तुझ्यावेळी नक्की येईन

गोष्ट भावनाशून्य मुलाची

"अहो, काय होतंय तुम्हाला?" वैशाली काकू घाबरून ओरडत होत्या. तोपर्यंत शेजार -पाजारची माणसं गोळा झाली आणि केशवरावांची रवानगी ताबडतोब दवाखान्यात करण्यात आली.
डॉक्टरांनी त्यांना तपासलं. पण अगदी काही मिनिटांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सगळं संपलं होतं.

"आय एम सॉरी. पेशंटना आणायला तुम्ही खूप उशीर केलात." इतकं बोलून डॉक्टर पुढच्या प्रोसिजरसाठी आपल्या केबिनमध्ये निघून गेले.

हे ऐकून काकूंना जबरदस्त धक्का बसला. आत्ता काही मिनिटांपूर्वी हसून खेळून असणारा माणूस असा अचानक 'कसा 'जाऊ शकतो? त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. त्यांच्यासोबत गेलेल्या शेजारच्या बायकांनी कशीबशी समजूत घालून त्यांना घरी आणलं. त्यांच्या लेकीला कळवलं.
कृष्णा, त्यांची लेक धावत -पळत घरी आली. तिने आईला जवळ घेतलं. आपले वडील गेल्याचं दुःख होतंच, मात्र याक्षणी आईला सांभाळणं तितकंच गरजेचं होतं.

काही वेळाने अॅब्युलंसने केशवरावांचा निर्जीव देह घरी आणण्यात आला. त्यांना पाहताच काकूंनी पुन्हा एकदा हंबरडा फोडला. गेल्या तीस वर्षांचा सहवास असलेला जोडीदाराचं अचानक आपल्या आयुष्यातून निघून जाणं, ही कल्पना त्यांना सहन होणारी नव्हती.

कृष्णा, आजूबाजूच्या बायका काकूंना सांभाळू लागल्या, धीर देऊ लागल्या.

लोकं येत होती. हळहळ व्यक्त करून जात होती.
गर्दीत कोणीतरी म्हणाले, "केशवरावांच्या मुलाला कळवलं का? एकुलता एक मुलगा आहे तो त्यांचा. त्याला यायला खूप वेळ लागेल. पटकन कळवून टाका."
हे ऐकून काकूंना धीर आला. त्यांनी आपला फोन घेऊन लाडक्या लेकाला फोन लावला.
"बाळा, तुझे बाबा गेले रे..." काकूंना हुंदका आवरेना.

हे ऐकून राजला धक्का बसणं साहजिकच होतं.
"कसं काय?"
तो रडत होता. हे त्याच्या आवाजावरून जाणवत होतं.

"अचानक झालं रे सगळं. तू निघ लवकर." काकू कशाबशा म्हणाल्या.

"आई..मागच्याच आठवड्यात येऊन गेलो मी. आता लगेच यायला कसं जमेल? आता सुट्टी नाही. शिवाय हे परदेश आहे. लगेच भारतात येणं तितकंसं सोपं नाही." राज शांतपणे म्हणाला.

"अरे, काय बोलतोस हे? तुझे वडील आहेत ते. तू एकुलता एक मुलगा ना त्यांचा? याची काही जाणीव..?" काकूंना पुढे बोलवेना.

"आई, खरं आहे हे. पण आत्ता लगेच इथून निघणं शक्य नाही. तुम्ही पुढचे विधी उरकून घ्या. मी ताईला सांगतो हवं तर."

"तुला काही लाज? माझ्या डोळ्यासमोर असतास तर हात उगारला कमी केला नसता मी." काकू तोंडावर पदर धरून रडू लागल्या.

"आई, प्लीज ऐक माझं. आता शक्य नाही. पण तुझ्यावेळी मात्र मी नक्की येईन. शेवटी आई आहेस तू.पण तू काळजी करू नकोस. थोडं समजून घे."

हे ऐकून काकूंनी अक्षरशः फोन फेकून दिला. पती जाण्याचं दुःख होतंच. पण मुलगा 'असा 'निघावा याच दुःख याक्षणी त्यांना तितकंच मोठं वाटलं.

"हा दिवस बघण्यासाठी सगळा अट्टाहास केला होता? अहो, उठा. तुमच्या मुलाच्या परवानगी शिवाय तुम्हाला मरण्याचा देखील अधिकार नाही. तो येणार नाही म्हणतोय आणि माझ्यावेळी सुट्टी काढून नक्की यायचं वचन देतोय. परदेशात जाऊन आपल्या जन्मदात्या आई - वडिलांना विसरणारा मुलगा आपल्याच पोटी जन्माला का यावा?" काकू केशवरावांच्या जवळ बसल्या.

"तीस वर्ष बाप होण्याचं कर्तव्य निभावलं. पण तुमचा लेक आपलं कर्तव्य सोईस्कररित्या विसरला. परदेशात जाऊन तिथल्या रीती शिकला. आज तुम्ही असता तर? त्याचं बोलणं ऐकून नाव टाकलं असतं. आता मीही तेच करणार. तुमच्यासोबत तोही गेला असंच समजेन.." काकू केशवरावांचा हात हातात घेऊन रडत राहिल्या. हे पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचे डोळे पाणावले.

कृष्णाने आपल्या भावाला फोन लावला.
"दादा, काहीतरी मार्ग काढून तू एकटा तरी निघून ये. बाबांच्या मागे आता तूच तर सगळं पाहायला हवंस. तू या घराचा आधार व्हायला हवंस. तू नसशील तर आम्ही कोणाकडे पाहायचं?"

राजने मात्र नकार दिला.
"यायला जमणार नाही." असंच म्हणत राहिला तो.

आपला लेक इतका भावनाशून्य कसा झाला? हेच काकूंना कळेना. कष्टात दिवस काढून मुलांची शिक्षण पूर्ण केली. कर्ज काढून परदेशी पाठवलं आणि मुलाने याचे चांगले पांग फेडले.
आपण मुलांवर संस्कार करायला कमी पडलो की मुलं आपल्याला समजून घेण्यास कमी पडली? ' काकूंच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
पती वियोगाचं दुःख आणि मुलाच्या भावनाशून्य वागण्याचा राग, क्रोध अशा भावना त्यांच्या मनात उफाळून आल्या होत्या.

काही वेळाने कृष्णा पुढे आली. "आई, मी करेन सगळं. तू नको काळजी करू."
केशवरावांचे धाकटे भाऊ कृष्णेच्या पाठीशी उभे राहिले.
"वहिनी, अशा वेळी आपण आपल्या माणसांना समजून घ्यायचा असतं. आम्ही आहोत. तुम्ही काळजी करू नका."

"कोणाला समजून घ्यायचं? म्हातारपणी मुलगा आपला आधार होईल म्हणून यांनी ज्याचे लाड केले त्याला समजून घ्यायचं? सख्खा बाप गेल्यावर पोराने पाठ फिरवावी, यासारखं दुसरं दुर्दैव ते काय?" काकूंच्या डोळ्यांतले अश्रू अटले होते.

इतक्यात त्यांच्या सुनेचा फोन आला. "आई, मी येतेय. पण यायला दुसरा दिवस उजाडेल."
ज्या सुनेचा रागराग केला, तिचाच आधार वाटला त्यांना.
'तुमच्याऐवजी मी निघून गेले असते तर पोटच्या पोराचे हे उत्तर ऐकून तुम्हाला फार फार वाईट वाटले असते. हे सहन झालं नसतं तुम्हाला.' काकू कितीतरी वेळ रडत राहिल्या.

बऱ्याच वेळाने पुढचे विधी उरकले. खटपट करून आलेली सून दुसऱ्या दिवशी हजर झाली. तिच्या येण्याने काकूंना आधार वाटला खरा. पण मुलाच्या भावनाशून्य वागण्याचे दुःख पती वियोगाच्या दुःखा इतकेच मोठे होते.


समाप्त.
©️®️सायली जोशी.