तुझे नि माझे जमेना भाग १४

कथा दोन जीवांची

तुझे नि माझे जमेना भाग १४




सगळ्यात आधी खूप क्षमस्व.. खूप दिवसांनी भाग पोस्ट करते आहे त्यासाठी.. तुम्ही सगळे माफ कराल अशी आशा आहे..


मागील भागात आपण पाहिले कि गौरीचे कुटुंब साक्षगंधासाठी प्रथमच्या घरी आले आहे.. बघू पुढे काय होते ते..


" आली का आमची गौराई?" आतून आजीचा आवाज आला.. "अरे किती वेळ माझ्या मैत्रिणीला बाहेर उभे करून ठेवणार? वय झाले आहे तिचे."

" माझे वय झाले आहे हो ग?" शालिनीताई म्हणाल्या.. आणि हसत आत गेल्या..

" चला आपण इथेच बोलण्यापेक्षा आत जाऊन बोलू.." प्रथमचे बाबा बोलले..

" कसली सुंदर दिसते आहे ग ही.. दृष्ट काढ हो तिची घरी गेल्यावर.." गौरीला बघून गायत्रीबाई बोलल्या.. आत येताच गौरीने सगळ्यांना नमस्कार केला..

" हिच्यावर ना तुम्ही खूप चांगले संस्कार केले आहेत.. माझ्या घराचे गोकुळ करेल ग हि. नाहीतर आमचा प्रथम बघ त्याला सांगायला लागते सगळ्यांना नमस्कार कर म्हणून." गायत्रीबाई बोलत होत्या..

" आजी तू पण ना.. " प्रथम म्हणाला.. त्यानेही सगळ्यांना नमस्कार केला..

" तुम्ही चहा, कॉफी काय घेणार?" सविताने विचारले..

" आता काहीच नको.. आधी आपण साक्षगंध उरकून घेऊ. म्हणजे नंतर गप्पा मारायला मोकळे.." सुनीलने सुचवले.. सगळ्यांनी होकार दिला..

प्रथम आणि गौरीला बाजूबाजूला बसवले.. दोघांनाही थोडेसे ऑकवर्ड वाटत होते.. सविताने गौरीला हळदीकुंकू लावून साडी दिली.. नंदिनीने प्रथमला कुंकू लावून घेतलेला शर्ट दिला.. दोघांचे औक्षण केले..

" आता झालो बाई आपण विहिणी.. दोन्ही आजींनी एकमेकिंना मिठी मारली..

" मी काय म्हणतो.. गौरीने आपले घर बघितलेच नाही.. जरा तिला घर दाखवूया का?" आजोबांनी सुचवले..

" हो.. मी दाखवते गौरीला घर.." सुचेता उत्साहाने उठली..

" गौरी काय गौरी? वहिनी म्हण तिला आता.. आणि तू कशाला? प्रथम दाखवेल तिला घर.. प्रथम तिला तुमची खोली दाखव.. तिला काय हवे नको खोलीत ते हि विचारून घे.." प्रथमच्या आईने सुचवले.. 

" हो.. जा.. तोपर्यंत आम्ही जरा लग्नाचे बोलून घेतो." सुनील म्हणाला.

" आम्ही जातो.. पण मला एक सुचवायचे होते.." प्रथम म्हणाला..

" बोल ना.. शेवटी लग्न तुमचे आहे. तुम्ही म्हणाल, तसेच होईल.." अच्युतने क्लिअर केले..

" मला असे वाटते लग्न खूप साधेपणाने व्हावे.. फक्त जवळचे नातेवाईक आणि मोजकेच मित्र.. चालेल का?" प्रथमने गौरीला विचारले.

पहिल्यांदाच त्याला असे विचारताना पाहून गौरीला गुदगुल्या झाल्या पण त्या न दाखवता ती म्हणाली..

" हो चालेल.. मला तर वाटते कि लग्नासाठी होणारा खर्च जर आपण अनाथाश्रमात दिला किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला तरी चालेल." 

प्रथम गौरीचा विचार ऐकतच राहिला.

" आम्हाला थोडा विचार करू दे ना.. घरातले पहिले लग्न.. कोणाला बोलावले नाहितर लोकांना वाईट वाटेल.." आजोबा विचारात पडले.

" आजी.." प्रथमने आजीकडे पाहिले.

दोघी आजी काही न बोलता आतल्या खोलीत गेल्या..

" काय ग , काय करायचे आता?"

"तूच सांग.. आमची काही हरकत नाही.."

" यांचे बिझनेसमधले मित्र रागवतील बोलावले नाहीतर. आणि नातेवाईक."

" ते तर आहेच.. सुनीलचा सुद्धा मित्रपरिवार मोठा आहे.."

" पण हि मुले आपल्यासाठी लग्नाला तयार झाली आहेत, हे विसरून कसे चालेल.." गायत्रीबाई विचार करत म्हणाल्या..

" एक उपाय आहे.. लग्न साधेपणाने करू.. नंतर बारसे थाटात करू.." शालिनीताई हसत म्हणाल्या..

" तुझे पण ना काहिही असते.. चल बाहेर जाऊन सांगूया.."

दोघी गंभीर चेहर्‍याने बाहेर आल्या..

"आम्हा दोघींना हे मान्य आहे.. पण विधी मात्र सगळे होतील.. चालेल?"

" हो.." प्रथम आनंदाने म्हणाला.

" मग जा तिला घर दाखवायला.. आम्ही पुढचे ठरवतो.."

प्रथम गौरीला घेऊन निघाला.. ते दोघे निघताच सुचेता पण उठली..

" कुठे चाललीस?"

" दादा आणि वहिनीसोबत.." सुचेता आजीकडे बघत वहिनीवर जोर देत म्हणाली..

" तू पण ना.. त्या दोघांना काही बोलायचे असेल तर ?" आई बोलली..

सुचेता धुसफुसत खाली बसली..

प्रथम गौरीला घेऊन आपल्या खोलीत गेला.. 

"हि माझी खोली.."

" छान आहे.."

" मला थोडे बोलायचे होते.."

" बोल. मी ऐकते आहे.."

" तुला वाटते आपण या लग्नाने सुखी होऊ?" 

प्रश्न ऐकून गौरी आश्चर्यचकित झाली.

" मी इथे बसले तर चालेल का?"

" सॉरी.. बस ना.. " प्रथम बेडवरची चादर नीट करत बोलला..

" तुला असे का वाटते?"

" कारण.. या आधी आपण जेव्हा केव्हा भेटलो आहोत.. आपल्या दोघांची भांडणेच झाली आहेत.. मग अचानक जुळवून घेऊ शकतो एकमेकांशी?"

" प्रयत्न तर करू शकतो ना? पण मला असे का वाटते तुझी माझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये.." गौरी म्हणाली.. ते ऐकून प्रथम थोडासा बावरला..

" असे काही नाहीये.."

" मग कसे आहे? खरेतर आपण दोघेही एकमेकांना जास्त ओळखत नाही.. फक्त आपल्या घरातल्या मोठ्यांच्या आनंदासाठी आपण हा निर्णय घेतला आहे.. पण तो घेताना आपण दुःखी व्हायला नको.. कारण शेवटी हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.." गौरी बोलत होती.. प्रथम विचारात पडला होता.. हिला सांगू कि नको?

" गौरी.." तिने त्याच्याकडे पाहिले..

" मी.. मला.. ईईई..." प्रथम ताडकन उठला..

" मी ईईई?"

" तू नाही ग.. ते झुरळ.. मला घाण वाटते.. इथे कसे आले ते?"

" शी.. झुरळाला काय घाबरतोस तू?"

" मी फक्त झुरळालाच घाबरतो.. ते कसे बघते आहे बघ माझ्याकडे.. त्याच्या त्या मिशा.." प्रथमने डोळे बंद करून घेतले होते.. गौरीला हसायला येत होते.. दुसर्‍यांची मस्करी करायला मजा वाटते.. आणि स्वतःवर आल्यावर.. ती उठली.. तिने ते झुरळ पकडले..

" प्रथम.."

" गेलं का ते झुरळ?"

" हे बघ.." प्रथमने डोळे उघडले.. गौरी समोर झुरळ नाचवत होती.. 

" प्लीज फेकून दे ना.." तो परत ओरडला..

" हो.. तेच करते आहे.. फक्त तुला दाखवत होते.. हे असे झुरळ पकडायचे आणि असे उचलून फेकून द्यायचे.." गौरी ते झुरळ फेकायला खिडकीत गेली.. ती ते झुरळ नक्की फेकते आहे का हे बघायला प्रथम तिच्या पाठी गेला.. तो पाठी आहे हे न समजल्याने पटकन वळलेली गौरी त्याच्या अंगावर आदळली.. त्या धक्क्याने तिचे बांधलेले केस सुटले.. ती पडणार तोच त्याने तिला धरले.. त्या स्पर्शाने दोघेही परत बावरले..

" तू खूप सुंदर दिसते आहेस.." प्रथम कुजबुजला..

" थॅंक यू.." गौरी ऐकू येईल न येईल अशा आवाजात बोलली..

"हे बरे आहे.. जोरजोरात ओरडायचे.. आणि इथे आल्यावर हे बघायचे.." दरवाजात कंबरेवर हात ठेवून सुचेता उभी होती..

" ते ते.. " म्हणत प्रथमने गौरीला सोडले.. ती परत पडायला लागल्यावर परत धरले आणि उभे केले..

" आधी सांग माझ्या खोलीत झुरळ कोणी सोडले?" प्रथम उसन्या अवसानाने बोलला.

" माझ्याशिवाय आहे कोण? ते ना मला मागच्या बागेत दिसले.. आणले उचलून आणि सोडले इथे.." सुचेता हसत म्हणाली..

" तुला ना मी बघतोच."

" जे बोलायचे ते नंतर बोल. आणि तुमचे शाहरूखकाजोल सारखे पोझ देऊन झाले असेल तर खाली जेवायला चला.. सगळे वाट बघत आहेत.. आणि वहिनी मगाशी तुझे केस बांधलेले होते.. अचानक कसे सुटले? दादा.."

" चल पटकन खाली जाऊ.." गौरी केस बांधत सुचेताला म्हणाली..

प्रथम तिच्याकडे बघतच राहिला..

" आजही सांगायचे राहिले.." तो स्वतःशीच बोलला...




काय सांगायचे आहे प्रथमला गौरीला.. ते बघू पुढील भागात..

परत एकदा उशीरा भाग टाकल्याबद्दल क्षमस्व..


भाग कसा वाटला सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all