त्याचं हळवेपण
भाग -१
“काय गं आई, आता काय झालं?... का एवढा त्रागा करत आहेस?”
“घ्या! लेकाच्या भल्यासाठी बोलायची पण सोय नाही राहिली आता...”
“माझ्या मनाला त्रास होईल अशा गोष्टींना तू भल्याच्या गोष्टी म्हणतेस आई?”
“तुला कसला आलाय रे मनाचा त्रास? पुरुष ना तू ... तरी बघावं तेव्हा जरा काही बोललं की बाई सारखं रडका चेहरा करतोस ... आणि तुझा नाही तर कोणाचा विचार करते रे मी ... एकुलता एक मुलगा आहेस आमचा... तुझं वाईट थोडं ना बघणार आहोत...”
“हे असं असतं तुझं! माझं चिडचिड करणं, राग व्यक्त करणं, स्वतःच्या भावना व्यक्त करणं, सगळं काही तुला सो कॉल्ड बायकीपणा वाटत असतो.... पुरुष काय पाषाणहृदयी असतात का गं? जे उठसूठ अशा गोष्टींना बायकांच्या नावानी जोडत असता...”
“हे बघ ... तुझं हे तत्वज्ञान ना तू तुझ्याजवळच ठेव. तुमचं शिक्षण जरा जास्त झालं म्हणून आमच्या अनुभवी नजरा कमजोर झाल्या आहेत असं नाही हो... नुसतं म्हणायला नाही तर खरोखरच जास्त पावसाळे बघितले आहेत हो आम्ही...”
“अगं पण तुमच्या अनुभवांना कुठे नाकारतो आहे मी? माझं म्हणणं इतकंच आहे की तू असं उठसूठ नको त्या गोष्टी बोलू नकोस.. आणि जे आहे ते मान्य कर... मी हा जसा आहे तसा आहे.. तू....”
“बस बस... नको काही बोलू. धड बोलावं तर आपल्यालाच अकलेच्या गोष्टी शिकवायला निघतात ही आजकालची पोरं... जरा म्हणून तारतम्य राहिलं नाहीये...”
तर हा होता देशपांडेंच्या घरातील संवाद... नव्हे नेहमीसारखाच एक वाद! विनायक देशपांडे हे एका खासगी कंपनीत नोकरी करणारे सद्गृहस्थ. नोकरी तशी चांगलीच असल्याने खाऊन पिऊन सुखी कुटुंब. त्यांची पत्नी रंजना बऱ्यापैकी शिक्षण पूर्ण झालेली गृहिणी. स्वभाव तसा प्रेमळच, पण काहीसा चालीरिती, रुढी परंपरा पाळल्या गेल्याच पाहिजेत असा.. आणि या दांपत्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे अतुल. अर्थात घरातून झालेले संस्कार आणि त्यांची योग्य ती जाणीव ठेवून अतुल हा अगदी कोणालाही मनापासून आवडावा असाच.
२६ वर्षीय अतुल, वयानुसार आणि वेळेनुसारच विचार करत होता. पण हल्ली आईसोबत वागता बोलताना मात्र हे विचार वादांचं कारण ठरत होते. अतुल तसा समंजस, शांत स्वभावाचा. पण त्याच्या स्वभावानुसार तो जे काही व्यक्त व्हायचा, त्याला आई भलतंच नाव द्यायची. अशाने त्याची स्वतःची अजूनच चिडचिड व्हायची.
खरंतर व्यक्त होणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये. पण आपल्याकडे मुळात मानसिकताच अशी झाली आहे की पुरुषानं व्यक्त होणं म्हणजे जणू काही त्यानं कोणता गुन्हाच केला आहे.
ही अशी बोलाचाल व्हायला खूप विषय पुरायचे. त्यातीलच एक म्हणजे अतुलचा हळवा स्वभाव! स्वभावाला काही औषध नसतं म्हणतात. इतर ठिकाणी कितीही कणखरपणा दाखवला तरी काही बाबतीत अतुलचं हळवं होणं काही चुकायचं नाही. मग काय आईला तर आयता विषय मिळे, 'तू असाच रहा', 'तुझ्या या अश्या स्वभावाचा ना कंटाळा आलाय मला', हे आणि अजून बरंच काही...
क्रमशः
-©® कामिनी खाने.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा