तुझेच मी गीत गात आहे..

कथा एका जोडप्याची
तुझेच मी गीत गात आहे..


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे.. अजूनही वाटते मला कि अजूनही चांदरात आहे.. कारवांवर लता गात होती.. खिडकीत बसून बाहेरचा पाऊस पाहणारी निधी कधीची तिथे बसून होती.. परत परत ती ते एकच गाणे ऐकत होती.. तिला अजून एक मग कॉफी हवी होती.. पण लताचा तो स्वर आणि समोरचा पाऊस सोडून उठायची तिची इच्छाच होत नव्हती.. रविवार होता.. त्यामुळे रोज कामाला येणाऱ्या मावशीही येणार नव्हत्या.. कोणीच तिला डिस्टर्ब करणारे नव्हते.. अशीच ती किती वेळ बसून होती तिला कळतच नव्हते.. तोच झंझावातासारखा तो दरवाजा उघडून आत आला..
" मूर्ख कुठची.. फोन नाही का उचलता येत? " तिने घाबरून फोनकडे पाहिले.. आज सकाळी उशीरा उठायचे असे तिने ठरवले होते. म्हणून रात्री झोपतानाच तिने फोन सायलेंटवर ठेवला होता.. आणि सकाळपासून फोन हातात घेतलाच नव्हता.. फोन बघितला तर त्यावर पन्नास एक मिस्ड कॉल्स.. आई, बाबा , दादा आणि त्याचेही.. तिने आईला फोन लावला.. तोवर त्याने कारवां बंद केला होता..
" हो आई.. मी बरी आहे.. अग फोन सायलेंटवर ठेवून मी गाणी ऐकत होते.."
" हो आहे मी वेंधळी.. झाले समाधान? ठेवू फोन?"
" मी विसरलेच होते.. थँक यू.." बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आले..
" हो आहे इथेच.. देते.." तिने त्याला खुणावले.. त्याने फोन हातात घेतला.
" हो आई.. काळजी नका करु.. मी आहे इथेच.. बरोबर करतो सगळे.." तो तिच्याकडे बघत बोलला..
" जा आवरून घे.. " तो फोन ठेवत बोलला.. त्याची नजर अजूनही तिच्यावरून हटली नव्हती.. त्या आक्रमक नजरेने ती शहारली.. तिला पटकन आठवले.. ती दोघे हनिमूनवरून परत आले होते. घरात दोघेच होते.. ती पोळ्या करत होती..
धुतलेले केस तिने असेच बांधले होते.. ते सतत तिच्या चेहर्‍यावर येत होते.. तो किती वेळ तिला निरखत होता त्यालाच माहित.. वैतागून ती हात धुवायला जाणार तोच तो पुढे आला.. एका हाताने त्याने तिचे केस बांधले.. दुसर्‍या हाताने तिचे लाटणे धरले.. कशाबशा तिने उरलेल्या पोळ्या केल्या.. पोळ्या होईपर्यंत त्याने तिचा हात सोडला नाही.. पोळ्या होताच त्याने तसेच तिला उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेला.. ती स्वतःशीच हसली.. तिने समोर पाहिले. तोही किंचित हसला..
" तुला हि तेच आठवले?"
निधीने लगबगीने नजर चोरली.. पण ती तिथून हलली नाही.. ते पाहून तो पुढे आला.. " आता जातेस बाथरूममध्ये कि तुला उचलून नेऊ?"
" निशिकांत प्लीज.." खूप दिवसांनी तिच्या तोंडून आपले नाव ऐकून तो हि थबकला.. तिला निधी हे नाव आवडले नव्हते.. लग्नात त्याने तिला न विचारताच नाव बदलले होते.. खूप राग आला होता तिला.. पण त्याने अंगठीने नाव लिहिले आणि गोड हसून म्हणाला निधीचा निशिकांत.. सगळा रुसवा त्या हसण्यासोबत निघून गेला होता.. कितीतरी दिवस सगळ्यांनी तिला त्यावरून चिडवून हैराण केले होता.. स्वतःशीच बोलायची निधीचा निशिकांत... पण आता त्याचे नाव कोणी घेतलेलेही तिला आवडत नव्हते.. तिने त्याच्याकडे पाहिले.. तो
वळून खिडकीत गेला होता.. त्याच्याकडे बघताना तिच्या लक्षात आले कि तो भिजला आहे.. ती आत गेली.. त्याचे कपाट उघडले.. तिथे ठेवलेल्या त्याच्या कपड्यांचा गंध श्वासात भरून घेतला.
" हे घे कपडे.. तुझे ओले झाले आहेत. बदलून घे.. हे धुवून इस्त्री करून ठेवते. नंतर घेऊन जा.."
" नंतर नेलेच पाहिजेत का?" त्याची नजर आर्त झाली होती..
ती चिडली.. हि आर्तता हि व्याकुळता सगळे तेव्हा कुठे होती? ती किती रडली होती तेव्हा.. पण तेव्हा या दगडाला पाझर फुटला नव्हता.. आणि आता..
लग्नाच्या आधीपासूनच निधी कामाला जात होती.. निशिकांतची सतत तिच्यापाठी भुणभुण असायची..
" पण मी म्हणतो काय गरज आहे तुला कामाला जायची? मला आहे ना एवढा पगार. रहा ना आरामात.."
" अरे पण मला आवडते काम करायला.. बुद्धीला चालना मिळते.. नवीन मित्रमैत्रिणी असतात.. जरा वेगळे वातावरण असते.."
" मित्रमैत्रिणींसाठी कामाला जायचे असते का?" तेव्हा त्याच्या आवाजातला संशय तिला जाणवत नव्हता.. पण नंतर हे प्रमाण खूप वाढले.. तिला जरा उशीर झालेला त्याला चालत नसे.. ती दमलेली दिसली कि त्याची चिडचिड व्हायची.
" मला थोडा चहा देतोस?" असेच एकदा ऑफिसमधून आल्यावर तिने विचारले.. बर्‍याचदा तो चहा करून ठेवायचा.. त्याचा मूड असेल तर स्वयंपाकही करायचा..
" का? तुला काय झाले?" त्याने तुसड्यासारखे विचारले..
" थोडे डोके दुखते आहे.. आज दोन तीन प्रेझेंटेशन होते.."
" एवढे जमत नाहीतर काम करायचे कशाला? सांगत होतो नोकरी सोड.. घरी बस आरामात. स्वतःला वेळ दे, घराला वेळ दे.. पण नाही.."
त्याची कटकट ऐकण्यापेक्षा उठून चहा करून घेणे तिला सोपे वाटले.. ती आत गेली.. तिथे चहा करून ठेवलेला होता.. तिला खूप रागही आला आणि त्याची दयाही आली..
" चहा केला होतास तर कटकट का केलीस?" ती त्याला बिलगत म्हणाली.
"तू काम सोडावेस म्हणून.."
" पण तुला काय अडचण आहे?"
" मला माझी बायकोने त्रास करून घेतलेला आवडत नाही.."
" हो का? आणि तू कामाला जातोस तेव्हा?"
" माझे कामच आहे ते.. तुला काही कमी पडू न द्यायचे.."
" असा कसा रे तुझा पुरूषी अहंकार? जीव गुदमरेल माझा?"
" नाही.. मी नाही मरू देणार तुला.." तो तिच्या जवळ येत म्हणाला..
" हो मरूही देणार नाहीस आणि जगूही.. चल मी जाते.. चहा जरी तू केला असशील तरी स्वयंपाक मलाच करायचा आहे.."
" मी खाली पोळीभाजी केंद्रात सात वाजता फोन केला होता. त्यांचे पदार्थ आले कि फोन करून कळवणार आहेत ते.." तो टीव्हीकडे बघत बोलला.. काय बोलावे ते तिला सुचेचना.. एकावेळेस अतोनात प्रेम आणि त्याचवेळेस तिच्या काम करण्यावर राग कसा करू शकतो हा? ती तशीच त्याला बिलगली..
" का वागतोस असा?"
" असाच आहे मी.." तो तिला अजून जवळ घेत म्हणाला..
दिवस जात होते.. त्याची चिडचिड कधी व्हायची कधी नाही.. पण त्या दिवशी अती झाले.. ती तिच्या बॉसच्या गाडीतून आली हे त्याला आवडले नव्हते.. ती गाडीतून उतरताना त्याने पाहिले आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली..
" हि थेर करायला तुला ऑफिसला जायचे होते?"
" अरे पण ऐकून तर घे.."
" काय ऐकू? तुला गरज काय होती त्याच्यासोबत यायची.. मला फोन करायचा होतास.. मी आलो असतो."
" हो पण उशीर झाला होता म्हणून ते आले सोडायला.."
" तुला एकटीलाच उशीर झाला का?" तो कुत्सितपणे बोलला..
" तू माझ्या चारित्र्यावर बोलतो आहेस."
" हो बोलणार.. मला माझी बायको कोणासोबत ही वाटून घ्यायची नाही.."
" तू काय बोलतो आहेस ते समजते आहे का?"
" हो.."
" असे असेल तर मग मला नाही राहायचे तुझ्यासोबत.. एवढाही विश्वास नाही माझ्यावर?"
"असेल ना कोणीतरी.. म्हणून रहायचे नसेल तुला माझ्यासोबत.."
तो ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हता.. तिने आत बॅग भरायला गेली ते बघून तो अजूनच चिडला..
" तू कशाला जातेस? मीच जातो.. म्हणजे तुझा रस्ता मोकळा.." ती काही न बोलता फक्त रडत होती.. खरेच बॅग भरून तो निघून गेला.. कुठे जातो हे न सांगता.. भानावर आल्यावर तिने तिच्या भावाला फोन करून काय घडले ते सांगितले.. त्याने उद्या येतो म्हणून तिची समजूत काढली.. ती रात्रभर जागी होती.. बाहेर वळवाचा पाऊस पडत होता, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू होता.. आणि एखाद्या भेदरलेल्या पक्षिणीसारखी ती एका कोपर्‍यात बसून होती.. दुसर्‍या दिवशी दादाने तिची समजूत काढली.. त्याला फोन लावायचा प्रयत्न केला.. पण फोन बंद होता.. दादा तिला घरी चलायला सांगत होता.. पण हिनेच हट्टाने नकार दिला.. इथेच राहिली होती ती तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगत.. आज दोन महिन्यांनी तो समोर आला होता. इतके दिवस न फोन ना मॅसेज.. बायको जिवंत आहे का हे ही नाही विचारले कधी.. आणि आज अचानक असा माझ्यावर रूबाब दाखवतो आहे..

" मी काय विचारले, कपडे नंतर नेलेच पाहिजेत का?"
निधी भानावर आली..
" ते मी काय सांगू? सगळे निर्णय तूच तर घेतोस?"
" मला माफ करशील?"
" मी अजूनही कामाला जाते.. आणि आता तर माझा बॉस मला रोज घरी सोडायला येतो.."
" माझा मूर्खपणा झाला निधी.. प्लीज मला माफ कर.." तो तिचा हात हातात धरून म्हणाला..
" गेल्या दोन महिन्यांत हे नाही कळले? आणि आज साक्षात्कार झाला?"
" हे गेलो तेव्हाच कळले होते.. मला तुझी समोरासमोर बसून माफी मागायची होती.. पण मी इथे नव्हतोच."
" मग कुठे होतास?"
" मला त्या दिवशी अर्जंट बाहेरगावी जायला लागणार होते.. म्हणून मी ऑफिसमधून लवकर आलो होतो.. तुझी वाट बघत होतो.. तुला उशीर झाला म्हणून फोन लावत होतो.. तुझा फोन लागत नव्हता.. तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला.. तिथे कोणी फोन उचलत नव्हते.. एका बाजूला माझी फ्लाईटची वेळ होत होती.. रागारागात तुला न सांगताच निघालो.. तिथे गेल्यावर डोके शांत झाल्यावर दादाला फोन लावला. त्याच्याशी बोललो.. आणि आज परतलो आहे.. तोच दादाचा फोन, तू फोन उचलत नाहीस म्हणून.. त्याला वाटले आपले परत भांडण झाले आहे कि काय?"
" तुझी बॅग मग?"
"ती हॉटेलमध्ये ठेवली आहे.. तू घरात घेशील का याची खात्री नव्हती म्हणून." तो डोके खाजवत म्हणाला..
"दोन महिन्यात साधा एक फोन करावासा वाटला नाही?" ती विषादाने म्हणाली..
" खूप वाटत होते.. पण फोनवरून बोलताना काही कमी जास्त बोलले गेले असते तर अजून भांडणे झाली असती म्हणून नाही केला.. तसेही दादाकडून सगळे कळत होतेच.." ती सुन्नपणे बसली होती..
" तुला हवे तेव्हा तू जाणार, हवे तेव्हा येणार.. माझ्या मनाचे काय?"
" हि पहिली आणि शेवटची चूक म्हणून माफ कर ना.. तुझ्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट समजून.."
" लक्षात आहे का?"
" त्याच्यासाठीच तर आलो आहे.. प्लीज माफ कर ग.." तो आर्जवाने बोलत होता.. तिने त्याच्याकडे नीट पाहिले.. डोळ्याभोवती काळी वर्तुळे.. सुकलेला चेहरा.. हडकलेला तो.. आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखं झाले तिच्या..
" केले माफ.." तिच्या तोंडून निघून गेले..
" खरेच??" त्याचा विश्वास बसत नव्हता.. तिने मान हलवली.. तो आनंदाने उठला.. तिच्याजवळ आला.. तिला मिठीत घेतले.. तोच त्याला काहीतरी जाणवले.
" निधी??" त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते..
" हेच ते कारण ज्यामुळे त्यादिवशी उशीर झाला.. त्या दिवशी मिटींगच्या नादात दिवसभर काहीच खाल्ले नाही. त्यामुळे निघताना चक्कर आली.. बॉसने आणि मीताने गाडीतून डॉक्टरकडे नेले.. त्यांनी प्रेग्नन्सी कन्फर्म केली.. तेच तुला सांगायचे होते त्यादिवशी.. पण तू ऐकायलाच तयार नव्हतास.." तिच्या डोळ्यात परत पाणी आले..
" मी खूप मोठा गुन्हेगार आहे तुझा.. मी हे सगळे छान क्षण माझ्या मूर्खपणामुळे घालवले.. पण आता परत नाही.. आणि हे दादाने मला का नाही सांगितले?"
"मीच त्याला शपथ घातली होती कि जर चुकून तू त्याला फोन केलास तरी तुला हे सांगायचे नाही म्हणून.."
" माझ्या आक्रस्ताळेपणाची किती ही मोठी शिक्षा मिळाली आहे मला.. चल त्याचे परिमार्जन करून घेतो.."
" ते कसे?"
" तू आवरून घे.. मग निघाल्यावर सांगतो.. मी चुकत नसेन तर उद्या आणि परवा तुला सुट्टी आहे.. चालत असेल तर बाहेर जाऊया?"
" एवढ्या पावसात आणि अशा अवस्थेत?"
" विश्वास ठेव माझ्यावर तुला आणि बाळाला काहीच होऊ देणार नाही.. जाऊया?"
तिने परत त्याच्या हातात हात दिला.. आणि दोघेही निघाले त्या पावसात चिंब भिजून आयुष्य नव्याने सुरू करायला..


कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई