Feb 23, 2024
सामाजिक

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? भाग -२

Read Later
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? भाग -२
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

भाग -दोन.


रिद्धी - राकेश दोघांना आईबाबा व्हायचे वेध लागले होते. त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरु झाले होते. डॉक्टर, तपासण्या, औषधं सगळं चालू केले. त्यात पुढचे दोन वर्ष गेली. ह्या दिवसात रिद्धीची पाळी एकदाही थांबली नाही. कित्येकदा आय यू आय केले. दर महिन्याला सोनोग्राफी, रोजच्या मोठाल्या गोळया.. गुण काही येईना.

आताशा रिद्धीची चिडचिड व्हायला लागली होती. पाळी आली की रडायला यायचं. महिनाभर आशेने वाट पहिल्यांनतर असं झालं की तिचा बांध फुटायचा. राकेशचे रिपोर्ट्स नार्मल होते. म्हणजे आपल्यामुळेच हा प्रॉब्लेम झालाय हे तिच्या डोक्यात बसले. राकेश तिला समजावायचा. कधी फिरायला जाणे, कधी हॉटेलिंग.. तिचे मन रमवण्यासाठी त्याचेही प्रयत्न सुरु होते. पण बाबा बनायची सुप्त ईच्छा त्याच्याही मनात होतीच की. पाळी आली की रिद्धीची रडारड, मूड डाउन हे सांभाळताना त्यालाही त्रास व्हायचा. वरवर आनंदी राहायचा कितीही प्रयत्न करीत असला तरी कित्येकदा बाथरूम मध्ये जाऊन तो आपले मन मोकळे करायचा.


आजदेखील तेच झाले होते. नऊ ते तीन ची शिफ्ट आटोपून रिद्धी घरी आली आणि आल्या आल्या कावळा शिवल्याची जाणीव झाली. खरं तर तारीख उलटून आठ दिवस वर झाले होते. गूड न्यूज असेल असा तिला समज झाला होता. काही दिवसांपूर्वी पिसिओडी चे निदान झालेय हे ती विसरून गेली होती. मग डोळ्यातून गंगायमुना बरसू लागल्या.
रात्री घरी परतल्यावर तिचा तो पडलेला चेहरा पाहून काय झाले असेल ते राकेश समजून गेला.

"सोड ना गं रिद्धी. किती त्रागा करून घेशील? नीट जेवलीस देखील नाहीस." रात्री झोपतांना तिला आपल्या कुशीत घेऊन तो समजावू लागला.

"राकेश, मी तुला कधीच बाळाचं सुख देऊ शकणार नाही का रे?" तिने कातर स्वरात विचारले.

"योग्य वेळ आली की सगळं नीट होईल." तो.

"अजून केव्हा येईल योग्य वेळ? राकेश माझी तिशी ओलांडलीय. ह्या वयात तर पुन्हा हार्मोन्सचा लोचा व्हायला सुरुवात होते. माझं कसे होईल रे? आईबाबा, आजीआई सगळ्याच्या किती आशा अपेक्षा असतील आणि मी त्यांना काहीच सुख देऊ शकत नसेल तर माझा जगून काय उपयोग?" ती रडायला लागली.

"वेड्यासारखी काही काय बोलतेस? बाळ नसले म्हणजे आयुष्य शून्य असे नाहीये नं गं?"

"मला सगळं शून्यच दिसतेय रे." ती.

 "होईल गं सगळं नीट. तू म्हणशील तर आपण परत टेस्ट ट्यूब बेबी करून बघायचे का?" तो.

"मागच्या खेपेला तेवढा पैसा खर्च करुनदेखील ते सक्सेस नाही झाले रे. ऐक ना राकेश, तू दुसरे लग्न कर. मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. "

तिच्यावर उठलेल्या हाताला त्याने आवरले.

"रिद्धी तू माझ्यासाठी काय आहेस हे अजूनही कळले नाही का गं? तोंडाला येईल तसे काहीही काय बरळतेस?" रागाने तो.

"सॉरी रे. पण मला आता काहीच सुचत नाहीये." आपल्या ओंजळीत तोंड लपवून ती पुन्हा हुमसून रडू लागली.

तू झोप. आपण सकाळी बोलूया." तिला थोपाटत राकेश म्हणाला.

"तुझा चेहरा इतका कशापाई उतरलाय गं?"

सकाळी एकत्र नाश्त्याला बसले असतांना आजेसासूबाईनी बोलायला सुरुवात केली.

"काही नाही गं आजी. ते असंच." राकेश.

"हे बघ राकेश, आपल्या बायकोला सांग की दर महिन्याला असं तोंड पाडून बसू नकोस. भरल्या घरात ते बरे दिसत नाही. विणे तू तरी सांग बाई तुझ्या सुनेला."

"आई तू एकदम अशी ओरडू नकोस गं." राकेशचे बाबा. "हळू बोलून देखील सांगू शकतो नं?"

"तिला रागावतेय असं वाटत आहे का? काय गं रिद्धी तुझ्यावर ओरडते का मी?" आजी.

तिने मान हलवून नकार दिला. डोळे मात्र पाण्याने डबडबले होते.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//