तुझ्यासाठी कायपण- भाग सहा

It's Love Story


तुझ्यासाठी कायपण - भाग सहा
विषय =(प्रेमकथा )

आतापर्यंत आपण पाहिलं...

जिल्हाधिकारी श्यामा आणि तिचा प्रियकर किसना या दोघांच्या आयुष्यात एक तिसरी व्यक्ती आली आहे, ती व्यक्ती सतत श्यामा आणि किसनाला त्रास देतेय, तिला किसनाला मिळवायचं आहे, श्यामाने रंगपंचमीच्या दिवशी तिचा पाठलाग केला, तरीही ती श्यामाच्या तावडीतून निसटली ,पण श्यामाने तिच्या डोक्यात दगड फेकून मारला होता.

आता पुढे ...

दुसऱ्या दिवशी सकाळी.

"किसना अरे ही जी कुणी आहे ती साधीसुधी सामान्य मुलगी नाहीये."
श्यामा बोलली.

"म्हणजे?" किसनाने विचारलं.

"अरे म्हणजे जी मुलगी आपल्या घरापर्यंत बिनधास्तपणे येते काय, भिंतीवरुन चढते काय, इतकी सराईतपणे पळते काय आणि सगळं तिच्या प्लॅननुसार जमवून आणते काय, हे सगळं एक चांगली शिकलेली, लवचिक अंगाची आणि कुठल्या तरी खेळाचे किंवा कराटे क्लासेस मधून प्रशिक्षण घेतलेली असावी." श्यामा बोलली.

"एक्साक्टली, तू तिच्या डोक्यात दगड फेकून मारला पण तरीही ती पळत होतीच, पोरगी एकदम जबरी आहे बरं." किसना म्हणाला.

"ओहो ती जबरी व्हय आणि मी कोण येडपट का?" श्यामाने विचारलं.

"अगं नाही तसं नव्हतं म्हणायचं मला." किसनाने सांगितलं.

"तू राहूदे हल्ली कशाची चेष्टा करावी ते तुला कळतच नाहीये, चल जाते मी आता मूड खराब झालाय माझा." श्यामा बोलली

"सॉरी ना डियर, इतकं का लगेच मनाला लावून घेतेस ,सॉरी ना..." किसना लडीवाळपणे म्हणाला.

श्यामा तरीही रागारागात किसनाच्या घरुन निघाली आणि तिच्या गाडीने तिच्या ऑफिसवर जाऊ लागली.

श्यामा गेल्यावर किसनाला एक निनावी कॉल आला,

ती : "हॅलो डियर ,कसा आहेस?"

किसना : "मी ठीक, पण आपण कोण?

ती : "मी तुझीच रे राधिका, तू माझाच रे कृष्ण."

किसना : "कळलं, कोण आहेस तू , अगं तुला कितीवेळा सांगू की, श्यामा माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. तिच्याशिवाय दुसरी मुलगी माझ्या आयुष्यात कधी नव्हती आणि नसणार."

ती : "हो का? बरं मग तिलाच वाटेतून बाजूला केलं तर?"

किसना : "म्हणजे? खबरदार जर श्यामाच्या केसाला जरी धक्का लागला तर मी सोडणार नाही मग तुला..."

ती : "तू मला कधीच सोडू नये असंच तर वाटतं मला नेहमी, आता थोड्यावेळाने गाडीचे ब्रेक फेल होतील मग श्यामा ढगात आणि आपल्या दोघांची प्रेमकहाणी सुरु...बाय."

किसना : "काय? हे बघ तू असं काहीही करणार नाहीयेस, हॅलोsss...हॅलोsss..."

किसनाला खूप टेन्शन आलं होतं, त्याने लगेच श्यामाला कॉल केला.

श्यामा : "हॅलो, हे बघ मला वैताग नको देऊ, आपण नंतर बोलूया."

किसना : "अगं लगेच गाडीतून खाली उतर."

श्यामा : "काय वेडबीड लागलं की काय तुला?"

किसना : "देवासाठी तरी माझी आई खाली उत्तर त्या गाडीतून..."

श्यामा : "एक मिनीट तू रडतोयस का, काय झालं इतकं किसना?"

किसना : "तिचा कॉल आलेला श्यामाच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत तिने."

किसनाने हे सांगेपर्यत श्यामाच्या गाडीचे ब्रेक कामं करणे बंद पडले होते, गाडी इकडंतिकडं वळत होती, पण गाडी काय एका जागी थांबत नव्हती, या गडबडीत श्यामाचा फोन खाली पडला. फोन उचलण्यासाठी ती खाली वाकली तेवढ्यात समोर असलेल्या लोखंडी सळईने भरलेल्या ट्रकवर गाडी आदळली, ड्रायव्हरच्या छातीतून आरपार लोखंडाच्या सळई गेल्या, त्यामुळे तो जागीच ठार झाला. श्यामा थोडक्यात बचावली, पण तिच्या डोक्याला खूप लागलं होतं.

आजूबाजूच्या लोकांनी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तिच्या सहकाऱ्यांना, किसनाला कळवलं. आपल्या होणाऱ्या बायकोला असं पाहून किसना खूपच गहिवरुन गेला, दररोज हॉस्पिटलमध्ये तिच्या उशाला बसून होता, जोपर्यंत तिला शुद्ध येत नव्हती तोपर्यंत...

दोन दिवसांनी श्यामा शुद्धीवर आली. श्यामाला शुद्धीवर आलेलं पाहून किसनाला खूप आनंद झाला. जवळच्या गणपतीकडे नवस केलेला त्याने त्यामुळे गणपतीचा प्रसाद तिला लगेच भरवला.

अजून दोन-तीन दिवस त्याने श्यामाची सेवा केली आणि एकेदिवशी अचानक गायब झाला. हॉस्पिटलमध्ये कुठंच नव्हता तो, ना त्याच्या घरी होता ना त्याच्या कोणत्याही मित्राच्या घरी होता पण श्यामाला एक चिठ्ठी सापडली तिच्या उशीखाली किसनाने ठेवली होती.

प्रिय श्यामा,

तुला माहीत आहे की माझं सर्वस्व तू आहेस, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही पण आता तुझ्या आयुष्यातून खूप दूर जातोय. माझ्यामुळे तुला हा त्रास सहन करावा लागतोय. उद्या जाऊन तुझं काही बरं वाईट होण्यापेक्षा मीच दूर जातो म्हणजे निदान तू जिवंत तरी राहशील. मला हे कारण पुरेसं आहे तुझ्याशिवाय जीवन जगायला, जमलं तर माफ करशील मला.

तुझाच किसना...

"का संगतीचं सुख खुणावत राही रं,
का बिलंगून , मन रीतं रीतं राही रं
का गुतलेलं जिणं उसवत राही रं
का पुनवच्या संगतीला चांद न्हाई रं

अवघड हि विरहाची कळ साहीना
नजर आता जग तुझ्याइन पाहीना
मुरलीचा, सूर जुळतो
जीव जळतो, त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा "


ही चिठ्ठी वाचून श्यामा खूप रडली. किसनाचा पत्ता कुठंच लागत नव्हता. श्यामाने तिच्या पदाचा वापर करून सगळ्यांना किसनाला शोधण्यासाठी प्रयत्न करायला लावले. तिचं कशातच मन नव्हतं लागत, एकही काम तिच्याकडून पूर्ण होत नव्हतं. इकडे किसनाचेही तसेच हाल होत होते. दुसऱ्या गावात एक रुम घेऊन तो एका दवाखान्यात कामाला लागला होता,पण त्याला श्यामाची आठवण खूप छळत होती. नियतीने काय खेळ मांडला होता या दोन प्रेमी युगुलांच्या आयुष्यात हे तिलाच माहिती.


क्रमश..


टीम : अहमदनगर
©® :मित्र रिषभ

🎭 Series Post

View all