तुझे नि माझे जमेना भाग १२

कथा एका वेगळ्या प्रेमाची

तुझे नि माझे जमेना भाग १२



मागील भागात आपण पाहिले कि प्रथम आणि गौरीच्या परिक्षा संपल्या आहेत.. प्रथमच्या आजीला हॉस्पिटल मध्ये ॲडमिट व्हावे लागते.. आता पुढे बघू काय होते ते..


" डॉक्टर.. आजी खूप सिरियस नाही ना?" प्रथमने घाबरून विचारले..

" ते चेक न करता आम्ही कसे सांगणार? थोडा वेळ द्या.. आम्ही आधी टेस्ट करून घेतो.. तोपर्यंत तुम्ही बाहेरच बसा.." डॉक्टर आत गेले.. आत आजी त्यांची वाटच पहात होत्या. " बोला डॉक्टर.."

" मी काय बोलणार गायत्रीबाई? हॉस्पिटलच्या विश्वस्तांपैकी एक तुम्ही आहात. मी काय सांगू? पण माझ्या नियमात हे बसत नाही.."

" डॉक्टर, तुम्ही देवाला मानता?"

" हो.. त्याचा इथे काय संबंध?"

" ते कसं आहे, एखाद्याचे चांगले होत असेल तर त्याच्यासाठी एखादे खोटे बोलायला हरकत नसते.."

" असे कुठे लिहिले आहे?"

" मी वाचलंय कुठेतरी.. पण त्यावर वाद घालण्याआधी आपण महत्वाचे काम करू.. मी तुमचे डायलॉग्ज तुम्हाला सांगते.. ते असेच्या असे जाऊन प्रथमसमोर बोलायचे.."

" पण..."

" पण नाही आणि बीण नाही.. मी पदर पसरते तुमच्यासमोर.. हाच एक शेवटचा उपाय आहे माझ्या नातवाला लग्नासाठी तयार करायचा.." डॉक्टर वैतागून काहीतरी पुटपुटत बाहेर गेले. त्यांना बघून अच्युत, प्रथम पुढे आले.

" डॉक्टर आई कशी आहे?" 

" त्या सिरीयस आहेत.." डॉक्टर मान खाली घालून बोलले..

" गायत्री....." आजोबांनी परत सुरुवात केली..

" बाबा सांभाळा स्वतःला.." अच्युत शंकररावांच्या जवळ जात म्हणाला.. 

"हे जरा जास्त होतय.. थोडे कंट्रोल करा.." त्याने हळू आवाजात आजोबांना सांगितले.. आजोबांनी सूर थोडा कमी केला..

" डॉक्टर, नक्की काय झाले आहे आजीला?" प्रथमने विचारले..

" त्यांची जगण्याची इच्छाच नाही असं दिसते आहे.. खूप दिवस त्या नीट जेवल्या नाहीत असे दिसते आहे.. त्यांना काही प्रॉब्लेम आहे का?" डॉक्टरांनी विचारले.. आत सफरचंद खात असलेल्या आजी दरवाजात उभ्या राहून सगळे ऐकत होत्या..

" नाही.. आजी तर व्यवस्थित जेवत होती.. " प्रथम आठवत म्हणाला.

" तू कधी बघितलेस तिला जेवताना? बरोबर आहे डॉक्टर तुमचे.. तिला ना प्रथमचे लग्न बघायचे आहे.. पण हा तर दोन महिन्यांनी परदेशी जायचे म्हणतो आहे. म्हणून तिने अन्न सोडले आहे.." आजोबा प्रथमकडे रागाने बघत म्हणाले..

" आजोबा मी? माझ्यामुळे आजी?" प्रथमला रडायला येत होते..

" हो.. तुझ्यामुळे.. सतत आपले मी परदेशी जातो.. परदेशी जातो. फक्त स्वतःचा विचार करायचा.. आमचा विचारच नाही करायचा.. आजी, आजोबा, आई, बाबा, बहीण आपल्या शिवाय कसे राहतील? हा विचारच नाही.. का नाही तिला वाईट वाटणार? तिला नाही का वाटत नातवंडाचे लग्न पहावे.. पतवंड पहावी.. पण नाही तुझेच खरे.." आजोबा पोटतिडीकीने बोलत होते..

" बाबा शांत व्हा.." अच्युत आजोबांपाशी गेला..

" त्याच्यामुळे गायत्रीला काही झाले ना तर माफ नाही करणार मी त्याला.." आजोबा बोलले.. प्रथमच्या डोळ्यातून पाणी वहात होते.. नेहमी प्रेमाने बोलणारे आजोबा आज पहिल्यांदाच एवढे चिडले होते.. आजोबांचा आविर्भाव पाहून डॉक्टर परत आत गेले.. दरवाजात उभ्या असलेल्या आजी त्यांना पाहून दचकल्या..

" आत येताना नॉक करायचे ना.."

" ते सोडा.. बाहेर काय सांगू ते सांगा.. आजोबा खूप चिडले आहेत.. मला ना समजतच नाही कि मी डॉक्टर आहे कि ॲक्टर.." डॉक्टर उदास होत बोलले..

" काही डॉक्टर पण ॲक्टर असतात कि.. ते जाऊ दे.. तुम्ही बाहेर जाऊन सांगा मी शुद्धीवर आले आहे म्हणून. "

"सर, मॅडम शुद्धीवर आल्या आहेत.. तुम्ही भेटू शकता.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा.. त्यांना धक्का बसेल असे काही बोलू नका.."

" हो डॉक्टर.." तिघेही आत गेले..

" गायत्री.."

" मी बरी आहे.. तुम्ही नका काळजी करू.." आजी थकलेल्या आवाजात बोलल्या.. प्रथम आजीजवळ गेला.

" आजी मी तुला खूप त्रास देतो का ग? माझ्यामुळे तू इथे आहेस का?" तो रडत म्हणाला..

" नाही रे बाळा.. तू नाही त्रास देत मला.. पण मला तुझे लग्न बघायचे आहे ते ही तेवढेच खरे.."

" पण आजी.."

" जाऊ दे.. जबरदस्ती नाही करत. मी अशीच मरणार.."

" तू तरी कशाला त्याला छळतेस.. सुखदाच्या प्रणितचे होईल ना लग्न त्यात सुख मानून घे.." आजोबा अजून चिडलेलेच होते..

" ती पण माझी नातसून असेलच.. पण ती थोडीच आपल्यासोबत राहणार आहे.. असो पण तुम्ही म्हणता तर तसे तर तसे. " आजी सुस्कारा सोडत म्हणाल्या.. प्रथम आजीचा हात हातात घेऊन हे सगळे ऐकत होता.. " आजी मी करतो लग्न."

" काय? काय बोललास तू?"

" तुला एवढेच वाटते ना, माझे लग्न व्हावे, मी परदेशी न जावे , तर मी तयार आहे.. पण तू बरी हो.. आणि आजोबांना सांग माझ्यावर चिडू नका म्हणून.." प्रथमच्या डोळ्यात अजूनही पाणी होते..

" बघ हा.. आता मी आजारी आहे म्हणून हो म्हणशील, मी बरी झाले कि परत नाही.." आजींनी खुंटा हलवून बळकट केला.."

" आजी प्रॉमीस.. आपल्या घरासाठी काहिही.. मगाशी आजोबा बोलले ना, मी फक्त स्वतःचा विचार करतो.. पण नाही आता मी घरातल्यांचा विचार करणार.."

" मी म्हणेन त्या मुलीशी लग्न करशील?" आजीने परत विचारले..

" हो.." प्रथमच्या डोळ्यासमोर नऊवारी नेसलेले, चंद्रकोर लावलेले रूप साकारत होते.. त्याने निर्धाराने तो चेहरा पुसून टाकला..

" मग होईन हो मी बरी लवकर.." आजीच्या चेहर्‍यावर हसू फुटले.. ते बघून प्रथम कसाबसा हसला..

" मग तुझ्यासाठी काय आणू खायला? डॉक्टर म्हणाले कि तू उपाशी आहेस."

" खायला कशाला आणतोस इथे? घरीच जाऊ कि.."

" अग असे कसे डॉक्टर सोडतील? आलीस तेव्हा गंभीर होतीस ना?" प्रथमने आश्चर्याने विचारले.. 

" प्रथम तू डॉक्टरांशी बोलून ये जरा.." अच्युत मध्यस्थी करत म्हणाला.. प्रथम बाहेर गेल्याची त्याने खात्री करून घेतली..

" आई, तू पण डेंजर आहेस ग.. किती घाबरलो होतो आम्ही आधी.. नशीब सुचेताने मॅसेज करून सांगितले.."

" घाबरायचे काय त्यात? मी काय पतवंड बघितल्याशिवाय जात नाही वर.. बरोबर ना अहो?"

" मला हे थोडे चुकीचे वाटते आहे.." शंकरराव गंभीरपणे बोलले. 

" आता हे काय नवीन?" आजींनी विचारले..

" आपण त्याच्या भावनांशी खेळतो आहे असं वाटतय.. मगाशी मीच विसरलो तू नाटक करते आहेस आणि काय काय बोलून गेलो.. माझी हि अवस्था.. मग त्याचे काय झाले असेल?"

" तुम्ही नका जास्त गंभीर होऊ आता सांगून ठेवते.. नाहीतर माझा बनाबनाया कार्यक्रम खराब कराल.." आजींनी धमकी दिली..

" आई.. अग पण मग त्या गौरीचे काय? तिचे कसे करायचे?" अच्युतने विचारले..

" ते पण आहे ना.. मग घरी जाऊन कसे चालेल? एक काम कर.. त्या शालिनीला फोन करून सांग, मी हॉस्पिटलमध्ये आहे.. बघते काहीतरी." यांचे बोलणे होईपर्यंत प्रथम डॉक्टरांना घेऊन आलाच होता.

"मी विचारले डॉक्टरांना, आजीला घरी नेता येईल का? तर ते म्हणाले आजीला विचारून सांगतो.. असे काय वागत आहेत ते?" प्रथमने अच्युतला हळू आवाजात विचारले..

" अरे म्हणजे उगाच आईच्या मनाविरुद्ध नको... म्हणून असेल ते.. तू नको विचार करूस जास्त.. तू घरी जातोस का?" अच्युतने विचारले..

" नको.. बघू डॉक्टर काय म्हणतात ते. आजीला जर इथे ठेवत असतील तर मग तुम्ही जा घरी. मी थांबतो इथेच.."

तोपर्यंत डॉक्टर आणि आजींचे बोलून झाले होते..

" आज राहू दे आजींना इथे.. उद्या देतो डिस्चार्ज.." डॉक्टर म्हणाले.. अच्युत आणि आजोबा घरी गेले.. सुचेता आणि सविता नंतर डबा घेऊन येणार होत्या.. प्रथम एकटाच तिथे विचार करत बसला होता..

" माझे आयुष्य कधीतरी सुरळित होणार आहे का?" तो स्वतःलाच विचारत होता.. " त्या गोष्टीपासून दूर जायचे ठरवत होतो.. पण इथेच अडकून रहायला लागत आहे.."



नक्की प्रथम कशापासून दूर पळतो आहे? प्रथमचा होकार तर आला, गौरी देईल? बघू पुढील भागात..



डॉक्टर असे खोटे पेशंट घेत नसतील.. पण कथेसाठी मी हे स्वातंत्र्य घेतले आहे..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all