तुझे नि माझे जमेना भाग ३

कथा द्वेषाची आणि प्रेमाची


तुझे नि माझे जमेना भाग 3


मागील भागात आपण पाहिले कि गौरीच्या बाबांचे मित्र गौरीला मागणी घालतात.. शर्मिलाच्या घरून एकटी येणारी गौरी रस्ता चुकते आणि चरसी लोकांमध्ये अडकते.. बघू पुढे काय होते ते..


बाईकवाल्याने आपादमस्तक गौरीला न्याहाळले..हो.. तो प्रथमच होता.
" आता काय रस्त्यात ओरडून सांगू गाडीवर बस म्हणून.."
प्रथम गौरीला उद्देशून बोलला.. ते बघून पुढे आलेले चरसी थोडे पाठी झाले. पण संशयाने त्याच्याकडे बघत होते..
" बायको आहे माझी.. भांडण झाले आहे म्हणून एकटी बाहेर पडली.. तुम्हाला काही प्रॉब्लेम?" प्रथमने त्या चरसींना थोडे दरडावून विचारले..
" आता बसतेस का पटकन? कि उचलू तुला?"
"माझा फोन.."
" फोनचे काय?"
" त्या माणसाने घेतला.."
" आधी नाही का सांगायचे? बस आधी.."
हे ऐकून मात्र घाबरून गौरी पटकन बाईकवर बसली.. प्रथमने गाडी सुरू केली.. त्या माणसाकडून फोन घेतला. थोडे अंतर गेल्यावर त्याने गौरीचा पत्ता विचारला..
" ते ते.." गौरीचे थोडे ततपप झाले..
" पत्ताही माहित नाही?" प्रथम थोडा वरच्या सुरात बोलला..
" माहित आहे.. पण तुझ्या तुमच्या अशा वागण्याने विसरायला झाला आहे.. दोन मिनिटे मला आठवू दे.."
प्रथम वेळ काढण्यासाठी गाडी उगाचच रेज करायला लागला.. त्या आवाजाने आणि वायब्रेशनने गौरी अजूनच वैतागली..
"तू... तुम्ही जरा थोडा वेळ शांत बसा ना.. मला काहीच सुचत नाही.. आधी ते चरसी आता तुम्ही.."
" तू माझी तुलना त्या चरसींशी करते आहेस? उतर मग गाडीवरून.."
" सॉरी.. सॉरी.. मी ना... तिथे राहते."
" मग सोडायचे तिथपर्यंत कि जाणार तुझी तू?"
"प्लीज सोडा ना.. उशीर पण झाला आहे.."
प्रथमने गौरीला तिच्या बिल्डिंगच्या इथे सोडले..
" जाणार कि वरपर्यंत येऊ?"
" नको.. थँक यू.. मला वाचवल्याबद्दल.."
" त्यात काय? अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करणे कर्तव्य आहे माझे.. पण नवीन आहात तर आधी रस्ते समजून घ्यायचे मग जायचे ना?"
गौरी पुढे काय बोलणार तोच प्रथमचा फोन वाजला..
" हो बाबा.. आलोच.. सॉरी.. एका ठिकाणी अडकलो होतो.. येतोच.." असे बोलत गौरीला बाय न करताच तो गेला.. गौरीला खरेतर त्याचा राग येत होता.. एकतर आधी तिथे ती त्याची बायको आहे असे म्हणाला.. नंतर तिलाच उलट सुलट सुनावून गेला.. याला काय अर्थ आहे.. विचारांच्या नादात ती घरी पोचली..
" गौरी काय हे? किती तो उशीर? आणि फोन का नव्हतीस उचलत?" आईने सरबत्ती सुरू केली..
" फोन?" गौरीने गोंधळल्यासारखे फोनकडे पाहिले.. फोनवर दहा मिस्ड कॉल होते.. आणि फोन सायलेंटवर होता..
" आई अग खरेच सॉरी.. ते ना सतत मेसेजेस आणि फोन येत होते.. प्रोजेक्ट करताना खूप डिस्टर्ब व्हायला होत होते म्हणून सायलेंटवर ठेवला.. परत नॉर्मल करायचे विसरले.."
" बरं. परत असे करू नको.." बाबा मध्ये बोलले.. पडत्या फळाची आज्ञा घेऊन गौरी आत पळाली..
" तू पण ना नंदिनी.. आल्या आल्या सुरुवात करतेस.. जरा दम तर खाऊ दे.." बाबा आईला म्हणाले..
"हो.. पण माझ्या जीवाला घोर लागला होता ना.. एकतर नवीन शहर.. त्यात
हि मुलगी फोनही उचलत नव्हती.. काय करू?"
" बरे आता ती आली ना घरी.. जा तिला जेवायला वाढ.. मी जाते झोपायला.." आजी दोघांचा वाद थांबवत म्हणाली..

" प्रथम, उशीर का झाला तुला? तुला माहित आहे ना आजी आजोबा तुझ्यासाठी जेवायला थांबतात ते.." प्रथमच्या आईने सविताने विचारले..
" अग हो.. मी वेळेत निघालो होतो.. पण थोडा प्रॉब्लेम झाला होता.." प्रथमने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला..
"आई तुझे जर तुझ्या लाडक्याशी बोलून झाले असेल तर जेवायला वाढशील का आता? खूप भूक लागली आहे.." सुचेताने प्रथमच्या बहिणीने आतून आवाज दिला..
" हो आलेच.. प्रथम जा.. हातपाय धुवून ये. मी पाने वाढायला घेते.."
"आजी आजोबा सॉरी.. पण तुम्ही माझ्यासाठी न थांबता जेवून घेत जा ना.. मला अजिबात आवडत नाही.. तुम्ही माझ्यासाठी थांबलेले.."
" मी पण कधीचे तेच सांगते आहे. पण माझे ऐकते कोण?" सुचेता हिरमुसून बोलली..
" त्याचे काय आहे, तू जेव्हा माझ्या वयाची होशील ना, तेव्हा कळेल.. घरातील सगळेजण दिवसातून एकदा तरी भेटणे किती गरजेचे आहे ते.. मग त्यासाठी आम्हाला हे असे वागावे लागते.." गायत्रीबाई म्हणाल्या..
" आई, तुझे चुकते आहे, असे नाही म्हणत पण तुला आता एवढा वेळ उपाशी राहणे झेपत नाही.. कधी मला उशीर होतो कधी याला.. मग तुलाच त्रास होतो.. बाबा सांगा ना तुम्हीच.."
" अच्युत या बाबतीत मात्र तुझी आई बरोबर बोलते आहे. तुम्ही जेव्हा बाहेरगावी असता तेव्हा ठिक आहे.. पण इथे असताना उगाचच पुढे मागे जेवणे मलाही नाही पटत.." शंकरराव बोलले..
" असो.. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली.. आई तुला माहित आहे, आज मला कोण भेटले?"
" आता ते मी कसे सांगू?"
" अग थोडा तर्क?"
" मला नाही आवडत तर्क करायला. सांग बरे पटकन.."
"अग शालिनीकाकू.."
" काय? शालिनी? ती कधी भेटली? कशी आहे ती?" गायत्रीबाई उत्सुकतेने विचारायला लागल्या.. आता हे कोण नवीन असा चेहरा करून प्रथम, सुचेता आणि सविता एकमेकांकडे पहायला लागले..
" आई ते सगळे इथेच आले आहेत रहायला.. आज मी एका कामासाठी सरकारी कार्यालयात गेलो होतो.. बाहेर त्याच्या नावाची पाटी वाचली.. मग ओळख काढली.. आज त्यांच्या घरी जाऊन आलो.."
"बाबा, मी उठलो तर चालेल का? दमलो आहे.. आणि उद्या परत लवकर कॉलेजला जायचे आहे.." प्रथमने विचारले.
" मी पण?" सुचेताला सुद्धा आजीच्या जुन्या मैत्रिणीत काही रस नव्हता..
" हो जा तुम्ही.." अच्युतने सांगितले..
दोघे आत गेलेले पाहून अच्युतने परत बोलणे सुरू केले.. "मी खरेतर आल्या आल्याच सांगणार होतो. पण एकापाठोपाठ एका चालू असलेल्या फोनकॉल मुळे विसरायला झाले.."
" कशी आहे रे ती आता?"
"ते छानच आहेत.. पण सुनीलची मुलगी मला प्रथमसाठी आवडली आहे.. छान, सोज्वळ.. अगदी लक्ष्मीसारखी वाटली मला. "
" अहो पण.. प्रथमचे अजून शिक्षण व्हायचे आहे.. एवढी घाई?" सविताने विचारले..
" मी कुठे लग्न ठरवले आहे? मला ती मुलगी आवडली बस एवढेच.. निर्णय तर सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे ना?"
"प्रथमचे काय?" शंकररावांनी विचारले.
" त्याला आत्ताच नको काही सांगायला. आधी त्याची परिक्षा होऊ दे नंतर बोलू.. तोपर्यंत तुम्ही मुलगी बघा.. आवडली तर जाऊ पुढे.."
" ह्म्म हरकत नाही.. तशी ती माणसेही चांगली आहेत.. बघूया.." आजी म्हणाल्या..

घरातले लग्न ठरवायला बघत आहेत.. पण प्रथम आणि गौरीला लग्न करायचे आहे का? बघू पुढिल भागात..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all