त्या आठवणींना उजाळा

जुन्या आठवणींना उजाळा...

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

                        त्या आठवणींना उजाळा 

अविस्मरणीय प्रसंग म्हटलं की डोळ्यांसमोर असे बरेच प्रसंग उभे राहतात जे आपण कधीही विसरू शकत नाही. आठवणी तर प्रत्येक लहानसहान गोष्टींसोबतही खूप असतात. पण काही गोष्टी किंवा प्रसंग मनाच्या खूपच जवळचे होऊन जातात. असे अगदी मोजकेच प्रसंग शब्दांकित करणं तसं तर कठीणच आहे पण तरीही काही ठराविक गोष्टी नक्कीच सांगाव्याशा वाटतील.

लहानपणीचा आजही अगदी जसाच्या तसा आठवणारा एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे मी पहिल्या इयत्तेत शिकत असताना मिळालेलं बक्षीस. खरं तर ही आठवण खूप खास आहे. तेव्हा एकाच वेळी तीन स्पर्धांसाठी बक्षीस मिळालं होतं. पण स्मरणशक्ती स्पर्धेसाठी मिळालेलं ते 'सिंदबादच्या सात सफरी' पुस्तक, इतर स्पर्धांमध्ये मिळालेल्या कंपासपेटी अन् रंगांपेक्षा जास्त भाव खाऊन गेलं. बक्षिसपात्र ठरण्याची तशी ती पहिलीच वेळ! कदाचित म्हणूनच आजही तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. नंतरही अनेक स्पर्धांमध्ये आणि शाळेतून नंबर मिळवण्याची वेळ बरेचदा आली. पण हा प्रसंग खासच राहिला! या गोष्टीला अविस्मरणीय म्हणण्याचं खरं तर अजून एक कारण आहे. या पुस्तकामुळेच नकळतपणे वाचनाची गोडी वाढू लागली. पहिल्या वहिल्या बक्षिसाची जादू असावी नाही का? वाचनाकडे वाढलेला कल वेळेनुसार वाढतच गेला. इतका, की खाऊ साठी मिळालेले पैसे सुद्धा पुस्तकं आणि वर्तमानपत्र घेण्यासाठी वापरण्याची सवयच जडली गेली. परिणामी अगदी माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंतच कितीतरी पुस्तकं वाचून झाली. आणि आज पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अजून नवनवीन साहित्य वाचण्याची आवड काही कमी झाली नाही. माझ्या या वाचनप्रिय स्वभावाचं मूळ त्या 'सिंदबादच्या सात सफरीं'सोबतच जोडलेलं आहे. म्हणून ते बक्षीस आणि तो बक्षीस वितरण सोहळा मनपटलावर कोरले गेले आहेत.

पुढेही असे न विसरता येणारे अनेक अनुभव गाठीशी आले, मग ते यश संपादित करण्यासंदर्भात असो किंवा मग मित्रमैत्रिणी, घरच्यांसोबतचे काही प्रसंग असोत. 

यात भर म्हणून हल्लीचाच एक आनंददायी, अविस्मरणीय अनुभव सांगायचा झालाच तर तो अर्थातच ईरासोबतचा आहे. लिखाणाची आवड जोपासताना सहजच ईराबद्दल समजलं होतं. जसजशी माहिती मिळाली तसं इथे लिहायला सुरुवात केली. पण या काही दिवसांत आलेले अनुभव खरचं खूप सुंदर आहेत. याला एक प्रसंग नाही म्हणता येणार. पण हा सर्व घटनाक्रम माझ्यासाठी नक्कीच अमूल्य आणि अविस्मरणीय असेल. लेखनाला तर सुरुवात झाली होतीच. परंतु स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची खरी वेळ आली ती म्हणजे वाचक स्पर्धेच्या वेळी. दर आठवड्याला न चुकता शक्य तितकं वाचन करणं सुरू होतं. जमतील तशा प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आणि अखेरीस मी एका आठवड्यात प्रश्नोत्तरी स्पर्धेत विजेती ठरली. खूप छान वाटलं होतं. घरी सुद्धा या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. नंतर जुलै महिन्यात ईरा राज्यस्तरीय साहित्य करंडक स्पर्धेबद्दल समजलं आणि त्यात सहभागी व्हायचा विचार केला आणि मग सुरू झाला रायगडकरांसोबत लिखाणाचा प्रवास! या स्पर्धेच्या निमित्ताने कितीतरी गोष्टी नव्याने उमगल्या आहेत. लिखाणाची पद्धत, व्याकरणाचे बारकावे आणि महत्त्व, निरनिराळ्या विषयांवर होणारी चर्चा, अशा कित्येक गोष्टी मनात घर करून राहिल्या आहेत. संघातील प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला तर मिळालं आहेच पण त्याचबरोबर आयुष्यात या नव्या सोबतींचं एक वेगळं स्थान सुद्धा निर्माण झालं आहे. आणि याच स्पर्धेच्या निमित्तानी मी आयुष्यातला स्वतःचा पहिला वहिला व्हिडिओ बनवलाय. या तोडक्या मोडक्या प्रयत्नात संघातील सर्वांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. ज्यामुळे भविष्यात हा प्रयोग आणखी चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल असा विश्वास तर नक्कीच आहे. या सोबतच गोष्ट छोटी डोंगराएवढी साठी लिहायचा प्रयत्न केला. आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला जेव्हा गोष्ट माझ्या गणरायाची या विषयासाठी मला द्वितीय क्रमांक मिळाला. याला कारणही तसंच होतं की अवघ्या सात-आठ मिनिटांत मी मनातील भावना लिहिल्या होत्या. आणि हे सहजपणे फक्त जे काही वाटतं ते लिहायला हवं या कारणासाठी होतं. स्पर्धेत इतक्या सुंदर कथा असताना मला पहिल्या तीन क्रमांकात येण्याची अपेक्षाच नव्हती. पण म्हणतात ना अनपेक्षित ते अति सुंदर! माझ्याबाबतीत तसचं काहीसं झालं. आणि या आनंदात भर पडली ती गौराई माझी लाडाची विषयासाठी जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला. या सर्व गोष्टींमुळे खरंतर लिखाण सुधारत आहे आणि आपल्याला हे जमतंय याचं समाधान सुद्धा मिळत आहे. या सर्वाचा उल्लेख करण्याचं कारण हे आहे की जसं लहानपणीच्या त्या पहिल्यांदा मिळालेल्या बक्षिसामुळे वाचनाची आवड निर्माण झाली, तसचं या स्पर्धांच्या माध्यमातून लिखाणाची आवड जोपासण्यासाठी नवा उत्साह निर्माण होत आहे. आपणही प्रयत्न करायला पाहिजे हा विचार मनात येणचं खरंतर खूप आहे. आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवणं म्हणजे सोन्याहून पिवळं. हा सुंदर असा अनुभवही नेहमी लक्षात राहील.

आयुष्य म्हटलं की जिंकणं आलं आणि हरणंही. साधंसोपं जगणं जसं आहे तसं खडतर प्रवासात धडपडणं ही आहेच. या प्रवासात अविस्मरणीय म्हणण्याजोग्या कितीतरी गोष्टी घडतात. कधीतरी निवांतपणे त्या चांगल्या वाईट प्रसंगांना आठवून, जुन्या आठवणींना उजाळा देणं सुद्धा गरजेचं आहे नाही का?
-©® कामिनी खाने.