तुझ्यासाठी कायपण - भाग ८ (अंतिम भाग )

It's Love Story


तुझ्यासाठी कायपण - भाग ८ (अंतिम भाग )
विषय - प्रेमकथा

आत्तापर्यंत आपण पाहिलं की श्यामा आणि किसना या दोन प्रेमी युगुलांच्या मध्ये एक तिसरी व्यक्ती म्हणजे राधिका येत होती आणि किसनाला मिळवण्यासाठी ती वाट्टेल ते करू पाहत होती, तिने श्यामावर जीवघेणा घातपात घडवून आणला त्यामुळे किसना घाबरला आणि आपल्यामुळे श्यामाला त्रास नको म्हणून कोणाला न सांगता गाव सोडून निघून गेला ... दुसऱ्या गावात तो राघव या नावाने हॉस्पिटलमध्ये कामाला लागला, तिथे त्याची ओळख राधिकाशी झाली ..बघता बघता सहा आठ महिन्यानंतर किसना तिच्या सहवासामुळे तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला प्रपोज केलं ,दोघांनी कोर्ट मॅरेज सुद्धा केलं.. आता वाचा पुढे...

"का झालं,कसं झालं,कोणामुळे झालं याचा आता काहीही अर्थ नाहीये, माझी राधिका आज मला सोडून गेली..." तिच्या मृत्युशय्येच्या बाजूला बसून राघव ओक्साबोक्शी रडत होता. कोणीतरी श्यामाला देखील कळवलं, त्यामुळे तीही लगेच तिथे आली. श्यामाला बिलगून राघव खूप रडला, तिला म्हणाला, " का देव माझ्या बाबतीत नेहमीच असं करतो? आधी मी तुझ्या भल्यासाठी दूर झालो. माझं पहिलं पहिलं प्रेम विसरण्याचा प्रयत्न केला. राधिका माझ्या आयुष्यात आली. तिने मला पुन्हा नव्याने जगायला शिकवलं आणि आता पुन्हा माझं प्रेम माझ्यापासून हिरावून गेलं आहे कायमचं."

राधिकाच्या प्रेताचे अंत्यसंस्कार झाल्यावर श्यामा किसनाला सावरत तिच्या घरी घेऊन गेली, जेवणाची अजिबात इच्छा नव्हती पण "अंगात काहीतरी त्राण रहावा म्हणून तर जेव." असं बोलून श्यामाने त्याला जेवू घातलं .. डोकं तापाने गरम झालं होतं म्हणून तिने त्याला औषध पाजलं. ती त्याला म्हणाली,
"आज इथेच माझ्याजवळ बस. "

त्यामुळे तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू लागला. त्याच्या डोक्यावर थोपटत असताना तिने एक प्रश्न केला,
" इतकं कमकुवत होतं का रे माझं प्रेम की तू फक्त सहा आठ महिन्यात त्या राधिकाच्या प्रेमात विरघळलास? आपल्या इतक्या वर्षांच्या प्रेमाला तू सहज इतक्या लवकर विसरुन गेलास."

"कोण म्हटलं मी आपल्या प्रेमाला विसरलो आहे? प्रेम तर मी अजूनही तुझ्यावरच करतोय आणि कायम करत राहणार." किसना बोलला.

"म्हणजे रे?" श्यामाने विचारलं.

"तुला ठाऊक आहे ना मला शाळा कॉलेजमध्ये रावणाच्या भूमिकेसाठी नेहमीच बक्षिसे मिळाली आहेत,कारण मी अभिनय करताना त्या पात्रात जगून घेतो स्वतःला, अगदी तसंच मी राघव नावाचं पात्र जगत होतो. " किसना बोलला.

"म्हणजे? मला कळेल असं बोल." श्यामाने प्रश्न केला.

"अगं तुला आठवतंय आपल्याला एक मुलगी खूप त्रास द्यायची, तिच्यामुळे मी तुला सोडून गेलो होतो. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून राधिकाच होती." किसना बोलला.

"अरे बापरे ,मला तर विश्वासच बसत नाहीये." श्यामा बोलली

"कसा बसेल विश्वास? कारण ती माझ्यासाठी खूप वेडी होती, पण प्रत्यक्षात ती खूप भावनिक आणि हुशार होती. मला ठाऊक होतं की, आपल्याला जी मुलगी त्रास देतेय ती एक ना एक दिवस नक्कीच मला शोधत माझ्याकडे येणार. जिथे तू मला शोधू शकणार नाहीस तिथे ती बरोबर येईल, कारण ती सतत माझ्या मागावर असायची. मला तिचा विश्वास जिंकायचा होता, म्हणून तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत गेलो. तिला वाटत होतं की, ती ऍक्टिग करतेय साळसूदपणाची पण तिच्यापेक्षा चालाख तर मी होतो. मी लवकरात लवकर तिच्याकडे खेचला गेलो आणि तिला प्रपोज केलं, कोर्ट मॅरेज केलं त्यामुळे मला खरं नाव टाकावं लागलं आणि तुझ्या खबरी लोकांनी तुला लगेच कळवलं. तू मला आणि राधिकाला एकत्र बघून भडकलीस खूप, पण मीच तुला नाही नाही ते बोलून पुन्हा वापस जायला सांगितलं. कारण ही माथेफिरु राधिका पुन्हा तुझ्या जीवावर उठली असती. लग्न झाल्यावर मी तिला सतत रोज तिच्याबाबत अति प्रमाणात पजेसीव झालोय असं जाणवून देऊ लागलो. ती ज्या सहकारी डॉक्टरांसोबत कामं करायची त्यांच्यावरुन तिच्यावर संशय घेऊ लागलो. कोणी पुरुष पेशंट जरी तिच्याशी बोलला तरी मी तिला रागावू लागलो. ह्यांना भेटू नको, त्यांना भेटू नको असं तिला सतत माझ्या बंधनात बांधून ठेऊ लागलो. परवा पार्टीत मीच तिच्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळून तिला एका पुरुषासोबत एकत्र पकडलं. तो इसम सुद्धा माझ्याच ओळखीतला होता... पण मग मी सगळं काही माहीत नसल्यागत तिला चार पाच शिव्या दिल्या. खूप घालूनपाडून बोललो, तरीही ती मला रडत रडत बिलगू पाहत होती, तर तिला बाजूला ढकलून दिलं आणि बोललो \"मर ना जाऊन तिकडं, कशाला आली माझ्या आयुष्यात.\" झालं, हेच निमित्त ठरलं आणि तिने गळफास घेतला. आता तू आणि मी मोकळे झालोय. आता फक्त तू आणि मी आपलंच जग असणार, तुझ्यासाठी कायपण श्यामा...तुझ्यासाठी कायपण..." किसनाने सगळं सांगितलं.

श्यामा रडत होती ते सगळं ऐकल्यावर

"का रडत आहेस तू श्यामा? आता आपले आनंदाचे दिवस येणार आहेत असं रडू नकोस." किसना बोलला.

"तू हे सगळं मला आधीच का नाही सांगितलं? मला विश्वासात घ्यायला हवं होतं ना राजा. बघ आता होत्याचं नव्हतं होऊन बसलंय." श्यामा रडत रडत बोलली.

"होत्याचं नव्हतं म्हणजे? " किसनाने विचारलं.

तेवढ्यात किसनाला छातीत कसतरी होऊ लागलं.डोळे पांढरे पडू लागले,तोंडातून फेस आला.

"अरे तू मला एकटीला सोडून निघून गेला यातच मी मेले होते पण तू लग्न केलं म्हणून मी अजूनच मेले, तरीही मी जगत होते रे कसंतरी पण आज जेव्हा राधिकाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तू तिच्यासाठी रडला ना, तेव्हा मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मला वाटायचं की शरीराने तू त्या रुक्मिणीसारखं राधिकासोबत आहे, पण मनाने मात्र तू तुझ्या श्यामासोबत म्हणजे राधा सोबत आहेस, पण तसं आज मला दिसलं नाही.तू धाय मोकलून रडत होतास त्या राधिकासाठी. त्यामुळे मी ठरवलं की आता तुला माझ्या आयुष्यात स्थान नाही. अशा प्रियकराला जगायचा अधिकार नाही, म्हणून मी मघाशी तुला औषधातून विष पाजलं. खरंच माझं खूप चुकलं रे, तू मला आधी सांगायला हवं होतं तुझ्या प्लॅनिंगबद्दल. " श्यामा रडत रडत बोलत होती.

किसना ने तिच्या मांडीवर जीव सोडला... श्यामा जोरात ओरडली,
"किसना " ...


समाप्त ...

टीम : अहमदनगर
©® मित्र रिषभ

🎭 Series Post

View all