Oct 29, 2020
स्पर्धा

तुझ्यासाठी काहीही....

Read Later
तुझ्यासाठी काहीही....

  #तुझ्यासाठी_काहीही ...

#प्रेरणादायी_कथा_स्पर्धा 

©अर्चना बोरावके"मनस्वी"   

      माया आज ऑफिस मधून लवकर बाहेर पडली. रिक्षा पकडून थेट 'फेमस स्वीट शॉप' गाठले. रियाच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू घेऊन घाई-घाईने परत रिक्षा पकडून स्टेशनवर आली. आज लोकलमध्ये जागाही मनासारखी मिळाली. डोळे मिटून ती विचार करू लागली. 'कशी आई आहे मी! रियाने एक महिन्यापूर्वी तिच्या आवडीच्या दुकानातून मोतीचूर लाडू आणायला सांगितले होते. तिला आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत ' सर्वोत्कृष्ट खेळाडू ' हे पारितोषिक मिळाल्यावर मायाच तिला म्हणाली होती कि,' काय बक्षीस देऊ तुला ? ' त्यावर रियाने फक्त ते मोतीचूर लाडू मागितले होते. आणि मायाला मात्र आज वेळ मिळाला होता.... एक महिना होऊन गेल्यावर...!
        रिया कधी कोणताही हट्ट करत नसे. दृष्ट लागावी इतकी समजूतदार मुलगी देवाने तिला दिली होती. अभ्यासात हुशार, खेळातही पुढे! तिच्या बक्षिसांनी तर एक कपाट भरून गेले होते. सर्व शिक्षकांचीही ती लाडकी होती. बरं, घरातही तिची कोणतीही तक्रार नव्हती. ना खाण्याची आवड निवड, ना कपड्यांसाठी हट्ट! तिच्या बाबांच्या अकाली जाण्याने असेल वा आईची होणारी धावपळ बघून असेल, रिया खूपच समजूतदार झाली होती. अशा गुणी मुलीचा एवढासा हट्टही आपण लवकर पुरा करू शकत नाही, या विचाराने मायाला स्वतःचाच खूप राग आला. नोकरीमुळे आणि ओव्हर टाईम मुळे आपण आई म्हणुन आपल्या कर्तव्यात कमी तर पडत नाही ना, अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनाला सारखी टोचत असे. 
              या विचारात असतानाच लोकल कधी थांबली हे तिलाही कळले नाही. आपले विचारचक्र थांबवून ती लगबगीने घराकडे निघाली. भरभर चालत तिने दहा मिनिटांतच घर गाठले. रियाने दार उघडताच मायाने मोतीचूरचा तो बॉक्स तिच्या हातावर ठेवला. पण रियाने ज्या थंडपणे तो बॉक्स घेतला ते बघून माया चकीतच झाली. कारण दरवेळी लाडू बघून रिया आनंदाने नाचतच बॉक्स फोडून लगेच खायला बसायची. मायाला वाटले, दमली असेल पोरं! दिवसभर शाळा, घरातले काम, शिवाय परीक्षाही जवळ आली आहे, त्याचा ताणही असेल तिला. मग तिनेच रियाला वाटीत खायला दिले. स्वतःही घेतले. रिया शांतपणे खात होती. मायाच तिला अधून मधून काही विचारी, रिया तेवढीच उत्तरे देत होती. मायाला थोडं नवल वाटलं., पण तिने दुर्लक्ष केले. 'दहावीच्या अभ्यासाचे टेन्शन असेल. जाऊदे करू दे तिला अभ्यास' असं म्हणून मायाही मग स्वयंपाकाला लागली. 
              बघता बघता सहामाही परीक्षा आली. माया अपराधीपणे रियाला म्हणाली,  "बाळा, या परीक्षेच्या वेळी मी सुट्टी नाही घेऊ शकणार. ऑफिसचं खूप काम आहे गं! पण तुझ्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी मी एक महिना सुट्टी घेणार आहे. आत्ता करशील ना तू मॅनेज?"
रिया नुसतं "हो" म्हणाली. मायाला मनातून खूप वाईट वाटत होतं. 'आई - वडील काय काय करतात आपल्या मुलांसाठी, दहावीला मुले असतील तर त्यांना किती वेळ देतात, त्यांच्यासाठी सुट्ट्या घेतात आणि मी? मनात असूनही काही करू शकत नाही. तिचा अभ्यास घेणे तर दूरच पण तिच्याजवळ बसायलाही वेळ नसतो मला.' स्वतः च्या अगतिकतेचा  विचार करतच माया ऑफिसला निघाली.
                      चार पाच दिवस असेच गडबडीत गेले. आणि अचानक ऑफिसमध्ये मायाचा फोन वाजला .'हा तर रियाच्या वर्ग शिक्षिकेचा फोन!' असं म्हणत मायाने फोन घेतला. फोनवर बोलता बोलता मायाच्या तोंडाला कोरड पडली. तिच्या सभोवतालचे जग गोल-गोल फिरत आहे असं तिला वाटायला लागलं. खुर्चीतून ती पडणारच होती पण शेजारच्या सहकार्‍याने तिला सावरले. पाणी दिले. तिला थोडी हुशारी वाटू लागल्यावर तिने सरळ पर्स उचलली, "घरी जाते. " इतकेच बोलून ती निघाली. कशीबशी लोकल पकडली. काही सुचतच नव्हते तिला! 'असं कसं करू शकते रिया? पहिले पाचही पेपर दिले नाही तिने. मला काहीच कशी बोलली नाही. रोज पेपर कसा होता विचारल्यावर "चांगला होता. " असं चक्क खोटं बोलली माझ्याशी! अभ्यास झाला नसेल का तिचा? ताण घेतला असेल का परीक्षेचा? असे एक ना अनेक प्रश्न तिला पडत होते. क्षणात घरी पोहोचावं असं तिला वाटत होतं. काळजीने जिवाचा नुसता थरकाप होत होता तिच्या! स्वतःला सावरत ती कॉलनीत पोहोचली.,तर समोरून साठ्ये काकू येताना दिसल्या. आता या नको त्या चौकशा करणार, या विचाराने माया भरभर निघाली. पण त्यांनी मायाला थांबवलेच! लगेच सुरूही झाल्या, " आज लवकर कशी गं आली? सगळे व्यवस्थित ना? रिया सध्या घरीच दिसते, शाळेला दांड्या मारते वाटतं . आणि रोज तिच्या शाळेतला मुलगाही येतो दुपारी. काय घरी बसुन एकत्र अभ्यास चाललाय वाटतं . लक्ष्य ठेव बाई पोरीवर. दिवसभर तू नसते. इकडे भलते उद्योग होऊन बसायचे." इतके बोलून साठ्ये काकू निघूनही गेल्या. माया मात्र जागीच थिजून गेल्यासारखी तिथेच उभी राहिली. आत्ता तडक घरी जावं आणि रियाच्या दोन तीन कानफटात देऊन तिला जाब विचारावा असा विचार करून माया धावतच घराच्या दिशेने निघाली. पण लगेचच ती थबकली. तिला या सगळ्या गोष्टींनी पुरतं चक्रावून सोडलं होतं, पण तरीही तिचा आपल्या रियावर पूर्ण विश्वास होता. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती तशीच कॉलनीतल्या बाकावर बसली. विचारचक्र तर जोरात सुरू होतं. प्रत्येक गोष्ट आपल्याशी मोकळेपणाने बोलणारी रिया सध्या अबोल झाली होती हे खरे! पण परीक्षा न देण्याइतपत काही तरी झाले म्हणजे बाब गंभीर आहे. त्यातच साठ्ये काकूंनी सांगितलेल्या गोष्टीमुळे तिला अजूनच काळजी वाटू लागली. हा प्रसंग त्रागा करून रियाला जाब विचारण्याचा नाही, तर थोडं सबुरीने घेण्याचा आहे. आरडाओरड करून रिया काही सांगणार तर नाहीच पण बर्‍याच गोष्टी लपवून मात्र ठेवेल. तिला विश्वासात घेऊन, तिला समजून घेऊनच खरं काय ते समजेल, असा निश्चय करून ती निघाली. स्वतःची घालमेल लपवत, चेहरा हसरा करण्याचा प्रयत्न करत तिने घराची बेल दाबली.
             आईला असं अचानक दारात उभं बघून, रिया थोडी गोंधळली , पण माया नेहमीप्रमाणे आत गेली आणि रोजच्या प्रमाणेच तिला विचारले "कसा होता गं आजचा पेपर? अगं तुला सरप्राईज  द्यावं म्हणुन मी आज लवकर आले. चल, तुझ्या आवडीचा शिरा करते पटकन. मग तू बस अभ्यासाला. उद्या शेवटचा पेपर आहे ना तुझा?" रिया यावर काहीच बोलली नाही. दोघीही जेवणाच्या टेबलवर शिरा खायला बसल्या. मग हळूच माया म्हणाली "रिया माझ्यामुळे तुला घरात खूप काम पडतं ना? परीक्षेच्या वेळीही तुला घरातलं  सर्व आवरून जावं लागतं. आता मी ना दूसरी नोकरी शोधते दहा ते पाच अशी. मग सकाळी सातलाच बाहेर नाही पडावं लागणार. आपल्याला बोलायला खूप वेळ मिळेल मग. आपल्या या कठीण दिवसात तू मला किती समजून घेतलेस गं! किती सांभाळतेस तू मला! आपण दोघीच तर आहोत एकमेकींसाठी. मी तुझ्याशी मनातले सर्व बोलते तशी तू ही तुझ्या मनातले सर्व माझ्याशी शेअर करतेस. आपलं नातचं वेगळं आहे, अगदी मैत्रिणींसारखं, हो ना बाळा? मैत्रीत काही लपवायचे नसते, अगदी विश्वासाने सगळे सांगायचे असते. तू ही माझ्याशी असेच वागते, त्यामुळे मी तुझ्या बाबतीत अगदी निश्चिंत आहे." मायाचे बोलणे पूर्ण होते ना होते तोच रिया, मायाच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. मायाने तिला जवळ घेत काही न बोलता पूर्ण शांत होऊ दिले. मग रियानेच बोलायला सुरुवात केली," अगं आई, मी तुझ्या विश्वासाला पात्र नाही. मी तुझ्यापासून बरचं काही लपवले आहे. तुला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणुन मी तुला काही सांगितलं नाही. तुला टेन्शन नको म्हणुन मीच हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत होते गं! पण माझ्याने हे आता शक्य नाही. मी पुरती अडकले गं यात! आता माझं काय होणार?"
              माया रियाचे बोलणे ऐकून मनातून खूपच धास्तावली, पण चेहर्‍यावर काहीही न दाखवता बोलली" अगं, काय बोलतेस तू हे? झालयं तरी काय?"
रियाने सर्व सांगायला सुरुवात केली, " हे सगळे सुरू होऊन एक महिना होऊन गेलाय. कुणीतरी मला व्हॉट्स अॅप  वरून मेसेज केला कि 'मैत्री करशील का?' मी त्याला सांगितले कि, मी अशी अनोळखी लोकांशी बोलत नाही. पण तो म्हणाला ' आपण आत्ताच तर भेटलो होतो आंतर-शालेय स्पर्धेत. मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायला आवडेल '. आई, मी त्याला स्पष्ट नाही म्हणुन सांगितले आणि नंबर ब्लॉक केला. पण दुसर्‍या दिवशी नवीन नंबरने परत तसाच मेसेज आला., आणि त्या बरोबर माझे खूप सारे फोटो सुद्धा! त्याने धमकीही दिली कि,' परत नंबर ब्लॉक केला तर हे सारे फोटो सोशल मीडिया वर घाणेरड्या प्रकारे व्हायरल करीन. तुझी बदनामी करीन '. मी खूप घाबरले आई. कुठून आले असतील माझे इतके फोटो त्याच्याकडे? तो तर दुसर्‍या शाळेचा आहे म्हणतो. त्यानंतर रोज विचित्र आणि घाणेरडे मेसेज असतात. मी आता नंबर सुद्धा ब्लॉक करू शकत नाही. मी घरातून कधी बाहेर पडते, कुठे जाते, शाळेतून कधी येते, हे सगळे त्याला माहीत असते. मी एके दिवशी कंटाळून त्याला मेसेजही केला कि, 'मी आईला सांगून पोलिसात तक्रार करीन म्हणुन'. त्याच्यावर त्याचा मेसेज आला कि 'ज्या दिवशी तू पोलिसात जाशील त्या दिवशीच तुझ्या तोंडावर अॅसिड टाकून तुझ्या तोंडाचे वाटोळे करीन '. आई त्या दिवसापासुन मग मी घराच्या बाहेरही पडले नाही. पेपर सुद्धा दिले नाही गं मी!"
            हे सर्व ऐकून मायाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोके सुन्न झाले. 'इतके सगळे होऊन गेले आणि मला काहीच कळले नाही. किती सहन केले माझ्या निष्पाप लेकराने! पण रिया हे सगळं खरं सांगत असेल तर, साठ्ये काकूंनी सांगितलेला तो मुलगा कोण जो घरी येतो?' माया हा विचार करतच होती, तितक्यात रियाच म्हणाली, " आई, अगं मी शाळेत जात नाही म्हणुन मागच्या आठवड्यापासून यश येतोय घरी. शाळेच्या नोट्स, रोज होणारे पेपर्स मला देतो आहे. मी घरीच सोडवले ते पेपर. त्याने मला खूप वेळा विचारले म्हणुन मी त्यालाही हे सर्व सांगितले आहे. खूप धीर देतो गं तो मला! लहानपणापासूनचा माझा मित्र अशा अडचणीच्या वेळी मला सावरतो आहे., आणि मीच भांडून बसले होते त्याच्याशी! तोच म्हणाला कि, 'आपण यातून मार्ग काढू., सध्या आईला सांगू नको, उगाच टेन्शन नको त्यांना '. म्हणुन नाही सांगितले गं तुला. पण आज रहावलं नाही मला. मी तुझ्यापासून काही लपवून ठेवूच शकत नाही आई. आता काय करायचे गं आपण? "
             मायाने रियाला जवळ घेतले. तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून म्हणाली," मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू यातून." रियाला जवळ घेऊन माया बराच वेळ विचार करत बसली. स्वतःशीच ती बोलू लागली, ' आता काही तरी करायलाच हवे. माझ्या रियाला यातून वाचवायलाच हवे. माझ्या बाळासाठी मी काहीही करेन.' माया उठली. रियाचा फोन तपासला. ते सगळे मेसेजेस तर रिया ने डिलीट केलेले होते. पण फोटो मात्र गॅलरी मध्ये सापडले. तिने सगळे फोटो नीट पाहिले. मनाशीच काही तरी तिने ठरवले आणि स्वस्थपणे ती झोपी गेली.
              दुसर्‍या दिवशी पेपर झाल्यावर यश घरी आला. माया आत झोपली होती. काल झाल्या प्रकारामुळे मायाला खूप त्रास झाला असेल या विचाराने रियाने तिला उठवले नाही. ती यशला हे सर्व सांगणार इतक्यात तोच म्हणाला, " किती दिवस तू घरात अशी कोंडून राहणार आहेस? आज ना उद्या तुझ्या आईला हे समजणारच! आण तो फोन, आपण आत्ताच सोक्षमोक्ष लावू त्याचा. आपण त्याला मेसेज करू कि, त्याचा नंबर आपण पोलिसांना दिला आहे. आणि आता पोलीस कधीही येऊन त्याला पकडून नेणार आहेत.' रिया काही बोलायच्या आतच यशने असा मेसेज पाठवून ही दिला. नंतर तो नंबर ही ब्लॉक केला. पण रिया घाबरून बोलली, "अरे आता तो मला अजूनच त्रास देईल. त्याने अॅसिड अटॅक केला तर?"
यश मग बोलला, "अगं तो असं काही करणार नाही. पोलिसांना तो नक्कीच घाबरणार. आता तो तुला परत त्रासही देणार नाही. आणि तुला खूपच भीती वाटत असेल तर मी येत जाईन तुझ्याबरोबर रोज शाळेत आणि घरी पण सोडत जाईल तुला. तू आता अजिबात घाबरायचे नाही. " रियाला खूप बरे वाटले हे ऐकून. हे सांगायला ती मायाला बोलवणारच होती, तोच मायाच बेडरूम मधून येताना दिसली. मायाला बघून यश चकीतच झाला. तो काही बोलणार इतक्यात मायाने त्याच्या चार पाच मुस्काटात लगावल्या . यश कोलमडून खाली पडला. तोच पोलीसही हजर झाले. त्यांनी यशला ताब्यात घेतले. रिया तर पुरती गोंधळून गेली. मायाच मग म्हणाली, "हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणी नसून यशच आहे." रिया अजूनच  गोंधळली आणि बोलली "अगं , पण आई तो कसा असेल? तो तर मला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी मदत करत होता."
         माया मग सविस्तर सांगू लागली, "रिया हे सगळं याचेच नाटक होते. त्याने तुला मागे प्रेमपत्र लिहिले होते. तेव्हा तू त्याला सर्वांसमोर सुनावले होतेस. त्याच्याशी असलेली बालपणापासूनची मैत्रीही तोडली होतीस. या सर्व गोष्टींचा सूड घेण्यासाठी आणि तुला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने हा बनाव केला. आधी तुझी माफी मागून मागचे सर्व विसरून जाण्यासाठी तुझी विनवणी केली. मी तुला तेव्हाच बोलले होते कि, हा मुलगा मैत्री करण्यासारखा नाही म्हणुन. लहानपणी आपल्या शेजारी राहणारा निरागस यश वेगळा आणि आता वाईट संगतीत पडून बिघडलेला यश वेगळा आहे. पण तू म्हणाली कि, आपण त्याला परत सुधारण्याची संधी देऊ, त्याला योग्य रस्त्यावर आणू. पण आपली मोठी चूक झाली. काही माणसे कधीच सुधरत नसतात." रियाला प्रश्न पडला कि 'आईला त्याच्यावर संशय कसा आला?' मायाच मग म्हणाली," मी तुझा मोबाईल चेक केला आणि त्याने पाठवलेले फोटो पाहिले. त्यातील एक फोटो त्याच्याच बहिणीच्या लग्नातला होता. लग्नाच्या अल्बम मधून  काढून क्रॉप केलेला तो फोटो दुसर्‍या कुणाकडे असणं शक्यच नव्हतं. लगेच मला कळून चुकले कि, हा दुसरा तिसरा कोणी नसून यशच आहे. मग मी तो नंबर ही इंस्पेक्टर साहेबांना पाठवला. त्यांनी सर्व शहानिशा करून तो यशच आहे याची खात्री करून घेतली."
     माया इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली," धन्यवाद साहेब!  तुम्ही मला खूप मदत केली. रात्रीतून तुम्ही सर्व तपास केला. याने माझ्या मुलीला विनाकारण खूप त्रास दिला. त्याला चांगली शिक्षा करा. परत त्याची असं करण्याची हिम्मत नाही झाली पाहिजे. " पोलिस यशला घेऊन गेले. रिया येऊन आईला बिलगली. आज आईमुळे ती किती मोठ्या संकटातून वाचली होती. एक आईच हे करू शकते! माय-लेकींच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. मोठं संकट टळलं होतं. 
मायाचा हात लेकीच्या डोक्यावरून फिरत होता. जणू ती रियाला आश्वासन देत होती," माझ्या प्राणाहून प्रिय रियाच्या डोळ्यात मी कधीही अश्रू येऊ देणार नाही. मी तुझ्यासाठी सगळ्या जगाशी लढेल , सर्व संकटांचा सामना करीन . फक्त तुझ्यासाठी जगते मी! आणि तुझ्यासाठी काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही मी! तुझ्यासाठी काहीही, बाळा...... तुझ्यासाठी काहीही........ "

                   © अर्चना बोरावके" मनस्वी"
आवडल्यास कृपया नावासह शेअर करा
माझ्या मनस्वी या FB पेज ला जरूर भेट द्या.