त्याचं काय चुकलं?

A marathi story of a simple inoscent boy Sagar who was about to marry a girl named Sheetal and who never harmed anybody but destiny made very bad effect on him and his family. The story is also about his elder sister and the incidents in her life too

सागरला मुलगी पसंत पडली. त्याने सर्वांत अगोदर त्याच्या आईला सांगितलं. आई खूप खुश झाली. हे पहिलंच स्थळ होतं आणि पहिल्याच बॉल वर षटकार! त्याने नंतर मुलीकडच्यांना त्याची पसंती कळवली. घरात सर्वजण खूप खुश होते.

मुलगी थोडीशी शांत स्वभावाची होती. अगदी नावाप्रमाणेच शीतल. त्याला तिच्याशी बोलतांना ती थोडी लाजाळू वाटली. तोही शांत स्वभावाचा होता आणि त्यालाही साधी-सरळच मुलगी हवी होती. त्यामुळे तर त्याने लगेच होकार दिला.

सागर हा लहानपणापासून शांत व थोडासा लाजाळू स्वभावाचा मुलगा होता. आपल्या कामाशी काम ठेवणारा. समंजस. आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणारा. कुणाच्या अधे ना मधे असणारा. दोघांची जोडी शोभणारी होती.

नंतर काही दिवसांनी दोघांची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंटच्या दिवशी शीतल थोडी चिंतेत दिसत होती. त्याला ते जाणवलं. त्याने कार्यक्रम आटोपल्यावर तिला विचारलं.

तो म्हणाला, "काय झालं? आज दुपारी चिंतेत वाटत होतीस. काही प्रॉब्लेम आहे का?"

ती शांतपणे म्हणाली, "अरे नाही! काही प्रॉब्लेम नाहीये."

तो म्हणाला, "पण मला जाणवलं की तू कुठल्यातरी गोष्टीमुळे चिंतेत होतीस."

ती म्हणाली, "अरे नाही. थोडी नर्वस होते, बाकी काही नाही."

तो म्हणाला, "काहीही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांग. संकोच करू नकोस."

ती म्हणाली, "हो नक्की सांगेल. बाय."

तो म्हणाला, "हो बाय."

तिच्या बोलण्याने त्याचे समाधान झाले होते ; पण तरीही त्याला तिचं एंगेजमेंटच्या दिवशी चिंतेत असणं राहून-राहून खटकट होतं. त्याला थोडीशी भीती वाटू लागली होती. त्याच्या डोक्यात अनेक विचार फिरू लागले होते. तो त्या विचारांतून बाहेर येण्यासाठी गच्चीवर आला.

त्याने बघितलं त्याची मोठी बहीण दिव्या एकटीच उभी होती. ती दूर क्षितिजाकडे बघत होती. नक्कीच ती काही विचार करत होती. तिचा चेहरा गंभीर होता.

आठ महिने तर झाले होते तिच्या घटस्फोटाला! लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच! लग्नापूर्वी मुलगा खूप चांगला वाटत होता. पण ते फक्त ढोंग होतं. हळूहळू तो त्याचे विविध रंग दाखवू लागला. थोडीशीही काही चूक झाली की मारहाण करायचा. मुळात त्याला दिव्या पसंतच नव्हती. दिव्याने सगळं सहन केलं. पण एके दिवशी दारूच्या नशेत तो बोलून गेला त्याच्या प्रेमाबद्दल. आईवडिलांच्या दबावामुळे त्याने तिच्याशी लग्न केलं होतं. हे मात्र ती सहन करू शकली नाही. शेवटी त्यांचा घटस्फोट झाला.

नंतर तिला येणारे स्थळं तिच्यातच चूक काढायचे. त्यांना वाटायचं नक्की हिच्यातच काहीतरी कमतरता असणार. तिचे आईवडील खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे. पण ते कुठं ऐकणार होते. तसंही लग्न मोडलेल्या मुलीशी लग्न करायला कुठला मुलगा सहजासहजी तयार होतो?

सागर तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याची चाहूल लागताच ती विचारांतून बाहेर आली. ती त्याच्याकडे बघून जराशी हसली. तोही हसला.

सागर म्हणाला, "काय झालं? एकटी का उभी आहेस असं?"

ती म्हणाली, "काही नाही रे. सहज."

बोलता-बोलता तिचा आवाज रडवेला झाला. तिने खूप प्रयत्न केला पण ती स्वतः ला रडण्यापासून अडवू शकली नाही. नक्कीच तिच्या लग्नाबद्दल चे विचार तिच्या मनात आले असतील. तिला बऱ्याच वेळा त्याने रडतांना बघितलं होतं.

त्यालाही वाईट वाटू लागलं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. जे सर्वकाही झालं त्यात तिची काय चूक होती? ती बिचारी गरीब मुलगी! पण त्याचा सर्वांत जास्त त्रास तिलाच होत होता. का असं होतं जीवनात? सागरचेही डोळे पाणावले. काही वेळाने ती शांत झाली. नंतर ते दोघे खाली आले.

सागरच्या लग्नाची तयारी जोमात सुरु झाली. दिव्या सोबत घडलेल्या घटनेमुळे जो काळोख त्यांच्या जीवनात दाटला होता तो आता निघून गेला होता. आनंदाचे, उत्साहाचे दिवस त्यांच्या जीवनात आले होते. सर्वजण खुश आहेत हे बघून दिव्याही खुश होती. तिला अधून-मधून तिचा भूतकाळ आठवणं बंद झालं होतं. ती सुद्धा तिच्या छोट्या भावाच्या लग्नाच्या तयारीत मग्न झाली होती.

सागरच्या आईला कुणाचातरी फोन आला. त्यांनी फोन उचलला. थोड्या वेळाने फोन त्यांच्या हातातून कोसळला! त्यांना धक्काच बसला होता. त्या खालीच बसल्या. त्यांचे डोळे उघडेच्या उघडेच होते. त्या रडायला लागल्या. सर्वजण धावत आले. दिव्याने त्यांना पाणी दिलं.

दिव्या म्हणाली, "काय झालं आई?"

त्यांची काहीही बोलण्याची हिम्मत होत नव्हती. शीतलच्या घरून फोन होता. शीतल घरातून पळून गेली होती. तिने घरच्यांसाठी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात तिच्या प्रियकराबद्दल लिहिलेलं होतं. ऐन लग्नघाईत तिने असं का केलं? जर तिला लग्न मान्य नव्हतं तर तिने नकार का नाही दिला? असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरत होते.

दिव्याच्या दुःखातून सावरत नाहीत तोच हे दुसरं दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलं होतं. सागर पार तुटून गेला होता. आता ही बातमी सर्व पाहुणेमंडळींमध्ये पोहोचणार होती. आता दुसरं स्थळ शीतल पळून जाण्यामागे त्याच्यात कमतरता असेल, असा निष्कर्ष काढणार होतं. कधीकधी चांगल्या, काहीही चूक नसणाऱ्यांना एवढं काही का सोसावं लागतं? का लोक समोरच्याचा थोडाही विचार करत नाहीत? त्याच्या फॅमिलीला त्रास न देताही हे होऊ शकलं असतं ना. त्याने शीतलला अनेक वेळा विचारलंही होतं. तो विचार करू लागला की या सर्वांमध्ये त्याचं काय चुकलं?

©Akash Gadhave