तुझे नि माझे जमेना भाग ८

कथा रागातून उमलणार्‍या प्रेमाची

तुझे नि माझे जमेना भाग ८



मागील भागात आपण पाहिले कि गौरीच्या चुकीमुळे प्रथमचे नाटक पडते आणि तो नाराज होतो.. तर दुसरीकडे त्या दोघांच्याही आजींनी मिळून एक प्लॅन ठरवलेला असतो.. बघू तो यशस्वी होतो का?



" प्रथम जरा इथे येतोस का रे?" 

" बोल ना आजी.."

" ते आता तुमच्या कॉलेजमध्ये आता काय काय असेल ना?"

" काय काय म्हणजे काय ग?"

" तेच रे.. रोझ डे, फ्रेंडशिप डे वगैरे.."

" तू का विचारते आहेस आज? इतके दिवस तर नाही विचारलेस?" प्रथमने आश्चर्याने विचारले..

" असंच रे.. मलाही त्यामुळे जरा तरूण झाल्यासारखे वाटते.." आजी हसत म्हणाली..

" फ्रेंडशिप डे तर कधीच होऊन गेला.. आता होतील सुरू वेगवेगळे डेज.."

" मग तू करतोस कि नाही ते सेलिब्रेट?"

" हो.. तू बघतेस कि मला कॉलेजला जाताना.."

" तसे नाही रे.. तुझी आहे का कोणी अशी खास फ्रेंड? जिच्याबरोबर तू हे साजरे करतोस?" आजी खोदून विचारत होतीस..

" हे बघ आजी, माझी कोणतीही मैत्रीण नाही, असणार नाही.. अजून तुला काही विचारायचे आहे?" प्रथम आता वैतागत होता..

" नाही रे बाबा. मी कशाला विचारू? मला नाही बाबा नको त्या चौकशा करायची सवय.. पण तुला राग येत असेल तर जातेच मी बापडी.." आजी तिथून गेली.. पण तिचे काम मात्र झाले होते..


    दोन्ही आजींनी आपापल्या मुलांना विश्वासात घेऊन वॉटर पार्कचा प्लॅन पक्का केला.. आणि ठरलेल्या दिवशी वॉटर पार्कवर पोचल्या.. प्रथमचे कुटुंब आधी पोचले होते.. प्रथमने आधीच तिकिट्स काढले होते.. सुचेता आत जायला नाचत होती.. पण गौरीच्या कुटुंबाचा अजून पत्ता नव्हता.. गायत्रीबाई थोड्या टेन्शनमध्ये आल्या होत्या.. कारण एकदा आत गेल्यावर शोधणे मुश्किल झाले असते.. त्यांनी खुणेने अच्युतला विचारले.. ते येतच आहेत असे त्याने सांगितले.. आता हा वेळ कसा काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता.. पण त्यांच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना बाहेर पडली.. समोर एक वडापावचे दुकान दिसत होते.. त्यांनी लेकाला हाक मारली..

" अच्युता, अरे किती दिवसात बाहेरचा वडापाव खाल्लेला नाहीरे.. समोर बघ कसा छान वडे तळतो आहे तो.." 

" आजी, तू आणि वडापाव खाणार?" प्रथम आणि सुचेताने अचंब्याने विचारले..

" का? मी काही खाऊ शकत नाही. पण माझे एवढे नशीब कुठे कि मला काही खावेसे वाटले आणि खायला मिळाले.. चला आत जाऊ.. आत जाऊन काय तर ते मेलं बर्गर आणि शेवयाच खायच्या ना?" आजी खोटा सुस्कारा टाकत म्हणाल्या..

" पण आई तुमचा आणि बाबांचे खाणे आणले आहे.." सविता बोलायला जात होती.. पण तिला अच्युतने पाठी खेचले..

"आई, थांब.. तुला खावेसे वाटत आहे ना.. मी घेऊन येतो."

" बाबा.. तुम्ही थांबा.. मीच आणतो.. चल ग सुचेता.."

" मी नाही एवढ्या उन्हात येत.. तूच जा.."

" उन्ह? पाण्यात खेळताना नाही का लागणार?"

" तुम्ही दोघे बसा भांडत.. मीच घेऊन येतो.." अच्युत म्हणाला..

" सॉरी बाबा.. मी जातो.."

प्रथम वडे आणायला गेल्यावर सुचेताने हळूच आईला विचारले..

" आजी बरी आहे ना?"

" का ग? असे बोलतात का?"

" बघ ना.. मला आधी कधीच आजीने बाहेरचे तेलकट खाल्लेले आठवत नाही.. आणि आज अचानक?"

" वाटलं असेल ग.."

"ह्म्म.." पण सुचेताचे डोके चालायला लागले होते.. ती विचार करत असतानाच समोर गौरी गाडीतून खाली उतरताना दिसली..

" हे गौरी.. इथे.." तिने हाक मारली.. तिला बघून गौरीला आनंद झाला.. तिने थांब येतेच अशी खूण केली.. तिने आधी गाडीतून आजीला खाली उतरवले.. तोपर्यंत सुचेता तिच्या जवळ आली होती..

" हाय.. तू इथे?"

" हो.. विथ फॅमिली.. आणि तू?"

" मी पण.. विथ फॅमिली.." 

" ओह्ह.." गौरीचा बदललेला सूर सुचेताला जाणवला..

" माझे आजीआजोबा तिथे आहेत.. चल निघू मी.."

" अशी कशी निघशील? आधी ओळख तर करून घे आमच्याशी.." गौरी काही बोलायच्या आधीच आजी बोलल्या. तोवर गौरीचे आईबाबा आणि राजही बाहेर आले होते.. 

" सुचेता हि माझी आजी, आई बाबा.. आणि हा दादा.. आणि हि..."

" मी सुचेता.. मला ना माझी ओळख करुन द्यायला फार आवडते.. मी तुमच्या गायत्रीची नात.. माझ्या घरचे सगळे तिथे उभे आहेत.."

"हो का? अरे बापरे बरे झाले भेटलीस ते.. चल रे सुनील. किती वर्षांनी भेटीन मी तिला.." सगळे प्रथमच्या गाडीपाशी गेले.. दोन्ही मैत्रिणींनी एकमेकींना मिठी मारली.. दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते.. 

" खूप बरे वाटले ग इतक्या वर्षांनी भेटून.." गायत्रीबाई म्हणाल्या.

" हो ना.. असे वाटलेही नव्हते ग अशा अनोळखी ठिकाणी तुझी भेट होईल. "

बाकीच्या घरातल्यांचीही ओळख होईपर्यंत प्रथम वडे घेऊन आला. 

" हे घ्या गरमागरम वडापाव सोबत मिरची.." प्रथमचा उत्साही चेहरा गौरीला बघून पडला होता..

" आणि हा आमचा प्रथम.." आजीने ओळख करून दिली..

" आता तरी आजी वडे खाऊन आत जायचे का?" 

" तुम्ही तुमचे कंटिन्यू करा.. आम्ही भेटतो तुम्हाला आत.." नंदिनी म्हणाली..

" अग.. असे कसे.. तुम्हाला जर चालत असेल तर आपण सगळेच वडे खाऊ.."

" पण आजी मी सहाच आणले आहेत.." प्रथम अपराधी स्वरात म्हणाला..

" ठिक आहे रे.. अर्धा अर्धा खाऊ.. इथे भूक कोणाला आहे?" शेवटचे वाक्य आजीने तोंडातल्या तोंडात उच्चारले..

" माणसे अकरा.. वडे सहा.. म्हणजे अर्धा वडापाव उरणार.. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी अख्खा खाईन म्हणतो." राज बोलला. "तसाही वडापाव माझा विक पॉइंट आहे.."

" नो इश्शूज भावा.." प्रथम त्याला म्हणाला..

" आम्ही दोघी एक वडापाव खाणार.. असे म्हणतात कि एक वडापाव दोघांनी खाल्ला कि प्रेम वाढते.." शालिनीताई म्हणाल्या..

" तुमचे प्रेम तुम्ही जरा पटापट वाढवाल का? मला ना आता राहवत नाहीये.. आतले गेम्स माझी वाट पहात आहेत.." सुचेता खूपच डेस्परेट झाली होती.. तिने एक वडापाव काढून अर्धा आजोबांना दिला अर्धा स्वतः खाल्ला.. ते बघून मग दोन्ही आजींनी अर्धा अर्धा वडापाव घेतला.. गौरी आणि प्रथमच्या आईबाबांनी पण घेतला..

" आता उरलेला प्रथम आणि गौरी तुम्ही घेऊन टाका.." गायत्रीबाईंनी सांगितले..

" नको आजी.. मला भूक नाहीये.." प्रथम गौरीकडे बघत बोलला..

" मला तसाही वडापाव आवडत नाही." गौरीने प्रथमकडे बघत नाक उडवले..

"आधीच सांगायचे ना?" शालिनीताई बोलल्या.. सगळ्यांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.. 

" म्हणजे आम्ही सुद्धा खाल्ला नसता. तुम्ही तरूण पोरं खाणार नाही.. आणि आम्ही म्हातार्‍यांनी खायचे.. बरे दिसते का?" गायत्रीबाईंनी पुस्ती जोडली..

" अरे यार.. तुम्ही आणि तुमचा ड्रामा.. आता जर तुम्ही आत आला नाहीत ना तर मी सरळ घरी निघून जाईन.." सुचेता पुढे आली तिने त्या वडापावचे दोन भाग केले.. ते गौरी आणि प्रथमच्या हातात दिले व हात जोडून म्हणाली..

" प्लीज खाऊन घ्या.. नाहीतर इथेच सगळा वेळ संपून जाईल.."

गौरी आणि प्रथमने नाईलाजाने खायला सुरुवात केली..

"आता फायनली खाणे झाले असेल तर आत जाऊया का, प्लीज?" सुचेता रडकुंडीला आली होती..

" हो जाऊया कि.. पण आम्ही तिघे म्हातारे काय पाण्यात येत नाही.. आम्ही त्या सावलीत बसून गप्पा मारतो.. तुमचे काय?" गायत्रीबाईंनी विचारले.

नंदिनी आणि सविताची पण मैत्री झाली होती. नंदिनी म्हणाली..

" मला त्या मोठ्या घसरगुंडीची भिती वाटते.. मी आपली पाण्यात पाय सोडून बसेन.."

" मी पण.." सविता म्हणाली..

" तेवढ्याच आपल्या पण गप्पा होतील.."

" चालेल कि.." 

" मग आम्ही जातो त्या उंच स्लाईडवर. दादा, गौरी चला.." एका हातात गौरीचा हात तर दुसऱ्या हातात प्रथमचा असे करून सुचेता त्यांना ओढत न्यायला लागली..

" आणि माझे काय ग?" राजने हसत विचारले..

" अरे दादा.. चल तूपण. " असे म्हणत नकळत सुचेताने गौरीचा हात प्रथमच्या हातात दिला आणि ती राजचा हात धरून पुढे पळाली.. अनपेक्षित अश्या त्या स्पर्शाने दोघेही बावचळले.. काय करावे दोघांनाही सुचेना.. दोन क्षण दोघेही तसेच एकमेकांकडे बघत राहिले..

" असाच हात धरून पुढे गेलात तरी चालेल.." आजोबा जवळ येऊन बोलले.. दोघांनीही पटकन हात सोडला.. बघितले तर राज आणि सुचेता सगळ्यात पुढे गेले होते.. दोघांचेही आईबाबा त्यांच्यापाठी जात होते.. दोन्ही आज्या खुदूखुदू हसत चालत होत्या आणि आजोबा त्यांच्यापाठी उभे होते..

"मी म्हटले तुम्ही तरी माझ्यासोबत याल.. पण जाऊदे.. मी जातो.." आजोबा पुढे जायला लागले..

" आजोबा थांबा.." असे म्हणत दोघेही आजोबांसोबत चालू लागले..



काय वाटते या वॉटरपार्क मध्ये तरी गौरी आणि प्रथमची मैत्री होईल कि प्रकरण अजून बिघडेल.. बघू पुढील भागात..


काही कारणास्तव हा भाग उशीरा आला त्यासाठी क्षमस्व..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all