दोन पावलं

Two footsteps

#दोन_पावलं

पिहू ट्रेनच्या डब्यात चढली. आरक्षित सीटच्या खाली तिने आपली अटेची सरकवली नि गाडी सुटायची वाट पहात बसली. तिच्या शेजारी एक वयोव्रुद्ध जोडपं येऊन बसलं. आज्जी तिच्या शेजारी बसल्या व आजोबा आज्जीच्या शेजारी. त्यांचं सामानही त्यांनी सीटखाली सरकवलं. 

एव्हाना गाडी चालू झाली होती. भरभर वस्ती मागे जात होती. पिहू दूरवर बघत होती. परेशचं नि तिचं लग्न होऊन उणेपुरे आठ महिने झाले होते. लग्न झालं तेंव्हा तिच्यावर जान निछावर करणारा,पिहू मी तुझ्यासाठी आकाशीचा चंद्रमा तोडून आणेन,पिहू मी तुझ्या वाटेवर गुलाबाच्या पाकळ्या अंथरेन म्हणणारा तिचा नवरा परेश आता मात्र घुम्यासारखा वागू लागला होता. 

नेहमीचीच त्याची प्रोजेक्ट्स नि नेहमीच्याच डेडलाईन्स. पिहूला तर तो एक चालतंबोलतं यंत्र वाटू लागला हौता. सेल तर सतत कानाशी लावलेला. नीट जेवणावरही ध्यान नसायचं त्याचं. 

पिहू घराजवळ गाळा घेऊन त्यात पार्लर चालवत होती. हळूहळू तिचा जम बसत होता. आजुबाजूच्या सोसायट्यांतल्या बायाही तिच्या मनमोकळ्या,लाघवी स्वभावाने तिच्याकडे येऊ लागल्या होत्या. पिहूच्या कामात फाईननेस होता. एखादी बाई तिच्याकडून हेअरकट करुन गेली की चार बायांना घेऊन यायचीच. इतके सुंदर हेअरकट करायची ती. 

फेशिअल तर पिहूकडूनच करुन घ्यावं अशी तिची मुलायम बोटं चेहऱ्यावर फिरत की बाया त्यांचा ताण,थकवा सगळं विसरत. आपसूक त्यांचे डोळे मिटले जायचे.  मेहंदीचे कोन तर लांबलांबची लोकं येऊन घेऊन जात होती. 

पिहू तिच्या कामात मग्न असायची,आनंदी असायची पण मग संध्याकाळी घरी यायला तिला उशीर व्हायचा. आधीच थकलेली असायची त्यात वरणभातभाजीपोळी हे सगळं करताना तिची तारांबळ उडायची. पिहूला वाटायचं परेशने तिला घरकामात मदत करावी,तिच्या दिवसभराच्या दिनचर्येबद्द्ल विचारावं पण परेशचं काम संपलं की तो एखादा गेम खेळत बसे नाहीतर मुव्ही बघत बसे. बघताबघता त्याचा डोळा गुरफटे. 

शनिवार,रविवार परेशला सुट्टी तर पिहूला जास्तीचं काम असे. ऑफिसला जाणारे क्लायंट्स वीकएंडलाच तर येत असत. काहीतरी सोयीचं खाणं बनवून ती बाहेर पडे पण परेशला चविष्ट,झणझणीत खायचा मुड आलेला असे नाहीतर पिहूला घेऊन कुठेतरी लंचला जावसं वाटे.

 यातुनच दोघा़ची धुसफूस,भांडणं होऊ लागली. बरं दोघंही माघार घेणारे नव्हते. अक्षरश:कुस्तीच्या सामन्यातल्या पैलवानांसारखे एकमेकांवर तुटून पडत. शाब्दिक हल्ले,प्रतिहल्ले होत नि शेवटी दोघंही डबलबेडच्या दोन्ही कडांवर कुशीने एकमेका़कडे पाठ फिरवून झोपी जात.

दोन दिवसापुर्वीच्या त्यांच्या भांडणात असाच शब्दाला शब्द वाढत गेला होता. दोघंही एकमेकांना, एकमेकांच्या नातलगांना वाट्टेल तसं बोलले होते. तिकीट बुक करुन पिहू आता मम्माकडे जायला निघाली होती.

दोन स्टेशनं निघून गेली नि आज्जीने तिच्या कापडी पर्समधून गुडडेची बिस्कीटं काढली. आजोबांनी चहा मागवला. आजोबांचा हात थरथरत होता म्हणून आज्जीने त्यांचा कप आपल्या एका हातात धरला व आजोबांना म्हणाली,'सावकाश चहात बुडवून बिस्कीटं खा मग गोळ्या घ्यायच्यात नं बीपीच्या.'

 आजोबाही मन लावून लहान मुलासारखं तन्मयतेने चहा बिस्कीट खात होते. या भानगडीत आज्जीचा चहा थंड होत होता पण आज्जीला त्याची फिकिर नव्हती.

 आजोबांचं खाऊन झालं तसं आजीच्या बोळक्यावर समाधान पसरलं. आज्जीने मग तिचा चहा नि बिस्कीट घेतली. पिशवीतून औषधांचा बटवा बाहेर काढून आजोबांच्या गोळ्या तिने चंदेरी वेस्टनातून बाहेर काढून त्यांच्या तळहातावर ठेवल्या. आजोबांना तोंड उघडायला सांगून त्यात पाण्याची धार सोडली मग स्वतःच्या गोळ्या घेतल्या. 

सगळं आवरलं तसा पुढच्या स्टेशनला आजोबांनी कोड्याचा पेपर विकत घेतला. दोघं मिळून कोडं सोडवू लागली. आज्जी विचारायची चार अक्षरी आडवा न वरुन सुरुवात होणारा लोणीसाठी दुसरा शब्द मग आजोबा जरा आठवल्यासारखं करून नवनीत लागतय का बघ . मग आजी जरा आजुबाजूस जुळतय का बघून अगदी चपखल बसला म्हणत टाळी द्यायची. एखादा शब्द दोघांनाही आला नाही की दोघंही चिंताक्रांत व्हायचे नि काय बरं असेल असा विचार करत बसायचे.

घाटातून गाडी जाऊ लागताच आज्जीने आजोबांच्या डोक्यावरून कान झाकले जातील अशी मफलर गुंडाळली. स्वतःकानाला रुमाल बांधला. भोगदा जवळ येताच पाठीमागून मुलं कुकु असा आवाज करत चित्कारायची. ओलसर दरडींवर रान माजलं होतं. दरडींवर जाळी बसवली होती. हिरव्याकंच डोंगररांगांतून पाढऱ्याशुभ्र धबधब्याचे दर्शन होत होते. 
रुळांच्या बाजूच्या माळरानावर गुराखी गाईगुजी चरावयास घेऊन आले होते. जांभळा,लाल तेरडा, हळदुवी हरणं वाऱ्यावर डोलत होती. 

दुपारच्या जेवणासाठीही आज्जीने दहीबुत्ती आणली होती सोबत तळलेल्या सांडगी मिरच्याही होत्या. आज्जीआजोबा जेवणं झाल्यावर बाथरुमला जाऊन आले. आज्जीचं होईस्तोवर आजोबा तिथेच उभे होते. तिला घेऊनच सीटजवळ आले. 

आज्जीने  पर्समधलं संत्र काढलं व आजोबांना एकेक पाकळी सोलून देऊ लागली. त्यांच्या गप्पांतून पिहूला कळलं की ती दोघं लेकाकडे पंधरा दिवसासाठी जाऊन राहिली होती आणि परत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाली होती. 

आज्जी पुर्वीचं नणंदेचं वागणं,सासूचं वागणं आणि आजोबांची अलिप्तता,आज्जीला तोंड दाबून घ्यावा लागलेला बुक्क्याचा मार याची आजोबांच्या कानात आवर्तनं करत होती. आजोबाही तिचं ऐकून घैत होते,तिला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते पण काही अढी आज्जीच्या पदराशी खूणगाठीसारख्या घट्ट बसल्या होत्या. आणि आता उतारवयात या अढीच तिला सोबत करत होत्या,तिचा मेंदू सतत कार्यक्षम रहात होता.

बसूनबसून पिहूचे पाय वळले. ती जरा दरवाजाकडे जाऊन हवा घेऊ लागली. 

थोड्याच वेळात  स्टेशन आलं. थंड पाण्याची बॉटलवाले,चहावाले,लस्सीताकवाले फिरु लागले. गाडी सुटणार तोच एक आर्त किंचाळी ऐकू आली. कुणी एका माणसाने खिडकीतून हात घालून आज्जीच्या गळ्यातलं मंगळसुत्र खेचलं होतं व निमिषार्धात तो दिसेनासा झाला होता. 

आज्जी भैदरली होती,तिच्या डोळ्यातून आसवं गळू लागली होती. आजुबाजूची माणसं,बाया येऊन येऊन चौकशी करत होते. चैन ओढून खाली उतरा नि तक्रार करा सांगत होते पण आजोबांनी जग पाहिलं होतं. आजोबा शांत राहिले.

 पिहू समोरच्या सीटवर जाऊन बसली. आज्जी अधनंमधनं पदर डोळ्याला लावत होती. आजोबांनी आजीचा हात आपल्या थरथरत्या हातात घेतला होता नि तिला सांगत होते,'गेलंतर गेलं. इडापिडा गेली म्हण. मी एवढा धडधाकट आहे ना तुझ्या साथीला मग मंगळसुत्राचं काय घेऊन बसलीस. घरी गेलो की एक एफडी मोडू नि छान नवीन डिझाइनचं बनवू,मोराच्या पदकवालं. 

पिहू विचार करत होती कोण आहेत हे दोघं एकमेकांचे केअरटेकर,मित्रमैत्रीण,पतीपत्नी,..कितीतरी ऋणानुबंधांच्या धाग्यांत  जोडले गेलेले दोन जीव. किती आयुष्य राहिलंय यांचं? दोघंही परतीच्या वाटेला लागलेले,हळवे जीव,कोण आधी जाणार ही भीतीही त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. 

पिहूने परेशला फोन  केला. परेश तिच्या फोनची वाट पहातच होता.
'हेलो परेश'

'हा पिहु,जागा मिळाली ना. सेफ आहेस नं तू. आजुबाजूला चांगली माणसं आहेत ना!पिहू सॉरी गं. मी यापुढे लक्ष घालेन घरात,तुझ्यासोबत घरकाम करेन.'

'परेश,ऐक माझं. रविवारी तू आईकडे यायचं मला न्यायला.'

'नक्की नक्की येतो पिहू.'

खरंतर पिहू घरातन बाहेर पडलेली ती परत कधी न येण्यासाठी पण आज्ज्जीआजोबांच्या निर्मळ प्रीतीने तिच्या मनातील विझलेली प्रीत पुनश्च जाग्रुत झाली. पिहू दोन पावलं परेशकडे सरकत होती. परेेेश दोन पावलं पिहूकडे सरकत होता. 

----------सौ.गीता गजानन गरुड.