त्या भयानक रात्री ... भाग 1

Horrer story ..

               आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी केव्हाची हजेरी लावली होती .दिवस असूनही रात्रीसारखा अंधार सगळीकडे पसरला होता . रानातील चिटपाखरेही आपापली जागा धरून केव्हाच बसली होती .कारण त्यांनाही माहीत होतं, आजचा पाऊस काही वेगळाच बरसतोय. आज नक्कीच काहीतरी अमानवीय घडणार आहे .
      अशातचं ,एक सुंदर ,नाजूकशी ,गोरीपान थोडी स्टायलिश ,ब्लू कलरची जीन्स आणि यल्लो कलरचा क्रॉप टॉप घातलेली मुलगी शिवानी .
       हो शिवानी ,अगदी अनवाणी धावत धावत त्या अंधाऱ्या काळोख्या रात्री आसरा शोधत होती .घाबरलेली भेदरलेली एकटीच ती ,जिवाच्या आकांताने पळत होती . कुठेतरी तिला आसरा मिळावा या विचारात असतानाच समोर काळ्याकुट्ट अंधारात ,त्या घनदाट झाडांच्या मागे तिला काहीतरी दिसलं. 
      क्षणभर ती थांबली . झुडूपांच्या काटेरी फांद्या बाजूला करत तिने समोर बघितलं . एवढ्या काळोख्या अंधारात मुसळधार पावसातही , त्याच्यावर एक वेगळीच चमक होती . तिचा शोध पूर्ण झाला होता .  त्या काही झाडाझुडुपांपलीकडे एक भलामोठ्ठा वाडा अंधारात आपलं गुढ लपवून उभा होता. निदान हा पाऊस थांबेपर्यंत तरी आपल्याला आसरा मिळाला आणि आपल्या पाठीमागे ते जे काही आहे त्यापासून या वाड्यात गेल्यावर तरी आपण नक्कीच वाचू .. ह्या विचारात ती वाड्याच्या दिशेने पळू लागली ...
   वाडाच तो , जरी बाहेरून निर्जीव भासत असला तरी त्याच्या आत काळोख्या अंधारात सामान्य जनांच्या आकलनशक्ती पलीकडच्या हालचाली चालू होत्या. त्याला शिवानीचं काय , आजूबाजूला असलेले पशू पक्षी ,झाडे झुडुपे ,मुसळधार कोसळत असलेला पाऊस , जोरजोरात वाहणारा वारा सगळे सगळेच अगदी अनभिज्ञ होते .. खुप मोठं गूढ लपवून होता तो जुना , ठिक ठिकाणी दुभांगलेला , वर्षानुवर्षे उभा राहुन ऊन , वारा, पाऊस झेलून कालानुरूप अगदी जीर्ण झालेला तो , अंधारात उभा असलेला ,पाहताक्षणी एखाद्याला आपल्या कवेत सामावून घेऊन कुठे तरी काळ्या कुट्ट अंधारात गुडूप करून टाकेल असा वाटणारा तो भयानक ,भलामोठा ,अजस्त्र श्वापदा सारखा पसरलेला तो वाडा.
       तो वाडा बघताक्षणी शिवानीला काहीतरी अस्पष्टस ,काहीतरी वेगळं ,अमानवीय जाणवलं  ..अचानक मागून एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या मऊशार ,रेशमी केसांतून तिच्या मानेला येऊन स्पर्शून गेली . काहीवेळ तिला समजलेचं नाही की ती नक्की वाऱ्याची झुळूकचं होती की कोणीतरी जबरदस्ती तिला पकडू पाहत होत .मागे फिरून  बघते तर बस जोरजोरात कोसळणारा पाऊस ,घनदाट झाडी आणि काळोख्या अंधारात उभी असलेली ती याव्यतिरिक्त काहीही नव्हतं .ती घाबरली ,अचानक तिच्या लक्षात आलं ,मघापासून काहीतरी आहे जे तिचा पाठलाग करत आहे . 
त्याच्यापासूनचं जीव वाचवण्यासाठी आपण आपली बंद गाडी रस्त्यात उभी करून इथं जंगलात या मुसळधार पावसात चिखलाची पर्वा न करता ,वाट दिसेल तिकडे धावत ,पळत आलो आहोत . 
          "कोणीतरी आपला पाठलाग" ,हे आठवताच तिच्या अंगात एकच शरशिरी आली . भितीने घाबरून घास कोरडा पडला होता तिचा . भोवळ यायचीच काही बाकी होती फक्त तिला . अशात तीन ठरवलं . आता इथं थांबून काहीएक फायदा नाही .ते जे कोणी आहे ते माझ्यापर्यंत पोहचायच्या आदी मला काहीतरी करायला हवं , आणि ती अंगात असेल नसेल तेवढा जीव एकवटून भर पावसातून ,काळोख्या अंधारातून ,काट्याकुट्यांची पर्वा न करता बेभान पळत सुटली त्या गूढ ,अनाकलनीय वाड्याच्या दिशेने . 
      

             पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता, विजांचा थयथयाट सुरूच होता आणि इतक्यात कुणीतरी त्या गूढ , रहस्यमयी वाड्याचं भलं मोठं दार ठोठावलं....
               प्लिज ,दार उघडा कोणी आहे का आत  ....  प्लिज ,लवकर दार उघडा कोणी आहे का आत ... प्लिज , मला खूप भीती वाटतेय, तिथे... तिथे त्या काळोखात कोणीतरी आहे .ते माझ्याकडेच रोखून पाहत आहे . 
            खूप घाबरलेली होती शिवानी .तिच्या आवाजावरूनच ते जाणवत होतं . रडून रडून डोळे लाल झाले होते . अक्षरशः जीव मुठीत घेऊन ती पळत पळत या अंधारात असलेल्या जुन्या वाड्यात आली होती . स्वतः लाच दोष देत की मी हा मूर्खपणा का केला ,का आले मम्मा बरोबर भांडण करून ,तीचं तरी काय चुकलं होत .आपल्या चांगल्यासाठीच तर ती सांगत असते . 
     तिचं ऐकलं असत तर माझ्यावर  ही वेळ नसती आली .मम्मा मला माफ कर खूप वाईट आहे मी ,तुझं काही ऐकत नाही , खुप चुकले मी .   हे तिच्या मनात असतानाच ज्या दरवाजावर ती मघापासून थाप मारत होती तो करकर आवाज करत उघडला गेला ,जसं काही किती वर्षांपासून तो उघडलाच गेला नसावा . बिचाऱ्या शिवानीला तरी काय माहीत तो दरवाजा ,तो जुना वाडा ,सावजाचीच वाट बघत होता,कोण एकदा येतंय आणि फसतंय माझ्या जाळ्यात.... 
        खरंतर शिवानीसाठी हे सगळं आकलन शक्तीच्या पलीकडे होतं की अगदी जीर्ण झालेला ,मोडकळीला आलेला ,केव्हाही कोसळून उध्वस्त होईल अशा परिस्थितीत असलेला वाडा . या वाड्याचं दार आतून बंद कसं .आपण  खुप घाबरलेलं असल्यामुळे ,भीतीमुळे आपल्याला काही समजलं नाही त्यामुळे आपण आवाज मारत होतो ,दार उघडण्यासाठी . पण अशा जीर्ण झालेल्या वाडयाचं दार कोणी कसं उघडू शकतं .हा तर किती काळापासून बंद असेल , बंद आहे . 

     तेवढ्यात .....

        आतून एक भारदार ,पुरुषी आवाज ऐकू आला ...या आत या अशा बाहेर का उभ्या तुम्ही ,पाऊस खूप आहे बाहेर ,रात्रही खूप झालेय आणि अशा अवेळी तुम्ही इथे या जंगलात काय करत आहात ? ...भीती वगैरे काही आहे की नाही तुम्हाला , अशा एकट्या तुम्ही ,बरोबर कोणी नाही तुमच्या ,अशावेळी तुमच्या बरोबर काहिही अघटित होऊ शकत ... तुम्ही आता तुमच्या घरी असायला हवं होतं ....ना ,की  अशा काळोख्या रात्री घनदाट जंगलात .

       प्रथम तर शिवानी अगदी ब्लँक झाली , आताच तिच्या मनात हा विचार येऊन गेला  , किती काळांपासून हा वाडा बंद आहे ,मी मूर्खासारखी दार बडवतेय , कोणीही उघडणार नाही माहीत असून . पण चक्क या जीर्ण वाड्याचं दार उघडलं गेलं आहे . तोही एका मुलाचा आवाज , हे कसं शक्य आहे . कि मी स्वप्नात आहे . अशातही तिने स्वतःला एक चिमटा काढून बघितला ,कळवळली ती . 
   अरे ! जे समोर घडतंय ते सर्व खरं आहे ,आपण स्वप्नात नाही आहोत आणि वाड्याचा भलामोठा  दरवाजा जो आपल्याला वाटलं होतं उघडणार नाही ते उघडला गेला आहे . तोही माझ्याच वयाच्या थोड्याफार फरकाने मोठ्या असलेल्या एका भारदस्त तरुणाने ...
            
             आतून अजून एक आवाज ऐकू आला ,अरे मुकुंद आत तरी घेणार आहेस का त्या वाट चुकलेल्या वाटसरू ला की बाहेर थांबवूनच सगळे प्रश्न विचारणार आहेस .बिचारी भिजली असेल पावसात ,घाबरली असेल अंधाराला आणि तू अजून बाहेर थांबवलं आहेस तिला .
     शिवानीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, एकतर अशा जुन्या ..जीर्ण वाड्याकडे कोणी पाहणं देखील मुश्किल ,आणि त्याच वाड्यात कोणी तरी वास्तव्य करून आहे . आणि त्याच्याबरोबर एक स्त्री देखील आहे.... आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट   की या ज्या कोणी आत आहेत,आतून बोलत आहेत . त्या वाड्याच्या आत आहेत त्यांनी मला पाहिलं देखील नाही ,तरी त्या एवढं अचूकपणे माझ्याविषयी कस सांगू शकतात . ती मनातल्या मनात म्हणाली खरचं मी किती मूर्ख आहे ,ही वेळ आहे का या सर्वाचा विचार करायची .तूर्तास तरी मला आत जायला हवय ,त्या काळ्या सावली पासून ,जी केव्हापासून माझ्या पाठीमागे आहे...
            त्या काळ्या सावलीपासूनचं वाचण्यासाठी ती भर पावसातून , एवढ्या अंधाऱ्या रात्री ,बंद गाडी आहे अशी उभी करून जंगलात पळत सुटली होती ...कारण ती सावली तिचा पाठलाग सोडण्यास तयार नव्हती ... शिवानीने रस्ता बदलला की ती सावली ही रस्ता बदलायची . हिने गाडी थांबवली की ती सावली ही थोड्या अंतराच्या फरकावर थांबायची . शिवानीने लांबून बघितले की नक्की ते काय आहे जे माझ्या पाठीमागे लागलं आहे ,माझा पिच्छा सोडेना. तर ते जे काही होत ते अस्पष्ट अस एक मोठाला काळा ठिपका असल्यासारखं भासत होत . पण ते खूप भयानक होत .म्हणून तर ती जीव मुठीत धरून कुठे निवारा मिळतो का ,कोणी सोबतीला भेटत का यासाठी त्या काळोख्या घनदाट जंगलात शिरली होतीं.

         ती वाड्याच्या आत प्रवेश करणार एवढयात तिने हळूच मागे वळुन पाहिले ,त्या अंधारात मघाशी जी  काळी सावली होती ती त्या झाडाझुडुपांमध्ये दिसतेय का ,ती आश्चर्यचकित झाली ...तिथे काहीच नव्हतं... तिला कळलंच नाही असं कसं झालं....आतापर्यंत जी अमानवी शक्ती माझ्या मागे होती ,तिच्यामुळे मला इथवर यावं लागलं ,रानावनातून ,काट्याकुट्यातून या जुन्या वाड्यात . मग ती शक्ती अचानक अदृश्य कशी होऊ शकते . 
              तिला वाटलं कदाचीत समोरच्या व्यक्तीने दार उघडल्यामुळे ती अदृश्य अमानवी शक्ती घाबरून ..गुप्त झाली असेल . पण त्या निरागस शिवानीला हे थोडी माहिती होतं की हा सगळा डाव  तिच्या इथं येण्यासाठी तर रचला गेला होता . नाहीतर शुल्लकशा गोष्टीवरून आईबरोबर भांडण करून ती अशी रात्री अपरात्री एकटी ,कोणालाही न सांगता ,ना कोणाला बरोबर घेता घरातून बाहेर थोडीचं पडली असती .
        तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचा आवाज शिवानीच्या कानावर आला .. " आत येणार आहात की रात्र बाहेर पावसातच काढायचा विचार आहे "  
      शिवानी गोड हसली .एवढ्या संकटाला समोर गेल्यावर निदान काहीवेळ तरी तिच्या चेहऱ्यावर हसू होत . तिने आत वाड्यात प्रवेश केला .तिच्या आत जाताच वाड्याच दार कर्णकर्कश आवाज करत बंद झालं ,जसं काही आता ते पुन्हा कधीच उघडणार नाही या उद्देशाने.. या आवाजाने शिवानी थोडी घाबरली खरी .. 
      वाड्याचा दरवाजा बंद झाला ,बाहेर काळोख्या अंधारात वाड्याच्या तोंडावर एक छद्मी हास्य मात्र जरूर पसरलं होतं ,समाधानाचं ...आता खरं वाडा सज्ज झाला होता आपलं खरं भयानक रूप दाखवण्यासाठी .  वाडा आणि त्या वाड्यातील माणसं पुन्हा एकदा यशस्वी झाली होती,एका निष्पाप जीवाला फ़सवण्यात...
         पाऊस चालूच होता बाहेर, रप रप आवाज करत .कधी नव्हे तो एवढा बरसत होता.की त्याच्या ही मनात होत अजून एक निष्पाप बळी नको ,म्हणून तर तो नसेल ना सांगत बेभान बरसून त्या अभाळातल्या परमेश्वराला .
      वाडा एका घनदाट जंगलात होता त्यामुळे साहजिकच तिथे लाईट असण्याचा प्रश्नच नव्हता .हे शिवानीने आदीच जाणलं होत.वाडा तसा आतून व्यवस्थित डागडुजी केलेला होता.तिने वाड्यात प्रवेश केला ,मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात ज्या व्यक्तीने दार उघडलं होतं, ती व्यक्ती निदर्शनास आली. गोरा गोमटा, पिळदार शरीरयष्टी, उंचा पुरा ,देखणा असा मुकुंद तिच्या समोर आला .ती आ वासून त्याच्याकडे बघतच राहिली , एवढा स्मार्ट मुलगा या जंगलात, अशा जीर्ण ,जुन्या ,पडक्या वाड्यात काय करतोय. हा तर सर्व सोयींनी युक्त अशा आपर्टमेंट मध्ये नाहीतर एका भल्यामोठ्या बंगल्यामध्ये असायला हवा होता . नाहीतर कुठल्या तरी पब मध्ये मैत्रिणींबरोबर पार्टी करत असायला हवा होता .
       की हा पण माझ्यासारखाचं वाट चुकलेला आहे .आणि कालांतराने या वाड्यालाच त्याने आपलं घर बनवलं आहे . अस काहीस पण येऊन गेलं शिवानीच्या मनात . 
       समोरून मुकुंदच्या खोकल्याच्या आवाजाने शिवानी आपल्या विचारतंद्रीतून बाहेर आली ..खरंतर त्याने मुद्दामचं खोकल्याचं नाटक केलं होतं ..कारण शिवानी भिजलेल्या ओल्या कपडयातचं उभी होती अजून ,त्यामुळे मुकुंद ला वाटले कदाचित ही नवख्या व्यक्तीसमोर कसं बोलायचं म्हणून गप्प असेल ,सुरवात आपणचं करावी ,नाहीतरी बिचारी थंडीने आजारी पडायची .. पण त्याला काय माहीत हिच्या डोकयात कसले कसले विचार येतात ते ...
       न राहवून त्यानेच हाथ पुढे केला . हॅलो करण्यासाठी , दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली ...हॅलो मी शिवानी . कॉलेज स्टुडंन्ट आहे . इथेच जवळच्या शहरात राहते .आई आणि मी दोघीच असतो घरी .  रात्री पार्टी होती मैत्रिणीच्या घरी . खूपचं उशीर झाला पार्टीमध्ये , म्हणलं हा जवळचा रस्ता  लवकर पोहचीन घरी म्हणून या जंगलातल्या रस्त्याने आले . पण या मुसळधार पावसात माझ्या गाडीला अचानक काय झालं समजलं नाही बंद पडली .मग अशा सुनसान रस्त्यात मी एकटी थांबणं उचीत नव्हतं वाटत .त्यामुळे मी निदान पाऊस कमी होईपर्यंत थांबण्यासाठी काही मिळतंय का पहाण्यासाठी इकडं जंगलात शिरले . वाटलं कोणी आदिवासी पाडा वगैरे मिळेल .
      आदिवासी पाडा नाही पण हा ' भया... '  पुढचं बोलणार तोच तिने आपली जीभ चावली  ,कारण ज्या व्यक्तीच्या वाडयात आपण उभे आहोत त्याच्यासमोरच त्याच्या वाड्याला भयानक वगैरे बोलणं ठीक नाही वाटत त्यामुळे तिने आपली जीभ आवरली .आणि राहिलेलं वाक्य पूर्ण केलं "पाडा नाही पण वाडा जरूर सापडला " 
    तुमचे खुप खुप आभार . तुम्ही मला आत वाड्यात प्रवेश दिला . तेवढंच मी पावसापासून वाचले ..आणि त्या काळ्या ____ सा _____.. पुढचं बोलणं तीन टाळलं ...
    खरंतर तिने मुकुंद ला सगळं खरं सांगितलंच नव्हतं ,की आपण आई बरोबर भांडण करून रागाने घरातून निघून आलो आहोत ते . पण बिचाऱ्या शिवानीला काय माहित , हे सगळं घडण्यामागे मुकुंदचाचं हाथ होता . ति या सर्वांपासून अनभिज्ञ होती . की हे सगळं जाळं मुकुंदचंच पसरवलेलं आहे .

         शिवानी ने जेव्हा शेक हँड करायला हाथ पुढे घेतला ,तेंव्हा मुकुंद चा हाथ तिला खूप गार वाटला ,जसं की तिने हातात बर्फ पकडला आहे .तिने झटकन आपला हात मागे घेतला. तिला समजलच नाही काय होतंय आपल्याबरोबर.
             तिने इकडेतिकडे बघितले, मघाशी ज्या बाईचा आवाज आला ती कुठे दिसतंच नव्हती ,अशी अचानक कुठे गायब झाली ,हा विचार ती करत असतानाच मागून तिच्या खांद्यावर पुन्हा एकदा बिलकूल थंड असा स्पर्श झाला ,ती खूप घाबरली दचकून तिने मागे वाळून बघितले तर ,एक स्त्री .... कॉटन ची पिवळसर सफेद साडी नेसलेली ,केसांचा आंबेडा, डोळे खोल आत गेलेले, जस की खूप दिवसापासून झोपल्याच नसतील . अशा त्या समोर आल्या , चहाचा कप हातात घेऊन ....
         तेवढ्यात मुकुंद पुढे आला परिस्थिती सावरत म्हणाला ,तुम्ही भिजला होता ना म्हणून आई तुमच्यासाठी चहा बनवायला गेली होती , ही माझी आई ....  
          ती खूप आजारी असते , डॉक्टरांनी  सांगितलं , यांना शहरातील हवामान सूट करत नाही ,तुम्ही काही दिवस यांना फ्रेश हवेत घेऊन जा .. मग म्हणलं अनायासे सुट्टी आहेच तर घेऊन जावं आईला गावाकडच्या वाड्यात.तसे आम्ही मूळचे शहरातील रहिवासी , पण बाबांना खूप ओढ गावाकडची ... मग एका मित्राच्या मदतीने गावी जागा घेऊन बांधला वाडा.. सुट्टीचे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावेत म्हणून ...
       आता बाबा नाहीत .मी आणि आई दोघेचं ...अगदी तुमच्यासारखंच ,जसं तुम्ही आणि तुमची आई दोघीजणी तसंच मी आणि माझी आई ,आम्ही दोघेचं.
    खरंतर महिना झाला इथे येऊन आम्हाला , दोन दिवसातच निघणार होतो आम्ही पण पाऊस काही जाऊन देईना . थांबायचं नावचं घेईना ,नुसता कोसळतोय मुसळधार ,जसं की कोणाचा जीव घ्यायला उठला आहे . असं मुकुंद ने  बोलताच ,शिवानीने झटकन मुकुंदकडे पाहिलं , तिच्या नजरेत भीतीदायक भाव होते . पावसाच्या गडबडीत आणि त्या काळ्या सावलीच्या भितीमुळे आईने शिकवलेली एक गोष्ट मात्र ती विसरलीचं होती की अनोळखी व्यक्तींवर असा लगेच विश्वास ठेवायचा नाही . विश्वासाचं जाऊद्या ती तर अनोळखी व्यक्तींच्या त्या भयानक वाड्यात उभी होती आणि त्यात मुकुंदचं असलं बोलनं , त्यात भरीस भर म्हणजे या दोन्ही मायलेकरांचे बर्फासारखे थंड हाथ ,या सर्व गोष्टींमुळे शिवानीला दरदरून घाम फुटला होता .
      
     चला, आम्ही इथून गेलो नाही ते बर झालं नाहीतर तुम्ही या घनदाट जंगलात एकटीने काय केल असतं . कारण ,आम्ही नसतो तर हा वाडा बंद असता . उघडणार कोणी नसतं त्यामुळे तुम्हाला अख्खी रात्र पावसात उभं राहवून काढावी लागली असती . वरूनवरून जरी  मुकुंद हे सगळं काळजीने बोलत असला तरी  ,त्याच्या मनात काहितरी दुसरंच चालू होत.असं की ज्याची शिवानीला साधी कल्पनाही नव्हती ,की पुढे तिच्याबरोबर काय अघटित होणार आहे . 

      तेवढ्यात शिवानी म्हणाली,हो तुम्ही इथं होतात म्हणून नाहीतर देव जाणें आज काय झालं असत माझ्याबरोबर, आणि ती बाहेर काळी सावली... पुन्हा एकदा तिच्या तोंडून काळ्या सावलीविषयी बाहेर पडलं पण पुढे ती जास्त काही बोलली नाही  , गप्प झाली .. कारण या बाबतीत मुकुंद ला किंवा त्याच्या आईला सांगणें शिवानीला तात्पुरते तरी ठीक वाटत नव्हते . वेळ आल्यावर नक्की सांगू या दोघांना आपलं इथं येण्यामागचं कारण काय , काय असं झालं ज्यामुळे आपल्याला इथंवर यावं लागलं .
     शिवानी चे बोलणे ऐकून  मुकुंद चे  काळे पांढरट डोळे अंधारात चमकले ..त्या काळ्या सावलीची तर कमाल आहे ही ,म्हणून तर तू फसली आहेस आमच्या जाळ्यात ... मुकुंद असं म्हणत मनोमनी हसला . कारण त्यांना त्यांचं सावज अगदी थोडयाशा प्रयत्नाने  मिळालं होतं . ते दोघे तिच्याबरोबर आता काहीही करू शकत होते .कारण वाड्याचा दरवाजा उघडला होता तो या दोघांच्या मर्जीने आणि बंद ही या दोघांच्याचं मर्जीने . एकदा कोणी या मायलेकरांच्या तावडीत सापडलं की पुन्हा त्याचा आत्मा देखील वाड्याबाहेर जाणं अवघड होतं .

     मुकुंदच्या आईने दिलेला चहा , शिवानी खाली बघून संपवत होती आणि हे दोघे एकमेकांकडे बघुन असुरी हसत होते आपलं सुळे दात बाहेर काढत .....

क्रमशः ....

   © VAISHU PATIL 


            
      
      

🎭 Series Post

View all