तुझी साथ हवी मला... भाग 4

हो ना आई बाबा तुम्ही कुठे जात नका जावु, तुम्हाला माहिती आहे का काय आहे पुढच्या आठवड्यात, आई बाबा तुमची एनिवर्सरी आहे



तुझी साथ हवी मला... भाग 4

©️®️शिल्पा सुतार
.........

सुरभीने शशीला फोन लावला.

शशी त्याच्या जुन्या ऑफिस मध्ये बसला होता, साधा आणि छान बिझनेस होता त्याच्या वडिलांचा, त्यांची अपेक्षा होती शशीने मदत करावी, शशी भांडला खरी घरच्यांशी पण नंतर जाऊन बसला ऑफिसमध्ये, त्याला आवडत नव्हतं हे ऑफिस, एकदा काव्याशी लग्न केलं की भरपूर पैसे मिळतील त्यातून त्याने मोठी इंजीनियरिंग युनिट टाकायचे स्वप्न बघितल होत.

असे स्वप्न बघायला हवे की जे आपण स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करु शकू, स्वतः कमवायचा असं वडिलांचं म्हणणं होतं, व्यवस्थित वागायला पाहिजे, खूप छान विचार होते त्यांचे,

अशा चांगल्या माणसाच्या पदरी शशी सुरभी सारखे मुल कसे काय जन्माला आले हेच मोठं कोडं होतं.

"बोल ताई तुझ्यापर्यंत गेला का आईचा रिपोर्ट",.. शशी.

"मी काय ऐकते आहे शशी तू घरातही भांडण करतो आहे आणि सोहमचा फोन येऊन गेला का तिकडे? ",.. सुरभी.

"हो आला होता जिजाजींचा फोन, खूप ओरडत होते ते मला",.. शशी.

"कशाला तू त्या काव्याचा हात पिरगळला, आज केवढा काळा निळा झाला आहे तो हात, सोहम किती चिडला होता माझ्यावर, तू असाच वागला तर हे स्थळ कॅन्सल होईल ",.. सुरभी.

" कोणी सांगितले हे हाताचं सोहम जिजाजींना? त्या काव्याने का? ",.. शशी.

" नाही रे बाबा त्या काव्याने काही नाही सांगितलं, दिसतो ना सगळ्यांना हात, त्या मावशी मध्ये बोलल्या तरी काव्या बोलत होती काही झालं नाही, या सोहमनेच तमाशा केला, मग ती बोलली",.. सुरभी.

"कठीण आहे सगळं काय करायचं आता मग मी? रोज त्या काव्याची आरती करायची का ? तिचे पाय धुवुन पाणी पिऊ का, एवढं चांगलं ठीक आहे का? ",.. शशी.

" हे बघ शशी तू दुसरं टोक गाठतो आहेस, मधला काही उपाय नाही का तुझ्याकडे? एकदम अति चांगला नाही तर अति वाईट असंच वागणार आहेस का तू? तुला माहिती आहे ना याचे काही परिणाम होऊ शकतात, एक तर सोहम चिडलेला आहे ",.. सुरभी.

"मी तुला सांगितलं आहे ताई मी असाच आहे, जर तुम्ही लोकांनी माझं लग्न काव्याबरोबर ठरवलं नाही तर बघा",.. शशी.

"तू डोक्यातला राग जरा कमी करणार का? हे लोक असे नाही, साधे आहेत ते, तुला काव्याला प्रेमाने जिंकता येणार नाही का? हे बघ प्रेमाने निर्माण केलेली नाती जास्त दिवस टिकतात ",.. सुरभी.

" ताई पुरे झाली तुझी फिलोसॉफी, मला चालणार नाही या गोष्टी, मला नाही पुढे पुढे करता येणार त्या काव्याच्या, एकदा लग्न झालं की मी मोकळा माझं आयुष्य जगायला, मुळातच मी तिच्याशी कशाला लग्न करायला हव, तू जिजाजीं कडून पैसे घेऊन देऊन दे ना मला, म्हणजे काही टेंशन नाही, तू पण तिथली मालकीण आहे, तसा काव्याला त्रास होणार नाही, मी पण माझ्या कामाला लागेल ",.. शशी.

" तुझ्या इंजिनिअरिंग फॅक्टरी साठी करोडो रुपये लागतील, कुठून घ्यायचे मी ते ",.. सुरभी.

" नवऱ्यावर एवढाही अधिकार गाजवत नाही का तु? ",.. शशी.

" करोडो रुपये नाही घेऊ शकत मी सोहम कडून, काय सांगणार आहे की शशीला पैसे द्या ",.. सुरभी.

" काय हरकत आहे, मला ती काव्या दिसली की डोक्यात राग जातो ",.. शशी.

" मी बोलते सोहमशी, पण मला नाही वाटत ते तुला पैसे देतील ",.. सुरभी.

" मग त्यांची बहीण देतील का मला? , ठीक आहे मग असे पैसे देत नाही तर मी काव्याला त्रास देणार ",.. शशी.

" शशी तुझ्या अश्या वागण्याने तु नुकसान करून घेशील मी ठेवते फोन ",.. सुरभी.

" संध्याकाळी आई बाबा घरी येणार आहेत त्यांच्यासमोर काव्याने काही सांगायला नको, ती कॉलेज होऊन लवकर आली तर थोडं बोलता येईल तिच्याशी, धमकी देता येईल",.. सुरभी विचार करत होती.

सुरभीने आज घर सावरायला घेतलं होतं, सासू-सासर्‍यां समोर ती खूप चांगली सून होती, प्रमिला ताई आणि तिच पहिल्यापासून पटत होतं, त्यांनी तीला सोहम साठी निवडलं होतं, त्यांच्याच ग्रुपची होती ती, संपत मामा पण दोन-तीन दिवसापासून फिरकले नव्हते बंगल्यावर, तेही येतील आज बहीण आली तर लगेच संध्याकाळी, मोठा स्वयंपाक करावा लागेल,

कॉलेज मधे खुप मजा आली, काव्या खुप खुश होती, घरी जायच्या नावाने तिच्या अंगावर काटा आला, आज नक्की मला वहिनी बोलेल, सकाळी दादा चिडला होता तिच्या वर, आज मी बाबांशी बोलेल, ती निघत होती.

राहुल तिच्या वर्गातला मुलगा काव्या प्रीतीशी बोलायला आला, प्रिती दुसर्‍या मुलींशी बोलत होती, राहुल काव्या सोबत होता, किती समजूतदार छान आहे राहुल, काव्या मनात विचार करत होती, त्या दोघी घरी यायला निघाल्या,

"काव्या राहुल आता हल्ली तुझ्या मागे पुढे असतो" ,.. प्रिति

"हो का" ,.. काव्या.

"जस तुला माहिती नव्हत" ,... प्रिति.

"अग पण काही उपयोग नाही या गोष्टीचा, तुला माहिती ना घरचे कसे आहेत, सोहम दादा एकटा गोड आहे आणि मावशी, बाबांना वेळ नसतो, ते आई सांगेल तेच ऐकतात, वहिनी आईच पटत त्या मुळे काही खर नाही माझ, आणि शशी बोलला मला मी कोणा दुसर्‍या सोबत त्याला दिसली तर तो त्या मुलाला मारून टाकेल",.. काव्या.

" कठीण आहे परिस्थिती ",.. प्रिति.

" खुपच कठीण, पण मी ठरवल आहे प्रिति मी अशी हार माननार नाही, पुरून उरेन या लोकांना ",.. काव्या.

" काय ठरवल आहे तु? ",.. प्रिति

" मी बोलणार आहे बाबांशी, बघते ना सांगते तुला ",.. काव्या.

प्रीती विचार करत होती अस श्रीमंत असण्यापेक्षा आपण मिडल क्लास बरे, किती त्रास आहे काव्याला.

काव्या घरी आली, अपेक्षे प्रमाणे वहिनी समोर बसलेली होती , मावशी उभ्या होत्या, त्यांना समजल नक्की काही तरी होणार आहे,.." आता चल काव्य आवरून घे जेवण कर ",

"काव्या एक मिनिट ",.. सुरभी.

"सुरभी नको त्रास देवु तू काव्याला",.. मावशी.

"मावशी तुम्ही मधेमधे करू नका",.. सुरभी.

"वहिनी अस का बोलतेस तू मावशी सोबत, माफी माग" ,.. काव्या.

"तु जास्त करतेस काव्या मुद्दाम आज तू तुझ्या दादा समोर हात घेवून बसली होती ना? तुला काही वाटत नाही का ग अस वागतांना, मी तुझ चांगल व्हाव या साठी प्रयत्न करते, तू मला अशी वागणूक देते",.. सुरभी.

" वहिनी तुला शशी कसा वागतो ते दिसत नाही का? तो उगाच माझ्या मागे मागे करतो. कशाला तू त्या शशीला मला घ्यायला पाठवते ",.. काव्या.

" तू होकार देत नाही म्हणून तो चिडचिड करतो नाहीतर माझ्या भाऊ किती चांगला आहे, सकाळी सात वाजेपासून ऑफिसला जातो ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मेहनत करतो, तुझ्या चांगल्या गोष्टीचाच विचार करते मी, म्हणूनच तर मी शशी साठी तुझ स्थळ सुचवल, ओळखीच्या लोकांकडे तुझं लग्न झालं तर किती छान होईल, तुझ्या दादाला तुझी काळजी वाटणार नाही आणि हे बघ हाताच आई-बाबांना सांगू नको ",.. सुरभी.

" मी कोणालाच काही सांगत नाही वहिनी, त्यांना माझा हात दिसला तर मी काय करणार आहे",.. काव्या.

" ठीक आहे, सांगुन द्यायच काही तरी, काही लागल वगैरे, जर तू काही बोललीस आई बाबांना तर मी हे सगळं शशीला सांगेल, मग मला काही सांगू नकोस काय होईल पुढे ते ",.. सुरभी

" नको सांगू वहिनी काही शशीला",.. काव्या आत मध्ये जात होती , मावशी माझं जेवण वरती दे,

सुरभी मावशींकडे रागाने बघत होती, खूप मधे मधे करतात या, तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा हसू होतं, ती आत चालली गेली, ही काव्या घाबरते शशीला, ते चांगलं आहे माझ्यासाठी, पण पैशासाठी या लोकांच्या किती पुढे पुढे कराव लागणार आहे काय माहिती? , नाहीतर असं सरळ केलं असतं या काव्याला,

संध्याकाळी सुरेश राव प्रमिलाताई आले, प्रमिलाताईंचं वागणं दूटप्पी होतं, सुरेश राव समोर त्या मुलांना खूप जीव लावायच्या, त्यांचा सगळा जीव मुलांच्या पैशात होता, काव्या पळत येऊन दोघांना भेटली, सुरभी आली, सगळे खूप आनंदी होते,

"आई-बाबा तुम्ही नव्हते तर करमत नव्हतं, हे असं जात नका जाऊ",.. काव्या.

"हो आई बाबा",.. सुरभी पण बोलली.

तिकडुन काय काय आणलं हे प्रमिलाताई दाखवत होत्या, काव्या त्यांच्या जवळ बसलेली होती, सुरेश राव समाधानाने बघत होते, काव्य सुरभी साठी ड्रेस आणले होते, सगळे छान बोलत होते, मावशी येऊन बसल्या पुढे,

" हाताला काय झालं ग तुझ्या काव्या? ",.. सुरेश राव.

सुरभी घाबरली,

" काही नाही बाबा, थोडं लागला आहे दरवाजा",.. काव्याने सांगितलं.

सुरभीला हुश्य वाटलं, तिला वाटलं आता जर ही शशी बद्दल बोलली तर काही खरं नाही, चहापाणी झालं,

"मी अभ्यास करते परीक्षा जवळ आली आहे",.. काव्या रूममध्ये गेली, सुरेशराव प्रमिलाताई सुद्धा आराम करत होते, सोहम अजून ऑफिस मधून आलेला नव्हता, सुरभी किचन कडे वळाली स्वयंपाकाचा सांगायला,

रात्री सगळे जेवणाचे टेबलवर हजर होते, सोहम खुश होता, तो सुरेश रावंशी बोलत होता, सुरभी टेबल जवळ उभ राहून वाढणाऱ्या ताईंना मदत करत होती, मावशी प्रमिला ताई सगळेच बसले होते, काव्या आली,.. "आज छान वाटत आहे ना दादा घरात आई-बाबा आले तर",

"हो ना आई बाबा तुम्ही कुठे जात नका जावु, तुम्हाला माहिती आहे का काय आहे पुढच्या आठवड्यात, आई बाबा तुमची एनिवर्सरी आहे, आपण छान सेलिब्रेट करूया, काय करूया यावेळी स्पेशल",.. सोहम.

"नाही काही गरज नाही त्याची" ,.. प्रमिलाताई सुरेशराव दोघ म्हटले, तुम्ही मुलं आमच्या सोबत आहे तेच मोठं सेलिब्रेशन आहे,

" नाही आपण सगळे जाणार आहोत आपल्या फार्म हाऊस वर तिथेच पार्टी असेल, मस्त राहू ",.. सोहम.

"माझी परीक्षा कधी संपते ते बघते एक मिनिट" ,.. काव्या टाईम टेबल बघत होती,.. "हो संपते आहे आदल्या दिवशी परीक्षा, जाऊ वीकेंडला तिकडेच राहू ",..

छान जेवण झालं, बराच वेळ काव्या सुरेश रावांसोबत बसलेली होती, सोहमही तिथेच होता, प्रमिलाताई सोहमच्या डोक्याला तेल लावून देत होत्या, मावशी बसलेल्या होत्या, सुरभी फोनवर बोलत होती, प्रमिलाताई लग्नातल्या गमती जमती सांगत होत्या,

" चला मुलांनो आता जाऊन झोपा",.. प्रमिला ताई.

काव्या रूम मध्ये आली, तिने जरा वेळ अभ्यास केला, कॉलेज ग्रुप वर मेसेज आलेले होते, उद्या काय सबमिशन आहे ते समजलं,

राहुलचा मेसेज आलेला होता,.. "मला तुझी वही घेऊन येतेस का उद्यासाठी, मी लगेच कम्प्लीट करून देईल",

"हो घेऊन येईन",.. काव्या.

सकाळी नाश्त्याच्याच वेळी संपत मामा आले, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोहित होता, मोहित जरा डोक्याने कमी होता, तो सदोदित संपत मामा जिकडे जातील तिकडे यायचा, त्याच्या भविष्याची खूप चिंता होती मामांना, त्याचा औषध पाण्याचा खर्च वगैरे सगळं प्रमिला ताईच करत होत्या,

सुरेशराव आणि सोहम नाश्त्याला आले,.. "मामा कधी आला तू? आई बाबा नव्हते तेव्हा इकडे फिरकला नाहीस तू?",

"अरे तुम्ही मुल घरी होते, म्हटलं का डिस्टर्ब करा कपलला, म्हणुन आलो नाही, काव्या कुठे आहे? , ",.. मामा.

काव्या आली, नाश्ता झाला,

"काव्या इकडे ये हा रघु, तुझ्या सोबत राहील हा, बॉडी गार्ड आहे हा तुझा, त्याला सांगुन कुठे ही जात जा, तसा तो असेल सोबत ",.. सोहम.

" हो दादा",.. काव्या.

रघु खूप उंच आणि डॅशिंग होता दिसायला, जास्त बोलत नव्हता तो, एकदम अलर्ट होता,

सोहम सुरेश राव ऑफिसला निघून गेले, मावशी त्यांच्या रूम मध्ये होत्या,

घरात प्रमिला ताई, सुरभी, संपत मामा यांची मीटिंग सुरू होती,

"कुठपर्यंत आल आहे काम सुरभी?",.. प्रमिला ताई.

"कसलं काय तो शशी ऐकत नाही, काव्या ऐकत नाही आणि सोहमही ऐकत नाही",.. सुरभी

"काय झालं?",.. प्रमिला ताई,

"नुसत भांडण झाल तुम्ही नव्हत्या तर",. सुरभी.

"त्या काव्याच्या हाताला काय झालं?",.. प्रमिला ताई.

"शशीने पिरगळला तिचा हात, ही काहीतरी बोलली वाटत त्याला ",.. सुरभी.

" काय सुरू आहे हे? जरा शांततेत घेता येत नाही का तुम्हाला?",.. प्रमिला ताई.

"आणि आता हा बॉडी गार्ड का आहे काव्या साठी? ",.. मामा.

"सोहमने ठेवला तो",.. सुरभी.

" असू दे, शशीला समज दे सुरभी, अश्याने हे स्थळ कॅन्सल होईल, मी काही करू शकत नाही, मी माझ्या दुसर्‍या भावाकडे काव्या बाबतीत बोलेल मग ",.. प्रमिला ताई.

प्रमिला ताई संपत मामाला काही तरी सांगत होत्या,

" आई एक चान्स द्या, तुम्ही बाबांजवळ शशी आणि काव्याच्या लग्नाचा विषय काढा ना",.. सुरभी.

" काढला होता त्यांना ते स्थळ आधी पासून पसंत नाही, जोपर्यंत शशी काव्याच्या मनात त्याची जागा निर्माण करत नाही तोपर्यंत हे शक्य नाही, तू शशीला इकडे बोलून घे बरं",.. प्रमिला ताई.

"हो करते त्याला फोन",.. सुरभीने फोन हातात घेतला.

🎭 Series Post

View all