तुझे नि माझे जमेना भाग २०

कथा गौरी आणि प्रथमची


तुझे नि माझे जमेना भाग २०


मागील भागात आपण पाहिले कि प्रथम आणि गौरीचे लग्न होऊन गौरी सासरी जाते. आता पुढे बघू काय होते ते..


" मी असेच आत सोडणार नाही हिला. वहिनी तू नाव घे आधी.." सुचेता दरवाजा अडवून उभी होती.
" हो , गौरी आता एक नवीन उखाणा होऊनच जाऊ दे, आमच्या चिऊसाठी.." सुखदा म्हणाली.. गौरीने प्रथमकडे बघितले. ते बघताच सुखदा म्हणाली,
" काळजी करू नकोस त्यालाही सांगणार आहे.." गौरीने सुरुवात केली..
"विवाह म्हणजे सुरुवात एका नव्या जीवनाची, प्रथमचे नाव घेऊन जाणीव ठेवीन कर्तव्याची.."
" एक नंबर वहिनी.. दादा आता तू.. आणि मेथीची कडू भाजी नको हं." सुचेताने दरडावले.
" बरं.. बाणात बाण मदनबाण, गौरी माझी जीव की प्राण."
"अरे व्वा.. लग्न झाल्या झाल्याच जीव की प्राण. मजा आहे बाबा एका माणसाची." गायत्रीबाई चिडवत म्हणाल्या. ते ऐकून गौरी आणि प्रथम दोघेही लाजले.. माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी गौरी आत आली. लक्ष्मीपूजन झाले.
" गौरी, आता तू सुचेताच्या खोलीत आराम कर. उद्या पूजेसाठी लवकर उठायचे आहे. दमली असशील ना.." सविता प्रेमाने बोलली.. गौरी आणि सुचेता तिच्या खोलीत गेल्या..
" मी मदत करू तुझी हे सगळे काढायला?" सुचेताने विचारले. गौरीने सुचेताच्या मदतीने सगळे दागिने, मेकअप उतरवला. तोच दरवाजा वाजला..
" सुचेता, तुझ्यासाठी कॉफी आणली आहे."
" दादा.. तू?"
" आत येऊ का?"
" ये की.." प्रथम कॉफी घेऊन आत आला.
गौरीला धक्का बसला होता.
"तू?"
"तू ओके आहेस ना?"
" हो. का?"
"तू नवीन ठिकाणी आली आहेस म्हणून विचारायला आलो. तुला वेगळे वाटत असेल ना?" प्रथम गौरीशी बोलत असताना सुचेता कंबरेवर हात ठेवून बघत होती.
" अजूनतरी असे काहीच वाटले नाही. मी कंफर्टेबल आहे."
" कॉफी घे. थोडं बरं वाटेल.."
" तू का आणलीस? मी आले असते बाहेर?"
" एक काम करा.. तुम्ही दोघे गप्पा मारत बसा. मी बाहेर जाऊन बसते." सुचेता वैतागून बोलली.
" असे कसे जाशील? मी बरा जाऊ देईन तुला. उलट तू दमली असशील म्हणून तुझ्यासाठी ही कॉफी आणली आहे, पिऊन घे." प्रथम सुचेताला मस्का मारत म्हणाला.
" बरे आलाच आहेस तर हे ही सांग, मी आता साडी नेसू की ड्रेस घालू?"
" तुला जे हवे ते घाल.. इथे कोणी काही बोलणार नाही."
" आता हिला साडी बदलायला मदत तू करणार की मी करू?" सुचेताने खोचकपणे विचारले.
" नको. मी जातो. तुम्ही या बाहेर." प्रथम तिथून निघाला.
रात्री सगळे थोडा वेळ गप्पा मारत बसले होते. गौरी पण सगळ्यांसोबत बसली होती. त्यांच्या गप्पा ऐकत होती. प्रथम मध्येच चोरून गौरीकडे बघत होता. गौरीने साधासा ड्रेस घातला होता. एकाबाजूला ती सुचेताला हेडमसाज करून देत होती. मसाज करता करता मध्येच गौरीची ओढणी सरकली. प्रथम गौरीकडे बघतच राहिला. गौरीला त्याची नजर समजली. त्याला नजरेनेच दटावत तिने ओढणी सारखी केली. प्रथम गोरामोरा झाला. पण नंतर त्याचा गप्पांमध्ये मूड लागेना. तो उठला.
" मी जातो माझ्या खोलीत.. दमलो आहे."
" तुला पण जायचे आहे का गौरी? तू ही दमलेली दिसतेस?" आत्याने विचारले.
"वहिनी तुझा हात दुखला का ग?" सुचेताने विचारले.
" नाही. का ग?" गौरीने विचारले.
" नाही म्हणजे तू माझा मसाज करुन दिलास ना. मग आता बहुतेक दादाला करून हवा असेल. म्हणून विचारले हात दुखत नसेल तर त्याचा पण करून दे.." सुचेता दात काढत म्हणाली..
" तू पण ना? थांब तुला बघतोच.." प्रथम सुचेताला मारायला धावला. ती पटकन उठली. तिने गौरीला उभे केले. गौरीला प्रथमच्या अंगावर ढकलून ती तिथून पळाली. प्रथम आणि गौरी दोघेही अवघडले होते. त्यांची ती अवस्था बघून घरातले सगळे मान खाली घालून हसत होते. शेवटी आजी बोलल्या..
" ही सुचेता पण ना, अजून कॉलेजला गेली नाही तरी एवढा वात्रटपणा करते आहे. गेल्यावर काय करेल देव जाणे. प्रथम, गौरी तुम्ही जा आराम करायला. म्हणजे बसायचे असेल तर बसा गप्पा मारत. पण दिवसभर लग्नाचा शीण आणि परत उद्या पूजा."
" मी जाते आत." गौरी म्हणाली.
" एकटी नको जाऊस. प्रथम सोडेल तुला खोलीत." आजी म्हणाल्या. प्रथमने आईच्या पाठी जाऊन लपलेल्या सुचेताकडे पाहिले. तिने याला वेडावून दाखवले.
" चल." प्रथम गौरीला सुचेताच्या खोलीच्या दिशेने घेऊन निघाला. दोघेही वरच्या मजल्यावर आले.
" तू आत झोपशील ना एकटी?" प्रथमने विचारले.
" हो. मी काही लहान आहे का?"
" लहान असे नाही. पण विचारले. घाबरलीस तर."
" अं हं. मी अजिबात नाही घाबरत. "
" मग मी आत येऊ नको असे म्हणतेस तर तू.."
" असे समज हवे तर.."
" तुझी इच्छा. जातो मग मी." प्रथम त्याच्या खोलीच्या दिशेने निघाला.
" प्रथम.." गौरीने हाक मारली. प्रथम थांबला.
" आय लव्ह यू.." गौरीने पटकन दरवाजा लावून घेतला.
" गौरी दरवाजा उघड." प्रथम कुजबुजला.
" अजिबात नाही."
" मी दरवाजा वाजवेन."
" घरातले सगळे गोळा होतील."
" मी बघतो तुझ्याकडे उद्या.." प्रथम दरवाजावर हलकेच मारत म्हणाला.
" नक्की.." गौरी हसत म्हणाली.
प्रथम स्वतःशीच हसत त्याच्या खोलीत गेला.. गौरीचा ऊरही धपापत होता. पहिल्यांदाच ती प्रथमशी असे बोलली होती..
पूजेच्या वेळेस गौरीने प्रथमने निवडलेली साडी नेसायला काढली. आजीने दिलेले दागिने.. प्रथमचे पूजेकडे कमी गौरीकडे जास्त लक्ष होते. गुरूजींनी जेव्हा पहिल्यांदा हाताला हात लावायला सांगितला तेव्हा दोघेही आधी थोडे संकोचले होते पण नंतर दोघेही गुरूजी कधी सांगतात याची वाट पहात होते. गौरीच्या घरचे सगळेच पूजेसाठी आले होते.. पूजा आरती झाली. जेवण झाल्यावर सगळेच बसले होते.. शालिनीताई म्हणाल्या,
" गौरी, बॅग भरली आहेस ना?"
मध्येच हे काय? अशा नजरेने सगळे त्यांच्याकडे बघायला लागले.
" बॅग कशाला भरायला पाहिजे? आल्यापासून तिने उघडलीच कुठे.." गायत्रीबाई म्हणाल्या.. न राहवून प्रथम बोलला.. "गौरी कुठे चालली?"
" कुठे म्हणजे? पाचपरतावण नको करायला?" आजोबा म्हणाले.
" आजच?" प्रथमने विचारले..
" मग कधी?"
" पण आज तर....." प्रथमची जीभ पुढे रेटेना..
" आज चांगला दिवस नाही का? बरे मग उद्या घेऊन जा तुम्ही.." सुखदाही या खेळात सामील झाली..
" का उगाच मुलांना छळता आहात.. गौरी आज नाही जाणार. तुम्ही बाहेर फिरून आल्यावर जाईल बरे. " सविता म्हणाली. प्रथमने जोरात सुस्कारा सोडला.. तो ऐकून सगळेच हसायला लागले. सुनील आणि नंदिनीचा गौरी खुश आहे हे बघून जीव भांड्यात पडला होता.
जसजशी संध्याकाळ होऊ लागली तसतसा हसरा प्रथम थोडा टेन्शनमध्ये दिसू लागला.. सुखदाने गौरीला छानशी साडी नेसवली.. घरी जायच्या आधी राजने आणि सुचेताने मिळून प्रथमची खोली सजवली होती. गौरी नटूनथटून प्रथमच्या खोलीत निघाली.. प्रथम खिडकीत उभा होता. गौरीला आत ढकलून सुचेताने बाहेरून दरवाजा लावून घेतला.. त्या आवाजानेही प्रथमने पाठी बघितले नाही. गौरीला आश्चर्य वाटले. ती पुढे गेली. प्रथम अजूनही विचारात गढला होता. गौरीने प्रथमच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला हाक मारली.. तोच प्रथम जोरात किंचाळला. " मी काही नाही केले तिला.. मी खरेच काही नाही केले." प्रथम जोरात रडायला लागला.. गौरी बघतच राहिली. बाहेर मस्करी करण्यासाठी उभी असलेली सुचेता दरवाजा उघडून पटकन आईबाबांना बोलावून घेऊन आली. सविताने प्रथमला जवळ घेतले.. ती त्याला थोपटत होती.. "हो.. तू खरेच तिला काही नाही केलेस."


प्रथमच्या आयुष्यात नक्की काय घडले आहे, हे गौरीला समजेल का? गौरी त्यावर काय निर्णय घेईल.. पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all