तुझे नि माझे जमेना भाग १९

एक प्रेमकहाणी


तुझे नि माझे जमेना भाग १९


"मागील भागात आपण पाहिले की प्रथम आणि गौरी दोघेही तयार होऊन साखरपुड्यासाठी येतात.. गौरीने प्रथमने सांगितले असते त्याच्या अगदी विरुद्ध मेकअप केला असतो.. आता बघू पुढे काय होते ते..

" चला, आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालून घ्या.." गुरूजींनी सांगितले.. प्रथमने अंगठी हातात घेतली आणि त्याने गौरीकडे हात मागितला.. पण शर्मिलाने अजिबात हात सोडला नाही..
" अशी अंगठी तर कोणीही घालेल. काहीतरी स्टाईल असली पाहिजे. हो की नाही गौरी?" गौरी काही न बोलता फक्त हसली.
" हो का? मग कशी अंगठी घालायची आमच्या मित्राने?" रमेश मध्ये बोलला..
" असे छान गुडघ्यावर बसून आणि मग अदबीने हात मागून.. बरोबर ना ताई?" गौरीची मावसबहीण बोलली..
"अगदी बरोबर.." गौरीऐवजी शर्मिलाच बोलली.. प्रथमने नजरेनेच गौरीला नाही म्हणून खुणावले. गौरीनेही मुद्दाम लक्ष नाही असे दाखवले.. त्यावर खांदे उडवत प्रथम खाली बसला. पण त्याने तिकडची अंगठी न घेता खिशातून गुलाबाचे फूल काढले आणि गौरीला विचारले,
" माझ्याशी लग्न करशील?"
" हे गुलाबाचे फूल असेल तर अजिबात नाही.. मी एकदा फसले आहे, परत परत फसणार नाही.." हे वाक्य ऐकून अच्युत आणि सविताचा चेहरा उतरला.. पण आता प्रथम फुल फॉर्ममध्ये होता..
" घेऊन तर बघ आयुष्यभर माझे नाव काढशील.."
" प्रथम ही तशी मस्करी नाही ना?" गौरीने गंभीरपणे विचारले. त्याने मानेनेच नकार दिला. गौरीने ते फूल हातात घेतले. ते उघडले.. आत एक हिऱ्याची अंगठी होती..
" पण मग ती अंगठी?" गौरीने आश्चर्याने विचारले..
" ती आईबाबांनी घेतलेली आहे. ही माझ्याकडून. माझ्या कमाईची.." प्रथमच्या आवाजात अभिमान होता.
" आता घालून घेणार का लवकर? असे बसून माझे पाय दुखले." गौरीने हसत हात पुढे केला. टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. दोन्ही आजी आणि आजोबा डोळे पुसत होते.
" शालिनी आपण ठरवले तसेच होईल ना ग?"
" हो ग. सगळे व्यवस्थित होईल. विश्वास ठेव माझ्यावर आणि थोडासा देवावरही." सगळे विधी झाल्यावर गौरी आणि प्रथम दोघेच होते..
" थॅंक यू.. या छानशा भेटीबद्दल. मी तर घाबरलेच होते तू इथेही ते काळे उडवतोस का माझ्या चेहर्‍यावर." गौरी म्हणाली.
" गौरी तो माझा मूर्खपणा समज. आता माझ्या होणाऱ्या बायकोसोबत मी असे कसे वागीन? याच्यापुढे तिचा मान जपण्याची जबाबदारी माझी आहे." गौरी त्याच्याकडे बघतच राहिली..
" तू माझ्या प्रेमात आहेस हे मला माहित आहे. पण इथे सगळ्यांसमोर माझ्याकडे असे नको बघूस. मला लाज वाटते." प्रथम मिस्किल हसत म्हणाला. गौरी लाजली.
" तुला माझी ही साडी नाही आवडली? " तिने विषय बदलत विचारले..
" खरेतर मला फिकट रंग जास्त आवडत नाहीत. पण बहुतेक मला असे वाटते आहे कि मला माझी आवड बदलावी लागेल. कारण हा रंग तुला छान वाटतो आहे."
" यापुढे आयुष्यभर तुम्हाला दोघांनाच बोलायचे आहे.. तुमच्या अमृतबोलाचा लाभ आम्हाला ही होईल का?" सुखदा मध्ये येऊन बोलली..
" आत्या.. काहिही असते तुझे. गौरी ही आत्या. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण." प्रथम उठत म्हणाला. गौरी लगेच नमस्कारासाठी वाकली..
" नमस्कार नाही.." असे म्हणत सुखदाने तिची गळाभेट घेतली..
" दोघेही असेच सुखात रहा."
लग्नाच्या दिवशी सगळ्यांची नुसती धावपळ सुरू होती.. गौरी तिच्या खोलीत गौरीहर पुजत होती. तिच्यासोबत आजी थांबली होती.
" आजी, थोडी भिती वाटते आहे ग.. आजपर्यंत तुम्हाला सोडून कधीच राहिले नाही.."
"अजिबात घाबरू नकोस. आम्ही जवळ आहोतच.. कधीही काही लागले तरी अर्ध्या रात्री आवाज दे. पण माझे मन मला सांगते की अशी वेळच येणार नाही.."
"मुलीच्या मामाने मुलीला घेऊन लवकर यावे.." असा आवाज आला. पाठोपाठ राज मामाला घेऊन आला..
" चला ताईसाहेब.."
" दादा, किती रे चिडवशील?"
" चिडवून घे बाबा. लग्नानंतर या बहिणी चिडवायलाच काय बोलायलाही भेटत नाही. हो की नाही काकू?" मामा बोलला.
" गौरी, मी तुला खरेच खूप मिस करेन.. आपली गाणी, आपली भांडणे.." राजच्या डोळ्यात पाणी होते.
" दादा, इथे तर तुम्ही सगळे असाल. मीच तिथे एकटी पडेन." गौरी राजच्या गळ्यात पडून रडत म्हणाली.
" तो प्रथम बरा तुला एकटे पडू देईल? आणि पाडलेच तर येईन ना मी कान पिळायला. सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे सगळ्यांचा मान जरूर राख पण स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच लागून देऊ नकोस. आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत.." राज तिला थोपटत म्हणाला..
" आणि आता स्वतःचे लग्न झाले म्हणून आरामात नको राहूस.. जरा स्वतःसाठी वहिनी पण शोध."
" दादा.. तू खूप म्हणजे खूप दुष्ट आहेस." गौरी एकाबाजूला रडत तर एकीकडे हसत होती.
" चला लवकर आता नाहीतर गुरूजी येतील नवरीला घेऊन जायला.." मामा बोलला. राज गौरीला घेऊन बाहेर आला. बाहेर एक छानशी पालखी सजवली होती. त्याने हाताला धरून गौरीला त्या पालखीत बसवले. त्याने आणि गौरीच्या बाकीच्या भावांनी पालखी उचलली..
" गौरी, कसली वजनदार झाली आहेस. थोडे कमी कर." तेवढ्यातल्या तेवढ्यात कोणीतरी नाटकीपणे बोलले.. स्टेजवर उभा असलेला प्रथम बघतच राहिला. राज आणि त्याची भावंडे पालखी उचलून आणत होते. पालखी छान फुलांनी सजवली होती. ते स्टेजपाशी येऊन थांबले. मामाने गौरीला हात देऊन उतरवले.. पिवळी नऊवारी नेसलेली गौरी त्यातून उतरली. आज तिने केसांची वेणी घातली होती.. त्यावर भरपूर गजरे.. कपाळावर चंद्रकोर.. प्रथमची नजर तिच्यावरून हटत नव्हती. गौरीने वर पाहिले. प्रथमला खुणेनेच विचारले, त्याने छान अशी हाताने खूण केली.
लग्न लागले. सर्व विधी झाले. प्रथम गौरीला घेऊन घरी निघाला. गौरीच्या घरचे सगळेच भावूक झाले होते. कोणीही काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी आजोबा पुढे आले. ते सुनीलला म्हणाले.
"गौरीची काळजी करू नका. जशी सुचेता तशीच ती. आणि लग्न झाले म्हणून तिचे तुमच्याशी नाते तर बदलणार नाही ना. जेव्हा वाटेल तेव्हा तिला भेटायला या. आता निरोप देताना मात्र हसत द्या."
आजोबांचे बोलणे ऐकून सगळ्यांनी स्वतःला सावरले.
गौरी निघाली आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करायला प्रथमसोबत. काय होते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात ते बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all