तुझ्यासाठी कायपण -भाग २

It's A Love Story


तुझ्यासाठी कायपण -भाग २
(प्रेमकथा)

किसना नाशिकला रेल्वे स्टेशनला पोहचला. पाहतो तर काय? फक्त त्याचे काका काकू त्याला न्यायला आले होते. त्यांच्यासोबत श्यामा नव्हती,त्याची खूपच चिडचिड झाली होती.

किसना घरी गेला आणि काकूला म्हणाला,
"ही स्वतःला समजते तरी काय? माहीत आहे बाईसाहेबांना खूप कामं असतात, पण मग तिच्या आयुष्यात माझं काहीच महत्व नाही का?"
असं बोलून तो रागारागात त्याच्या रुममध्ये गेला, पायातील शूज तसेच पायातूनच वर फेकून देऊन काढले, त्यातील एक बूट पुन्हा त्याच्या डोक्यातच आपटला. घामाने बरबटलेला शर्ट त्याने पटकन काढून फेकून दिला आणि टॉवेल काढण्यासाठी कपाट उघडलं तर पाहतो तर काय? तोंडावर समोर सगळे केसं पुढं घेतलेली, पांढरा ड्रेस घातलेली एक तरुणी त्यामध्ये उभी होती. किसना घाबरला आणि ओरडत ओरडत तसाच मागे गेला, तो तोल जाऊन पडणारच,तोच त्या तरुणीने लगेच त्याला पकडलं आणि तीही शेजारी असलेल्या बेडवर त्याच्यासोबत पडली.

ती मोठमोठ्याने हसू लागली.

किसना म्हणाला,
"तू ? वाटलंच मला तू असशील. लहानपणापासून तुझा स्वभाव अगदी असाच आहे.अरे पण मी तुझ्याशी का बोलतोय?ओ मॅडम बाजूला व्हा मला आवरायचं आहे "

"काय रे इतकं चिडायला काय झालं ?" तिने विचारले.


"कोणीतरी मला स्टेशनला न्यायला येणार होतं, पण आलंच नाही."किसना खट्टू होत म्हणाला.

"ओह, सॉरी यार. मला खूप कामं होती. मला जमलंच नाही." ती सफाई देत बोलली.


"हे बघा श्यामा मॅडम, तुम्ही सगळ्या जिल्ह्याला येड्यात काढू शकता, पण मला नाही." थोडासा चिडून तो.

"म्हणजे रे?" निर्विकारपणे तिचा प्रश्न.

"जी मुलगी माझ्या कॉलेजच्या भोंग्या वर ऐकू जाईल,इतक्या मोठया आवाजात माझ्यासाठी गाणं म्हणू शकते,ती मुलगी लगेच दुसऱ्या क्षणी व्यस्त कशी काय असू शकते?" तो.

"म्हणजे ? कोण मुलगी रे ? आणि तेही तुझ्यासाठी गाणं म्हंटली ? वाह ! जिगरा आहे मुलीमध्ये." तिने त्याचा चेंडू त्याच्याच कोर्टात भिरकावला.

किसना म्हणाला,
"का नाही आलीस तू स्टेशनला ? कॉलेजला तर आली होतीस ना,मग स्टेशनला पण यायचं की."


"हे बघ मी कॉलेजला नव्हते आले रे ,उलट इतक्या लांब येण्यासाठी मला वेळच नव्हता, जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यासंदर्भात मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती. मी ती घेतली सुद्धा हवं तर तू न्यूजवर बघ."श्यामा उत्तरली.


"अगं,मग ती कोण होती?" किसनाच्या चेहऱ्यावर मोठ्ठे प्रश्नचिन्ह.

"अरे तू आहेसच किसन कन्हैया, मग तुझ्या अवतीभवती खूप गोपिका वावरत असणारच ना." खट्याळ हसत ती.


"गोपिया आनी जानी है, राधा तो मन की राणी है,सांज सखा रे जमुना किनारे, राधा राधा ही कान्हा पुकारे."किसनाने सूर छेडले.

श्यामा म्हणाली,
"ओय होय ,ओय होय ,ओय होय. बरं चल आवर लवकर आपल्याला जरा बाहेर जायचंय. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे."

किसना म्हणाला,
"वाह, मला सरप्राईज खूप आवडतात."

श्यामा म्हणाली,
"ठाऊक आहे रे राजा, म्हणून तर मी नेहमीच तुला नवनवीन सरप्राईज देत असते,चल आवर पटकन."

किसना म्हणाला,
"चल ना तूपण सोबत "

श्यामा म्हणाली,
"कुठं?"

किसना म्हणाला,
"अंघोळीला, चल सोबतच फ्रेश होऊ."

श्यामा म्हणाली ,
"हट वात्रट,चल आवर पटकन मी खाली वाट पाहतेय."


किसना आवरुन खाली हॉलमध्ये गेला पाहतो तर श्यामा तिथे नव्हती.तो तिला मोठमोठ्याने आवाज देऊ लागला
"श्यामा...श्यामा...श्यामा "

किसनाची काकू म्हणाली,
"ओरडू नकोस राजा,ती तर केव्हाच गेली. मला बोलली की,सिटी प्राईड चौकात असलेल्या प्राजक्त बिल्डिंग मध्ये पाचव्या मजल्यावर तुला यायला सांग."

किसना म्हणाला,
"शट यार,ही हल्लीअशी का करत आहे? सतत मला एकट्याला सोडून जातेय,चलो देखते है, उस मकान में आखीर ऐसा है क्या?"

किसना सिटी प्राईड चौकात, प्राजक्त बिल्डिंग मध्ये गेला.लिफ्टमध्ये आत जाताना पाच सहा व्यक्तींसोबत ती सुद्धा त्याच्या सोबत आत गेली, ती बरोबर त्याच्या मागे उभी होती.

डोळ्यांवर रे बन चा आकाशी गॉगल, व्हाईट टॉप आणि लाल स्कर्ट घातलेली ती लिफ्टमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, पण ती मात्र एका हाताने तिचे कुरळे केस बोटांनी खेळवत आणि चुइंगम खात आपल्या किसनाकडेच बघत होती.तेवढ्यात पाचवा मजला आला म्हणून किसना आणि बाकीचे लोकं पटापट बाहेर आले पण तिला तिच्यामागे उभ्या असलेल्या एका टपोरी पोराने हात धरुन रोखवून ठेवले होते.

ती म्हणाली,
"सोड रे मूर्खा."

तो म्हणाला,
"काय त्या फडतूस वर लाईन मारते इकडं मी आहे की अनुभवी पठ्ठ्या. "

बघता बघता लिफ्ट बंद झाली,तिला त्याचा खूप राग आला होता.त्याच्याकडे रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी बघत होती, तिने डोळ्यावरील गॉगल काढला.

तो म्हणाला,
"तू कसली लवंगी मिर्ची दिसतेस गं."

तिने क्षणाचाही विलंब न करता हातातील गॉगलला तोडला आणि त्या गॉगल ची छोटी,निमुळती काडी त्या इसमाच्या डोळ्यात घातली

ती म्हणाली,
"खबरदार जर पुन्हा माझ्या किसनाला फडतूस बोलला तर."

पुढे पुन्हा पाचवा मजला आल्यावर ती लगबग बाहेर गेली,पण तिला किसना कुठेच दिसला नाही?म्हणून हताश होऊन ती तिकडून निघून गेली.


"अगं अगं आता तरी डोळ्यांवरील पट्टी काढ,पाहू तर दे मला तू काय सरप्राईज आणलं आहे?"

श्यामा ने अलगद किसनाच्या डोळ्यांवरील पट्टी काढली. किसनाला डोळ्यांसमोर मोठा आलिशान फ्लॅट दिसला,अगदी काही महिन्यांपूर्वी त्याने जो पेपरमध्ये जाहिरातीत अगदी तसाच पाहिला होता.

श्यामा म्हणाली,
"काय आवडलं का सरप्राईज?आपलं लग्न झालं की तू आणि मी इथंच रहायला यायचं."

किसना म्हणाला,
"अरे वाह, श्यामा..श्यामा तुला कुठं ठेवू न कुठं नको असं आता मला झालंय."

किसना तिला उचलून घेऊन गोलगोल फिरवू लागला.

"स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! "

श्यामा आणि किसना. एक जिल्हाधिकारी तर दुसरा भावी डॉक्टर, दोघांच्या विश्वात अगदी मनमुराद आनंद लुटत होते,पण या आनंदाला कोणाची नजर लागली तर ?


क्रमश :
©® मित्र रिषभ
टीम : अहमदनगर

🎭 Series Post

View all