Login

तुझे नि माझे जमेना. अंतिम भाग..

कथा गौरी आणि प्रथमची


तुझे नि माझे जमेना भाग २७


मागील भागात आपण पाहिले की शेवटी गौरी आपले प्रेम प्रथमला बोलून दाखवते. आता पाहू पुढे काय होते ते..

" माझ्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज.. काहीही.." गौरी गोरीमोरी झाली होती.
" हो का? हा कसला रूड आहे. याच्याशी कोण लग्न करणार वगैरे वगैरे.." गौरीने लाजेने तोंड हाताने झाकून घेतले होते.
" अजून ऐकायचे आहे का? इथे आल्यावर पण तू आधी काकूंशी बोलून खात्री करून घेतलीस. त्याही आधी आत्याशी बोलून तू इथे यायचे ठरवलेस."
" तुला कसे हे माहित?"
" त्या दिवशी अव्या तुझ्या पाठीच होता. आणि जेव्हा तू मला न सांगता इथे आलीस तेव्हाच मी ओळखले होते की आत्यानेच तुला हा सल्ला दिला असणार. कारण माझ्या मनातला गिल्ट निघून जावा म्हणून ती कितीतरी वर्षे मी इथे यावे म्हणून माझ्या पाठी लागली आहे. मी येत नव्हतो कारण मला माझी स्वतःचीच भिती वाटत होती. पण आता असे वाटते आधीच यायला हवे होते."
" तू चिडला नाहीस माझ्यावर?" गौरीने बोटांच्या फटीतून प्रथमकडे बघत विचारले.
" मी तुला चिडका वाटतो का?" प्रथमने आश्चर्याने विचारले.
" हो.. मला तुझ्या रागाची भिती वाटते." गौरीने तोंडावरचा हात घट्ट केला.
"याचा अर्थ आजी खोटे बोलत होत्या."
" माझी आजी.. आणि खोटे.. कधीच नाही.."
" पण त्या तर म्हणत होत्या, आमची गौरी खूप धीट आहे. कोणालाच घाबरत नाही." प्रथम आजींची नक्कल करत बोलला.
" तू पण ना?" गौरीने त्याला मारायला हात उचलला.. प्रथमने तो वरचेवर धरला.
" आता हे समज, गैरसमज , वादविवाद, अबोला सगळे सोडून आपल्या खऱ्या सहजीवनाला सुरुवात करुया? तुझी इच्छा असेल तर आणि तरच.." गौरीने आपला सलज्ज होकार दिला.
रात्रीची जेवणं झाल्यावर प्रथम तिला घेऊन बागेत गेला. तिथे रातराणी बहरली होती. दोघेही तिथल्या झोपाळ्यावर बसले. प्रथमने मंद झोका घ्यायला सुरुवात केली. गौरी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती.
" तू इथे एकटी थोडावेळ बसशील?" प्रथमने तिचा हात हातात घेऊन विचारले.
" का?"
" थोडे काम आहे. मी तुला फोन करतो. मग तू ये आत.."
" मी पण येते ना.."
" नाही.. मी बोलावल्यावरच ये. प्लीज.." प्रथम आर्जव करत म्हणाला. गौरीने नाराजीनेच होकार दिला. प्रथम गेल्यावर ती एकटीच विचार करत बसली होती.
" आयुष्य किती वेगळे झाले आहे. ज्याचा आधी खूप राग येत होता त्याच्याशिवाय राहणे म्हणजे शिक्षा वाटू लागली आहे." तिला अचानक घरच्यांची खूप आठवण यायला लागली. तिला आठवले, आजीचा फोन आला होता. या प्रथमच्या नादात घरी फोन करणे राहूनच गेले. तिने घरी फोन लावला..
" आई.."
" गौरी.. कधीची फोनची वाट पाहते आहे. आता वेळ मिळाला का तुला? " आई थोडी चिडली होती.
" नाही ग आई. अग पाय मुरगळला होता थोडा. मग राहूनच गेले."
" आता कसा आहे पाय तुझा?" आईने काळजीने विचारले.
" बरा आहे. प्रथमने लेप लावला आहे."
" काय ग? काय झाले तुझ्या पायाला?" आजीने फोन घेत विचारले..
" काही नाही ग.. उगाचच. तू कशी आहेस?"
" गौरी.. मला तुझी माफी मागायची आहे."
" आजी.. आपल्यामध्ये कधीपासून माफी हा शब्द यायला लागला?"
" तू खुश आहेस ना?"
" हो.."
" धर.. तुझ्या बाबाशी बोल."
" गौरी, लग्न झाल्या झाल्या विसरलीस बाबाला?"
" नाही हं बाबा. आम्ही आता इथे बाहेर आलो आहोत. म्हणून राहिले."
" मस्करी करत होतो.. तू काळजी घे."
" हो. तुम्ही पण घ्या. दादा कसा आहे?"
" फायनली माझी आठवण आली का? मग प्रथम बरा आहे ना? की छळलंस त्याला खूप?"
" काहीही हं दादा.. मी छळते का कोणाला?"
" खूप.. आता आम्ही मिस करतो आहोत हे छळणे.."
" दादा.."
" चल ठेव फोन.. उगाच रडारड नको फोनवर. आलीस की कळव. मग आपण भेटू."
" हो.." गौरीने फोन ठेवला. समोर प्रथम उभा होता..
" एनिथिंग सिरियस?" त्याने विचारले.
"अंहं.. घरी बोलले.."
" ओह्ह.. मग चलायचे की इथेच थांबायचे?"
" जाऊयात.. पण तू फोन करणार होतास ना?"
" नाही केला.. चल.." प्रथमने तिचा हात मागितला. तिने विश्वासाने त्याच्या हातात हात दिला. दोघे घराच्या दिशेने चालू लागले..
" काका काकू?" गौरीला मध्येच आठवले.
" ते आज रात्री त्यांच्या गावातल्या घरी रहायला गेले आहेत. आईबाबा, आजी आजोबा, सुचेता सगळे आत्याकडे दोन दिवस जाणार आहेत.. आपल्या स्वयंपाकाच्या मावशी आणि ड्रायव्हर काकांना घेऊन.. अजून कोणी राहिले आहे का?"
" तू मस्करी करतो आहेस माझी?" गौरीने डोळे बारीक करत विचारले.
" तुझी मस्करी आणि मी? माझी नाही एवढी हिंमत." हसू लपवत प्रथम म्हणाला. त्याच्या हसण्याने गौरी मात्र चिडली. त्याचा हात झटकून ती खोलीत गेली आणि थक्क झाली.. खोली फुलांनी सजवली होती.. मंद दिवे जळत होते. गोडसा सुगंध दरवळत होता.. गौरी थक्कच झाली.. पाठीमागून प्रथमने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले..
" आवडले?"
" खूप.. पण हे केलेस तरी कधी?"
" तू आणि तुझे प्रश्न.. आता काहीच बोलायचे नाही.. फक्त एकमेकांमध्ये हरवून जायचे.. कबूल?"


गौरी आणि प्रथम.. दोघांचा शेवटी सुखी संसार सुरू झाला. प्रथमने वचन दिल्याप्रमाणे गौरीच्या करिअरला जास्त महत्त्व देत तिचे तिच्या बाबांसारखे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायला मदत केली. त्याने स्वतःचे परदेशी जाण्याचे स्वप्न तर सोडून दिलेच होते.. घरचा व्यवसाय त्याने जोमाने सांभाळायला सुरुवात केली. राजचे लग्न झाले. सुचिताचे शिक्षण चालू होते.. दोन्ही आजी आणि आजोबा ज्या गोष्टीची वाट पहात होते ती ही गोष्ट झाली.. प्रथम आणि गौरी एका क्युटशा परीचे आणि गोंडस राजकुमाराचे आईबाबा झाले.. आणि आयुष्य पुढे चालू राहिले..



तुझे नि माझे जमेना..

थोडक्यात संपेल असे वाटलेली कथा पण नाही.. थोडी थोडी म्हणता म्हणता २७ भागांची झाली.. तुम्ही सर्वांनीच प्रथम व गौरीवर केलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.. असेच प्रेम असूदे..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all