तुझी साथ हवी मला... भाग 9

आज आमच्याकडे माझ्या आई बाबांच्या ऍनिव्हर्सरीचा कार्यक्रम आहे तर मी तुम्हा लोकांना आमंत्रण द्यायला फोन केला आहे",..


तुझी साथ हवी मला... भाग 9

©️®️शिल्पा सुतार
.........

काव्या बाहेर जेवायला येऊन बसली, सगळे घरातले उद्याच्या कार्यक्रमाबद्दलच बोलत होते खूप खुश होते ते , वहिनी आई सोबत ठरवत होती काय तयारी करायची, काय नाही.

" काव्या तुझा ठरला का ड्रेस? ",.. सुरभी.

"हो वहिनी तो लाल रंगाचा अनारकली घालू का मी? ",.. काव्या.

"घाल छान आहे नवीन आहे, मस्त दिसते तू त्यात",.. सुरभी.

वहिनी नीट बोलत होती मग काव्याने नीट उत्तर दिल.

जेवण झालं काव्या सोहम सोबत बाहेर फेऱ्या मारत होती.. "दादा तुलाही असं वाटतं का की शशी चांगला आहे",

" चांगला आहे असं नाही वाटत, पण तो वाईट काम करत नाही",.. सोहम.

" मग तो माझ्याशी असं रागा रागाने का वागतो, मला वाटत की त्याला माझ्याशी लग्न करायचं नाही पण तरी काहीतरी झालं आहे आणि काहीतरी कारणामुळे तो माझ्याशी लग्न करतो आहे त्याच्या पण घरचे असा दबाव आणत असतील का? स्पेशल वहिनी",.. काव्या.

"माहिती नाही मी करतो सगळ्या गोष्टीची चौकशी ",.. सोहम.

.....

सुरेशराव प्रमिलाताई सुरभी आत मध्ये सोफ्यावर बसलेले होते,.." आई तुम्ही बोलल्या का बाबांशी? ",

सुरेशराव सुरभी कडे बघत होते,.." काय बोलायचं आहे तुला सुरभी? ",

" बाबा काव्या आणि शशीच लग्न ठरल्याची अनाउन्समेंट करायची आहे का उद्या पार्टीत? बरीच लोक असतील ना चांगला चान्स आहे आणि आता जवळजवळ काव्याचं कॉलेजही संपलं आहे अगदीच शेवटची परीक्षा बाकी आहे, ती सुद्धा एक महिन्यात संपून जाईल हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं आहे",... सुरभी.

" बेटा काव्याला थोडा वेळ हवा आहे ",.. सुरेश राव.

" आता का वेळ हवा आहे तिला? काय प्रॉब्लेम आहे बाबा? दोघं बरोबर वयात आहेत",... सुरभी.

" होऊ दे तिची परीक्षा एकदम मनाला लावून घेईल ती ",.. सुरेश राव.

"हे बघा तुम्ही योग्य निर्णय घेत असाल, पण तरी मला असं वाटतं की याबाबतीत मुलींना जास्त सूट देऊ नये",.. प्रमिलाताई.

" हो मी बघतो तिच्याशी बोलून",.. सुरेश राव.

" खूप मवाळ धोरण घेऊ नका जरा, तिला सांगा की तुझं लग्न याच्याशीच होईल, बहुतेक काव्याला डिसिजन घेता येत नाही, तुम्हाला पसंत आहे ना शशी",.. प्रमिलाताई.

" हो मला काही प्रॉब्लेम नाही, होऊ दे तिची परीक्षा",.. सुरेश राव

"आजच संपली ना परीक्षा? " ,.. प्रमिलाताई.

" हो ती टेस्ट होती आता वार्षिक परीक्षा आहे ना थोड्या दिवसात",.. सुरेश रावां पुढे कोणाचं काही चाललं नाही प्रमिलाताई आणि सुरभी गप्प बसल्या

सुरभी रूममध्ये आली, सोहम अजून बाहेरच होता तिने शशीला फोन लावला,

" काय झालं ताई उद्या करत आहात ना तुम्ही अनाउन्समेंट , माझं आणि काव्याचं लग्न ठरलं हे ऐकुन बरेच लोक आश्चर्यचकित होतील ",.. शशी खुश होता.

"नाही काव्या नाही म्हणते आहे, तिला वेळ हवा आहे अजून, तिची वार्षिक परीक्षा झाल्यावर बघू",.. सुरभी

"मी तर तुला कधीच म्हणतो आहे ताई, त्या काव्याशी चांगल्या शब्दात बोलायलाच नको, किती नाटक करते ती, तुम्ही लोक का ऐकता तीच? मी बघु का जरा ",.. शशी

" तू काहीही करणार नाही शशी, शांत राहत जा जरा, उगाच डोक्यात राग घालून सगळं प्लॅन चौपट करू नको तुला या सगळ्या लोकांसमोर शांत संयमी आणि चांगलं म्हणून वावरायचं आहे, म्हणूनच मी तुला आज पटकन फोन केला, उद्या मला अजिबात वेळ नाही तुझ्याशी बोलायला, तिथे कार्यक्रमात गोंधळ घालू नको, एकदम शांत रहा आणि व्यवस्थित वाग जरा",.. सुरभी
.......

शशी चिडला होता तो घराबाहेर आला, त्याने त्याच्या मित्रांना फोन लावला,.." कुठे आहात आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर या",

शशीने फोन करायचा अवकाश की त्याचे तीन चार मित्र लगेच हॉटेलवर आले, फुकटात जेवायला मिळायचं, एवढा श्रीमंत मित्र असताना, ते कशाला नकार देतील.

पण आहे त्या गोष्टीच समाधान नव्हतं शशी आणि सुरभीला, अजून श्रीमंत व्हायचं होतं त्यांना, त्यासाठी काव्यासारख्या साध्या मुलीला ते त्रास देत होते.

त्याचे सगळे मित्र जमले, शशी खूप दारू पिलेला होता, काहीच्या काही बोलत होता तो काव्या आणि तिच्या घरातल्यांबद्दल, त्या काव्याचं घमंड तर मी एवढं तोडणार आहे, बॉडीगार्ड ठेवते काय, असं वाटतं आता जाव आणि तिला इकडे उचलून घेऊन याव.

"शशी पण तो रघु मारेल ना तुला ",.. मित्र रघुच्या विचाराने घाबरले होते.

सोड मी नाही घाबरत रघुला, मी तिचा होणारा नवरा आहे, एकदा लग्न झालं ना तेव्हा तिला समजेल हा शशी काय चीज आहे ते, सोहम आणि तिचे आईबाप पाया पडतील माझ्या, असं करून टाकीन मी टाईट वातावरण,

आता जावं लागेल उद्या नटून थटून त्यांच्या कार्यक्रमाला, एकदम चांगलं असल्याचं दाखवत, का तर त्या लोकांनी मला पसंत करावं, काय गरज आहे? एक घाव दोन तुकडे जमतात मला.... शशी शुद्धीत नव्हता. त्याचा त्याचा बडबड करत होता तो.... "फॅक्टरी टाकायची आहे, घाई करायला हवी, आत्ताच तिशीचा आहे मी आणि त्या रघुला तर मी सोडणार नाही, अजून गाल दुखतो आहे माझा",

त्याचे मित्र त्याला फुकटचा सपोर्ट करत होते, हो ना शशी, रघुला पकडल की मला ही सांग मी पण मारणार त्याला, माझ पण अंग दुखत आहे, किती मारल आपल्याला काल,.... एकही मित्र शुद्धीत नव्हता

तू फक्त सांग शशी तू म्हणशील ते करू आम्ही, लग्न करायचं आहे का उद्या करून टाक, कोणाची वाट बघू नको, तुझा डिसिजन आता तू घे, हे घरचे मोठे लोक ना सगळे कामाला लांबणी वर टाकत राहतात,
......

काव्या रूम मध्ये आली, बाबांना शशी पसंत आहे, वाटतं ते जास्त दिवस माझं ऐकणार नाही, झाल्या प्रकाराचा तिने खूप धसका घेतला होता, खूपच घाबरून गेली होती ती, काय होईल माझ पुढे आयुष्यात, काहीच रस्ता दिसत नव्हता, ती झोपली जरा वेळ,

परत रात्री तेच स्वप्न पडल, आई... थांब... किती भराभर चालते ग... कितीतरी लांब ती आईच्या मागे रडत पडत चालत होती... आई थांब ना जाऊ नको... मला तुझ्या सपोर्टची गरज आहे ग... इथे कोणीच माझं नाही... जो तो स्वार्थी... सगळ्यांना फक्त आपलं चांगलं व्हावं असं वाटत... माझ्यासाठी फक्त दादा आहे इथे आणि मावशी आहे... काव्या हाक मारत होती... आई सरळ चालत होती... अचानक ती समोरच्या झाडांमध्ये नाहीशी झाली... खूप दचकून काव्या उठली... घामेघुम झाली होती... आई आई ओरडत होती ती.

मावशी तिच्या रूममध्ये तिच्याजवळ बसलेल्या होत्या, काव्या उठून बसलेली होती ,.. "काय झालं काव्या पाणी पी आधी हे घे, परत ते स्वप्न पडलं का काव्या ",..

"हो मावशी, ती रडत होती, मला इथे नाही राहायचं, मला एखाद्या सुरक्षित आणि छान ठिकाणी जायचं आहे, मला जगायचा कंटाळा आला आहे",.. काव्या.

"असं बोलतात का वेड्यासारखं",.. मावशींनी तिला जवळ घेतलं, कीती घाम आला आहे, त्यांनी पदराने तिचा घाम पुसला, हे घरचे नुसते तुझ्या मागे लागून जातात, काय करू मी आता? त्या काळजीत होत्या,

" घाबरायचं नाही बेटा तू सज्ञान आहे, तू तुझा निर्णय घेऊ शकते, तुला लग्न करायचं असेल तर होकार दे.. नसेल करायचं तर स्पष्ट नाही सांग, तुझ्यावर कोणी कसली जबरदस्ती करू शकत नाही",... मावशी.

"माझ्या हातात काही नाही आहे मावशी आता ",.. काव्या अजूनही रडत होती,

कसं काय सांगणार आहे मी घरच्यांना की शशी कसा वागतो, माझं लग्न झालं तर एक दिवस पण मी सुखी राहणार नाही, बाकीच्यांना तेच पाहिजे आहे मी शशी सोबत लग्न करणं.

आता कार्यक्रमात पण येईल तो, एक तर त्या शशीच्या भीतीमुळे माझ्या कोणी मैत्रिणी सुद्धा आमच्याकडे येत नाही, नातेवाईकात कोणाची मुलगी नाही सोबत, त्याच्यामुळे ती वहिनी माझ्या सोबत राहते आणि मला त्या शशीकडे देते, उद्या मी मावशी सोबत राहील, काही झालं तरी शशी सोबत बोलणार नाही,
.....

दुसऱ्या दिवशी सकाळपासून कार्यक्रमाची खूप गडबड सुरू होती, नाश्त्या आधी प्रमिलाताईं सुरेश राव यांना मावशींनी ओवाळल, मावशी खूप पूर्वीपासून त्या घरात राहत होत्या, दूरच्या नातलगही होत्या त्या, त्या वयाने जास्त होत्या त्यामुळे त्यांचा तो मान होता आणि कोणीही नकार देत नव्हतं, दोघांनी त्यांच्या पाया पडल्या.

काव्या सोहम सुरभी येऊन भेटले, त्यांनी त्यांना घड्याळाचा जोडी गिफ्ट दिली, सुरभीने दोघांना कपडे दिले, संपत मामा आले फुलांचा गुच्छ घेऊन, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई घरात आधीच आली होती, छान वातावरण तयार झालं होतं, खूप फोन येत होते शुभेच्छां साठी, स्वयंपाक घरात पुरण वरणाचा स्वयंपाक होत होता, बरेचसे नातेवाईक येत होते, खुप आनंदी वातावरण होत.

"आई मला थोड्या वेळ ऑफिस मध्ये जाव लागेल, काम आहे मी येतोच एक दोन तासात जेवणाच्या वेळेपर्यंत",.. सोहम.

"चालेल जाऊन ये",.. प्रमिला ताई.

सोहम ऑफिसमध्ये आला त्याचा मॅनेजर मागेच होता... " आपल्याकडं कोणाकोणाला संध्याकाळच्या कार्यक्रमाचा आमंत्रण द्यायचं याची लिस्ट तयार आहे का?",..

"हो सर तयार आहे",..

" मी स्वतः फोन करायला पाहिजे त्यांना",.. सोहमने फोन करायला घेतला.
...

अभिजीत आदेश दोघं ऑफिसला यायला निघाले, अभिजीत फोनवर बोलत होता तोपर्यंत आदेश आई आणि आजीजवळ बाहेर कार जवळ उभा होता,

" चांगलं काम कर आदेश ऑफिसमध्ये, नाहीतर तुला अभिजीत ओरडेल परत",.. आजी.

" हो ना आजी माझ आज काय होणार आहे काय माहिती?, दादा का इतका सिरियस आहे?, घाबरायला होत आहे मला, अस वाटत आहे परीक्षा आहे ",.. आदेश.

आजी आई दोघी हसत होत्या... " आज काय आता रोजच तुझं ट्रेनिंग आहे",..

"हो ना बापरे आई तू काय घाबरवते आहेस मला, एक तर इथे मला काही सुचत नाही, त्या दादासोबत ऑफिसला जायचं म्हणजे रस्त्याने नुसतं गप्प बसावं लागत किंवा नुसत्या मीटिंग त्यांच्या चर्चा",.. आदेश.

" मग तुला काय गप्पा मारायच्या आहेत",.. आजी.

" तू चल ना आजी सोबत तू असली की सगळे शांत असतात",.. आदेश.

" मी काय करणार आहे तिकडे येऊन, मला काय माहिती काय काम चालतं तिकडे",.. आजी.

" तूच तर सगळ्यात हुशार आहे या घरात आजी, तूच एवढं सगळं सांभाळलं आहे",.. आदेश.

दोन तीन मोटर सायकल वर पाच सहा मुल आले, आदेश दादा चला आम्ही पण पार्टी ऑफिस मधे जात आहोत,

अभिजीतचा फोन झाला,.." चला निघायचं का? ",

मुल अभिजीत आदेश कडे बघत होते,

" कोण आहेत हे मुल? काय काम आहे? ",.. अभिजीत.

" आम्ही आदेश दादा साठी काम करतो",..

"आता नाही तो जरा वेळाने येईल तिकडे, चल आदेश गाडीत बस",.. अभिजीत.

"मी काय म्हणतो दादा मी येतो ना एका तासात",.. आदेश आशेने अभिजीत कडे बघत होता.

अभिजीत ने रागाने बघितल, आदेश कार मधे बसला.

"दुपारी येणार का जेवायला की डबा पाठवू ऑफिसमध्ये",.. आशा ताई.

"मी सांगतो ना आई बारा वाजे पर्यंत",... अभिजीत.

आजी अजूनही आदेश जवळ जाऊन बोलत होत्या,

" आजी बाजूला सरक, आदेश काही लढायला सीमेवर चालला नाही, ऑफिसला चालला आहे तो, येईल संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत घरी, अति लाडावून ठेवल आहे त्याला ",.. अभिजीतने आजीला मीठी मारली,

" लवकर ये रे तू पण ",.. आजी.

हो आजी

सगळे हसत होते,

"बाबा कुठे आहेत ",.. अभिजीत.

" ऑफिसला गेले आहेत सकाळी सकाळी",.. आशा ताई.

आजी आई आत मध्ये गेल्या,

"कोणता प्रोजेक्ट हँडल करणार आहे तू मग आदेश",.. कार मधे अभिजीतने विचारल.

"तू म्हणशील ते दादा",.. आदेश.

" एवढ्या बारीक आवाजात का बोलतो आहेस? , काही प्रॉब्लेम आहे का? ",.. अभिजीत.

काही नाही..

" एकदा एखादा प्रोजेक्ट हातात घेतले तर शेवट पर्यंत करायचा, काम मधेच सोडायचं नाही, पूर्ण कामाचा पाठपुरावा करायचा",.. अभिजीत.

" चालेल दादा",.. आदेश कडे बघून वाटत होत एकदम परीक्षा सुरू आहे.

दोघे ऑफिसमध्ये आले, अभिजीत त्याच्या केबिन मध्ये निघून गेला, त्याने त्याचे सकाळचे सगळे काम केले, नंतर त्याने मॅनेजर कदम यांना आत मध्ये बोलवलं,.. आदेश कुठे आहे?

" त्यांच्या केबिनमध्ये आहेत साहेब ",.. कदम.

त्याला बोलवा, आदेश आला, अभिजीत आदेश प्रताप रावांच्या केबिनमध्ये आले,

"अरे वा आज आदेश साहेब ऑफिसला आले का",.. ते पण कौतुकाने विचारत होते,

"हो आता रोज येणार आहे आदेश ऑफिसमध्ये, तेच तुमच्या सोबत डिस्कस करायचा आहे बाबा, आदेशच्या प्रोजेक्ट बद्दल",.. अभिजीत.

"हो बोला",.. बाबा.

अभिजीत कदम साहेब आदेशला प्रोजेक्ट बद्दल सगळं सांगत होते, ते दोघ लिहून घेत होते, समजलं ना आता लागा कामाला, काही अडचण आली तर मला विचारा, दोघेजण गेले,

प्रताप राव कौतुकाने आदेश कडे बघत होते,.." हे आश्चर्य कस काय झाल अभिजीत? ",

"बाबा आदेशने ही सिरियस व्हायला हव, सगळे काम शिकायला हवे त्याने , म्हणून मी जरा सक्ती करतो आहे ",.. अभिजीत.

"बरोबर आहे तुझ ",.. प्रताप राव.

अभिजीतचा फोन वाजत होता, बाबा मी येतो, ,.. "बोल सोहम काय म्हणतोस",

"आज आमच्याकडे माझ्या आई बाबांच्या ऍनिव्हर्सरीचा कार्यक्रम आहे तर मी तुम्हा लोकांना आमंत्रण द्यायला फोन केला आहे",.. सोहम.

" खूप धन्यवाद मी सांगतो आई बाबांना, पण बहुतेक त्यांना जमणार नाही ते आज बाहेर जाणार आहेत",.. अभिजीत.

" तुला जमेल ना मग तू ये",.. सोहम.

" हो मी नक्की प्रयत्न करेन, काय म्हणताय झाली का कार्यक्रमाची तयारी? तुला कुठे काही काम असेल म्हणा, तू तर फक्त फोन हातात घेऊन ऑर्डर सोडणार",.. अभिजीत.

" तू पण तेच काम करतो ना अभिजीत, कसा सुरू आहे बिझनेस ",.. सोहम.

" व्यवस्थित सुरू आहे ",.. अभिजीत.

"तरी आमच्या कडून निधी घेतला",.. सोहम अभिजीत दोघ हसत होते, भेटू मग संध्याकाळी मला बरेच फोन करायचे आहेत

ठीक आहे...

अभिजीत आज जेवायला घरी गेला नाही, घरूनच डबा आला तो आणि आदेश जेवायला बसले,.." संध्याकाळी एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, तिकडे येणार का आदेश माझ्यासोबत? ",

जाऊ..

" दहा पंधरा मिनिटे थांबू आणि वापस येऊ",.. अभिजीत.

"कुठे आहे कार्यक्रम?",.. आदेश.

"बाजूच्या गावाला, माझा मित्र आहे ना सोहम देशमुख त्याच्या आई-वडिलांची एनिवर्सरी आहे ",.. अभिजीत.

" चालेल जाऊया आपण सोबत",.. आदेश.

🎭 Series Post

View all