तुझे नि माझे जमेना भाग २३

प्रथम आणि गौरीच्या फुलणार्या प्रेमाची


तुझे नि माझे जमेना भाग २३



मागील भागात आपण पाहिले की गौरी सध्यातरी प्रथमला सोडून न जाण्याचा निर्णय घेते. ती त्याला घेऊन माहेरी न जाता दुसरीकडे घेऊन जाते. कुठे ते पाहू.


" प्रथम उठतोस का?" गौरीने झोपलेल्या प्रथमला उठवले.
" इथे? तुला हा पत्ता कोणी सांगितला?"
" चिल.. थोडा शांत हो. काल मी हे सगळे नेटवरून शोधले. स्थानिक वर्तमानपत्रात सुद्धा ती बातमी आली होती. त्यावरून माझी खात्री पटली की झाला तो अपघातच असावा. नाहीतर ती घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला असता. आज सकाळी मी परत आपल्या घरातल्यांशी बोलले. त्यांनी मला सांगितले की तू त्या घटनेनंतर इथे पाऊलही टाकले नाहीस. सो इथे आपले मिशन सुरू होते. तुला जो अपराधीपणा आला आहे त्याला बाय करायची वेळ आली आहे आता."
प्रथम काहीच न बोलता फक्त समोरच्या वास्तूकडे बघत राहिला. त्यांचे फार्महाऊस. बाबांनी खूप उत्साहाने बांधलेले. चहुकडे लावलेली झाडे. त्यामध्ये असलेली टुमदार बंगली. कमानीवरून ओसंडून वाहणारी मधुमालती. बंगलीच्या आत लावलेली फुलझाडे. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी नटलेली ती आतली बाग. तिथून येणारा जाईजुई, निशिगंध यांचा सुवास. त्याच जाईजुईच्या मांडवाखाली असलेला झोपाळा.. पण त्या घटनेनंतर प्रथमने इकडचे कधी नावही काढले नाही. प्रथमची आई तर ही वास्तू विका म्हणूनच सांगत होती पण आजीने ठामपणे नकार दिला होता. त्यानंतर आजी, आजोबा, सुचेता, बाबा आत्या आली की अध्येमध्ये यायचे इथे. आधी सविताही यायला तयार नसायची. नंतर मग प्रथमच हट्ट करून तिला पाठवायला लागला. पण तो स्वतः मात्र आज इतक्या वर्षांनी आला होता. त्याच्या आजपर्यंतच्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे क्षण त्याने इथे घालवले होते.
" चलायचे का आत?" गौरीने विचारले.
प्रथम भानावर आला.
" हो. चल ना." दोघे आत जायला निघाले तोच एक जोडपे बाहेर आले.
" अरे प्रथम बाबा, थांब जरा.." त्या बाईने आवाज दिला. ती हातातले सामान सांभाळत आली.
" इतक्या दिवसांनी आलास. थेट घरात नको येऊस." तिने हातातल्या भाकरीने दोघांची अलाबला काढली. दोघांच्या पायावर पाणी ओतले.
" पुढे जा. पण घरात नका जाऊ. दरवाजातच उभे रहा." तिने प्रेमाने दरडावले.
" हो काकी." प्रथम म्हणाला.
" तुम्ही जा पुढे. मी तुमचे सामान घेऊन येतो."
"काका, अहो आम्ही नेतो ना."
" नको. आज कितीतरी वर्षानंतर तुम्ही इथे आला आहात तेही नव्या नवरीला घेऊन. तुम्ही जा आत.. नाहीतर मालन ओरडेल मला." प्रथम आणि गौरी आतल्या दरवाजात उभे राहिले. त्या काकूंनी गौरीचे औक्षण केले. तिला माप ओलांडायला लावले. आत येताच गौरीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. तिचे बघून प्रथमही वाकला. त्याला बघून काकूंच्या डोळ्यात पाणी तरळले.
" दमला असाल ना? फ्रेश होऊन या. मी पाने वाढायला घेते."
" काकू , तुम्हाला?"
" दादांनी फोन करून कळवले. तुला आवडतात तशी भरली वांगी , ठेचा केला आहे. या पटकन. गरमागरम भाकर्‍या करायला घेते." प्रथम आणि गौरी काहीच न बोलता त्यांच्या खोलीत गेले. दोघे फ्रेश होऊन येईपर्यंत काकूंनी खरेच जेवण तयार ठेवले होते. मध्ये काहीच खाणे न झाल्याने दोघेही दणकून जेवले.
" काकू, स्वयंपाक मस्त झाला आहे." गौरी बोटे चाटत म्हणाली.
" हो ना. वांगे तर अप्रतिम. खूप वर्षांनी असे खाल्ले. तुम्हाला आठवते काकू, तुम्ही एका बाजूला भाकर्‍या करायला घ्यायचात आणि एकीकडे आम्हाला जेवायला बसवायचा. किती खायचो मी आणि प्रिया.. सुचेता किती चिडायची त्यावरून.." प्रथम बोलता बोलता एकदम थांबला.
" मी भात आणते हां." असे म्हणत डोळ्यातले पाणी पुसत काकू आत गेल्या. " प्रियाची आठवण आली असेल तिला." काका अभावितपणे बोलून गेले. प्रथमकडे बघून चपापले.
" काका, ही सगळी झाडे तुम्ही लावलीत?" गौरीने विषय बदलत विचारले.
" हो. म्हणजे थोडी मी थोडी दादांनी कुठून कुठून मागवली. आवडली तुम्हाला?"
" तुम्हाला काय काका? माझे नाव गौरी आहे. गौरीच म्हणा."
" बरं गौरी. तुला आवडत असेल तर मी तुला सगळी बाग दाखवतो." काका उत्साहाने बोलले.
" आता नको काका. मी ना गाडी चालवून थोडी थकले आहे आता. जरा आराम करते आता.." गौरी खोलीत जाताच काका आणि प्रथम दोघेच उरले. काकू मगाशी ज्या आत गेल्या त्या बाहेर आल्याच नाहीत. दोघांनाही थोडे अवघडल्यासारखे झाले होते.
" कसे आहात काका?" प्रथमने विचारले.
" छान आहोत. चालू आहे दादांमुळे."
" सर्वेश कुठे आहे? दिसला नाही तो."
" अरे तो त्या तिथे दूरच्या शहरात असतो. दादांनीच नोकरी शोधून दिली."
" मग तुम्ही नाही गेलात त्याच्याकडे?"
" एकदा दोनदा गेलो. पण नाही करमले. आलो परत. तसाही जीव गुंतला आहे इथे. तू कसा आहेस? खूप वेळा वाटायचे तुझ्याशी बोलावे. धीरच व्हायचा नाही."
" काका. जाऊ दे ना तो विषय. चला मी पण निघतो. थोडा आराम करतो." प्रथम तिथून निघाला. काकांची नजर त्याचा पाठलाग करत होती म्हणून तो बाहेर न जाता खोलीत गेला. गौरी बेडवर झोपली होती. तिला डिस्टर्ब नको म्हणून तो खुर्चीत बसून गाणी ऐकायला लागला. पण लवकरच कंटाळला. तशीही गाडीत त्याची झोप झाली होती. समोर झोपलेली गौरी फार मोहक दिसत होती. त्याला स्वतःला आवरता आले नाही. तो झोपलेल्या गौरीच्या जवळ गेला. हलकेच तो तिच्या केसांचा गंध त्याच्या श्वासात भरून घेणार तोच तिने डोळे उघडले.
" मला वाटलेच तू असेच काहीतरी करणार?" ती उठत बोलली..
" तू जागी होतीस?"
" झोपत होते तोच तू दरवाजा उघडलास. मग झोपमोड झाली. ठरवले की तू काय करतोस की पाहूया?"
" मग काय दिसले?"
" मला दिसले की एक माणूस स्वतःच्याच घरात कंटाळला आहे.."
" हो. मी बोर झालो होतो. त्यात तू पण झोपलेली. काय करू ते सुचत नव्हते म्हणून.."
" म्हणून असे जवळ यायचे?"
" जवळ आलो आहे कुठे अजून?" प्रथम तिच्या अजून जवळ जात म्हणाला.
" प्रथम प्लीज.." गौरी मागे सरकत म्हणाली..
" प्लीज काय गौरी?" प्रथम पुढे सरकत होता.
"अजून पुढे येऊ नकोस." गौरीने डोळे बंद केले होते.
" जवळ आलो नसतो तर हे कसे केले असते?" प्रथम गौरीच्या हातात तिच्या केसात अडकलेली काडी देत म्हणाला.
" उघड डोळे.." गौरीने प्रथमकडे पाहिले नंतर हातातल्या काडीकडे. ती चिडून त्याला मारायला जाणार तोच त्याने तिचा हात धरला.
" भांडणे आणि मारामारी सोडून जरा प्रेमाचे काही बोलूयात?"
"हो. मला बोलायचे आहेच. तुझ्या गर्लफ्रेंडचे नाव काय आहे?" प्रथमचे तोंड उघडेच राहिले.


प्रथमची खरेच कोणी गर्लफ्रेंड होती की गौरी उगाच त्याला छळते आहे, पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all