तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..??

सुखी कुटुंबाची त्रिसूत्री!!

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..??


(सुखी संसाराची त्रिसूत्री सांगणारी लघुकथा..!)

**********


सायंकाळचे चार वाजलेले. रिद्धी शून्यात टक लाऊन बसली होती. \"माझ्याच बाबतीत का असं घडावं?\" हा प्रश्न महिन्याच्या विशिष्ट तारखेला नेहमीच पडायचा.


" आज मला चहा मिळेल का?"

आजेसासूचा आवाज तिच्या कानाला स्पर्शून गेला पण तिच्या अंतरात काही पोहचला नाही.


"आई हा घ्या तुमचा चहा! स्पेशल  आलं घातलेला." आपल्या सासूबाईच्या हातात रिद्धीच्या सासूने चहाचा कप ठेवला.


" विणे, तू का चहा केलास? आणि तुझी सून अशी का बसलीय? "


" बसू दे हो. अशी दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असतेच की. दमली असेल."  विनिता.


"हिला तरी अती लाडावून ठेऊ नकोस हो. दोन्ही मोठया सुना बघितल्यास ना कशा तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटून नवऱ्याला घेऊन बाहेर पडल्या."


" चालायचं हो. हल्लीची पिढी जरा वेगळी आहे. त्यांना संयुक्त कुटुंबात जुळवून घ्यायला थोडं जड जातं आणि सुनांनाच का म्हणायचे? आपले मुलगेही त्यांच्यासोबत गेलेतच की." हसून विनिता.


"तुला माझं म्हणणं कधी पटलंय का? किमान ही सून तरी त्यांच्यासारखी निघायला नको."  सासूबाईंनी हात जोडले.


"आई, प्रत्येकजण सारखा नसतो हो. दोघी तशा वागल्या म्हणून रिद्धी तेच करेल असे नाही नं? आणि मुळात आपण कोणाकडून अपेक्षाच का करायची?.देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेत जावे."

रिद्धीला चहा नेऊन देतांना विनिता म्हणाली.


" हो, पण घेणाऱ्याने तुझे हात ओरबडून घेऊ नये म्हणजे मिळवलं." सासूबाईंचे पुटपुटणे विनिताच्या कानावर पडले.


"रिद्धी चहा घे बाळा."


"आई, अहो तुम्ही कशाला केला? मला बोलायचं ना." रिद्धी ओशाळून म्हणाली.


" अगं नेहमीच करतेचस की. आज जरा बसून दिसलीस म्हणून मी केलाय. संकोचू नकोस, पी!"

त्यांच्या मृदू बोलण्याने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.


"काय गं? काय झालं?" विनिता.


"आई, आज परत पाळी आलीय. आठ दिवस उशीर झाला. मला वाटलं काही गूड न्यूज असेल. पण तसे काहीच नाहीये."


"अगं बाळा, अशी हताश नको होऊ गं. तुमचे प्रयत्न सुरु आहेत ना, झालं मग. जेव्हा योग जुळून यायचा तेव्हा येईलच की." तिच्या डोक्यावरून हात फिरवून विनिता म्हणाली.


 "विणे, मला काही खायला देशील की कोरडा चहाच पाजशील?" सासूबाई गरजल्या तशी विनिता त्यांच्याकडे गेली.


" हो,तुमच्यासाठी शिरा केलाय देते हो. बाळा चहा झाला की थोडावेळ आराम कर." जाता जाता रिद्धीकडे प्रेमानं बघून त्या म्हणाल्या.


**********


रिद्धी आणि राकेश एक समृद्ध जोडपं. घरात सुबत्ता. दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरीवर. संसारात कशाची कमतरता नाही पण एकच शल्य होतं.. लग्नाला पाच वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता.


लग्नानंतर पहिले काही दिवस आनंदात गेले. मग दोन वर्ष होत आली तशी बाहेरून विचारणा होऊ लागली. नवीन लग्न, काही दिवस मजा-मस्ती.. म्हणून हसण्यावारी घेण्यात आले पण जसे दिवस जाऊ लागले तशी घरातूनही विचारणा होऊ लागली.


रिद्धी - राकेश दोघांना आईबाबा व्हायचे वेध लागले होते. त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरु झाले होते. डॉक्टर, तपासण्या, औषधं सगळं चालू केले. त्यात पुढचे दोन वर्ष गेली. ह्या दिवसात रिद्धीची पाळी एकदाही थांबली नाही. कित्येकदा आय यू आय केले. दर महिन्याला सोनोग्राफी, रोजच्या मोठाल्या गोळया.. गुण काही येईना.


आताशा रिद्धीची चिडचिड व्हायला लागली होती. पाळी आली की रडायला यायचं. महिनाभर आशेने वाट पहिल्यांनतर असं झालं की तिचा बांध फुटायचा. राकेशचे रिपोर्ट्स नार्मल होते. म्हणजे आपल्यामुळेच हा प्रॉब्लेम झालाय हे तिच्या डोक्यात बसले. राकेश तिला समजावायचा. कधी फिरायला जाणे, कधी हॉटेलिंग.. तिचे मन रमवण्यासाठी त्याचेही प्रयत्न सुरु होते. पण बाबा बनायची सुप्त ईच्छा त्याच्याही मनात होतीच की. पाळी आली की रिद्धीची रडारड, मूड डाऊन हे सांभाळताना त्यालाही त्रास व्हायचा. वरवर आनंदी राहायचा कितीही प्रयत्न करीत असला तरी कित्येकदा बाथरूम मध्ये जाऊन तो आपले मन मोकळे करायचा.



आजदेखील तेच झाले होते. नऊ ते तीन ची शिफ्ट आटोपून रिद्धी घरी आली आणि आल्या आल्या कावळा शिवल्याची जाणीव झाली. खरं तर तारीख उलटून आठ दिवस वर झाले होते. गूड न्यूज असेल असा तिला समज झाला होता. काही दिवसांपूर्वी पिसिओडी चे निदान झालेय हे ती विसरून गेली होती. मग डोळ्यातून गंगायमुना बरसू लागल्या.

रात्री घरी परतल्यावर तिचा तो पडलेला चेहरा पाहून काय झाले असेल ते राकेश समजून गेला.



"सोड ना गं रिद्धी. किती त्रागा करून घेशील? नीट जेवलीस देखील नाहीस. " रात्री झोपतांना तिला आपल्या कुशीत घेऊन तो समजावू लागला.


" राकेश, मी तुला कधीच बाळाचं सुख देऊ शकणार नाही का रे? "

तिने कातर स्वरात विचारले.

"योग्य वेळ आली की सगळं नीट होईल." तो.


" अजून केव्हा येईल योग्य वेळ? राकेश माझी तिशी ओलांडलीय. ह्या वयात तर पुन्हा हार्मोन्सचा लोचा व्हायला सुरुवात होते. माझं कसे होईल रे? आईबाबा, आजीआई सगळ्याच्या किती आशा अपेक्षा असतील आणि मी त्यांना काहीच सुख देऊ शकत नसेल तर माझा जगून काय उपयोग?" ती रडायला लागली.


"वेड्यासारखी काही काय बोलतेस? बाळ नसले म्हणजे आयुष्य शून्य असे नाहीये नं गं?"


"मला सगळं शून्यच दिसतेय रे." ती.


 "होईल गं सगळं नीट. तू म्हणशील तर आपण परत टेस्ट ट्यूब बेबी करून बघायचे का?" तो.


" मागच्या खेपेला तेवढा पैसा खर्च करुनदेखील ते सक्सेस नाही झाले रे. ऐक ना राकेश, तू दुसरे लग्न कर. मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. "

तिच्यावर उठलेल्या हाताला त्याने आवरले.


" रिद्धी तू माझ्यासाठी काय आहेस हे अजूनही कळले नाही का गं? तोंडाला येईल तसे काहीही काय बरळतेस? " रागाने तो.


"सॉरी रे. पण मला आता काहीच सुचत नाहीये." आपल्या ओंजळीत तोंड लपवून ती पुन्हा हुमसून रडू लागली.


तू झोप. आपण सकाळी बोलूया." तिला थोपाटत राकेश म्हणाला.

******


"तुझा चेहरा इतका कशापाई उतरलाय गं?"


सकाळी एकत्र नाश्त्याला बसले असतांना आजेसासूबाईनी बोलायला सुरुवात केली.

"काही नाही गं आजी. ते असंच."

राकेश.


"हे बघ राकेश, आपल्या बायकोला सांग की दर महिन्याला असं तोंड पाडून बसू नकोस. भरल्या घरात ते बरे दिसत नाही. विणे तू तरी सांग बाई तुझ्या सुनेला."


"आई तू एकदम अशी ओरडू नकोस गं." राकेशचे बाबा. " हळू बोलून देखील सांगू शकतो नं? "


" तिला रागावतेय असं वाटत आहे का? काय गं रिद्धी तुझ्यावर ओरडते का मी?" आजी.

तिने मान हलवून नकार दिला. डोळे पाण्याने डबडबले होते.


"अगं रडूबाई, गायी लगेच पाण्यावर आल्यात होय?" तिला मायेने जवळ घेत विनिता म्हणाली.


" अगं तुझी ही अवस्था बघवत नाहीये. मला, बाबाला आणि आईंना सुद्धा. म्हणून काळ रात्री आम्ही तिघांनी विचार करून निर्णय घेतला. म्हणजे आयडिया तशी आईंचीच होती पण आम्हा दोघांना पटली." विनिता.


"आई काय म्हणायचे आहे तुला? कसली आयडिया?"

रात्री रिद्धी दुसऱ्या लग्नाचे बोलली होती. आजीच्या मनात तेच तर आलं नसेल ना म्हणून राकेश बावरल्यासारखा झाला.


" बाळाबद्दल बोलायचे आहे. "

बाबा.


"काय बोलायचे आहे?"

इतका वेळ गप्प असलेल्या रिद्धीने भीतभीत विचारले.


"आपण बाळ दत्तक घ्यायचं का ?" तिच्या डोळ्यात बघत विनिता उत्तरली.


"आई दुसऱ्याचं बाळ चालेल तुम्हाला..?" रिद्धीने डोळे विसफारून एकवार विनिताकडे आणि नंतर आजीकडे बघून विचारलं.


" आपलं -दुसऱ्याचं, असं काही नसतं. लेकरू ते लेकरू असते. " चमचाभर उपमा तोंडात टाकत आजी म्हणाली.


" रिद्धी, अगं राजेश आणि रमेश माझेच मुलगे ना? पण त्यांचे लग्न झाले आणि ते एक दोन वर्षांत त्यांच्या बायकांसोबत वेगळे राहू लागले. त्यांच्यावर आणि राकेशवर मी सारखेच संस्कार केलेत गं. तुम्ही दोघे पाच वर्ष झाली तरी अजूनही इथेच आहातच की.

मुलं लहान असतांना आईवडिलांनी त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करावं. मोठे झाल्यावर त्यांनी आपली काळजी घ्यायची असेल तर घेतील. आता आपलेच बघ.कधी कुरबूरी होत असतील तरी एकमेकांना सांभाळून घेतोच ना आपण?

आणि आईबद्दल म्हणशील तर त्या फणसासारख्या आहेत गं. वरून काटेरी आणि आतून गोड. म्हणून तर इतका चांगला उपाय त्यांनीच शोधला.

महागातल्या महाग ट्रीटमेंट करून आपण पाण्यासारखा पैसा खर्च केला. आता नको तो खर्च. दर महिन्याचा तुलाही त्रागा नकोच. त्या पेक्षा अनाथालयातून बाळ दत्तक घेऊया. त्या बाळाला आईबाबा मिळतील. त्याचं आयुष्य सुखकर होईल आणि तुम्हालाही एक वेगळाच आनंद मिळेल. बघा, म्हणजे हे आमचे विचार आहेत. तुम्हाला पटले तरच पुढचा निर्णय घ्या. "

विनिता त्या दोघांकडे पाहत म्हणाली.


"आईबाबा तुम्ही खरंच ग्रेट आहात आणि आजी तुझ्या डोक्यात ही कल्पना आली ती आम्हाला कशी सुचली नाही गं?" आजीला मिठी मारत राकेश.


हम्म! ही मिठी तुझ्या बायकोला मार. तिला त्याची गरज आहे. सारखी रडत असते." त्याचा कान पकडून आजी.


घरच्यांचा विचार दोघांना पटला. आपल्या पदरात बाळ येईल या कल्पनेनेच रिद्धीला आई झाल्यासारखे वाटत होते.


यथावकाश एका अनाथाश्रमातून रिद्धी आणि राकेशने एक चार महिन्याची गोंडस परी घरी आणली.

 बाळाचे संगोपन करण्यात दोघेही आनंदी होते. घराला घरपण होतेचे आता एक बालपण आले होते. त्या गोंडस परीच्या बाललिलांनी घर भरून गेले.


वर्ष सरले. परीचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. रात्री झोपतांना रिद्धी परीकडे टक लाऊन पाहत होती.


"अशी काय बघतेस? राणीसाहेब आंनदी आहात ना? की काही हवंय ?" राकेशने हसून विचारलं.


" मी खूप खूप आनंदी आहे रे! राकेश सुखी संसारासाठी काय लागतं? थोडे प्रेम, थोडा विश्वास, थोडा समजूतदारपणा! आपल्या घरात मला हे सगळं भरभरून मिळाले. आता तूच सांग तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवेय? " त्याच्या मिठीत विसावत ती उत्तरली.

"एक जादूची झप्पी विथ गोड पप्पी!" तिच्या गालावर ओठ टेकवत तो म्हणाला तशी ती लाजली.


           ******* समाप्त *******


खरंच प्रत्येक घरात एकमेकांबद्दल थोडे प्रेम, थोडा विश्वास आणि थोडा समजूतदारपणा असला तर ते कुटुंब कोणत्याही परिस्थितीत नक्कीच आनंदी असेल.

सुखी संसाराचे हेच त्रिसूत्र असावे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

ही लघुकथा कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि नावासहित शेअर करा.

धन्यवाद!!