Login

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? भाग -१

एका व्यथेची कथा.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

भाग -एक.


सायंकाळचे चार वाजलेले. रिद्धी शून्यात टक लाऊन बसली होती. 'माझ्याच बाबतीत का असं घडावं?' हा प्रश्न महिन्याच्या विशिष्ट तारखेला नेहमीच पडायचा.


" आज मला चहा मिळेल का?" आजेसासूचा आवाज तिच्या कानाला स्पर्शून गेला पण तिच्या अंतरात काही पोहचला नाही.

"आई हा घ्या तुमचा चहा! स्पेशल आलं घातलेला." आपल्या सासूबाईच्या हातात रिद्धीच्या सासूने चहाचा कप ठेवला.

"विणे, तू का चहा केलास? आणि तुझी सून अशी का बसलीय?"

"बसू दे हो. अशी दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असतेच की. दमली असेल." विनिता.

"हिला तरी अती लाडावून ठेऊ नकोस हो. दोन्ही मोठया सुना बघितल्यास ना कशा तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटून नवऱ्याला घेऊन बाहेर पडल्या."

"चालायचं हो. हल्लीची पिढी जरा वेगळी आहे. त्यांना संयुक्त कुटुंबात जुळवून घ्यायला थोडं जड जातं आणि सुनांनाच का म्हणायचे? आपले मुलगेही त्यांच्यासोबत गेलेतच की." हसून विनिता.

"तुला माझं म्हणणं कधी पटलंय का? किमान ही सून तरी त्यांच्यासारखी निघायला नको." सासूबाईंनी हात जोडले.

"आई, प्रत्येकजण सारखा नसतो हो. दोघी तशा वागल्या म्हणून रिद्धी तेच करेल असे नाही नं? आणि मुळात आपण कोणाकडून अपेक्षाच का करायची?.देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेत जावे." रिद्धीला चहा नेऊन देतांना विनिता म्हणाली.

"हो, पण घेणाऱ्याने तुझे हात ओरबडून घेऊ नये म्हणजे मिळवलं." सासूबाईंचे पुटपुटणे विनिताच्या कानावर पडले.

"रिद्धी चहा घे बाळा."

"आई, अहो तुम्ही कशाला केला? मला बोलायचं ना." रिद्धी ओशाळून म्हणाली.

"अगं नेहमीच करतेचस की. आज जरा बसून दिसलीस म्हणून मी केलाय. संकोचू नकोस, पी." त्यांच्या मृदू बोलण्याने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

"काय गं? काय झालं?" विनिता.

"आई, आज परत पाळी आलीय. आठ दिवस उशीर झाला. मला वाटलं काही गूड न्यूज असेल. पण तसे काहीच नाहीये."

"अगं बाळा, अशी हताश नको होऊ गं. तुमचे प्रयत्न सुरु आहेत ना, झालं मग. जेव्हा योग जुळून यायचा तेव्हा येईलच की." तिच्या डोक्यावरून हात फिरवून विनिता म्हणाली.

 "विणे, मला काही खायला देशील की कोरडा चहाच पाजशील?" सासूबाई गरजल्या तशी विनिता त्यांच्याकडे गेली.

" हो,तुमच्यासाठी शिरा केलाय देते हो. बाळा चहा झाला की थोडावेळ आराम कर." जाता जाता रिद्धीकडे प्रेमानं बघून त्या म्हणाल्या.



रिद्धी आणि राकेश एक समृद्ध जोडपं. घरात सुबत्ता. दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरीवर. संसारात कशाची कमतरता नाही पण एकच शल्य होतं.. लग्नाला पाच वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता.

लग्नानंतर पहिले काही दिवस आनंदात गेले. मग दोन वर्ष होत आली तशी बाहेरून विचारणा होऊ लागली. नवीन लग्न, काही दिवस मजा-मस्ती.. म्हणून हसण्यावारी घेण्यात आले पण जशे दिवस जाऊ लागले तशी घरातूनही विचारणा होऊ लागली.

रिद्धी - राकेश दोघांना आईबाबा व्हायचे वेध लागले होते. त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरु झाले होते. डॉक्टर, तपासण्या, औषधं सगळं चालू केले. त्यात पुढचे दोन वर्ष गेली. ह्या दिवसात रिद्धीची पाळी एकदाही थांबली नाही. कित्येकदा आय यू आय केले. दर महिन्याला सोनोग्राफी, रोजच्या मोठाल्या गोळया.. गुण काही येईना.
:
क्रमश:
काय होईल पुढे? वाचा पुढील भागात.