त्या'चं टोकाचं पाऊल

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त काहीतरी...

                      त्या'चं टोकाचं पाऊल 


( १० सप्टेंबर,जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त काहीतरी लिहावसं वाटलं...)

प्रिय आईबाबा,
माहित नाही तुम्ही माझ्याबद्दल काय विचार कराल, जेव्हा तुम्हाला समजेल मी इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे. कळतंय मला की तुम्हाला खूप त्रास होईल याचा, पण खरंच आता काही सुचेनासं झालंय. सर्वात आधी तर माफी मागेन मी, तुमच्या लाडक्या मुलाला फक्त एकदाच शेवटचं माफ करा.

तुम्हाला तर माहित आहेच की मला या नाट्य क्षेत्रात किती रस होता. हो, होताच म्हणेल मी! किती आवडीने मी शाळेत असताना नाटक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो. आपल्या सोसायटीच्या आवारात दरवर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेतही मी आवर्जून भाग घेत होतो. खरंतर यामुळे माझा स्वतःवरचा विश्वास वाढत होता. आणि मग अजून प्रयत्न केले मी स्वतःचं कौशल्य सिद्ध करण्यासाठी! तुम्ही पण माझ्या इच्छेखातर मला अभिनयाचं शिक्षण पूर्ण करून दिलेलं. पण.......................
हा खूप मोठा पण काही माझा पाठलाग सोडत नव्हता. अभिनयाचे धडे गिरवताना खूप खुश होतो मी. आणि ते करताना कौतुकाची थाप सुद्धा मिळत होती सहकारी आणि इतर लोकांकडून. हा काही नातलग आणि मित्र परिवार आहेत असे ज्यांनी मला आणि माझ्या क्षेत्राला नाव ठेवण्यात अजिबात कसर ठेवली नाही. तरीही तुम्ही मात्र नेहमीच मला साथ दिली. खरं सांगू मला हा खूप मोठा आधार वाटत राहिला.
पण ना मिळणाऱ्या अपयशाला पाहून कुठे तरी माझा आत्मविश्वास हळूहळू डळमळीत होऊ लागला. तुम्हाला कधी जाणवून दिलं नाही मी, पण आतून मी रोज रडत होतो. कदाचित स्वतःच्या नशिबावर! माझ्या अपयशामुळे उगाच तुम्हाला का काळजी करायला लावावी हाच विचार करायचो. रोजचं माझं रडगाणं मलाच ऐकवेना झालं. जिथे जिथे प्रयत्न करत होतो तिथे तिथे नकार पचवावे लागले. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने मिळत असणारा हा नकार ना ऐकवतचं नव्हता आता. तुमची काही हरकत नव्हती ओ, पण माझंच मन मला खायला उठायचं. किती दिवस ओझं बनून राहणार होतो बरं मी. जिथे मित्र 'सेटल' झाले, तिथे मी मात्र 'स्ट्रगल'चं करत होतो! अर्थात इथेही तुम्ही कधीच माझ्या स्वप्नाआड यायचा प्रयत्न केला नाहीत. हा तुमचा समजूतदारपणा होता पण म्हणून का मी गैरफायदा घेत राहू? 
कधी कधी वाटतं की का निवडला हा रस्ता? पण मग हा विचार सुद्धा मनात येतो की का नको निवडायला मर्जीचा रस्ता? निवड तर केली मी, पण त्या रस्त्यावर चालताना मिळालेल्या खस्ता नि खाचखळगे फार अवघड होते. इतके,की आता विट आलाय या सगळ्याचा. कुठे कोणी भेटलं की तोच प्रश्न नि तेच सल्ले,काय करतोस मग सध्या, अरे दुसरं काही केलं असतंस तर आज कुठे असतास,.....या सल्ल्यांची यादी वाढतच चालली आहे. तुम्हालाही हे सगळं ऐकावं लागलं असणारचं. पण तुम्ही काही मला बोलून दाखवणार नाही. म्हणून आता खरंच बस झालं...
मला ना आता विचार करवत नाही अजून. अजून किती दिवस हेच सुरू राहणार आहे? त्यापेक्षा कायमचं सगळं सोडून जायचं ठरवतोय. चूक करतोय मी, पण पर्याय नाही.
काळजी घ्या. 
                               -तुमचाच लाडका मुलगा...

हे होतं एका आत्महत्या केलेल्या मुलांचं शेवटचं पत्र. 
परिस्थितीला कंटाळून, अडचणी आणि अपयश सहन न होऊन त्यानी आत्महत्येचा पर्याय निवडला. पण हे खरच योग्य आहे का? आईबाबांना त्रास होईल हे कळतंय तर बोलून मार्ग काढणं योग्य नाही का? कोणत्याही अडचणींसाठी उपाय असतातच ना. फक्त ते शोधावे लागतात. भले ते थोडं उशीरा होईल पण विश्वास डगमगता कामा नये. नैराश्याच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर निघणं अवघड होऊन जातं. पण म्हणून हातपाय गाळून बसणं,हा काही पर्याय नाही. पाण्यात बुडताय तर हातपाय हलवायला लागतीलच ना. इच्छाशक्ती प्रबळ असली तरच त्यातून बाहेर येऊ शकतो. शेवटी हे आयुष्य आहे. यात उतार चढाव असणारच ना? रोज सुख पायाशी लोळण घालत असेल तर दुःखाची जाणीव काय असते कळणार कसं? असं म्हणतात सहजासहजी मिळालेल्या गोष्टींपेक्षा मेहनतीने मिळालेल्या गोष्टींची आपण जास्त जाण ठेवतो. 
हल्ली वाढलेल्या आत्महत्येचं , त्यातही नैराश्यामुळे किंवा अपयश, प्रेमभंग अशा कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्येचं प्रमाण अगदीच चिंताजनक आहे. नैराश्याच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तीने मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणं म्हणजे वेड लागलंय असं नव्हे, हे समजून घेण्याची आज नितांत गरज आहे. 

आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिवसाचं औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये आत्महत्या थांबविण्यासाठीचे संदेश देतात. समुपदेशन करतात, जागरूकता वाढवतात.
या काही ओळींमुळे 'क्रिएटिंग होप थ्रू ॲक्शन' या थीम चा हेतू काही प्रमाणात तरी साध्य झाला असावा अशी मी आशा करते.
धन्यवाद...
-©® कामिनी खाने.