते. दूर राहूनही एकमेकांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटत होता.
मनातील भावनांना मग आठवणींच्या त्या आभासी दुनियेतील तो सुखद असा गारवा हलकेच स्पर्शून जायचा आणि दूर राहूनही कायम एकमेकांच्या सोबत असल्याचा भास मग दोघांनाही व्हायचा.

पुढे एकच महिन्यात काशी आणि केशवच्या प्रेमाचे प्रतीक उदरात तिच्या स्थिरावले. आता काशी वारंवार त्या आभासी जगात वावरु लागली. बाळ येणार या जाणिवेनेच ती सुखावून गेली होती.
"आता तर कधी एकदा केशव सुट्टीला घरी येतो." असे झाले होते तिला. सोप्पं नव्हेत हे सारं. कारण पहिल्यांदा ती आई आणि केशव पहिल्यांदाच बाबा होणार होता. पण दोघांचेही नशीब पाहा कसे, एकत्रितपणे तो हा आनंद साजरा देखील करु शकत नव्हते. आयुष्यातील सर्वांत आनंददायी गोष्ट. पण त्याला विरहाचे खूप मोठे कोंदण.

"आज केशव जवळ असता तर आनंदाने त्याने मला मिठीत घेतले असते. त्याच्या उबदार मिठीच्या त्या प्रेमळ स्पर्शात अलगद मन सुखाच्या हिंदोळ्यावर झुलले असते. पण आता हे काही शक्य नाही. जेव्हा कधी केशव सुट्टीला येईल तेव्हा मात्र तो मला कुठे ठेवू आणि कुठे नाही असेच करेल."
दोन्ही हातांनी हलकेच पोटावरुन हात फिरवत काशी स्वप्नांच्या त्या आभासी दुनियेत हरवून गेली. केशव जणू तिच्या सोबत असल्याचा भास तिला क्षणाक्षणाला होत होता.

आज काशीच्या आयुष्यातील खूप मोठा आनंदाचा दिवस होता. पण नेमकी हे सांगण्यासाठी केशवसोबत मात्र काहीही संपर्क होत नव्हता. नक्कीच तो खूप मोठ्या कामात व्यस्त असेल याची काशीला खात्री पटली. तेवढ्यात टीव्ही वर बातमी झळकत होती, "काश्मिर खोऱ्यात भारतीय जवान आणि आतंकवाद्यांच्या गटात चकमक. दोन जवान शहीद आणि चार जण जखमी."

आता तर काशीच्या पायाखालची जमीनच सरकली. "नक्की केशव सोबत काय झाले असेल..?" याचा काशी विचारही करु शकत नव्हती. तिचे मन नको नको त्या विचारांत गुंतले होते. ती आतुरतेने प्राण कंठाशी आणून पुढील बातम्या पाहत होती. शहीद जवानांची नावे घोषित करण्यात आली. पण सुदैवाने केशवचे नाव नव्हते त्यात. पण जखमी जवानांत मात्र केशवचे नाव होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच काहीसे झाले होते केशवसोबत.
काशीने खूप प्रयत्न केला केशवसोबत संपर्क करण्याचा पण त्या दिवशी काहीच बोलणे होवू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मग त्यानेच तिला फोन केला.

त्याचा आवाज मात्र खूप खोल गेला होता. डाव्या हाताच्या खांद्याला गोळी चाटून गेली होती. अंगावर थोड्या फार जखमा झाल्या होत्या. बोलायलाही त्याच्यात त्राण उरले नव्हते. डॉक्टरांनीही त्यावेळी त्याला जास्त बोलण्यास मनाई केली. एवढेच बोलून मग फोन ठेवण्यात आला.

काशीच्या मनातील भावनांचा पुर आता ओसंडून वाहत होता. "देवा तुझे खूप खूप आभार.इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही आज केशवची सुटका केलीत."
काशी मनोमन देवाचे आभार मानत होती. कधी एकदा केशव बरा होतो आणि ही आनंदाची बातमी त्याला सांगते असे झाले होते काशीला. मनातून तिला भीतीही वाटत होती पण त्यापेक्षा जास्त तिला केशवबद्दल अभिमान वाटत होता. अभिमानाने तिचा उर अगदी भरुन आला.
चार पाच दिवसांनी केशवला आता थोडे बरे वाटू लागले होते. त्याने लगेचच काशीला फोन केला. किती बोलू नि किती नाही असेच झाले त्याला क्षणभर.

बोलता बोलता काशीने तिची आनंदाची बातमी सांगितली केशवचा आनंद तर आता गगनात मावेनासा झाला. कडकडून काशीला एक घट्ट मिठी मारावी असेच झाले केशवला. दूर असूनही त्याने मात्र तिला अलगद मिठीत सामावून घेतले. दोघेही क्षणभर स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेले. खरचंच दोघांनाही एकमेकांच्या मिठीत अगदी सुरक्षित वाटत होते. हे भास आभास जरी असले दोघांच्याही मनाचे तरी दुरुनही ते आपला आनंद एकमेकांसोबत साजरा करत होते.

बघता बघता एक एक महिना सरत होता. काशीला आता पाचवा महिना सुरु झाला. पोटातील बाळाची हालचाल देखील आता सुरु झाली होती. सद्ध्या तरी केशवच्या प्रेमळ आठवणी आणि मनात रंगवलेले बाळाचे ते गोंडस रुप ह्या दोनच गोष्टी काशीच्या जगण्याचा आधार बनल्या होत्या. वेळ मिळेल तेव्हा केशव फोनवरूनच काशीला काळजीचे अनेक सल्ले द्यायचा. काशिही त्याचे वेळोवेळी मनोबल वाढवत होती."लवकरच मी सुट्टीवर येण्याचा प्रयत्न करील." केशवने तिला आश्वासन दिले.
काशी देखील त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती.

पण, दुर्दैवाने तो दिवस उगवलाच नाही. केशव आला मात्र भगव्यात लपेटूनच. आयुष्यच जणू थांबल्यासारखे वाटले काशीला. आता केशव तिला, तिच्या पोटातील बाळाला कधीही भेटणार नव्हता. किती यातानादायक काळ होता तो काशीसाठी. सात महिन्यांची गरोदर काशी केशव सोबतच्या त्या सुखद आठवणींत रममाण व्हायची. अलगद त्याच्या कुशीत शिरायची. त्याच्या प्रेमाच्या त्या उबदार मिठीत तिला खूप सुरक्षित वाटायचे. हे सारे जरी तिच्या मनाचे खेळ असले तरी तेच आता तिच्या जगण्याचा आधार बनले होते.
केशवचा आभासच आता तिच्या जगण्याचा खरा आधारस्तंभ होता.

केशव आता या जगात नव्हता. पण तरीही तो सतत आपल्या अवतीभवती असल्याचा भास काशीला व्हायचा.
"काशी.." म्हणून तिला तो हाक मारायचा. काळजी करु नकोस मी तुझ्या सोबतच आहे आणि शेवटपर्यंत राहील. असा विश्र्वास तिला तो वेळोवेळी द्यायचा. अलगद तिला आपल्या बाहुपाशात सामावून घ्यायचा. खरंच केशवचा हा आभासच आता काशीच्या जगण्याचे खरे कारण बनला होता.

काशीचे नऊ महिने पूर्ण झाले नि छोटा बाळकृष्ण कुशीत तिच्या विसावला. अगदी केशवचीच प्रतिमा असल्याचा भास काशीला त्यावेळी झाला. परमेश्वराने तिचा केशव जरी तिच्यापासून हिरावून नेला असला तरी पुन्हा दुसऱ्या हाताने तिला तो परतही केला होता. हाच नियतीचा खेळ होता जणू.

छोट्या केशवकडे पाहून काशीला जगण्याचे बळ वेळोवेळी मिळत होते. एकटीने ही आयुष्याची लढाई लढणे जरी कठीण असले तरी केशवचा आभासच तिच्या जीवनाला दिशा देत होता. त्याचा आभासच बनला आता तिच्या जगण्याचा खरा आधार.

भास आभास हा खेळ असे मनाचा,
मनाच्या खोल तळाशी रुतलेल्या भावनांचा..
जे नाही तेही अचानक जेव्हा येते समोर,
मन हे वेडे भुलते मग त्यास क्षणभर..
खऱ्या खोट्या द्वंद्वात अडकते,
वेडे मन हे मग सैरभैर होते...

समाप्त..

धन्यवाद..

©® कविता सुयोग वायकर

#गोष्ट छोटी डोंगराएवढी- "आभास.."

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//