तुझी चप्पल कुठे आहे

सासु सुनेचे चप्पलपुराण.
सासु सुना मंदिरात गेलेल्या होत्या. सुन म्हणजे सासुने त्यांच्या भावाची केलेली मुलगी होती. दोघींच चांगलच मेतकुट जमलेल होत. पण कधी कधी भांडे वाजतातच ना. पण दोघीही तेवढ्यापुरती करुन सोडुन देत होत्या.

पण आदल्या रात्री त्यांच जरा जास्तच वाजलेल होत. दोघींनी स्वतःच आवरल आणि निघाल्या होत्या. दोघींमध्ये एकाच खानदानाच रक्त, मग मागे तरी कोण हटणार? पहीले कोण बोलणार यावरुन दोघीही गप्पच.

देवदर्शन झाल. दोघीही मंदिराच्या बाहेर आल्या. संध्याकाळ होत आलेली होती. दोघीही बराच वेळ मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी काहीतरी शोधत होत्या. शेवटी वैतागुन दोघी ऐकमेकींजवळ आल्या आणि एकदमच बोलल्या.

"कुठे चप्पल काढली होतीस तु?"

"मी?" सुन "माझी तर माझ्या पायात आहे. मी तर तुझी शोधत होती. तु कुठे ठेवली होतीस?"

"माझी पण माझ्याच पायात आहे. मी तर तुझीच शोधत होती." सासु

दोघींनी साडी नेसलेली असल्याने दोघींनाही ऐकमेकींच्या पायातील चप्पल काही दिसलीच नव्हती. फक्त ती शोधत आहे म्हणुन ही पण शोधत होती.

दोघींनी ऐकमेकींकडे पाहीले आणि स्वतःच्या वेडेपणावर दोघीही एकत्रच हसायला लागल्या होत्या. त्या हसण्यात दोघींचा अबोला कुठेतरी जाऊन लपला होता.

हे नात असच असत ना, तुझ माझ जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.