तुझे नि माझे जमेना भाग ६

कथा द्वेषाची आणि प्रेमाची

तुझे नि माझे जमेना भाग ६



मागील भागात आपण पाहिले कि गौरी आणि प्रथम दोघेही कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त असलेल्या कार्यक्रमात भाग घेतात.. त्यात गौरी नटूनथटून कॉलेजला जायच्या तयारीत असतानाच आजी नाटक करून तिला प्रथमच्या घरी पाठवते.. पुढे बघू काय होते ते..


"हॅलो शर्मिला.."

" अग गौरी.. कुठे आहेस तू? मॅम विचारत होत्या.."

" ऐकून तर घे आधी. माझ्या आजीचे एक छोटेसे काम आहे. ते करते आणि लगेच येते.."

" गौरी अशी काय ग तू? आपल्यावर स्वागताची आणि नंतर बाकीची सगळी जबाबदारी तुझी आहे माहित आहे ना? तरिही?"

" अग, हो.. पण मी माझ्या आजीची इच्छा नाही डावलू शकत.. आणि आत्ताशी नऊ वाजले आहेत.. पाहुणे जरी दहा म्हटले तरी येईपर्यंत अकरा वाजणारच. मी येतेच अर्ध्या तासात."


गौरीने दिलेल्या पत्त्यावर रिक्षा थांबवली.. 

" दादा, तुम्ही इथे थांबाल का? मी पटकन हे पार्सल देऊन येते.."

" ताई नक्की सांगत नाही.. कारण बरेचजण येतो म्हणून सांगतात.. आणि येतच नाही.. आमचे पैसे बुडतात मग.."

" अहो.. मी नाही तसे करणार.."

" सगळे असेच म्हणतात.. बघा.. मला गिऱ्हाईक मिळाले तर मी जाईन.. नाहीतर थांबतो.."

" चालेल.. मी येतेच.."

गौरीने हातातला पत्ता वाचून परत एकदा कन्फर्म केले.. समोरच्या बंगल्यात पाऊल टाकले..

" व्वा.. आजीची मैत्रीण भलतीच श्रीमंत दिसते आहे.." तिने मनात विचार केला.. "कधी भेटली देवाला माहित.." 

गौरीने दारावरची बेल वाजवली..

" तू??"

" तू इथे काय करतोस?"

" खरेतर हा प्रश्न मी विचारायला पाहिजे.. पण तरिही मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. सामान्य लोक आपापल्या घरात राहतात.. आणि हे माझे घर आहे.. मी इथेच राहतो.. आता तुम्ही इथे काय करता ते सांगण्याचे कष्ट घ्याल का? ओह्ह त्या दिवशी गुलाब आणि आज चक्क काहीतरी?" प्रथम बोलतच होता..

" एक्सक्यूज मी.. मी इथे माझ्या आजीच्या मैत्रिणीला हा डबा द्यायला आले आहे. मला माहित असते ना हे तुझे घर आहे तर अजिबात आले नसते.." गौरी आढ्यतेने बोलली..

"प्रथम, कोण आले आहे?" 

" आजी तुझ्याकडे कोणीतरी आले आहे.."

" मग आत बोलव.. बाहेर उभे का ठेवले आहेस?"

"मी आत नाही येत.. मला कॉलेजला जायला उशीर होतो आहे. हा डबा दे आजींना.." प्रथम काही बोलायच्या आत गौरी बोलली..

" हा आमचा प्रथमना अगदीच वेंधळा आहे.. साधा दरवाजा उघडून आलेल्या माणसाला आत सुद्धा घेता येत नाही त्याला.." आजी बाहेर येत म्हणाल्या..

" अग तूच ना शालिनीची नात.." 

" हो.. नमस्कार करते आजी.. " गौरी नमस्कार करायला वाकली..

" चांगले संस्कार आहेत हो तुझ्यावर. सविता, सुचेता, अहो... येताय ना बाहेर ?"

" आजी.. आमच्या कॉलेजमध्ये आता एक कार्यक्रम आहे. मला ना तिथे जायला उशीर होतो आहे.. आजीने तुमचा वाढदिवस आहे म्हणून तुमच्यासाठी हा शिरा केला होतो.. तोच द्यायला आले होते.. मी निघू का आता?"

" आजीचा वाढदिवस? आज?" प्रथमने आश्चर्याने विचारले..

" हो.... तिथीने आहे.. माझ्या मैत्रिणीलाच काळजी हो माझी.." ठसक्यात हो म्हणत आजीने डोळ्यात न आलेले पाणी पुसले..

"वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आजी. मी निघू का?" गौरीने परत विचारले..

" दोनच मिनिटे हो.. सविता अग हि निघाली बघ.."

" हो आई.. येतच होते.. सुचेता आण ग ते.. " सविता हातात चहाचा ट्रे घेऊन आल्या.. पाठून सुचेता नाश्ता घेऊन आली. शंकरराव सुद्धा पेपर हातात घेऊन बाहेर आले..

"अग हि.. तुझे नाव काय ग? मी विसरलेच.."

"गौरी.." प्रथम मध्येच बोलला..

" हो.. हि गौरी.. पण तुला कसे माहित रे?" आजीने डोळे मोठे करत विचारले.

" आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत." प्रथम डोकं खाजवत म्हणाला..

" असो.. तर हि माझ्या मैत्रिणीची नात. आज माझा वाढदिवस म्हणून शिरा घेऊन आली आहे.." 

" किती गोड ग.." सविताताई म्हणाल्या..

" काकू मी निघू का आता? मला ना थोडे वेळेत पोचायचे आहे.. बाहेर रिक्षावालेकाका पण वाट बघत असतील.."

" जाशील ग.. मी सुचेता.. माझी ओळख करून द्यायला सगळे विसरतील म्हणून आधीच करून देते."

" आम्ही ढिग विसरू.. पण तू विसरू देशील?" आई म्हणाली..

" चहा नाश्ता घे ना काहीतरी.." आजी गौरीला म्हणाल्या.. गौरीचा फोन वाजला..

" गौरी कुठे आहेस? लवकर ये.. मॅम वाट पहात आहेत.." 

" हो शर्मिला मी निघतेच.."

" आजी मी प्लीज निघते.. तिथे सगळे माझी वाट पहात आहेत.."

" अग हा प्रथम सोडेल कि तुला.. एकाच कॉलेजमध्ये आहात ना?"

गौरीने क्षणभर प्रथमकडे पाहिले..

" आजी नको.. मी जाते.."

गौरी उठली.. तिने सगळ्यांना वाकून नमस्कार केला.. सगळे तिला दरवाजापर्यंत सोडायला आले.. गौरी बाहेर आली.. ते रिक्षावाले काका निघून गेले होते.. गौरी खूपच टेन्शनमध्ये आली होती.. तिथे सगळेच बंगले होते म्हणून असावे कदाचित रिक्षा दूर दूरपर्यंत दिसत नव्हती.. ते सगळे दागिने आणि नऊवारी नेसून मुख्य रस्त्यापर्यंत जायचे कसे हा प्रश्न तिला पडला होता.. "का मी आजीला मदत करायचे ठरवले?" ती आता स्वतःवरच चिडली होती.. पाठून गाडीचा आवाज आला म्हणून तिने आशेने वळून पाहिले तर एक कार येताना दिसली.. प्रयत्न करावा म्हणून तिने कारला हात केला.. कार थांबली.

"..... कॉलेजला सोडू शकाल का?" हे शब्द गौरीच्या तोंडातच राहिले.. आत प्रथम बसला होता.. त्याने काहीच न बोलता कारचा दरवाजा उघडला.. गौरी पुढे चालायला सुरुवात करणार तोच तो बोलला..

" मॅडम तुम्हाला जर वेळेत पोचायचे असेल तर आत बसा.. नाहीतर बसा वाट बघत.. या रस्त्यावर रिक्षा खूप कमी येतात.. आता येत असाल तर सांगा नाहीतर मी निघालो.."

आतापर्यंत गौरीलाही परिस्थितीची जाणीव झाली होती.. त्यामुळे त्याच्यावर उपकार केल्यासारखी ती त्याच्या गाडीत जाऊन बसली. बोलत दोघेही नव्हते.. पण प्रथम गुपचूप गाडीच्या आरशात तिला बघत होता.. आणि ते बघणे जाणवून गौरी अजूनच अस्वस्थ होत होती.. शेवटी दोघेही कॉलेजला पोचले..

" थॅंक यू.." गौरी गाडीतून उतरताना म्हणाली..

" इट्स ओके.. घरी आलेल्या पाहुण्यांची काळजी घेणे आमचे कर्तव्यच आहे.." प्रथम गौरीकडे न बघता गाडी पार्क करायला गेला..

" दुष्ट.. खडूस... मी घ्यायलाच नको होती लिफ्ट.." गौरी पुटपुटली..

" गौरी, गौरी.. चल लवकर.." शर्मिला समोरून हाक मारत होती..

"गौरी तू प्रथमसोबत आलीस?" शर्मिलाने डोळे मोठे करत विचारले.

" मोठी स्टोरी आहे.. चल आधी मॅडमना भेटू.."

समारंभ सुरू झाला.. स्टेजवर जणू फक्त गौरीचे राज्य सुरू होते.. आपल्या चुरचुरीत बोलण्याने ती सगळ्यांची मने जिंकून घेत होती.. सूत्रसंचालनाला थोडीशी विनोदाची झालर त्यामुळे तो समारंभ कंटाळवाणा वाटत नव्हता.. प्रथमची नजर तर गौरीच्या चेहर्‍यावरून हटायला तयार नव्हती.. शेवटी एकदाचा बक्षीस समारंभ संपला.. प्रमुख पाहुणे, शिक्षक सगळे तिथून गेले.. थकलेली गौरी तिथेच दमून बसली.. या नंतर होते फक्त विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असलेले कार्यक्रम.. पहिलेच होते प्रथमचे नाटक. त्यामुळे पूर्वतयारीसाठी तो आणि त्याची टीम स्टेजवर आली होती.. त्याला पाहून गौरी उठली.. ती उठलेली पाहून प्रथम तिच्यापाठी जाऊ लागला.. तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता.. पण ती लक्षच देत नव्हती.. प्रथम बेचैन होत होता.. पण..




नक्की काय सांगायचे असेल प्रथमला गौरीला, पाहू पुढील भागात..


कथा कशी वाटली नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all