तुझे नि माझे जमेना भाग २२

कथा गौरी आणि प्रथमची


तुझे नि माझे जमेना भाग २२



मागील भागात आपण पाहिले की लहानपणी प्रथमकडून चुकून त्याच्या बालमैत्रिणीला गोळी लागते. त्यातच तिचा मृत्यु होतो. त्याच अपराधाचे ओझे प्रथमच्या डोक्यावर होते. गौरी काय निर्णय घेईल बघू या भागात..


" मी तुला सांगितले होते, मला परत फसवू नकोस. तरिही तू फसवलेस. मी नाही राहू शकत आता तुझ्यासोबत.."
" गौरी प्लीज ऐकून घे ना.. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम करतो ग."
" ते मला काहीच माहित नाही. फसवणूक म्हणजे फसवणूक. मी चालले. परत कधीही मला भेटायचा प्रयत्न करू नकोस. मी घटस्फोटाची नोटीस पाठवून देते."
" गौरी नको ना जाऊस. थांब ना.. गौरी.."

प्रथम दचकला.. त्याला खिडकीत बसल्या बसल्याच झोप लागली होती. त्याच्या अंगावर एक शाल पांघरलेली होती. त्याने ती बाजूला केली. तोंड वगैरे धुतले. हळूच
सुचेताच्या खोलीत डोकावला. तिथे सामसूम होती. " न भेटताच गेली." तो खिन्नपणे स्वतःशीच बोलला. आता या क्षणी त्याला कडक कॉफीची गरज होती. तो खाली आला. डायनिंग टेबलवर सगळे बसले होते.
" मला कॉफी हवी आहे."
" गौरी." आजींनी हाक मारली.
" ती गेली.. बहुतेक सगळे सामान घेऊन." प्रथमचा चेहरा अजुनही पडला होता. त्याची कोणाकडेच बघायची इच्छा होत नव्हती. तो मोबाईल मध्ये डोके खुपसून बसला. अनेकजण लग्नाच्या शुभेच्छा देत होते. आता यांना काय उत्तर द्यायचे हा विचार तो करत होता..
" कॉफी.." मेहेंदी काढलेला एक हात समोर आला.
" तू?? तू गेली नाहीस?" त्याने आश्चर्याने विचारले.
" ती नाही गेली. पण तू जाणार आहेस आता तिच्यासोबत." आजोबा म्हणाले.
"बरं.." प्रथमचा आवाज अजूनही त्याच्या चेहर्‍यासारखाच पडला होता.
" मी आलो आवरून." कॉफीचा मग खाली ठेवत तो म्हणाला.
" नाश्ता तर कर.."
" मला भूक नाही." प्रथम तसाच निराश होऊन त्याच्या खोलीत गेला. तो कपाटातून कपडे काढत असताना. पाठी कोणाची तरी चाहूल लागली. आई नाश्ता घेऊन आली असेल असे वाटून तो म्हणाला.
" आई, मला नको आहे काही. तू जा इथून. मी येतोच आवरून खाली."
" मी पण नाश्ता करायचा नाही का?" गौरीचा आवाज आला.. प्रथमने चमकून वर पाहिले..
" तू का नाही करणार? खाऊन घे काहीतरी.."
" आजी सांगते नवर्‍याने खाल्ल्याशिवाय काही खाऊ नये. निदान पहिल्या दिवशी तरी.."
" म्हणजे तू?? तू मला स्वीकारले आहेस?" प्रथम आनंदाने वेडा होणार होता.
" अगदी तसेच नाही म्हणता येणार.. मी एक महिना बघणार, तू कसा वागतोस. त्यानंतर ठरवणार."
" तू हे मस्करीत बोलते आहेस की सिरियसली? माझा जीव नुसता टांगणीला लावते आहेस."
" तुझा जीव कसला टांगणीला लागतोय? तो तर माझा लागतो आहे. सकाळी आले तेव्हा छान झोपला होतास.."
" तू कधी आली होतीस?"
" त्याचे काय आहे रात्रभर मी ही झोपले नव्हते. सकाळी लवकर आवरायचे तर माझी बॅग इथे होती. ती घ्यायला आले तर तू झोपला होतास. थंडीने कुडकुडत होतास. मग माझी शाल तुझ्या अंगावर पांघरून मी गेले बाहेर. तर सांगायचे हे की माझी झोप उडवून तू शांत झोपला होतास."
" सॉरी गौरी.. मला तसे वागायचे नव्हते."
" त्या विषयावर नंतर बोलू.. आधी खाऊन घ्यायचे का? मला खूप भूक लागली आहे."
" इथेच बसायचे का?"
" नाहीतर?"
" काही नाही." दोघे नाश्ता करायला बसले. गौरीने पोह्यांची डिश प्रथमच्या हातात दिली. प्रथम ती हातात घेऊन बसला होता..
" सुरू कर ना." गौरीने सांगितले. प्रथमने नकारार्थी मान हलवली. गौरीने दरवाजात कोणी आहे का हे पाहिले. मग हळूच एक घास त्याला भरवला. \"आता हाताने खा\" असे तिने नजरेने सुचवले. पण प्रथम तसाच बसून राहिला. तिने परत चमचा उचलला. प्रथमने तिला थांबायचा इशारा केला. आणि तिला घास भरवला.
" आपल्याला निघायचे आहे. उशीर होतो आहे. आता हाताने खाऊन घे." नजर चोरत गौरी म्हणाली.. खातानाही प्रथमची गौरीवरची नजर ढळत नव्हती. गौरीने कसाबसा नाश्ता संपवला.
"तू आवर. मी खाली वाट पाहते तुझी."
" जायलाच पाहिजे?"
" हो.. गेल्याशिवाय काही प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत.."
" तू मला नवरा मानतेस का?"
" लग्न झाले आपले काल."
" नक्की?"
" हो.." गौरी निरागसपणे बोलून गेली..
" मग एक फक्त एक जादूची झप्पी मिळेल?" प्रथम गौरीचे भाव निरखत होता.
" अजिबात नाही.." गौरी लाजत होती. ती त्याच्या हातातील डिश घ्यायला पुढे वाकली. प्रथमने हात मागे घेतला. ती अजून पुढे झाली. तिचा सुगंध त्याला वेडापिसा करत होता. कसेतरी त्याने स्वतःला सावरले. त्याने डोळे मिटून घेतले.
" पटकन आवरून खाली ये.." गौरी त्याच्या कानात कुजबुजली. त्याने डोळे उघडायच्या आत खाली पळाली. गौरी घर सोडून गेली नाही तरी तिच्या मनात काय चालू आहे, हा विचार प्रथमच्या डोक्यात पिंगा घालत होता. त्याने पटापट स्वतःचे आवरले. गौरी खाली सगळ्यांशी काय बोलत होती त्यांनाच माहीत.
" प्रथम नीट जा आणि सुखरूप या." पहिल्यांदाच आजीच्या आवाजात काळजी होती.
" प्रथम, गौरीची काळजी घे." अच्युतने सांगितले.
" मजा आहे तुमची. दोघेच फिरायला जाताय. " सुचेता बोलून गेली.
" फिरायला??" प्रथमला आश्चर्य वाटले.
" सुचेता.." आईने आवाज दिला.
" गौरी.. जरा इथे ये.." सुखदाने गौरीला एका खोलीत नेले.
" मला कोणी सांगेल का इथे काय चालले आहे? मला गौरीला तिच्या माहेरी घेऊन जायचे आहे ना?" प्रथम विचारत होता.
" ते गौरीच सांगेल.." आजोबांनी विषय थांबवला.. गौरी आणि सुखदा बाहेर आल्या. गौरीचा चेहरा परत गंभीर दिसत होता. तिने आजीआजोबांना नमस्कार केला. "लवकर ये ग पोरी." आजींनी अलाबला घेतली..
" आई बाबा.." अच्युतने कारची चावी गौरीच्या हातात दिली..
" तुमच्या लग्नाचे गिफ्ट.."
"पण.."
" पण नाही आणि बीण नाही. ठेव हे. तुझे सामान गाडीत ठेवले आहे. झाले गेले विसरून लवकर परत ये." अच्युतचे डोळे पाणावले होते. गौरी काही न बोलता निघाली. प्रथम तिच्या पाठोपाठ निघाला. घरातले सगळे त्यांना निरोप द्यायला बाहेर आले. गौरीने कारचा दरवाजा उघडला. प्रथमला बाजूला बसायचा इशारा केला. प्रथम गुपचूप बसला.. सगळ्यांना बाय करून दोघे निघाले. गौरी सफाईने गाडी चालवत होती.
" तू एवढी छान गाडी चालवतेस. मला माहित नव्हते."
" तुला माझ्याबद्दल अनेक गोष्टी अजून कळायच्या आहेत.." गौरी हसत म्हणाली.
गौरी वेगळ्याच दिशेने गाडी नेते आहे हे बघून प्रथम म्हणाला..
" आपण तुझ्या घरी चाललो आहोत ना?"
" नाही. तो प्लॅन बदलला आहे. आता आपण दुसरीकडेच चाललो आहोत."
" कुठे?"
" एवढे घाबरायची गरज नाही.. मला रस्ता माहित आहे. प्रवासाचा आनंद घ्या. आपण गाणी ऐकूयात. मला खूप आवडते गाडी चालवताना गाणी ऐकायला.."
" तुमची इच्छा.." प्रथम नाटकीपणे बोलला. गौरीने गाणे लावले.
" आये हो मेरी जिंदगीमे तुम बहार बनके,
मेरे दिलमें युंही रहना तुम प्यार प्यार बनके." प्रथमने चमकून गौरीकडे पाहिले.
गाणे चालूच होते..
" मेरे साथी मेरे साजन मेरे साथ युंही रहना, बदलेगा रंग जमाना पर तुम नही बदलना.. मुझे छोडकेना जाना वादे हजार करकें.."
" गाडी थांबव गौरी.. लगेच.." प्रथम जोरात बोलला. गौरीने घाबरून गाडी बाजूला घेतली.
" काय झाले?"
" तू वचन दे मला.. तू तरी मला सोडून जाणार नाहीस.." प्रथमच्या डोळ्यात पाणी होते. "नाहीतर तू ही माझ्याशी खेळशील आणि सोडून निघून जाशील."
" शांत हो प्रथम. आपले लग्न झाले आहे. मी नाही सोडून जाणार तुला. विश्वास ठेव. मी गाणी बंद करते आधी. तू डोळे बंद कर. मी तिथे पोहोचल्यावर उठवते तुला." प्रथमने डोळे बंद केले. गौरीने गाडी सुरू केली.. तिच्या डोक्यात आता एकच विचार होता.. असे नक्की किती भूतकाळ आहेत याच्याकडे..


गौरी प्रथमला नक्की कुठे घेऊन जाते आहे.. बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all