तुझे नि माझे जमेना

कथा द्वेषाची आणि प्रेमाची


" कान फुटले का? कधीचा हॉर्न वाजवतो आहे.. ऐकू येत नाही का? पार्कात चालताय का?"
" ओ मिस्टर तोंड सांभाळून बोलायचे.. आणि हे पार्क जरी नसले तरी हा कॉलेजचा प्रिमाइस आहे.. आम्ही कुठेही चालू शकतो.."
" चालताना हॉर्न ऐकू नये, असा कुठे नियम आहे का? अरे हो पण कसे ऐकू येणार एका कानात एअरपॉड्स दुसर्‍या बाजूला मैत्रिणींशी गप्पा.. बरोबर आहे गाडी चालवणाऱ्याचीच चूक आहे.. त्याने ना खाली उतरायचे आणि चालणार्‍याच्या हातात मोबाईल आहे का, कानात काही आहे का हे बघायचे आणि मग गाडी पुढे न्यायची."
" आपण पण ना कोणाशी बोलतो आहोत.. चला पटापट नाहीतर लेक्चरला उशीर होईल.."
" ओ मिस.."
" आता काय?"
" लेक्चरला बसताना कानात एअरपॉड्स ठेवू नका.. नाहीतर शिकवलेले समजणार नाही.."
" यू फूल..."
" फ्लॉवर नही फायर..." आणि तो गाडी उडवत तिथून निघून गेला..
आता तुम्हाला प्रश्न पडला असणार कि तो कोण? तर तो आहे या कथेचा नायक प्रथम.. थोडे वेगळे नाव आहे ना? पण तो हि असाच वेगळा आहे.. आता नायक आहे म्हटल्यावर तो टाॅल, डार्क , हँडसम असलाच पाहिजे नाही का? तसा तो आहेच पण याच्याकडे अजून एक नाही दोन गोष्टी आहेत.. एक म्हणजे निरागसपणा आणि तेवढाच रागीटपणा.. वडिल उद्योगपती असल्यामुळे पैसा भरपूर हातात.. त्यामुळे मित्रपरिवार मोठा.. आईवडिलांचा आणि धाकट्या बहिणीचा जीव कि प्राण.. प्रथमचे कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू आहे. यानंतर त्याच्यासमोर दोन पर्याय वडिलांना जॉइन करायचे किंवा परदेशी शिक्षणासाठी जायचे. त्यामुळे आमचा हिरो सध्या आयुष्याचे मजे घेतो आहे..

मगाशी जी चिडली होती ना, ती आहे या कथेची नायिका गौरी.. आता ती ही नायिका आहे मग ती थोडीच पाठी राहणार? तर ती हि आहे खूप सुंदर, हसताना मोती वगैरे सांडणारी गालावर छान खळ्या असलेली.. लांबसडक केस मोकळे सोडणारी..
पण हिचा एक प्रॉब्लेम आहे..हि आपली मुळूमुळू रडणारी नाही. हिला अन्याय अजिबात सहन होत नाही. अरे ला कारे करणारी हि आहे.. गरजूंना मदत करणे हिचा धर्म.. आता बघूया अशा या दोघांचे जुळते कि फाटते..

" काय रे अव्या ते नवीन पाखरू कोण आहे ?" प्रथमने त्याच्या मित्राला विचारले.
" ती? तिच्यापासून थोडा लांबच रहा."
" का रे? "
" अरे ती शर्मिला सांगत होती.. कोणा बड्या अधिकाऱ्याची मुलगी आहे.. वडिलांची बदली झाली आहे म्हणून इथे आली आहे.. ती पण लास्ट इयरला आहे.."
" मग मला इतके दिवस कशी नाही दिसली?"
" त्याचे काय आहे आपण आज कितीतरी दिवसांनी कॉलेजला आला आहात.. गेले आठ दिवस आम्ही रोज तिला बघतो आहोत.. पण हिंमत कोणाची तिची मस्करी करायची.. या रमेशने नवीन दिसली म्हणून तिच्या अंगावर नेहमीची रबराची पाल टाकली. तर तिने याच्या अंगावर खरी पाल टाकली.."
" काय रे रमेश, हे खरे आहे?"
रमेशने लाजत मान खाली घातली.. प्रथमने हसत त्याच्या पाठीवर थाप मारली.. " मी मिस केले यार.. आता मजा येईल कॉलेजमध्ये.."

"काय ग, कोण होता तो? तू एवढ्या प्रेमाने त्याच्याकडे पहात होतीस.." गौरीने डोळे फिरवत तिच्या मैत्रिणीला विचारले.
" तो? तो या कॉलेजचा मोस्ट एलिजिबल बॅचलर. माझा तर विश्वासच बसत नाही तो आपल्याशी म्हणजे तुझ्याशी बोलला.. मुली मरतात त्याच्याशी बोलायला.. आणि तू कसली तुसड्यासारखी बोलत होतीस त्याच्याशी?" शर्मिलाने तिची नाराजी दर्शवली..
" ए बाई, त्याने माझ्या अंगावर गाडी आणली.. मग मी काय त्याचे ऐकून घेऊ? सॉरीच हां.. आपल्याला नाही जमणार असे.. आणि परत एकदा माझी खोडी काढू दे त्याला.. बघतेच.. मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणे.." गौरी शर्मिलाला चिडवत म्हणाली..

हि होती दोघांची पहिली भेट.. पुढे बघूया दोघांची कथा काय वळण घेते ते..

कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all