तुझे नि माझे जमेना भाग ११

कथा प्रेमाची
तुझे नि माझे जमेना भाग ११


मागील भागात आपण पाहिले कि प्रथम गौरीला घेऊन खाली येतो.. सुचेता जेव्हा त्याच्या खोलीत जाते तेव्हा तो रडत असतो.. पुढे बघू काय होते ते..


अच्युत आणि सविता प्रथमला शांत करून आपल्या खोलीत आले..
" हे कधीच संपणार नाही का?" सविताने रडत अच्युतला विचारले..
" म्हणून तर मी त्याच्या लग्नाची घाई करतो आहे.. मला सुद्धा त्याने यातून बाहेर यावे असे वाटते.."
" पण गौरीच्या घरातल्यांना हे सांगायला नको?"
" सध्यातरी नको.. आणि तसाही तो काही आजारी नाही.. पण हे सांगितल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल माहित नाही.. मला आता माझ्या मुलासाठी कोणतीही रिस्क घ्यायची नाही.."
" पण हे फसवल्यासारखे नाही का होणार?"
" मग तुझी काय इच्छा आहे? मी त्यांना जाऊन सगळे खरे सांगावे? आणि जर उद्या त्यांनी नकार दिला तर मग मुलगाही विसरा आणि त्याचे लग्नही.." अच्युत चिडून बोलत होता.
सविता काही न बोलता रडत होती.. ते पाहून अच्युत वरमला..
" विश्वास ठेव माझ्यावर.. मी जेव्हा त्या गौरीला पाहिले तेव्हाच मला असे आतून वाटले कि तीच आपल्या मुलाला यातून बाहेर काढू शकेल.. मी कोणालाही फसवत नाही हे तुला माहीत आहे ना.. आपण फक्त एक घटना त्यांना सांगत नाही आहोत.. त्यातूनही यात तिचे काही वाईट होते आहे असे वाटले असते तर मी खरेच हे पाऊल उचलले नसते."
"पटतेय मला.."
"मग यांची परिक्षा झाली कि लगेच लग्नाचा बार उडवू.."

" नंदिनी, ए नंदिनी.."
" काय झाले? कशाला बोलावले?"
" गौरी कुठे आहे?"
" ती शर्मिलाकडे गेली आहे. काही काम होते का तिच्याकडे?"
" नाही.. तिच्यासमोर बोलायचे नाही.. अग अच्युतचा मॅसेज आला आहे.. प्रथम पसंत असेल तर परीक्षेनंतर मुहूर्त धरायचा का?"
" एवढ्या लगेच? गौरी नाही तयार होणार.. मलाही तितकेसे पटते आहे असे नाही.." नंदिनी म्हणाली.
" तुमची हरकत नसेल तर मी बोलू?" आजींनी विचारले..
" आई तुला कधीपासून परवानगीची गरज लागली?"
" असे नाही रे.. नवरा बायकोच्या मध्ये बोलू नये असे म्हणतात म्हणून विचारतेय.."
" बोल ग.."
" मला सांग, गौरीने जर कॉलेजमध्ये तिचे तिचे जमवले असते तर तुम्ही परवानगी दिली असती का?"
" मुलगा चांगला असता तर नक्कीच. " सुनील नंदिनीकडे बघत म्हणाला.
" मग इथे समोरून स्थळ आले आहे म्हणून तुम्ही नको म्हणताय कि ते आपल्या ओळखीचे आहेत म्हणून लगेच नको म्हणताय?"
" आई, काहीच सुचत नाहीये.. एका बाजूला वाटते लग्न लगेच लावून टाकावे.. दुसरीकडे नको वाटतेय.."
" असे असेल तर नको जास्त विचार करूस.. सगळे माझ्यावर सोड.. तुला मुलगा आवडला का?"
" हो.. पण गौरीचे काय?" सुनील आणि नंदिनीने एकदम विचारले.
"ते माझ्यावर सोपव.."

गौरी आणि प्रथमची परिक्षा होईपर्यंत दोन्ही घरातून लग्नाचा विषय बंद होता. आता दोन्ही आजी बाहेर भेटत होत्या.. कधीतरी सुचेतापण सोबत असायची.. त्यांचे प्लॅन त्यांनाच माहीत. ज्यांच्यासाठी हे सगळे चालले होते ते प्रथम आणि गौरी मात्र यापासून अनभिज्ञ होते. गौरीला एकदा वाटले होते कि प्रथमला थँक यू म्हणायला जावे पण नंतर त्याचा आलेला अनुभव पाहून तिने मनाला आवर घातला.. प्रथमही तिला बघून न बघितल्यासारखे करतच होता.. शेवटी एकदाच्या दोघांच्याही परिक्षा संपल्या. त्याआधीच सुचेताचीही संपली होती. आता सुरू होणार होता दोन्ही आजींचा मास्टर प्लॅन..

परिक्षा संपल्यामुळे प्रथम निवांत हॉलमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसला होता.. आजी बाजूला येऊन बसली.. तिने टिव्ही लावला.. टिव्हीवर नेमका चेन्नई एक्स्प्रेस नुकताच सुरू झाला होता.. "ये हुई ना बात.." आजी स्वतःशीच पुटपुटली.. शाहरूख आणि त्याच्या आजीचा सीन सुरू झाला.. इथे आजीने डोळ्यातून पाणी काढायला सुरुवात केली.. तरिही प्रथमचे लक्ष नाही हे बघून मग जोरजोरात हुंदके द्यायला सुरुवात केली.. 
" काय ग आजी.. का रडतेस?"
" बघ ना, किती आज्ञाधारक नातू आहे.. आपल्या आजोबांसाठी काहिही करायला तयार आहे.. कितीही वेळा पिक्चर बघितला तरी त्याचे आजोबा मरताना मला रडायला येते.."
" कमॉन आजी.. तू पण ना.. तो फक्त एक पिक्चर आहे.. कुठे सिरीयसली घेतेस या गोष्टी?"
" या गोष्टी नाही घेणार, मग कोणत्या घ्यायच्या ते तूच सांग.. आम्ही काय बाबा पिकली पाने.. आज आहेत उद्या नाही.. कशात तरी मन रंगवायचे म्हणजे झाले.. आता बघ हा.. तू, सुचेता लहान होता तेव्हा तुमच्यात मन रंगवले.. आता तुमचे जग वेगळे झाले मग असे विरंगुळे शोधून काढायचे.. आता एखादे पतवंड असते तर रमले असते.. पण ती सुचेता अजून लहान आणि तुला तर लग्नच करायचे नाही.. मग हि अशी आज्ञाधारक नातवंडे बघून मनाचे समाधान करायचे. " आजी नाटकी सुस्कारा टाकत म्हणाल्या..
" मी इथे बसू कि नको?" प्रथमने विचारले..
" बस कि.. घर जरी माझे असले तरिही आमच्या नंतर तुझ्या बाबाचे आणि नंतर तुझेच आहे.. म्हणजे तू इथे राहिलास तर.." आजी खडा टाकत म्हणाल्या..
" आजी तू ना इम्पॉसिबल आहेस.." नेहमी हा विषय काढल्यावर चिडून निघून जाणारा मुलगा आज इथेच बसून आहे हे पाहून आजी खुश झाल्या.. आपण योग्य दिशेने जातो आहे याची त्यांना खात्री पटली.

" गौरी, ए गौरी."
" काय झाले ग आजी?"
" काही कामात आहेस का?"
" थोडा तुम्हाला त्रास द्यायचा विचार करते आहे.."
" म्हणजे ग?"
" अग, नवीन रेसिपी ट्राय करते आहे. बोल तुझे काय काम आहे.."
" काम असे काही खास नाही.. तुला विचारायचे होते थोडे.."
" विचार कि.." पीठ भिजवता भिजवता गौरी हसत म्हणाली.
" तो प्रथम कसा आहे ग?" आजीने विचारले.. गौरीचा पीठ भिजवणारा हात थांबला.. ह्रदयात धाकधूक सुरू झाली..
" मला नाही माहित.. पण तू मला का विचारते आहेस?" गौरी मान फिरवत म्हणाली..
" अग, त्या सुधामामी आहेत ना, त्यांची नात आहे लग्नाची.. त्या दिवशी त्यांचा फोन आला होता.. तर माझ्या डोळ्यासमोर हा मुलगा आला. पण म्हटले असे कोणतेही स्थळ कसे सुचवायचे? तुझ्या कॉलेजमध्ये आता ना, मग स्वभाव तुला माहित असावा म्हणून विचारले.."
" नाही आजी.. आम्ही कॉलेजमध्ये बोलत नाही.. पण तो मुलगा चांगला आहे.." गौरी बोलून गेली.
" चला.. मुलगा चांगला आहे म्हणजे स्थळ सुचवायला हरकत नाही.." आजी गौरीच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत म्हणाल्या.. गौरी पिठात हात घालून तशीच उभी होती..
" अग, काय विचारते.. स्थळ सुचवूना त्याचे? कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल ना?"
" हो.." गौरी म्हणाली..
" ते पीठ बघ.. पाणी जास्त आणि पीठ कमी झाले आहे त्यात.." आजी म्हणाल्या.. आजी तिथून गेल्या तरी गौरीला कळले नव्हते..
" गायत्री आमचा हिरवा सिग्नल.. तुमचे काय?"
" आमचा तर कधीचाच हिरवा आहे.."
" मग आता?"
" आता? तयारी सुरू.."
" सुचेता, तयार?" आजींनी विचारले..
 " हो.."

" बाबा, दादा आजी कशी करते आहे." सुचेता जोरात ओरडत म्हणाली. 
" आई.. काय ग काय झाले?"
"बाबा, मी डॉक्टरांना फोन करतो.."
" गायत्री मला सोडून नको ग जाऊस.." आजोबांनी सूर लावला..
" बाबा.. काहिही काय बोलताय?"
" बाबा, डॉक्टरांनी आपल्यालाच हॉस्पिटलमध्ये बोलावले आहे.. ते म्हणाले काही गंभीर असेल तर वेळ वाया नको जायला.."
" गायत्री.. " आजोबांनी परत सुरुवात केली..
" आजोबा.. प्लीज शांत व्हा.. बाबा तुम्ही गाडी काढा.. मी आजीला घेऊन येतो. "


नक्की काय झाले असेल आजींना? पाहू पुढील भागात..

सारिका कंदलगांवकर
 दादर

🎭 Series Post

View all